‘पेणचे गणपती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेशमूर्तीच्या घडणीत ज्यांचा मोलाचा वाटा समजला जातो, त्या नारायण गणेश देवधर ऊर्फ राजाभाऊ देवधर आणि त्यांचे चिरंजीव आनंद यांच्या तीनशे मूर्तीचे कायमस्वरूपी ‘देवधर कला दालन’ आज, ३१ मार्च रोजी सर्वासाठी खुले होत आहे. त्यानिमित्त पेणच्या गणपतीचा ब्रँड कसा तयार झाला, याची ही कहाणी.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक शिक्षित, अर्धशिक्षित, अशिक्षित मंडळी आपले नशीब अजमावण्यासाठी (खरं तर पोट भरण्यासाठी) कोकणातून मुंबई-पुणे इत्यादी शहरांच्या दिशेने धावली. कै. भिकाजीपंत हे त्यापैकीच एक. पण ते मुंबई पुण्याला न जाता कुणातरी नातेवाइकामुळे पेणला आले. हरहुन्नरी कलाकार असल्यामुळेच पागोटी बांधता बांधता गणपती करायला शिकले. (अशा प्रकारे १८८० च्या सुमारास गणेशमूर्तीने आमच्या घरात प्रवेश केला व आजपर्यंत ती वास्तव्यास आहे.) स्वत:ची कर्तबगारी सिद्ध करताना, पेणमध्ये स्वत:चं छोटंसं घर बांधण्याची व चार पैसे गाठीला ठेवण्याची संधी व पुरेसा वेळ नियतीने त्यांना दिला.

dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू
kolhapur, cracks on ambabai mahalaxmi idol
अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीवर तडे, तातडीने संवर्धन गरजेचे; पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालात निष्कर्ष

या उलट त्यांच्या मुलाचे म्हणजे (कै.) बाबुराव देवधरांचे! खरं तर वडिलांच्या हाताखाली शिकत शिकत ते एक उत्तम कलाकार झाले होते. गणपतीव्यतिरिक्त दत्त व इतर देवतांच्या काचेच्या फ्रेमधील प्रतिमा ते तयार करत. रांध्याची छोटी खेळणीवजा चित्रे व वेगवेगळे प्राणीही बनवत. आमचे शेजारी (कै.) मा. दा. टिळक यांच्या वाडय़ातील दिवाणखान्यात, भिंतीवर त्यांनी रंगवलेले शिव-पार्वतीचे चित्र आजही रंग उडालेल्या अवस्थेत आहे.    पण आजोबांनी माझ्या वडिलांना व काकांना या व्यवसायापासून दूर ठेवायचे म्हणून, आपल्या कला मंदिरात त्यांनी कधी फिरकूही दिले नाही. गंमत म्हणून, खेळ म्हणून जरी हातात माती घेतली तरी त्यांच्या आयुष्याची माती होईल या भीतीपोटीच त्यांनी दोन्ही मुलांना मातीपासून दूर ठेवले. आजोबांच्या अकाली निधनामुळे नाइलाजाने हातात आलेल्या मातीचे वडिलांनी मात्र सोने केले. म्हणून ‘पेण म्हणजे गणपती व गणपती म्हणजे देवधर’ हे समीकरण भविष्यात तयार झाले.

पितृछत्र हरपल्यामुळे वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी अंगावर पडलेली संसाराची जबाबदारी विधवा आजी, विधवा आई आणि १०-११ वर्षांचा धाकटा भाऊ असा चार जणांचा संसार राजाभाऊंना चालवायचा होता. दुसऱ्याची चाकरी करायची नाही हा पक्का निर्धार. मग आजोबांनी नाकारलेल्या रस्त्यावरूनच त्यांनी चालायचे ठरविले. हातात माती घेऊन श्रीगणेशालाच त्यांनी परत कौल लावला आणि त्या विघ्नहर्त्यांने त्यांना निराश न करता त्यांच्या बाजूने कौल दिला. जिद्दी आई, आजी व धाकटा भाऊ यांची साथ होतीच.

मातीला आकार देता देता हळूहळू दादांचे (आम्ही भावंडे व सर्व नातेवाईक आमच्या वडिलांना म्हणजे राजाभाऊंना ‘दादा’ म्हणायचो!) आयुष्यही सुंदर आकार घेत होते. संघर्षांच्या काळात मैलाचे दगड रंगविणारे दादा पुढील काळात इतर कलाकारांसाठी एक दीपस्तंभ बनून गेले. आजोबांनी व वडिलांनी चालू केलेले गणपती, देवादिकांच्या छोटय़ा प्रतिमा, रांध्यापासून बनवलेली छोटी छोटी खेळणी व प्राण्यांची चित्रे करता करता दादा कलेच्या आराधनेत मग्न होत होते. १९३२ ते १९४० या आठ वर्षांच्या तपश्चर्येनंतर नियतीने दादांसाठी यशाचे दार थोडेसे किलकिले केले. त्याचे झाले असे..

सिनेदिग्दर्शक, नटश्रेष्ठ राजा नेने हे दादांचे शालेय जीवनापासूनचे स्नेही. त्या सुमारास ते ‘प्रभात फिल्म कंपनी’त सहदिग्दर्शक होते. प्रभातच्या भागीदारांपैकी एक कै. विष्णुपंत दामले हे पेणचे व राजा नेनेंचे मामा. प्रभात कंपनीचा ‘संत ज्ञानेश्वर’ हा चित्रपट ३९-४० साली प्रदर्शित झाला.  तुफान यशस्वी झाला. चित्रपटगृहावर ज्ञानेश्वरांच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवायच्या अशी कल्पना सर्वाच्या मनात आली. त्यासाठी चार-पाच कलाकारांकडून त्यांनी ज्ञानेश्वरांच्या मूर्तीचे नमुने मागवले. कै. राजा नेनेंनी आपल्या मित्राला म्हणजे दादांनाही ज्ञानेश्वरांची मूर्ती बनवायला सांगितले. प्रभातचे कलादिग्दर्शक कै. थत्ते व इतर सर्वानी साऱ्या मूर्तीमधून दादांनी बनवलेली ज्ञानेश्वरांची मूर्ती निवडली. त्या ज्ञानेश्वरांचा आशीर्वाद दादांना पुढे आयुष्यभर मिळाला. प्रभातसाठी पुढेही त्यांनी काही पुतळे तयार केले.

१९४०, ४१, ४२ ही तीन वर्षे दादांच्या आयुष्यात महत्त्वाची ठरली. ज्ञानेश्वरांच्या आशीर्वादाने व्यवसायात जम बसत असतानाच त्यांच्या कलेची कीर्ती त्या वेळच्या कुलाबा प्रांताचे अ‍ॅक्टिंग गव्हर्नर मि. एच. एफ. नाइट यांच्या कानावर गेली. नाइटसाहेब कलाप्रेमी, रसिक व गुणग्राहक होते. त्यांनी स्वत: पेणला येऊन दादांच्या स्टुडिओला भेट दिली. तो काळ दुसऱ्या महायुद्धाचा. दादांचे काम पाहिल्यावर नाइटसाहेबांच्या मनात एक कल्पना आली. त्यांनी  दादांकडून सर विन्स्टन चर्चिल यांचा एक छोटासा पुतळा तयार करून घेतला. तो पुतळा आवडल्यावर त्याच्या शंभर प्रती करून घेतल्या आणि तो पुतळा सर्वसंमत झाल्यावर एक लाख प्रतींची ऑर्डर दिली. त्या वेळची व्यवसायाची परिस्थिती, प्लॅस्टरचे साचे यामुळे दादांनी ती ऑर्डर नम्रपणे नाकारली. ते गमतीत नाइटसाहेबांना म्हणाले,  ‘‘दुसरं महायुद्ध जाऊ दे, तिसरं महायुद्ध सुरू होऊन संपलं तरी ही ऑर्डर मला पुरी करता येणार नाही!’’

एकदा ‘स्वस्तिक रबर कंपनी’ची काही मंडळी दादांना भेटली. ‘प्लॅस्टर मूर्ती करण्यासाठी मोल्ड तयार करताना रबराचा उपयोग करता येईल’ अशी एक कल्पना त्यांनी त्यांच्यासमोर मांडली. अथक परिश्रम व संशोधनानंतर दादांनी रबरचा साचा बनविला. (आजही सगळीकडे रबरचा साचा बनवण्याची तीच पद्धत प्रचलित आहे.) हा साचा बनवण्याचे काम अत्यंत गुप्तपणे चाले. जवळजवळ बारा वर्षे ‘रबराचा साचा कसा बनवतात?’ हे कोणाला कळू न देण्यात देवधर बंधू यशस्वी झाले. हा काळ देवधर बंधूंच्या व्यवसायाचा सुवर्णकाळच म्हणायला हवा.

कलाकार म्हणून दादांनी नाव कमावले होतेच. व्यवसायाची गरज आणि नवनिर्मितीचा ध्यास यातून एकापाठोपाठ एक अशा नवीन मूर्तीची मालिकाच त्यांनी निर्माण केली. एक मूर्ती तयार केली. लोकांना ती आवडली, की तीच मूर्ती लोकाग्रहास्तव वेगवेगळ्या आकारांत परत नव्याने बनवावी लागे. त्यामुळे सरस्वती, लक्ष्मी, विष्णू, शंकर, राम, राम-सीता, कृष्ण भगवान, राधा- कृष्ण, भगवान बुद्ध, अष्टविनायक, गणेशाची अनेक रूपे तसेच धन्वंतरी, ज्ञानेश्वर, विवेकानंद, शिवाजीमहाराज, रामदास, तुकाराम, साईबाबा आणि नर्तिका, जपानी डॉल, मराठमोळी स्त्री, उमरखय्याम, सोनी महिवाल अशा वेगवेगळ्या अनंत विषयांतील प्रतिमा त्यांच्या जादूई बोटातून साकारल्या. त्याही वेगवेगळ्या आकारांत. एव्हर ब्राइट, सद्गुरू फ्रेम वर्कस्, खादी ग्रामोद्योग, डेकोर, लिबर्टी आर्ट्स इत्यादी मुंबईचे, तर माणिक स्टोअर्स, व्हरायटी स्टोअर्स, स्वीटहोम हे पुण्याचे व्यापारी मूर्ती नेण्यासाठी खेपा मारत. इतकेच नव्हे तर सोलापूर, वीरपूर, इंदोर, वृंदावन, कोलकाता, दिल्ली अशा कितीतरी ठिकाणी या मूर्ती विक्रीसाठी जाऊ लागल्या.

१८८० सालापासून पेणचे गणेश मूर्तिकार आपल्या गणेशमूर्ती मुंबईच्या बाजारात (पुढे पुढे थोडय़ाफार प्रमाणात पुणे येथे) विक्रीसाठी घेऊन जात. मूर्ती विकल्या गेल्या तर चांगले पैसे मिळत. अन्यथा नुकसान. १९५६ साली व्यवसायाच्या दृष्टीने दादांनी एक क्रांतिकारक निर्णय घेतला. पुणे येथे मामा पटवर्धन यांना एजंट नेमून त्यांच्याकडे त्यांनी गणेशमूर्ती विक्रीस दिल्या. पुढील चार-पाच वर्षांत मुंबईस फॅमिली स्टोअर्स, पुण्याला माणिक स्टोअर्स, व्हरायटी स्टोअर्स, भावे, पारसवार, तर मुंबईला पार्ले येथे महाजन, कुर्ला येथे जोशी, सांताक्रूझला पटवर्धन, ठाण्याला ढवण, कळव्याला पाटणकर, डोंबिवलीला चक्रदेव, कर्जतला करमरकर, सोलापूरला मिरजगावकर अशी गणेशमूर्ती विक्रेत्यांची मालिकाच तयार झाली. निश्चित मिळकतीमुळे गणपतीचा व्यवसाय चांगलाच स्थिरावला. गणपतीबरोबर गौरी येतात. गौरीचे मुखवटे करण्याचा जोडधंदाही तेव्हाच सुरू झाला. कोळी, आगरी लोकांकडे गौरी व गणपतीच्या शेजारी काही पौराणिक, सामाजिक विषय घेऊन त्याला अनुरूप मूर्ती ठेवल्या जातात. त्याला गौरा म्हणतात. दादांनी सलग चार-पाच वर्षे एका कोळी गृहस्थाला (किंवा आगरी असेल) असा गौरा केवळ हौस म्हणून करून दिला. त्यांनी ते चित्र आम्हाला परत आणून द्यायचे अशी अट असे. तेव्हा त्यांनी बनवलेल्या कल्याणच्या सुभेदाराची सून व शिवाजीमहाराज, रथावर आरूढ होऊन युद्धावर निघालेले कृष्ण व अर्जुन, कृष्ण-सुदामा हे देखावे पाहण्यासाठी सारे पेण लोटत असे.

मधल्या काळात दादा व काका जनरीतीप्रमाणे विभक्त झाले. काकांनी ‘कल्पना कला मंदिर’ नावाने आपले स्वतंत्र कलामंदिर सुरू केले, ते साल होते १९५७-५८. काकांनी गणेशमूर्तीवर आपले लक्ष केंद्रित केले व पेणच्या गणपती व्यवसायावर आपला वेगळा ठसा उमटवला. काकांचे आवर्जून सांगावे असे वैशिष्टय़ म्हणजे एकत्र असतानाच्या थोडय़ा मूर्ती सोडल्या तर ‘कल्पना कला मंदिर’साठी सर्व मूर्ती त्यांनी स्वत: तयार केल्या.

१९६४ साल हे या प्रवासातील नमूद करण्यासारखे महत्त्वाचे वर्ष. याच सुमारास खरं तर थोडे आधीच गणेशमूर्तीव्यतिरिक्त प्लॅस्टरच्या मूर्ती तयार करणारे काही कारखाने पेणमध्ये नव्याने उदयाला आले. ‘रबर मोल्ड’ कसा तयार करायचा याचे रहस्य आता गुपित राहिले नव्हते. प्रभात कला मंदिरातून बाहेर पडलेल्या काही कारागिरांनी दादांनी तयार केलेल्या मूर्तीवरच ‘रबर मोल्ड’ तयार करून त्यांच्या प्रतिकृती कमी किमतीत बाजारात विकण्यास सुरुवात केली. (आता तर कन्याकुमारीपासून बद्रिनाथपर्यंत आणि द्वारकेपासून कोलकात्यापर्यंत अनेक ठिकाणी आमच्या मूर्तीच्या प्रतिकृती बाजारात दिसतात.)

या अडचणीच्या काळातही दादांमधील कलाकार स्वस्थ बसू शकत नव्हता. एक अभ्यास म्हणून त्यांनी घारापुरीच्या त्रिमूर्तीची साडेचार फूट उंचीची प्रतिकृती तयार केली. पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयासाठी पाच फूट उंचीचे उभे विवेकानंद व उभे ज्ञानेश्वर तयार केले. उरळीकांचनमधील एका शाळेसाठी चार फूट उंचीची बसलेली शारदेची मूर्ती तयार केली. एक कलाकार म्हणून ते खूप मोठे असले तरी सच्च्या कलाकाराकडे असणारी अस्वस्थता त्यांच्या मनात घर करून असायची. मातीकामाचे शास्त्रशुद्ध शिक्षण आपल्याला घेता आले नाही, ते आपल्या मुलांपैकी कुणीतरी घ्यावे असे त्यांना वाटत असे. म्हणूनच मोठा मुलगा सुरेश इंजिनीअर होऊन नोकरीनिमित्त मुंबईला गेल्यावर मधला मुलगा सदानंद यांचे बी.ए.पर्यंत शिक्षण झाल्यावर ‘प्रभात कला मंदिर’मध्ये व्यवस्थापक म्हणून येण्याचा व धाकटय़ा मुलासमोर अर्थात माझ्यासमोर एस.एस.सी. झाल्यावर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये मॉडेलिंग विभागात शिल्पकलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवला. वडील करतील ते योग्यच करतील यावर आमचा ठाम विश्वास असल्यामुळे सदानंद (नाना) ‘प्रभात कला मंदिर’ मध्ये रुजू झाला व मी जे. जे.मध्ये दाखल झालो. देवधरांच्या दुसऱ्या पिढीला या मातीच्या व्यवसायात तिसरी पिढी येऊ नये असे वाटत होते आणि तिसऱ्या पिढीतील दोघांनाही चौथी पिढी याच व्यवसायात यावी असे वाटत होते.. परिणाम, मी व चुलत बंधू श्रीकांत दोघेही जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून पदवी घेऊन – मी १९७३ मध्ये व श्रीकांत १९८० मध्ये – या गणेशमूर्तीच्या व्यवसायाशी निगडित झालो.

१९३२ ते १९९७ या प्रदीर्घ काळातील दादांच्या कलाविषयक कामगिरीचे मूल्यमापन एका वाक्यात करायचे झाले तर मी असे करेन, ‘लिथो प्रेस’च्या निर्मितीमुळे राजा रवी वर्मा यांनी, केवळ राजेरजवाडे, संस्थानिक व श्रीमंतांच्या दिवाणखान्यातील भिंतींवर स्थान पटकाविणाऱ्या आपल्या पेंटिंग्जच्या प्रतिकृतींना सर्वसामान्यांच्या घरातील भिंतींवर जागा मिळवून दिली, त्याचप्रमाणे ‘रबर मोल्ड’च्या संशोधनामुळे व उपयोगामुळे केवळ श्रीमंतांच्या घरातील दिवाणखान्यात दिसणाऱ्या पुतळ्यांना व मूर्तीना कै. राजाभाऊंनी सर्वसामान्यांच्या घरातील भिंतींवर, हॉलमध्ये व देवघरामध्ये स्थान मिळवून दिले.