खुशवंत सिंग यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या दोन बाजू आहेत. एक खुशवंत हे खूप विचार, मंथन करून देशात बदल घडवून आणण्यासाठी आणि राजकीय व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्यासाठी उत्स्फूर्तपणे काम करणारे आहेत. दुसरे खुशवंत हे ‘चला, भेळ खायला जाऊ या’ किंवा ‘अमूक ठिकाणी चिवडा चांगला मिळतो, तो खायला जाऊ या..’ असे आपल्या मित्रांना, सहकाऱ्यांना म्हणणारे.. रस्त्यावर उभं राहून लहान मुलासारखं आइस्क्रीम खाणारे आहेत. त्यांना बघून मला नेहमी आश्चर्य वाटायचं, की हा इतका नामी, ‘पद्मविभूषण’ माणूस- पण या अशा गोष्टी करतो! ते ‘इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’त असताना आमच्या केबिन समोरासमोर होत्या. बऱ्याचदा ते माझ्याकडे येत आणि मला म्हणत, ‘विमला, कम.. लेट्स हॅव लंच.’ पण जायचं कुठं? तर रस्त्यावरच्या भेळवाल्याकडे! त्यामुळे त्यांना काही लोक ‘विचित्र’ म्हणत. पण मला तसं वाटत नाही. ते श्रीमंत आणि गरीब यांत फरक करत नसत. त्यांची मैत्री निखळ होती. ते कुणालाही आपल्याकडे चहाला वा गप्पा मारायला बोलवीत. पण एक होतं- त्यांचं वागणं आणि त्यांचं संपादनाचं काम हे पूर्णपणे प्रामाणिक होतं.. ‘आय अ‍ॅम व्हॉट आय अ‍ॅम’ पद्धतीचं. त्यांच्याविषयी कुणी काहीही बोला, त्यांना काहीच फरक पडत नसे. त्यांना आपलं काम आणि आपण भले, एवढंच माहीत होतं. थोडक्यात काय, तर खुशवंत यांचं व्यक्तिमत्त्व भेळीसारखंच संमिश्र आणि चटपटीत आहे.
‘इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’चं आधीचं रूप हे फक्त उच्चभ्रू लोकांचं नियतकालिक असं होतं. खुशवंत यांना ते मान्य नव्हतं. नियतकालिक जनसामान्यांपर्यंत पोचलं पाहिजे, तरच ते यशस्वी होऊ शकतं. त्यादृष्टीने त्यांनी ‘वीकली’मध्ये अनेक बदल केले. परिणामी हे साप्ताहिक जनसामान्यांचं होऊन त्याचा खप ६५ हजारावरून चार लाखांपर्यंत गेला.
सत्तरचं दशक हा भारतीय पत्रकारितेचाच टर्निग पॉइंट होता. कारण या काळात ‘भारता’चा ‘ड्रॅमॅटिक’ जन्म झाला. त्याआधी तामीळ, कन्नड, गुजराती स्वत:ची ओळख घेऊनच वावरत आणि स्वत:च्या समाजाच्या कोशातच राहत. यांचं खाणंपिणं त्यांना माहीत नाही आणि त्यांचे कपडे यांना माहीत नाहीत अशी परिस्थिती होती. इथं अनेक प्रदेश होते. त्यांना एकत्र जोडण्याची संधी स्वातंत्र्यानंतर उपलब्ध झाली. १९४७ नंतर खऱ्या अर्थानं हा भूखंड एक देश झाला. या काळात ‘इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’ (‘फेमिना’ आणि ‘धर्मयुग’सुद्धा!) वॉज अ ग्रेट बाँडिंग फॅक्टर बिटवीन पीपल ऑफ डिफरन्ट कल्चर, बट बिलाँगिंग टु सेम रूट्स.. ज्या पंजाबी बाईला वडापाव माहीत नव्हता, तो तिला ‘फेमिना’मुळे माहीत झाला. खाणंपिणं, कपडे, भाषा यांचं एकत्रीकरण झालं. मल्याळी माणूस, तमीळ माणूस, पंजाबी माणूस अशी स्वतंत्र ओळख थांबून सर्वाची ‘भारतीय माणूस’ अशी ओळख तयार झाली. माझ्या लहाणपणी ‘अंडागुंडूथंडापाणी म्हणजे तामीळ’ किंवा ‘घाटी म्हणजे मराठी’ किंवा ‘गुज्जूभाई म्हणजे गुजराती’ असे शब्द वापरले जायचे. ते सत्तरच्या दशकात अस्तंगत व्हायला लागले. स्वातंत्र्यानंतर हिंदू कोड बिल इत्यादी अनेक कायदे पास झाले होतेच. तेव्हा एक प्रकारे भारताचं संकल्पनात्मक चित्र तयार व्हायला सुरुवात झाली होती. आपल्याला आपला देश कसा हवा आहे, याची ती सुरुवात होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची पहिली पिढी साठ-सत्तरच्या दशकांत घरसंसार करू लागल्यावर ही राष्ट्रीय एकात्मता आणि हा देश एक आहे, हे माध्यमांनीही दाखविण्याची ती वेळ होती. त्यामुळे खुशवंत सिंग, धर्मवीर भारती, मी.. आम्हालाही ती संधी मिळाली. आम्ही ती संधी ओळखली, हे महत्त्वाचं. आणि आम्हाला थांबवलं गेलं नाही, हे त्यापेक्षाही महत्त्वाचं. आम्हाला संपादक म्हणून संपूर्ण स्वातंत्र्य होतं. तेव्हा जे जे आम्हाला वाटलं, ते ते आम्ही करू शकलो.
‘वीकली’, ‘धर्मयुग’ आणि ‘फेमिना’ या नियतकालिकांना हा असा प्लॅटफॉर्म मिळाला. त्यात खुशवंत सिंग यांनी ‘वीकली’मध्ये केलेला एक प्रयत्न मला आठवतो : प्रत्येक जाती-उपजातीविषयी माहिती देणारी लेखमाला त्यांनी सुरू केली. देशस्थ, कायस्थ, चित्पावन, सारस्वत या साऱ्यांचा इतिहास सांगणारी.. म्हणजे आपलीच समज आपल्याला दिली. या अंकांनी ‘वीकली’ला गती दिली. कारण लोकांना भारताशी स्वत:ला जोडून घ्यायचं होतं. आज भारतात कुठेही गेलं तरी आपल्याला कुणी ‘घाटी’ म्हणत नाहीत, ‘महाराष्ट्रियन’ म्हणतात. हे करण्याची संधी आम्हाला मिळाली. खुशवंत यांनी ती मोठय़ा प्रमाणावर वापरली. कारण ‘वीकली’ हे साप्ताहिक होतं आणि केवळ स्त्री वा पुरुषांपुरतंच ते मर्यादित नव्हतं. त्यांनी त्याचा मोठय़ा प्रमाणावर लाभ उठवला. त्यांनी ‘वीकली’ला भारतीय नियतकालिक बनवलं. धर्मवीर भारतींनीही ‘धर्मयुग’चं तेच केलं. आणि म्हणूनच त्यांना यश मिळालं. कारण लोकांनाही तेच हवं होतं.  
खुशवंत यांनी त्यांच्या जमान्यातल्या संपादकांपेक्षा निराळय़ा दोन गोष्टी केल्या. त्याआधी संपादकाविषयी अशी आदरयुक्त भीती लोकांच्या मनात असे की, ते कुणाला भेटत नाहीत, कामात असतात, त्यांची मर्जी असेल तरच भेटतात. त्यामुळे लोकही त्यांना वचकून असत. ही प्रतिमा खुशवंत यांनी खरवडून काढली. त्यांना कुणीही भेटू शकत असे. दारावर टकटक करायचं आणि विचारायचं की, ‘सर, मे आय कम इन?’ ते म्हणत, ‘येस.’ किंवा फार बिझी असतील तर म्हणत, ‘प्लीज वेट.’ कुणाची मुलाखत घ्यायची तर ताजमध्ये न जाता इराण्याकडे जाऊन तिथे ते त्याच्याशी बोलत. थोडक्यात, संपादकीय खुर्चीविषयीचा घुमेपणा आणि गवगवा त्यांनी घालवला. तुम्हाला त्यांच्याशी सहजपणे बोलता, हसता यायचं. विनोदही करता यायचे. तुम्हाला हवं ते त्यांच्यासोबत ‘शेअर’ करता यायचं. खुशवंत उत्तम संपादक होते. त्यांनी केवळ लोकांसाठी आपलं व्यक्तिमत्त्व तयार केलेलं नव्हतं. ते अनेकांतले पत्रकार होते. ते कुणाशीही बोलू शकायचे. त्यांच्या काही नियम-अटी नव्हत्या. ‘भारताचं काय होणार?’ यावर एखाद्या मान्यवर व्यक्तीची मुलाखत घेऊन बाहेर पडल्यावर ते रस्त्यावरच्या पेपरविक्रेत्यालाही विचारत की, ‘तुला काय वाटतं? पुढे काय होणार आहे?’ ..अशा प्रकारची पत्रकारिता खुशवंत यांनीच पहिल्यांदा सुरू केली.
पॉप्युलर पत्रकारिता म्हणजे काय, हे खुशवंत यांना खूप चांगलं माहीत होतं. त्याकाळचं कुठलंही नियतकालिक उघडून त्याच्या संपादकीय पानावरील भाषा आणि इतर पानांवरील भाषा पाहावी. त्यावेळचं संपादकीय पान हे बुद्धिजीवींसाठीच असायचं. संपादक सामान्य माणसांबद्दल बोलत नसत. खुशवंत यांनी संपादकीयाची ही रूढ प्रतिमा मोडून काढली. त्यातला उच्चभ्रूपणा घालवला. संपादक नावाच्या कुणालाही न भेटणाऱ्या, जनसामान्यांशी फटकून राहणाऱ्या पत्रकाराची प्रतिमा बदलवण्याचं काम त्यांनी केलं. आणि अशा प्रकारचा दृष्टिकोन स्वीकारूनही यशस्वी संपादक होता येतं, हे त्यांनी सिद्धही करून दाखवलं.
मोठमोठय़ा लोकांच्या ग्रुपमध्ये बसून ‘भारताचं भविष्य अमूक तमूक’ यासंदर्भात बोललं की स्टेटस मिळतं. अशा ग्रुपमध्येही ते बसले असावेत. त्यांनी तशा प्रकारच्या चर्चाही केल्या असतील.. नाही असं नाही. कारण त्यांच्या ओळखी भरपूर होत्या. पण भेळवाला, पाणीपुरीवाला, रस्त्यावरची सामान्य माणसं हा खरा भारत आहे याची खुशवंत यांना चांगलीच जाणीव होती. मला आठवतं की, ते इतरांच्या हुशारीचं कायम कौतुक करत. पत्रकारिता ही लोकांपासून फटकून राहून होऊ शकत नाही, तर ती त्यांच्याबरोबर राहूनच होऊ शकते, याबाबतीत ते कायम दक्ष असत. सामान्य लोक कसा विचार करतात, त्यांना काय हवं आहे, त्यांची आकांक्षा काय आहे, त्यांना कुठे जायचं आहे, देशाला कुठे न्यायचं आहे, हे सामान्य जनतेशी संपर्क असल्याशिवाय कळत नाही. ताजमधील जेवण आणि भेळवाल्याकडील भेळ या दोन्ही गोष्टींचा ते तेवढय़ाच सहजतेने आस्वाद घेत. त्यांच्या बोलण्यात मोकळेपणा होता. परंतु एखाद्याचं काही खटकलं, तर ते लगेचच सांगत.
पत्रकारितेतील कारकीर्दीत खुशवंत यांची अनेक विधानं वादग्रस्त ठरली आहेत. वादग्रस्तता नियतकालिकाचा खप वाढवते. म्हणूनच ते या गोष्टी करत असावेत. तुम्हाला पत्रकारितेत इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं. तसं केलं तरच तुम्ही इतरांचं लक्ष वेधून घेता. परंतु खुशवंत यांनी भारतात दुही माजवण्यासाठी, त्यात अंतराय निर्माण करण्यासाठी कधी काही केलं असेल, यावर माझा अजिबात विश्वास नाही. त्यांची भूमिका नेहमीच स्पष्ट असे. इंदिरा गांधींशी, अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी घरोबा असतानाही त्यांनी कधी कुठलीही राजकीय बाजू घेतली नाही. आपल्या विधानांवरून उठलेली वादळंही ते एन्जॉय करतात. ही इज अ नॉटी पर्सन.  
मी त्यांच्या सांगण्यानुसार ‘वीकली’मध्ये सारस्वतांवर एक लेख लिहिला होता. त्यावर शंभर पत्रं आली. तेव्हा खुशवंत म्हणाले, ‘आणखी एक लेख लिही.’ लोकांना वाद आवडतात. त्यांना शांतता आवडत नाही. म्हणजे हाणामाऱ्या, गोंधळ हवा असं नव्हे; तर.. दे लाइक पीसफुल आग्र्युमेंट. आणि हे खुशवंत यांना संपादक म्हणून उत्तम प्रकारे माहीत होतं.
त्यांना टाइम्स समूहाने एका आठवडय़ाच्या आत निघायला का सांगितलं, आणि मालक व त्यांच्यामध्ये नेमकं काय झालं, मला माहीत नाही. पण मला आठवतं- ते माझ्याकडे आले आणि म्हणाले, ‘विमला, बाय बाय. सी यू इन् दिल्ली.’ दिल्लीत म्हणजे सुजानसिंग पार्कमध्ये- त्यांच्या घरी. ते घर त्यांचे वडील सर शोभासिंग यांनी बांधलेलं आहे. त्या घराच्या दारावर लिहिलं आहे-‘प्लीज डू नॉट रिंग द बेल अनलेस यू आर एक्सपेक्टेड.’ तरीसुद्धा कुणी बेल वाजवली आणि ती व्यक्ती ओळखीची असेल, तर त्याच्याशी बोलायला ते राजी होतील. पण नको असलेली व्यक्ती असेल तर मात्र ‘हु आर यू?’ असं म्हणायलाही ते कमी करणार नाहीत.
त्यांचा ज्या घराण्यात जन्म झाला, ते घराणं श्रीमंत आहे. त्यांचे वडील शोभासिंग यांनी ल्युटनसोबत दिल्ली शहराची उभारणी केली. मी लंडनला गेले तेव्हा या एडविन ल्युटनच्या गावी जाऊन आले. तेव्हा मला असं समजलं की, ल्युटन स्वत: इथं प्रत्यक्ष काम बघायला राहिले नाहीत, ते सगळं काम शोभासिंग यांनीच केलं. तर, खुशवंत यांची खानदानी श्रीमंती खूपच बडी आहे. त्यांची पत्नीही खूप सुंदर होती. त्यांनी अनेकदा लिहिलं आहे की, ‘मला सुंदर बायकांविषयी आकर्षण वाटतं.’ पण मला वाटतं, ते फक्त बोलण्यापुरतंच असावं. स्वत:ची रंगेल छबी रंगवण्याकरता ते असं करत असावेत.
खुशवंत हिंमतवाला, धैर्य असलेला माणूस आहे. १९८४ मध्ये जेव्हा ऑपरेशन ब्ल्यू स्टार झालं, तेव्हा त्यांनी त्याविषयी जाहीरपणे नापसंती व्यक्त केली होती. खरं तर खुशवंत भिंद्रनवालेच्या विरोधात होते. त्यांची गांधी घराण्याशी जवळीक होती. अनेकांनी त्यांना विचारलंही की, तुम्ही या लष्करी कारवाईला विरोध का केला? मात्र, इंदिरा गांधी यांच्याशी घरोबा आणि खलिस्तान्यांना विरोध असूनही त्यांनी या कारवाईला पाठिंबा दिला नाही. खुशवंत यांनी ‘वीकली’मधून मुस्लिमांची बाजू मांडणारं जसं लिखाण छापलं तशीच त्यांनी शिखांवरसुद्धा वेळप्रसंगी टीका केली.  
त्यांनी ३५ पुस्तकं लिहिली आहेत. त्यात शिखांच्या इतिहासाच्या चार खंडांचाही समावेश आहे. आज हे खंड शिखांच्या इतिहासाचे सर्वात महत्त्वाचे दस्तावेज ठरले आहेत. खुशवंत इतिहासाचे फार चांगले अभ्यासक आहेत. त्यांना महाराष्ट्राच्या इतिहासाचीही चांगली जाण होती. त्यांचं व्यक्तिमत्त्व शीख असलं तरी ते कोणत्याही बाबतीत कट्टर नाहीत. ते पगडी घालत असतील, पण गुरुद्वारामध्ये फारसे जात नाहीत. आयुष्याचं तत्त्व म्हणून ते ‘ग्रंथसाहिब’ला मानतात. खुशवंत खऱ्या अर्थाने भारतीय आहेत. आपला अभिमान ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे यावर त्यांचा विश्वास आहे. आपण कोण आहोत, आपली ओळख काय आहे, हे ज्यांना कळलं, तो माणूस कधीच लाचार होणार नाही. ते आध्यात्मिकदृष्टय़ा खूप जागरूक आहेत.
खुशवंत आधी लेखक आहेत आणि मग पत्रकार. त्यांची ‘ट्रेन टू पाकिस्तान’ ही फाळणीविषयीची कादंबरी कुणीही एकदा वाचल्यावर विसरू शकत नाही. तसंच शिखांचा इतिहास! शिवाय, ‘लिट्ल मॅलिस टुवर्डस वन अँड ऑल’ हे त्यांचं प्रचंड गाजलेलं आणि वाचलं जाणारं सदर! त्याचं शीर्षकच पुरेसं बोलकं आहे. मला नाही वाटत, ते ‘मॅलिस’ (दुर्भावना, द्वेष) करतात. ते वाचणाऱ्याला मजा येईल असंच लिहितात. त्यांचं हे सदर लोकांना जोडून घेणारं होतं, आजही आहे. वाचक त्यांना पत्रं लिहीत आणि खुशवंतही त्यांना पत्रोत्तर देत. राजकारण, समाजकारण, साहित्य, कला अशा सर्वच गोष्टींबाबत ते नेहमी जागरूक असतात. थोडक्यात, खुशवंत यांना भारताचा आत्मा चांगलाच अवगत आहे.  
खुशवंत यांची अनेकांना फारशी माहीत नसलेली गोष्ट म्हणजे त्यांचा फुलझाडांचा प्रचंड अभ्यास आहे. त्यांची फुलांविषयीची जाणकारी अतिशय उच्च दर्जाची आहे. आज मला जी काही फुलं माहीत आहेत ती केवळ त्यांच्यामुळेच. आम्ही कुलाब्याला भेळ-पाणीपुरी खायला जात असू तेव्हा वाटेत दिसणाऱ्या फुलांची नावं ते मला सांगत असत. त्या फुलांचे प्रकार, त्यांची झाडं कुठं कुठं आढळतात, याची बित्तंबातमी त्यांना असे. त्यांनी ज्या ज्या फुलांच्या मला ओळखी करून दिल्या, त्यांची रोपं मी आमच्या सोसायटीच्या आवारात आणून लावली आहेत.
ते अनेकांचे चांगले मित्र आहेत. त्यांच्यात जसा बालिशपणा आहे, तशीच त्यांची जगण्याची इच्छाशक्तीही जबर असली पाहिजे. आयुष्यावर पूर्ण प्रेम असल्याशिवाय आणि जगण्याचा पूर्ण आनंद घेण्याची इच्छा असल्याशिवाय कोण इतकी र्वष आनंदी आणि समाधानी वृत्तीने जगेल? खुशवंत हे अनेकांसाठी चांगल्या आरोग्याचं उत्तम उदाहरण आहेत. याच महिन्यात त्यांनी ९९ वर्षे पुरी केली. गेल्या महिन्यात त्यांना भेटायला जाण्याची माझी इच्छा होती; पण आता मला दिल्लीला जायचं, कुणाच्या घरात राहायचं, हे सगळं नको वाटतं. पण माझी इच्छा आहे की, खुशवंत यांनी अजून खूप र्वष जगावं, लिहावं. त्यांच्यासारखा एकटा माणूस दिवसभर घरात असतो. त्यांना कसं हे जमतं, कुणास ठाऊक. पण ते त्यांनी करून दाखवलं आहे. ते अजूनही आठवडय़ाला एक पुस्तक वाचतात. त्यांचं भाषेवर, शब्दांवर प्रेम आहे. म्हणूनच ते अजूनही लिहिते आहेत. ही हॅज मास्टर्ड आर्ट ऑफ रायटिंग.. ही नोज द फीलिंग ऑफ द पीपल.. ही फील देम.. आणि त्यांच्या भावना ते शब्दांकितही करतात. म्हणूनच ते अनेकांच्या हृदयाला, भावनेला, नसीला पकडू शकतात. ते एकटे राहतात, पण त्यांचं मन आजही भारतभर फिरत असतं.  
शब्दांकन : राम जगताप

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Declass khushwant singh
First published on: 23-02-2014 at 01:20 IST