भारत माझा देश आहे.
– आहें! आता त्याला आपण काय करणार? आमच्यापण बापजाद्यांना इथं डोंबोलीतच जन्म घ्यायचा होता! साला, त्या मोदींचा अन् आपला एकच प्रॉब्लेम! व्हिसा! तो मिळतों ना, तर तुम्हांस सांगतो लेलें.. जाऊ दें! आमच्या नशिबी ‘सागरा प्राण तळमळला’ हें गाणं मुळी नाहीच!

सारे भारतीय माझे बांधव आहेत.
– हीहीहीही! फक्त एक सोडून! व्हय की नाय रे इज्या?

माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून..
– क्या शेट? स्साला तुज्याकडं चंदाच मागितला ना? घर का चाँद तो नाय ना मागितला? मग एवडा बवाल काय करतो खालीपिली? देखो शेट, इस साल अपने डांडियाकु पाच बरस हो गएला हाय. तो पोग्राम िढकच्याक होना चाहिये के नहीं? तो वो क्या फोकट में होता है? तूमीच बोलो शेट! आखीर परंप्रा बी कुच चीज है के नहीं? वो टिकनी चाहिये. बढनी चाहिये. इस साल तो अपने डांडिया में फोरीन की हिरोईने लाना बोलते सब लोग. हौर तुम पाच हजार के लिये हिचकिच करताय. तो बोलो, कितने की पावती फाडू?.. ये फोक्या, लिख बे छे हजार लिख.. परंप्रा जनरल स्टोर के नाम!

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन..
– ये चम्या, थांब! चल चल चल.. कल्टी मार इथून!
– नको रे. इथंच बसू या. तिकडं टेबलपण खाली दिसतंय.
– साल्या, तिकडं बापूस बसलाय माझा लॉनवर! पाहिलं तर शीण करील!
– त्यांना अजून माहीत नाही?
– येडा की काय तू? आपण घरी जाताना अख्खी बाबा इलायची तोंडात टाकतो.
– माहीत असेल रे त्यांना! एवढं लपून राहतं काय? आणि आता आपण काही लहान नाही. चांगले एफवायला आहोत!
– नको यार. त्यांनी पाहिलं तर..
– काय होईल?
– अरे, त्यांनाच लाजल्यासारखं होईल!!

..आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
– टेम्पू साइडकू लाव. हौर ये पकड.
– ये क्या साब?
– दिखता न क्या, गुलाब का फूल? ले. हौर अभी शंभर निकाल.
– जाने दो ना साब. र्अजट डिलिवरी है.
– ये टेम्पो, ज्यादा आवाज न! तू आता पहले पेपर, पीयूशी, लायसन निकाल.
– पीछले टैम पचास दिया था साब. अभी एकदम सौ?
– पीछले टैम मने तेरेकू गुलाब का फूल दिया था?
– नही.
– तेरे साथ गोडीगुलाबीसे बोला था?
– नहीं.
– फिर?
– फिर क्या साब? गुलाब के फूलका सौ रुपया?
– नही रे टेम्पो! अभी सौ-जन्य सप्ता चालू है ना हमारा, उसका!

माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यांतच माझे सौख्य सामावले आहे.
.. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही हे स्पष्ट करतो, की आमचा याच्याशी काहीएक संबंध नाही. हे सर्व आरोप आमच्यावर राजकीय हेतूने केलेले आहेत. हे विरोधकांचे षड्यंत्र आहे. हे आम्हाला राजकारणातून उठवण्याचे कारस्थान आहे. माध्यमांनी आमच्या बोलण्याचा विपर्यास केला आहे. आमच्यावरचा एक जरी आरोप खरा ठरला, तरी आम्ही राजकारणसंन्यास घेऊ..

– झकास! आता कसं जमलं. मान्साला पाठांतर कसं तोंडपाठ पायजेल!
– थँक्यू डॅडी! मग आता आम्ही पॉलिटिक्समध्ये येऊ ना?
– निचिंत या! तुमची सगळी तयारी झालेली हाये! या आनी आमच्या बरोबरीने तुम्हीबी आपल्या देशाची सेवा करन्याचा नवा आदर्श घालून द्या! म्हना, भारत माता की जय!!