‘जागतिक विकलांग दिन’ (World Handicap Day) पाच-सहा दिवसांवर आला होता. आमचे डायरेक्टर एस. एन. मूर्ती यांनी मला त्यांच्या खोलीत बोलावले. ‘हे पाहा-’ ते म्हणाले, ‘या दिवसाप्रीत्यर्थ तू गॉल्फ लिंक्सजवळच्या अंधशाळेत जाऊन त्यांच्या दिनचर्येवर एक छोटासा माहितीपट बनव.’ मी मनात चरकले. अंधपणाविषयी मी लहानपणापासून फार हळवी आहे. अंध लोकांच्या- विशेषत: मुलांच्या सान्निध्यात मी अस्वस्थ होते. माझी कमजोरी मी मूर्तीना समजावण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. ‘प्लीज, प्लीज सर, माझ्यापेक्षा कुठलाही पुरुष सहकारी ही कामगिरी समर्थपणे करू शकेल. मला ती जमणे अवघड आहे. मी याबाबतीत जरा- म्हणजे खूपच भावनाप्रधान आहे.’
‘असं का?,’ आपला विशाल देह टेबलावर झुकवून माझ्याकडे निग्रहीपणाने पाहत मूर्तीसाहेब म्हणाले, ‘करेक्ट मी, इफ आय अॅम राँग.. पण पुरुषांच्या जोडीने जोखमीच्या मोहिमेवर तुला धाडले जात नाही, अशी तक्रार तूच नेहमी करीत असतेस. वेल! धिस इज अ चॅलेंज. जा, आणि छानशी ‘भावनाप्रधान’ फिल्म बनवून आण.’
‘ब्लाइंड रीलिफ असोसिएशन’च्या फाटकातून मी धडधडत्या अंत:करणाने आत शिरले आणि काही क्षण जागीच खिळून राहिले. सुरेख दगडी इमारत. भोवताली प्रशस्त मोकळे आवार. समोर दाट हिरवळ. आणि हिरवळीवर डोळ्यांचे पारणे फिटावे असे दृश्य.. जे मी कदापि विसरणार नाही. रस्सीखेच चालू होती. दोन्ही बाजूला आठ-दहा मुले आणि मधे त्यांना सांधणारा जाडजूड दोर. जिवाच्या आकांताने सगळी मुलं दोर खेचत होती. त्यांची पडझड, हसणे, खिदळणे आणि जल्लोष चालू होता. आनंद ओसंडून वाहत होता. हळवे व्हावे, कारुण्य दाटून यावे असे काहीसुद्धा नाही. अगदी सर्वसामान्य मुलांसारखी मुले. फक्त ही नेत्रहीन होती.
डॉ. अजय मित्तल या संस्थेच्या प्रमुखांना मी भेटले. विस्कॉन्सिन विद्यापीठातून पीएच.डी. घेऊन ते भारतात परतले होते. या संस्थेत दाखल झाले होते. तल्लख बुद्धिमत्ता, संभाषणकुशलता (हिंदी-इंग्रजीवर सारखेच प्रभुत्व) आणि प्रसन्न भाव यामुळे सहज छाप पडावी असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. ते स्वत: अंध होते. त्यांनी हिंडून आम्हाला वर्ग दाखवले. मुलांचे विविध उपक्रम आम्ही पाहिले. सगळी मुले हसरी होती. त्यांच्या बोलण्या-चालण्यात आत्मविश्वास होता. त्या मुलांच्या अस्मितेने ‘अपंग’ या शब्दाला खोटे पाडले होते.
मूर्तीसाहेबांच्या फर्मानाबरहुकूम मी माहितीपट बनवला खरा; पण तो विषय तिथेच संपला नाही. माझ्या डोक्यात घर करून राहिला. मित्तलसरांचा आशावादी दृष्टिकोन, शाळेतली जोशिली मुले, त्यांचे बुलंद खेळ या सगळ्याचे मनात मंथन होत राहिले आणि मी एक टेलिनाटिका लिहिली.
टेलिनाटिका (teleplay) हा एक फार सुरेख रंजनप्रकार आहे. सिनेमा आणि नाटक यांचा सुवर्णमध्य गाठणारा म्हणा ना! आपल्याच घरातल्या आत्मीय आणि ‘घरगुती’ वातावरणात पाहिलेल्या कार्यक्रमाची खुमारी अधिक गहिरी होते असे माझे मत आहे.
माझ्या टेलिनाटिकेला ‘रैना बीती जाये’ हे काहीसं फिल्मी नाव दिलं आणि रीतसर परवानग्या घेऊन बी. आर. ए.मध्येच चित्रण सुरू केलं. संस्थेचे नेत्रहीन प्रमुख आणि शाळेत अनाहूतपणे आलेली एक तरुण विधवा यांच्या अगतिक प्रेमाची ही कहाणी आहे. दोघेही आपापल्या व्यथांनी ग्रासलेले असतात. एक जण शारीरिक, तर दुसरा मानसिक स्तरावर. दोघेही आपापल्या एकाकी विश्वात मग्न असतात. बाकीच्या जगापासून अलिप्त. आणि मग कधीतरी दोन वर्तुळांचा एकमेकांना छेद जातो. सुषमा सेठ आणि कुलभूषण खरबंदा या नावाजलेल्या कलावंतांनी टेलिनाटिकेत अप्रतिम भूमिका केल्या. जोडीला खरीखुरी अंध मुले होतीच.
माझ्या तकलादू हळवेपणाला मूर्तीसाहेबांनी खतपाणी घातले नाही, म्हणूनच माझ्या हातून ही चांगली कलाकृती निर्माण होऊ शकली. मी त्यांची ऋणी आहे. टेलिफिल्मला वेळेचे बंधन असे. पाऊण तासात काय ते सांगून मोकळे व्हायचे. या बंधनामुळे मला अंध मुलांवर फारसे लक्ष केंद्रित करता आले नाही. त्यांच्या समस्या विस्ताराने सांगता आल्या नाहीत. त्यांची तारणहार जी ब्रेल लिपी- तिच्याविषयी सांगायचे राहूनच गेले. त्यामुळे जरी दर्शकांची ‘रैना’..ला कल्पनेबाहेर दाद मिळाली; आणि नाटिका पुन: पुन्हा दाखवण्याची फर्माईश झाली; तरी मला सतत ‘अर्र्र, हे राहून गेले,’ ‘ते राहून गेले’ अशी सल बोचत राहिली. पुढे-मागे केव्हातरी एक सविस्तर पटकथा लिहून एक सिनेमाच करू या, असे मी मनाला समजावले आणि तो विषय तात्पुरता बाजूला सारला. त्यावेळी ते एक पहाटेचं स्वप्न होतं. त्या स्वप्नाला पुढे वास्तवतेचा परीस‘स्पर्श’ होऊन ते साकार होईल, असं तेव्हा मुळीसुद्धा वाटलं नव्हतं. पण पुढचं पुढे..
‘धुवां धुवां’ ही माझी लोकप्रिय ठरलेली आणखी एक टेलिनाटिका. ‘रैना’ जितकी गहन होती, तितकीच ही अल्लड, खेळकर होती. विषयच मुळी तीन उडाणटप्पू दोस्तांचे रिकामपणाचे उद्योग- हा होता. सिगरेटी फुंकत आपापल्या (कल्पित) पराक्रमांचे वर्णन करणारे हे तीन वीर. धुराच्या लकिरीने रेखाटलेली त्यांची चित्रे कितीशी शाश्वत असणार? गंमतीजमतींनी ठासून भरलेला हा ‘धूम्र’पट लोकांना खूप आवडला. तद्दन विनोदी प्रकार हाताळण्याचा तो माझा पहिला यत्न. याही टेलिनाटिकेचा पुढे मी सिनेमा केला.. ‘चष्मेबद्दूर’! माझा दुसरा चित्रपट!! तोही किस्सा मजेदार आहे. पण तो सध्यातरी हातचा राखून ठेवू या.
‘टहनी एक गुलाब की’ आणि ‘शतरंगिनी’ या आणखी दोन टेलिनाटिका आठवतात. ‘टहनी’ या काहीशा भावरम्य कथेत एका लहान मुलीची आई अचानक मोटर अपघातात गेल्यावर ती छोटी मुलगी आणि तिचे वडील कसे एकमेकांना सावरण्याचा प्रयत्न करतात, याचे वर्णन आहे. दया डोंगरेने फार हळुवार छटांनी आईची भूमिका रंगवली होती. दया ही एक अशी गुणी अभिनेत्री मी पाहिली, की जिच्या केवळ असण्याने स्क्रीन उजळून जाई. दिल्ली आणि नंतर मुंबईला रंगभूमी आणि टेलिव्हिजन हे दोन्ही मंच तिने आपल्या कलागुणांनी संपन्न केले. पण तिला दृष्ट लागली. दृष्टीच्याच मुलखावेगळ्या व्याधीने ती ग्रस्त झाली आणि तिला तिच्या कार्यक्षेत्रापासून अकाली संन्यास घ्यावा लागला. सहा वर्षांच्या विनीने मुलीची भूमिका केली होती. एका प्रसंगी तिला रडायचं होतं. ती आता काय करते, नाही रडली तर काय उपाय करायचा, या चिंतेत आम्ही होतो. कॅमेरा सुरू झाला आणि विनी हमसून हमसून रडली. माझ्यासकट सगळे अवाक् झाले. तिला नंतर या हुकमी ‘अदाकारी’बद्दल  विचारल्यावर ती म्हणाली, ‘अगं, पपा (नाटिकेतले) मला ‘रडू नको, रडू नको’ म्हणतात ना? मी रडलेच नाही, तर कसं म्हणणार ते?’ आणि एवढं साधं कसं मला कळलं नाही, अशा आशयाने तिने माझ्याकडे पाहिलं. मोटार अपघातासाठी छायाकाराने तऱ्हतऱ्हेचे स्थिर फोटो काढून त्या फोटोंची जणू कसरतच जलद गतीने एडिट केली. छायाकार आणि संकलक यांनी आपले कौशल्य पणाला लावून हा ‘अपघात’ घडवून आणला. त्या काळात हाताशी कॉम्प्युटर ग्राफिक्सची जादू नव्हती. तेव्हा असले वेगवेगळे प्रयोग करायला गंमत यायची.
‘शतरंगिनी’ म्हणजे शोभादर्शक. कॅलिडोस्कोप. या नाटिकेसाठीसुद्धा तंत्रज्ञांनी कमाल केली. चक्क एक मोठा शोभादर्शक तयार केला. त्याच्या मदतीने अवघ्या नाटकभर योग्य ठिकाणी आम्हाला एकाहून एक सरस आकृतिबंध दाखवता आले. या शोभादर्शकासाठी काचांचे तुकडे, रंगीत मणी, चांदीचे कपटे, छोटे शंख, शिंपले.. नाना वस्तू आम्ही गोळा केल्या होत्या. हाही उपक्रम लोकांना आवडला. पण दूरदर्शनमधलेच एक दोस्त- प्रोग्रॅम एक्झिक्युटिव्ह जानकीदास गौड हसून म्हणाले, ‘सई, यार तुम्हारे कलाकारों से भी जादा कांच के तुकडों की अॅक्टिंग अच्छी रही.’
दिल्ली दूरदर्शन हाच मुळी एक मजेदार कॅलिडोस्कोप होता. देशभरचे तऱ्हेतऱ्हेचे नमुने आकाशवाणी भवनमध्ये सामावलेले होते. आपापल्या क्षेत्रात तरबेज असलेल्या साथीदारांबरोबर नित्य नवीन योजना आखण्याची एक वेगळीच प्रचीती असे. एक नवीन युग घडते आहे आणि त्यात आपला थोडा सहभाग आहे, याची आम्हा सर्वाना जाणीव होती.
वरिष्ठ श्रेणीच्या अधिकाऱ्यांत जानकीचा  समावेश होता. दिसायला ओबडधोबड, वेश गबाळा आणि डोक्यावर जावळ असल्यासारखे थोडकेच केस असा त्याचा अवतार होता. पण बोलायला लागला की तो मैफल जिंकत असे. बहुश्रुत, शौकीन आणि मार्मिक विनोदबुद्धी असलेला जानकी मनस्वी होता. उपचारासाठी तो मनोरुग्ण दवाखान्यात काही काळ होता अशी कुणकुण कानी आली होती. मधूनच तो अंतर्मुख, निराश होत असे. मग तो स्वत:ला कामात झोकून देत असे. तसा तो कामसू होताच. workaholic! एका संध्याकाळी त्याच्या खोलीत आम्ही चहा पीत गप्पा मारत होतो. त्याच्या टेबलावर फाइलींचा ढीग होता. बोलता बोलता जानकी एकदम रडू लागला. अगदी लहान मुलासारखा. ओक्साबोक्शी.  ‘I can’t cope, I can’t cope’… ‘मला जमत नाही, मला जमत नाही,’ म्हणू लागला. ‘सगळ्या फाइली खिडकीतून खाली फेकून दे,’ असं बजावून मी तडक डायरेक्टर चावलासाहेबांची खोली गाठली. माझी चिंता ऐकून ते म्हणाले, ‘मी तरी काय करणार? तो स्वत:हून अंगावर काम ओढवून घेतो. नको त्या जबाबदाऱ्या उचलतो. अजिबात ऐकत नाही.’ दोन दिवसांनी आकाशवाणी भवनच्या सहाव्या मजल्यावरच्या आपल्या खोलीच्या खिडकीमधून खाली उडी मारून जानकीने जगाचा निरोप घेतला. त्याच्याविषयी एवढे विस्ताराने लिहिण्याचे कारण- माझ्या कला-कारकीर्दीत त्याचा फार मोठा सहभाग होता. पदोपदी त्याने मला मार्गदर्शन केले.
दूरदर्शनच्या शोभादर्शकातल्या लक्षवेधी लुकलुकणाऱ्या चांदण्या म्हणजे आमच्या गाजलेल्या निवेदिका आणि संचालिका. दूरदर्शनच्या पहिल्या दिवसापासून दर्शकांशी वार्तालाप करणारी सुंदर, सोज्वळ प्रतिमा पुरी, अवखळ, नखरेल मुक्ता श्रीवास्तव, लावण्यवती सलमा सुलतान (जिच्यावर सर्वाची ‘जान कुर्बान’), दूरदर्शनची वहिदा रहमान म्हणून प्रसिद्ध असलेली मधु राजा.. या सगळ्याजणी खऱ्या अर्थाने दूरदर्शनच्या प्रतिनिधी मानल्या जात होत्या. त्यांच्याविषयी प्रचंड आस्था व कुतूहल होते. त्यांचे स्वतंत्र ‘चाहते गट’ (fan clubs) होते.
केवल कपूर हा आमच्या शोभायात्रेमधला एक अफलातून नमुना. ‘प्रॉडक्शन असिस्टंट’ ही त्याची नोकरी होती. पण काही काम करण्यापेक्षा दिवसभर खोल्या-खोल्यांमधून हिंडून आपल्या विदूषकी चाळ्यांनी लोकांना हसवण्यात त्याचा वेळ जात असे. तो विलक्षण ताकदीचा विनोदी नट होता. त्याची ‘ऐसा भी होता है’ ही मालिका वर्षांनुवर्षे चालली होती. केवल हा पट्टीचा पिणारा होता. संध्याकाळची ‘व्यवस्था’ करण्यात त्याच्या दिवसाचा बराच वेळ मोडत असे. दिल्लीला तेव्हा ‘भाकड’ दिवस किंवा ‘ड्राय डे’ असे. आठवडय़ातून एकदा. केवलची त्यामुळे फार पंचाईत होई. कारण ‘उद्यासाठी हातची’ म्हणून बाटली घेतली तर ती त्याच दिवशी संपणार. मग खुद्द त्याची आई ‘ब्लॅक’मध्ये त्याला बाटली विकत असे. हे ऐकून मी थक्क झाले. पण आईचे म्हणणे- ‘हा ज्यादा पैसे मोजून कुठूनतरी  बाटली आणणारच. मग मीच का कमवू नये?’
चोख युक्तिवाद!
एकदा केवलची चक्क बढती होऊन तो प्रोडय़ुसर झाला. एका संध्याकाळच्या सभेचा तो नियंत्रक होता. कार्यक्रम चालू झाला. केवल अर्थातच ‘घेऊन’ आला होता. कुणीतरी डायरेक्टरना फोन केला. ‘कंट्रोल पॅनलवर तातडीने या,’ नंदलाल चावला येऊन पाहतात तो काय, इंजिनीअर बिचारा आपल्या मनाने कार्यक्रम चालवतो आहे आणि पॅनलच्या खाली जमिनीवर आडवा केवल गाढ झोपी गेला आहे. दुसऱ्या दिवशी तत्काळ त्याचं ‘डिमोशन’ झालं. तो पुन्हा प्रोडय़ुसरचा ‘असिस्टंट’ झाला. म्हणाला, ‘हुश्श! अब तो शानदार पार्टी बनती है.’  त्याच्या पिण्यापायी पुढे त्याला वरचेवर हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागे. तिथंही वॉर्ड बॉयला पैसे देऊन तो आपली सोय करीत असे. एकदा म्हणे डॉक्टर त्याच्या खाटेशेजारी बसून त्याच्याबरोबर पीत होते.
अखेर त्याच्या लाडक्या बाटलीने त्याला दगा दिलाच. ‘सिरोसिस’ने तो वारला. आज वाटतं, की तो असता तर त्याला पटकावण्यासाठी सगळ्या वाहिन्यांमध्ये चुरस लागली असती. केवल गडय़ा, आज तू हवा होतास. चीअर्स!
आम्हा चार प्रोडय़ुसर्सपैकी ए. प्रताप हा ‘हिंदी पत्रिका’ इ. कार्यक्रम करायचा. तो पुढे पुण्याला फिल्म इन्स्टिटय़ूटच्या दूरदर्शन शाखेत शिकवण्यासाठी गेला. स्वदेशकुमार आम्हा सर्वाच्यात वडील होते. अप्रतिम गुलाब फुलवण्याबद्दल त्यांची ख्याती होती. दरवर्षी फुलांच्या प्रदर्शनात त्यांच्या गुलाबांना हमखास पहिले बक्षीस मिळे. त्यांच्या फुलांप्रमाणे त्यांचे कार्यक्रम मात्र कधी बहरले नाहीत. पी. कुमार हा फिल्म इन्स्टिटय़ूटचा कॅमेरा विभागाचा पदवीधर. तांत्रिकदृष्टय़ा तो आम्हा सर्वाच्या कितीतरी पुढे होता. अतिशय कुशल होता. त्याने एकदा स्टुडिओमध्ये एका नाटिकेसाठी दादरचा टिळक ब्रिज उभारला होता. पण भव्यदिव्य करण्याच्या नादात कुमारला आशय किंवा विषय यांच्याशी काही देणेघेणे नसे. ‘वह सब तुम लोग देख लो,’ असं तो म्हणत असे.
मध्यंतरी जर्मनीला एका शिष्टमंडळाबरोबर जाण्याची संधी मिळाली. फ्रँकफर्ट, हॅम्बर्ग, बर्लिन आणि म्युनिकला जर्मनीची नेत्रदीपक प्रगती पाहिली. ही भेट खूप धावती होती.
आम्ही चौघे प्रोडय़ुसर्स आमच्या बी ग्रेडला घट्ट धरून होतो. साहजिकच आमच्यात आता असंतोष धुमसू लागला. माझे ‘नाटय़द्वयी’चे प्रयोग जोरात चालू असल्यामुळे मला पर्यायी विरंगुळा होता. कुढत बसायला वेळ नव्हता. त्यातून मला फ्रेंच सरकारची एक वर्षांची शिष्यवृत्ती मिळाली. नाटक आणि टेलिव्हिजन शिकण्यासाठी! ही पर्वणीच होती. मला दूरदर्शनने ‘तू जा. तुझी नोकरी सुरक्षित राहील,’ असे आश्वासन देऊन एक वर्षांची बिनपगारी रजा मंजूर केली.
एक वर्षांनंतर पॅरिसहून नाटक आणि दूरदर्शन या माझ्या दोन्ही आवडत्या माध्यमांबद्दलची विस्तृत माहिती पदरी बांधून मी परतले आणि नोकरीवर पुन्हा रुजू झाले. फ्रेंच सरकारच्या कृपेने मिळालेल्या अनुभवाची दखल घेऊन कदाचित आपल्या ग्रेडमध्ये सुधारणा होईल अशी एक वेडी आशा वाटली होती. ती फोल ठरली. मग ‘जिथे आपली किंमत नाही, तिथे राह्य़चे कशाला?’ असे प्रकर्षांने वाटून मी नोकरी सोडायचा विचार करू लागले. पण ‘सरकारी नोकरी सोडून कुठे धक्के खाणार आहेस? उगाच वेडेपणा करू नकोस..’ असा सल्ला हितचिंतक जेव्हा एकमुखाने देऊ लागले, तेव्हा मी मन मारून दिल्ली दूरदर्शनला धरून राहिले.
..आणि मग एक फार चांगली गोष्ट घडून आली. लवकरच मुंबईला स्वतंत्र दूरदर्शन केंद्र सुरू होणार होते. त्याच्या उद्घाटनाचा पहिलावहिला कार्यक्रम मी प्रस्तुत करावा असा निर्णय झाला. त्यासाठी मला आठ दिवस दिल्लीहून मुंबईला जायचं होतं.
हा ठराव खरोखरच अनपेक्षित होता. केवढा हा मान!  मी मनातून मोहरून गेले आणि ‘ग्रेड बी’ची बात काही काळ विसरले.
२ ऑक्टोबर १९७२ रोजी उद्घाटनाचा सोहळा भाभा हॉलच्या आलिशान सभागृहामध्ये निमंत्रितांच्या उपस्थितीत व्हायचा होता. तिथे तात्पुरता स्टुडिओ थाटला गेला. हा कार्यक्रम  O.B. म्हणजे off Broadcast होणार होता. म्हणजे नेहमीच्या टेलिस्टुडिओतून नव्हे, तर बाहेरून. या प्रसंगाला साजेसे विविध कार्यक्रम योजण्यात आले. बिसमिल्ला खॉं यांची सुरीली सनई, वाणी जयराम आणि साथी यांचे वृंदगीत, आशा पारेख आणि गोपीकृष्ण यांचे कथ्थक, इ. राज्यपाल अलियावर जंग उशिरा आले. नमाजला उशीर होतो आहे म्हणून खॉंसाहेब अस्वस्थ होते. तशात आशा पारेखच्या पायाला काच रुतली. पण कार्यक्रम सुरू झाला. धडधडत्या अंत:करणाने मी पॅनेलवर बसले. कार्यक्रम ‘प्रत्यक्ष’ होता- live! चुकीला वाव नव्हता. क्षमाही नव्हती. खरे तर तसे अवघड किंवा मोठय़ा कौशल्याचे असे फारसे काहीच काम नव्हते. तीन कॅमेरे टिपतील ते शॉट्स थंड डोक्याने निवडत जायचे. अधूनमधून मी एखाद्या प्रेक्षकाची दाद किंवा नेमकी समेवर वाजलेली टाळी ‘पकडू’ शकले, एवढंच. कार्यक्रम छान झाला. काहीही गडबड न होता. नवोदित प्रोडय़ुसर्सची रांग अदबीने उभी होती. त्यांनी अभिनंदन केले तेव्हा धन्यता वाटली.
मुंबई दूरदर्शनचा पहिला कार्यक्रम करण्याचा मान खरोखरच दडपून टाकणारा होता. वरळीच्या अॅनी बेझंट रोडवरून जाताना मी दरवेळी टीव्ही टॉवरकडे पाहते आणि मनोमन सुखावते.
दिल्लीला परतले. असंख्य नवे नवलाईचे कार्यक्रम, लघुपट, तेहरानचे पारितोषिक, अनेक टेलिनाटके, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनीचे अभ्यास दौरे आणि आता एका नव्या केंद्राचा उद्घाटन सोहळा.. एवढे करूनही मी जिथल्या तिथेच होते. आता बस्स झाले.. बाहेरची मोकळी हवा आजमावण्याची हीच ती वेळ, असं ठरवून मी माझ्या सरकारी नोकरीला रामराम ठोकला.  (भाग ३)                      

Arvind Kejriwal
अरविंद केजरीवालांची शुगर लेव्हल ३२० वर, अखेर तुरुंगात पहिल्यांदाच दिलं इन्सुलिन
nilesh sambre, kapil patil
“कपिल पाटील डोळ्यांची शस्त्रक्रिया करा”, नीलेश सांबरे यांचे खासदार कपिल पाटील यांना प्रत्युत्तर
dombivali, 17 year old bangladeshi girl,
आईला वेश्याव्यवसायातून वाचवण्यासाठी मुलीनं केलं बाळाचं अपहरण..
100 Ghungaru Nagin Chappal Price Will Shock You Watch Video
७ नागाचे फणे, सहा किलो वजन, पंढरपूरच्या दानवेंची ‘नागीण चप्पल’ दिसते कशी? किंमत ऐकून थक्कच व्हाल