News Flash

अरतें ना परतें.. : पोटा आपुलिया आलो..

मला जवळपास नेहमीच चित्रविचित्र स्वप्नं पडत असतात.

परवा एकदा असं दिसलं की, माझा मृत्यू झालाय नि लोक गंभीरपणे त्याविषयी बोलतायत, कुजबुजतायत. मी मरून गेल्याचं मीही पाहत होतो. मीही त्याविषयी लोकांपाशी गंभीरपणे बोलत होतो; कुण्या फलाण्या मीडियावाल्यांना माझ्याच मरण्याविषयी बाइट्स देत होतो.

प्रवीण दशरथ बांदेकर – samwadpravin@gmail.com

मला जवळपास नेहमीच चित्रविचित्र स्वप्नं पडत असतात. परवा एकदा असं दिसलं की, माझा मृत्यू झालाय नि लोक गंभीरपणे त्याविषयी बोलतायत, कुजबुजतायत. मी मरून गेल्याचं मीही पाहत होतो. मीही त्याविषयी लोकांपाशी गंभीरपणे बोलत होतो; कुण्या फलाण्या मीडियावाल्यांना माझ्याच मरण्याविषयी बाइट्स देत होतो. मी त्यांना सांगत होतो की, अजून एक-दोन थीम्स डोक्यात होत्या. तेवढय़ाच दोन कादंबऱ्या लिहून नंतर मेलो असतो तर बरं झालं असतं; पण आता काय करणार? आपलं मरण आपल्या हातात थोडंच असतं? आता जाऊ दे म्हणायचं. यावर अर्थातच मग कुणीतरी- नेमकं कशाविषयी लिहायचं डोक्यात होतं, म्हणून विचारलं. मी काहीतरी सांगितलं. ते सांगत असतानाही मला हे आपण काहीतरी भयंकर ग्रेट लिहिणार होतो, ते आता कायमचं राहून गेलं याचं वाईट वाटत होतं. आणि मागाहून मग जाग आल्यावर फक्त आपलं मरण आठवतं, काहीतरी लिहायचं राहून गेल्याचं सांगितल्याचं आठवतं; पण ते काय लिहायचं होतं, ते मात्र काही केल्या आठवत नाही. नुसतीच चुटपुट लागून राहते. स्वप्नात दिसलं होतं तसं काही झालेलं नाही. आपण ठणठणीत जिवंत आहोत. म्हणजे आता आपण आपल्या डोक्यात जे काय होतं ते लिहू शकतो, असं जाणवून एकीकडे हायसं वाटत असतं. दुसरीकडे मात्र स्वप्नातल्या आपल्या मरणामुळे ते जे काही ग्रेट लिहायचं राहून गेलं म्हणून आपण हळहळत होतो, ते नक्की काय होतं, ते आता काहीही केलं तरी आठवत नाही म्हणून प्रचंड निराश झाल्यागत वाटत असतं. म्हणजे जणू आपण खरोखरच तेव्हा मेलो होतो, आता आपला पुनर्जन्म झालाय आणि मागल्या त्या जन्मातलं आपल्याला आता काहीच आठवत नाहीये, असं काहीतरी मनात येत राहतं.

हे असं अनेकदा होत असतं. अनेकांना असा अनुभव येत असेल. पुनर्जन्माचं वगैरे सोडून देऊ; त्याविषयी आपण काहीच ठामपणे बोलू शकणार नाही; पण झोपेत असताना काही चांगल्या कल्पना सुचलेल्या असतात, स्वप्नात किंवा झोपेच्या अमलाखाली स्वप्नसदृश्य भासमान दृश्यांमध्ये दिसलेल्या असतात, त्या नंतर काही केल्या आठवत नाहीत, हे खरं आहे. या अर्थाने विचार केला तर आपल्या त्या लिहिण्याआधीच मरून गेलेल्या असंख्य गोष्टी मग आधीच्या जन्मातल्यासारख्या वाटत राहतात. या मरून गेलेल्या गोष्टी म्हणजे जणू एखाद्या कलावंतासाठी साक्षात्काराचे क्षण असू शकतात. ते पक्क्य़ा शब्दांच्या चिमटीत पकडण्याआधीच त्यांचं निसटून जाणं कलावंताच्या दृष्टीने त्यांच्या मरणाइतकंच दु:खदायक असतं. अशा वेळीच त्याला जाणवतं, मरून गेलेल्या त्या गोष्टींना पुन्हा जन्माला घालायचं असेल तर आपल्यालाच मरून पुन्हा आपल्याच पोटी जन्माला यावं लागेल. आपल्याच जन्म आणि मृत्यूकडे त्रयस्थपणे पाहावं लागेल. अर्थात ही गोष्टही काही वाटते तितकी सोपी मुळीच नाहीये. अनेकांना हे काहीतरी अतिशयोक्तीपूर्ण वाटण्याची शक्यता आहे; पण जगभरातल्या अनेक महान कलावंतांनी या हरवलेल्या गोष्टींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी एका अर्थाने विदेही होत, स्वत:तून बाहेर येऊन आपल्या प्रत्येक कृती-उक्ती शक्य तितक्या अलिप्तपणे निरखण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला आहे. त्यातूनच मग तुकोबांसारखा महाकवी लिहून गेला असावा-

‘मीचि मज व्यालों। पोटा आपुलिया आलो।

आतां पुरले नवस। निरसोनी गेली आस।

जालों बरा बळी। गेलों मरोनि ते काळीं।

दोहींकडे पाहे। तुका आहे तैसा आहे।’

तुकोबांना हेच तर सुचवायचं आहे ना? या चराचरात भरून राहिलेले प्राणतत्त्व आणि मी हे परस्परांहून भिन्न मानता येणार नाही. मी ज्या प्राणतत्त्वाचा अविभाज्य भाग आहे ते प्राणतत्त्वही माझ्यातूनच निर्माण झालं आहे. याचाच अर्थ- मीच मला जन्म दिला आहे आणि माझ्या पोटी पुन्हा मीच जन्माला आलो आहे. हे एकदा नीट कळलं की निर्मितीप्रक्रियेशी संबंधित पुढच्या गोष्टी आपोआपच सुरळीत होऊन जातात. अवघे शब्दब्रह्मच माझ्यात सामावल्याचे ध्यानात आल्याने आणखी वेगळ्या काही ब्रह्माचा शोध घेण्याची मनोकामनाही नष्ट होऊन जाते. परिणामत: आत्मिक मनोबल किंवा आत्मशक्ती वाढून मला या नश्वर देहाचे आणि या इंद्रियांचे काहीच वाटेनासे होते. स्वप्न आणि जागृती, जन्म आणि मरण यांच्या उंबरठय़ावर उभं राहून दुशीकडे पाहण्याचा हा अनुभव घेणं यातूनच शक्य होत असावे.

अर्थात आपल्या निर्मितीच्या क्षणांचा इतक्या असोशीने मागोवा घेणारा तुकोबा हा काही एकटाच कलावंत नाहीये. निर्मितीसाठी आयुष्य पणाला लावणारे असे आणखीनही आजूबाजूला असू शकतात. ‘अनुभवाविन मान हालवू नको रे’ म्हणून सांगणाऱ्या माझ्या भूमीतील अशाच एक अवलिया संतकवीनेसुद्धा एकाच जन्मात आपल्या मृत्यूला सादवीत आपल्या मरणाचा सोहळा अनुभवला, शब्दबद्ध केला. ‘सोहिरा जाय सोहिऱ्यापाशी, आदिअंत साक्षी सोहळ्याशी’ या सोहिरोबानाथांच्या ओळी वाचताना मला निर्मितीचा उत्सव साजरा करू पाहणाऱ्या कलावंताची बेहोशी जाणवत राहते. काहीतरी नवं जन्माला घालणं, काहीतरी निर्माण करणं म्हणजे एका अर्थाने आपल्यातलं काहीतरी नष्ट करणं असावं का? नाही तरी एकेका क्षणाक्षणाने आपण मृत्यूच पावत असतो. तशाच एका मरत्या क्षणी आपण काही नवं घडवू पाहतो, म्हणजे आपण त्या एका क्षणाला संजीवनी देतो. तो एक क्षण आपल्या पोटी आपल्याच होणाऱ्या जन्माचा असतो. एकाच जन्मात असे असंख्य जन्म आणि असंख्य मरणं आपण अनुभवत असतो असंही मग आपलं आपल्यालाच जाणवत राहतं. म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत एक लांबलचक काळोखी पोकळी आणि त्यात वावरताना आपले असंख्य पुनर्जन्म आणि मृत्यूपूर्व अकाली मृत्यू. मराठीपुरताच विचार केला तरी आधुनिक काळातही जीए, ग्रेस, आरती प्रभू, गुरुनाथ धुरी अशी अस्वस्थ कलावंतांची एक समृद्ध परंपरा यासंदर्भात डोळ्यांसमोर येत राहते.

या काळोख्या पोकळीवरून आठवलं, अनेक लहान मुलांची असते तशी लहानपणी माझीही एक खोड होती. दुष्टपणा किंवा खरं तर क्रूरपणाच होता तो, हे आता जाणवतंय. तर तेव्हा मी गंमत म्हणून छोटी पिवळी फुलंपाखरं, नाकतोडे, टोळ किंवा हिरव्या रंगाचे चतुर वगैरेसारखे कीटक पकडून काडय़ापेटीत बंद करून ठेवायचो. आजी करवदायची.. ‘‘रे, कित्याक् त्या मोन्या जिवांका असो कोंडून मारतंस? असां केलंस तर देव तुका फुडल्या जन्माक पाखो करतंलो नि तुकापण असोच कोंडून घाल्तंलो..’’ आजीचं हे बोलणं मला शाप दिल्यासारखं वाटायचं. आपल्या बाबतीत खरंच असं काही झालं तर..? काळोखाचं मला तेव्हा विलक्षण भय वाटायचं. आपल्याला काळोख्या खोलीत कुणी बंद करून ठेवलं आहे, आपला जीव घुसमटतोय, सुटका व्हावी म्हणून आपण धडपडतोय- अशी कल्पनाही मला घाम फोडायची. आपण असं पाखरू झालोय नि काळोख्या पोकळीत जिवाच्या आकांतानं फडफडतोय असंही अनेकदा मग स्वप्नात दिसत राहायचं. जिवाची काहिली व्हावी, कासाविशी अनुभवास यावी असे प्रसंग नंतर जगण्याच्या संघर्षांत अनेकदा वाटय़ाला आले. लिहिण्याचा, काही नवं निर्माण करण्याचा विचार करताना तर नेहमीच येत असतात. त्यातून तावूनसुलाखून बाहेर आल्यावर या एकाच जन्मात जगत असताना आपण आपलाच बळी दिलाय, पूर्वसंचिताची होळी केलीय नि आता आपला पुनर्जन्म झालाय, नव्याने सगळी मांडामांड करून जगू लागलोय असं वाटत राहायचं. मधे कधीतरी एकदा तुकोबाच्या एका अभंगाच्या काही ओळी वाचताना मला अचानक या काळोख्या पोकळीत फडफडणाऱ्या जिवाची घालमेल जाणवून आली होती. निर्मितीच्या क्षणांसाठी, आपल्या नव्या जगण्यासाठी आपलाच बळी देणं भाग असल्याची जाणीवही त्या ओघानेच व्यक्त झाली होती. या ओळींचा वेगळा अर्थही निघू शकतो; पण माझ्यापुरता मात्र मी तो निर्मितीच्या अनुषंगाने घेतला आहे. त्या ओळी अशा-

‘पंचभूतांचिये सांपडलों संदीं।

घातलोंसे बंदी अहंकारें।।

आपल्या आपण बांधविला गळा।

नेणें चि निराळा असतां हो।।

कासया हा सत्य लेखिला संसार।

कां हे केले चार माझें माझें।।

कां नाहीं शरण गेलों नारायणा।

कां नाहीं वासना आवरली।।

किंचित सुखाचा धरिला अभिळास।

तेणें बहु नास केला पुढें।।

तुका ह्मणे आतां देह देऊं बळी।

करुनि सांडूं होळी संचिताची।।’

पुढच्या जन्माचं कुणी बघितलंय? पण याच जन्मात अशा पोकळीतच तर आपण केविलवाणी घुसमट सहन करत जगत राहिलो आहोत. या अमर्याद पोकळीत भरून राहिलेला काळोख आपल्या डोळ्यांना दिसत नसला, त्या पोकळीतला मरणाचा सूक्ष्म गंध आपल्याला जाणवत नसला तरी तुकोबासारख्यांना तो आधीच जाणवून आलेला असतो. स्वप्नातल्या स्वप्नात मरून जाताना किमान आपल्यासारख्यांच्या वाटय़ाला तो आदिगंध आला तरी जागेपणी आम्हीही तुकोबाच्या सुरात सूर मिसळून म्हणू शकतो-

‘तुका ह्मणे वर्म आलें। हातां भलें हेंचि माझ्या..’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2021 12:37 am

Web Title: death birth dream arte na parte dd 70
Next Stories
1 पडसाद : उपयुक्त सदर
2 मोकळे आकाश.. : आय. सी. यू.च्या बेडवरून..
3 अंतर्नाद : टाळ बोले चिपळीला..
Just Now!
X