कौस्तुभ केळकर- नगरवाला

जिगरी मतर सदाभौ यांस,

दादासाहेब गांवकरचा दंडवत.

वॉट्श्शाप सदाभौ? मंजी काय चाल्लया? कशी काय चाललीया डान्स प्रॅक्टिश? न्हाई म्हन्लं, कुनी मनपसंत डान्श पार्टनर गावला की न्हाई? का तुम्च्या लाईफपार्टनरनं डान्शपार्टनरचा पत्ता कट क्येला की काय? चालतंय की! नाचताना डोळं उघडं ठय़ेवलं की जालं. नजर कशी भिरभिरती पायजेल. येकदम धूपछाव शिल्क साडीवानी. गोविंदावानी आंखियोंसे गोली मारता यायला पायजेल. अशोक मामांसारकं ‘निशाणा तुला दिसला ना?’ असं ईचारता यायला हवं. सदाभौ, जरा जपून. ‘समदं आम्च्या वैनीसायेबांच्या नजरंला पडनार न्हाई’  ह्यची तजवीज जम्ली पायजेल. तुम्चं नजरेचं ख्येळ त्यांच्या ध्यानामंदी आलं की मंग नजरबंदी. डोस्की दांडिया! टिपऱ्यांचं घाव बरुब्बर डोस्क्यात. येक घाव दोन तुकडं. फिकीर न्हाई. आम्च्याकडं येक अक्सीर ईलाज हाई.

हेल्मेट दांडिया! मंजी दांडिया खेळताना डोईवर हेल्मेट पायजेल. तेची काळी काच खाली वढली की येकदम शेफ. नजरबंदीचं खेळ बायकूच्या नजरंस पडत न्हाईत. आन् समजा डोळ्यावर आलं तरीबी फिकीर न्हाई. दोनचार टिपऱ्यांचं तडाखं डोईवर पडत्यात. पण आवं, हेल्मेट हाई की. सिर सलामत तो पगडी पचास. आम्च्याकडं ‘हेल्मेट गरबा’ लई पाप्युलर हाई. तुमीबी ट्राय करून बगा.

आमीबी वॉट्श्शाप इद्यापीठाचं डबल ग्रॅडय़ुयेट हाई म्हन्लं. कापी आन् प्येष्ट. आमास्नी येकदम ब्येश्ट जमून ऱ्हायलय. त्यो गरबाचा डान्स फीव्हर ममईहून शून्य मिल्टात गावाकडं पोचतू. चावडीम्होरं गरबा मदान. झ्याक लायटिंग आसती. नगरहून डाल्बीची भिंत येती मुक्कामाला धा दिस. रातच्याला देवीची आरती जाली की धुमशान! नुस्ता थरथराट. दे दनादन. जो तो झपाटल्येला. समदे डान्शच्या भुतानी पछाडल्येले. चार वर्षांचं पोर न्हाई तर साठीची म्हातारी. समद्यो नाचत्यात. बेधुंद मनाच्या लहरी! समद्योच शुपर डान्सर; रातच्याला दीड-दोन वाजंपर्यंत. आमचं गावबी सराटच हाई. गावचं पोर येरवी पंदरा मिन्टं आभ्यास करून ऱ्हायलं की दमतं. पाठ दुखाया लागत्ये त्येची. आता चार-पाच घंटे शॉक बसल्यावानी थिरकत्यात. पर कायबी कम्प्लेंट न्हाई. बिलकूल बॉडीपेन न्हाई. हातात पेन-पेन्सिल धराया टाईम गावंना. या टायमाला समदी पोरं ग्येल्ती भोईर मास्तरांकडं, तेन्ला रिक्वेश्ट कराया. ‘‘मास्तर, कायबाय अ‍ॅडजेश्टमेन्ट कराच. येक तर नवरात्री पुडं ढकला न्हाई तर सहामाही परीक्षा. परीक्षेच्या टेन्शनपाई जीव रमत न्हाई डान्शमंदी. स्टय़ेप चुकत्यात. बीजगणितात चुकत्यात तशाच. यापाई गावची इज्जत मिट्टी में मिल जाती है. त्येवढं परीक्षेचं जमवाच.’’

काय बोलनार? समद्य्ोच गरब्यापाई आवारा पागल दिवाना! आमच्या गावाकडंबी गरब्याची महान परंपरा हाई. वीस-पंचवीस वर्सापूर्वीची गोस्ट. सुभान्याचा पोरगा तिकडं ममईला शिकत व्हता कालीजात. ममईला त्यानं गरबा बगितला. डिस्को दांडिया बगितला. तेला दिलसे वाटलं. ह्ये नवा ख्येळ गावाकडं आलाच पायजेल. नवरात्रीचं श्येवटचं दोन दिस आला गावाकडं. सोबतीला टिपऱ्यांची भलीमोटी मोळी. भोंग्यावर केकाटनारी गानी आनि थिरकनारी पावलं. गावातली समदी पोरं फ्येर धरून नाचली. पुढच्या टायमाला चावडीम्होरच्या मदानात धा दिस गरबा चालला. हरसाल काहीबाही पेशल. लायटिंग आली. डाल्बी आली. गरबाची सर्वशि इन्डस्ट्री आली. तारक मेहतावाल्या दयाबेनसारीक जालंया. समद्यास्नी गरब्याचं येड लागलंया.

सुभान्याची नात हाई कालीजात शिकती ममईला. गावच्या पोरीबाळीन्नी लई रिक्वेश्ट क्येली तिला. तिच्या मत्रिनीला घेऊन आली ती हिथं. तिची मत्रीन बुटिशियन हाई. पोरीबाळी, बायाबापडय़ा समद्या मेकअप करून ऱ्हायल्याती. धा दिवस सकाळच्या पारी तिनं क्रॅश कोर्स घ्येतला ब्युटिशिअनचा. गावाला लौकरच परमनंट ब्युटिशिअन गावनार बगा. गरब्याचा नवा स्टार्टअप. चालतंय की! सदाभौ, आमच्या नाम्या शिंप्यानं माडी बांधली गरब्याच्या जिवावर. चार-पाच र्वस जाली. गणपती इसर्जन जालं की नाम्या पळतू तिकडं सुरतेला. मस सुरत लुटून आणतूया. गरब्यासाटी खास कापडं आणतू रंगबीरंगी. येकदम झिंगाट.

त्येच्या बायकूनंबी टेलरिंगचा कोर्स केला हाई. चनियाचोली, काठीयावाडी धोती-कुर्ता. बजेट आसंल तसं. जेन्ला परवडतं त्ये शिवून घ्येतात. न्हाई तर भाडय़ानं. पंचक्रोशीत कुटं ना कुटं रोज गरबा नाईट आसतीच. टेम्पो घिवून नवराबायकू दोगंबी तिथं जात्यात. भाडय़ानं कापडं पुरवत्यात. मस पका मिळतू. नाम्या हुशार हाई आम्चा. देवीचा भरभरून आशीर्वाद गावला त्येला.

वॉट्श्शाप इद्यापीठात मस म्हायती गावली गरब्याची. गरबा तिकडून आला हाई. गुजरात, राजस्तान आन् माळव्यामदनं. त्येचं असली नाव ‘दीपगर्भ’. नवरात्रीच्या पयल्या दिशी घटामंदी दिवा लावत्यात. घटाला चार छिद्रं पाडत्यात चार दिशान्ला. त्यामदनं दिव्याचा उजेड चारी दिशान्ला पोचतूया. चारी दिशा उजळवून टाकतू. अंदार पळून जातू. समदीकडं सुख-समृद्दी येत्ये. या दीपगृहाला मदोमद मदानात ठेवत्यात. त्याभोवती फेर धरून बाया-बाप्ये नाचत्यात. रंगबीरंगी कापडं नेसत्यात. देवीची गानी म्हनत्यात. टाळीनृत्य करत्यात. दो ताली, चार ताली, छे ताली, बारा ताली.. येगयेगळे टाईप असत्यात.

‘दीपगर्भ’ मंजी सौभाग्याचं प्रतीकच जनू. तेलाच पुडं लोक गरबा म्हनू लाग्लं. नाचताना संगट टिपऱ्या आल्या. तेचा जाला दांडिया. गरबा मंजी लोकनृत्यच हाई. मुखी देवीचं नाव. भक्ती-शक्तीचा सोहळा. ढोल, नगारा बडवित्यात. ठेका धरत्यात. पावलं थिरकायला लागत्यात आपूआप. फकस्त फिल्मी वंगाळ गानी लावत्यात. लई बेक्कार! हिंदी पिक्चरमंदीबी मस हिट गानी हाईत देवीची. ‘मैं तो आरती उतारू रे संतोषी माता की..’ न्हाई तर आपल्या बच्चनसायेबांचं. त्ये माँ शेरोंवालीवालं- ‘सबसे बडा तेरा नाम, माँ शेरोंवाली..’ तेवढं पथ्य सांभाळायला पायजेल. बाकी ब्येश.

सदाभौ, मनाच्या कानामंदी डीजे वाजून ऱ्हायलाय की न्हाई? बिगीबिगी ड्रेपरी करून यिवा मदानामंदी. गुजरातचा गरबा समद्या देसाचा जाला हाई. हम सब येक है! नवरात्रीला येकीचा रंग पसरतू समदीकडं. ढोल बाजे, ढोल बाजे..

‘केसरीया रंग तने लाग्योला गरबा,

झीणी झीणी जारी ओ, मेला ओ ओला  गरबा..’

सदाभौ, बोला आंबामाता की जैय! सदाभौ, गरबा आन् दांडिया आमास्नी पराये वाटत न्हाईत गडय़ा, पर नवरात्रीत भुलाबाईला इसरून कसं चालंल? भुलाबाई, भोंडला, न्हाई तर हादगा. अश्विन म्हैना. हस्त नक्षत्र. मस पाऊसपानी झाल्येलं. पिकं तरारुन उंच झालेली. समदीकडं सुजलाम् सुफलाम्! धरनीमातेच्या सुफलीकरनाचा उत्सव. पाटावर हत्तीचं चित्र काढत्यात. हत्ती हस्त नक्षत्राचं प्रतीक. भुलाबाई मंजी देवी पार्वती. पाऊस पानी झ्याक. पिकंबी जोरामंदी. देवीला मागणं मागायचं. तुजी किरपा हरसाली, हमेशा अशीच ऱ्हावू दे.

लेकीबाळी, सासू-सुना, नणंदा-भावजया, समद्या बाया पाटाभोवती फेर धरून नाचत्यात. भुलाबाईची गानी म्हनत्यात. खिरापत वाटत्यात. सदाभौ, आमी जवा लहान व्हतू तवा आईसायेबांचं बोट धरून जायचू भुलाबाईची गानी म्हनाया. खिरापत लई आवडायची. ‘ऐलोमा पलोमा गनेश द्योवा..’ आमास्नी आम्चं ताईसायेब लई चिडवायचं. ‘‘दादू, पोरास्नी हिकडं यायचं काम न्हाई. न्हाई तर तुजी बायकू गानं म्हनंल, येडय़ाची बायकू करीत हुती लाडू..’’ अस्सं कस्सं जालं.. आमाला लई वंगाळ वाटायचं. पर खिरापतीसाटी जायचू.

आमी फकस्त येवढंच म्हन्तू, गरब्याबरूबर भुलाबाईलाबी लक्षात ठेवाया पायजेल समद्यान्नी. मऱ्हाटी बाणा जपायलाच पायजेल.

सदाभौ, तुमास्नी येक सांगायचं हुतं. कसं सांगू? शरम वाटती. नवरात्री मंजी रंगपेटीचा उत्सव. गनपती जालं की लगोलग नवरंग रिलीज होतु. तुम्चं वैनीसायेब नऊ रंगाच्या नऊ साडय़ा रेड्डी ठेवत्यात. एकादी कमी आसंल तर फटफटीवरनं आमी दोगं तुरंत नगरला जातू. कापड बाजारामंदी शापिंग. चालतंय की वं. आवं गृहलक्ष्मीच्या खुशीसाठी काय पन. या टायमाला आमीबी जरा येगळा इचार क्येला. नऊ दिवस नऊ रंगाचं सदरं आमीबी रेड्डी ठय़ेवलं. आमी दोगं राजा रानी. मॅचिंग-मॅचिंग. आम्ची लेक रोज रामपारी दोगांचं फोटु काढती. रोजच्या रोज मोबाइलवर डीपी बदलतुया. तुम्च्या वैनीसायेब येकदम खूश. जोडीचा मामला लगोलग व्हायरल जाला गावामंदी. कापी आन् प्येष्ट. नवराबायकू मॅचिंग कलर कोडमंदी दिसून ऱ्हायलीत समदीकडं. मज्जा आली.

काल आम्चं आईसायेब काय म्हन्लं सांगतू तुमास्नी. ‘‘नवरा-बायकूची नुस्ती कापडं मॅचिंग करून भागनार न्हाई दादासायेब. मनंबी जुळाया हवीत. बरुबरीची जागा, मान, स्वातंत्र्य भेटाया पायजेल तिलाबी, कुनाची तरी बायकू अशी नगं.. तिची सौताची वळख जवा तिला भेटंल तवाच नवरात्रीच्या उत्सवाला खरा मतलब मिळंल. बाईमानसाला जवा सन्मान, स्वातंत्र्य आनि शिक्षन भरभरून भेटंल तवाच देवी प्रसन्न हुईल. देवीला प्रसन्न करन्यासाटी समद्यांनी आधी घरच्या लक्ष्मीला जपाया पायजेल. येतंय ना ध्यानामंदी.’’

माजी ल्येक बाजूलाच हुभी. ‘सही बात’ अशी डाक्टर हाथीवानी आनंदानं वरडली ती. मीबी आईसायेबांचं पाय धरलं आन् वचन दिलं. आमाला आईसायेब येकदम श्यामची आई वाटू लागल्या सदाभौ. तुमी आमी समदे बाप्ये देवीपुडं शपथ घेवूयात. ‘आई, बहीन, ल्येक.. घरच्या लक्ष्मीला कायबी कमी पडू देनार न्हाई. मातारानी फकस्त तुजा आशीर्वाद ऱ्हावू दे.’

सदाभौ, काळजी न्हाई. आंबाबाई, महालक्ष्मी, सप्तशृंगी, एकवीराआई..किती नावं घेवू? समद्यांचे आशीर्वाद लाभनार बगा अवघ्या महाराष्ट्राला. उदे गं अंबाबाई उदे! तवर चालू द्या जोरात. डान्स इन्डिया डान्स! नाचू किती, नाचू किती, कंबर लचकली!

तुम्चा जिवाभावाचा दोस्त,

दादासाहेब गांवकर

kaukenagarwala@gmail.com