News Flash

ध्वनिमुद्रिकांची न्यारी दुनिया..

आकडे, रंग, नावे यांचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक गोष्टी त्यामुळे आपल्या स्मरणात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत.

| June 21, 2015 12:10 pm

आकडे, रंग, नावे यांचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक गोष्टी त्यामुळे आपल्या स्मरणात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. पांढरा, भगवा, काळा, हिरवा, निळा असे रंग पाहिले की आपण ते आयडेंटिटी असलेल्या मुळाकडे जातो. तसेच साहेब, भाऊ, बिग-बी, धकधक, सम्राट अशी नावे ऐकली की त्या व्यक्ती लगेच आपणास दिसावयास लागतात. आकडय़ांचेही असेच आहे.. १९४७- स्वातंत्र्य, १६३०-१६८०- शिवाजीमहाराज, साडेतीन म्हटले की शक्तिपीठे किंवा मुहूर्त, ३६-२४-३६ अशी आकडेवारी म्हणजे सौंदर्याची व्याख्या, ८०/१४०- शुगर किंवा बी. पी.चे रीडिंग, ७/१०, ५/१० वाजले की जाणारी-येणारी डेक्कन क्वीन धावताना दिसते, आणि ७८, ३३-१/३, ४५ असे आकडे पाहिले की आपले मन संगीतात रममाण होते. कारण हे आकडे आहेत ध्वनिमुद्रिकांच्या वेगाचे (स्पीड). जगभर याच स्पीडने ध्वनिमुद्रिका/ रेकॉर्ड अखंड शंभरहून अधिक वर्षे फिरत आहेत व आपणास संगीताचा आनंद देत आहेत.
याच ध्वनिमुद्रिकाच्या दुनियेत आपल्याला नेले आहे सोलापूरचे जयंत राळेरासकर यांनी. ध्वनिमुद्रिका या खरे तर स्मरणमुद्रिका- आनंदमुद्रिका आहेत. वर्षांनुवर्षे त्यांची गोडी, कुतूहल आणि आनंद आपण घेत आहोत.
‘ध्वनिमुद्रिकांच्या दुनियेत’ हे जयंत राळेरासकर यांनी स्व-अनुभव, आवड, अभ्यास, ध्यास, प्रेम व चिकाटी यांचे सुंदर रसायन बनवून पुस्तकरूपाने आपणापुढे ठेवले आहे. अनेक चाकोरीबाहेरची व वेगळ्या विषयावरची पुस्तके प्रकाशित करणारे अरुण जाखडे यांच्या पद्मगंधा प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. अत्यंत सुंदर ‘प्रॉडक्शन’ असलेले हे छोटेखानी पुस्तक आहे. १५१ पानांमध्ये लेखकाने ३४ लेख लिहिले आहेत. या सर्वाचा विषय जरी ‘ध्वनिमुद्रिका’ हाच असला तरी त्यात विषयांची विविधता आहे. वृत्तपत्रांतून पूर्वी प्रसिद्ध झालेल्या लेखांचा हा संग्रह आहे. त्यामुळे प्रत्येक लेख स्वतंत्र आहे. पण हे लेख एका धाग्याने जोडले गेले आहेत. दोन-तीन पानांचा एकेक लेख आहे. त्यामुळे ते लवकर वाचून होतात. शिवाय स्वतंत्र असल्यामुळे आपण आपल्या आवडीप्रमाणे कोणताही लेख केव्हाही वाचू शकतो. लेखकाची भाषा अतिशय सुंदर, सुसंस्कृत, अनुभवाने समृद्ध झालेली व तरीही ओघवती आहे. त्याला एक गप्पांची व मित्रांशी हितगुज करण्याची- म्हणजे ‘ये हृदयीचे ते हृदयी’ पोहोचविण्याची कलात्मकता आहे. आणि एवढे असूनही सर्व लेख माहितीपूर्ण- मुख्य म्हणजे विश्वासपात्र आहेत व ते इतिहासाच्या शास्त्रकाटय़ावर सिद्ध झाले आहेत. नुसत्याच गावगप्पा नाहीत.
जयंत राळेरासकर यांनी हे पुस्तक पत्नीला अर्पण करताना लिहिले आहे की, ‘माझ्या या छंदाचा तिला कधीही त्रास वाटला नाही.’ असे म्हणून त्यांनी जणू कॅव्हेट दाखल केले आहे, किंवा अटकपूर्व जामीनाचा अर्जच सादर केला आहे. गमतीचा भाग असा की, असे संग्राहक- मग ते कोणत्याही विषयांतील असोत वा कोणत्याही काळातील असोत- त्यांच्या घरी डोकावून पाहावे, म्हणजे ‘त्रास वाटला नाही’ याचा योग्य तो प्रत्यय वाचकांस येईल. ‘आज घरी येताना कृपया काहीही ‘दुर्मीळ’ आणू नका,’ ही तंबी समस्त संग्राहकांना नित्याचीच आहे.
ध्वनिमुद्रिका या नेहमीच आपणास आनंद, अभ्यास, अनुभव, प्रेम देत असतात. अनेक संग्राहकांमुळेच त्या आपणास उपलब्ध होत असतात. वाडीच्या नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी दत्तगुरूंचे वर्णन करताना एका पदात लिहिले होते- ‘स्मरता दर्शन देणाऱ्या..’ एका अर्थाने ध्वनिमुद्रिकांनाही हे लागू पडते. आपण एखाद्या गायकाची, वादकाची, नटाची, रागाची, पदाची, गायकाच्या एखाद्या रागातील एखाद्या जागेची नुसती आठवण जरी केली, म्हणजे स्मरण जरी केले, तरी लगेचच त्याचे दर्शन आपणास होऊ शकते.. अर्थात ध्वनिमुद्रिका हाती असेल तर! अशा ज्येष्ठांच्या ध्वनिमुद्रिका या आपणास मार्ग दाखविणाऱ्या गुरूच आहेत.
आता ज्येष्ठ नागरिकांच्या क्लबमध्ये दाखल होऊ घातलेले जयंत राळेरासकर हे सोलापूरचे. बी. एस्सी. (ऑनर्स) असूनही त्यांची तब्बल ३० वर्षे नोकरी झाली ती सेंट्रल बँक ऑफ इंडियात. पण त्यांनी छंद जोपासला तो संगीताचा. वाचन, लेखन, संगीत ऐकणे यातून त्यांनी पाच ते सहा हजार ध्वनिमुद्रिकांचा संग्रह केला. आणि नुसतेच ‘माझ्याकडे ध्वनिमुद्रिकांचा संग्रह आहे,’ असे न सांगता सर्वाना तो विविध माध्यमांतून, जाहीर कार्यक्रमांतून, तसेच रेडिओच्या अनेक कार्यक्रमांतून उपलब्ध करून दिला. त्यांचे हे कार्य फारच महत्त्वाचे आहे. आज सोलापुरातील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या श्रीराम पुजारी संगीत संग्रहालयात ते त्याचे जतन व वृद्धी करीत आहेत. या सर्व लेखांमध्ये ध्वनिमुद्रिकांच्या इतिहासातील अनेक टप्पे आपणास दिसतात.
थॉमस अल्वा एडिसनच्या २२ डिसेंबर १८७७ साली तयार केलेल्या ग्रामोफोनमधून त्याच्या आवाजात रेकॉर्ड केलेल्या ‘मेरी हॅड अ लिटिल लॅम्ब’ या बालगीताच्या इतिहासापासूनची माहिती या लेखसंग्रहात आपणास मिळते. ही जगातील पहिली रेकॉर्ड सिलेंडर स्वरूपात होती. आज आपण जी ७८ आरपीएम सपाट रेकॉर्ड पाहतो, तिचा शोध लागायला १८८७ साल उजाडले. एमिली बलीनर या जर्मन शास्त्रज्ञाने त्याचा शोध लावला.. अशी महत्त्वपूर्ण माहिती आपणास पुस्तकातून मिळते.
भारतात प्यारीसाहेब, गोहरजान, मलकाजान, जानकीबाई ऑफ अलाहाबाद हे सुरुवातीचे गायक कलावंत- ज्यांच्या रेकॉर्ड्स उपलब्ध होत्या. बंगालमधील कोलकाता- डमडम हे या उद्योगाचे मुख्य केंद्र होते, हे विशेष. त्याकाळी बेका, ओडियन, ट्विन, रामाग्राफ, यंग इंडिया, जयभारत, हिंदुस्तान रेकॉर्ड्स व सर्वात मोठी कंपनी एचएमव्ही या लबल्सने रेकॉर्डनिर्मिती होत होती. प्रत्येक कंपनीचे कलाकार वेगळे होते. कंपनीचे अधिकारी गायक, वादक, नट, नेते, साहित्यिक, पुढारी यांना शोधून त्यांच्या रेकॉर्ड्स तयार करीत असत.
आपले गाणे रेकॉर्ड करू देणाऱ्या कलावंतांचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत. आज शंभर वर्षांनंतरही आपण ते सहज ऐकू शकतो. त्या- त्या काळात आलेल्या ध्वनिमुद्रिका हे त्या- त्या कलावंताचे प्रातिनिधिक सादरीकरण होते व त्यावेळी हा एकच मीडिया असल्यामुळे ते रेकॉर्डिग उत्तम कसे होईल यासाठी सगळेच जण झटत होते.
यातल्या सर्व लेखांमध्ये आलेल्या कलाकारांच्या रेकॉर्ड्सचा नुसता उल्लेख जरी पाहिला, तरी आपणास रेकॉर्ड्सचा इतिहास व त्याची व्याप्ती सहज अनुभवाला येते. अब्दुल करीम खाँ, रामकृष्णबुवा वझे, रहिमत खाँ, ओंकारनाथ ठाकूर, डी. व्ही. पलुस्कर, विनायकबुवा पटवर्धन, केसरबाई, मोगुबाई, लक्ष्मीबाई जाधव, पं. भीमसेन जोशी, कुमार गंधर्व ते लता व आशा.. केवढा मोठा हा स्पॅन आहे.
लता व आशा यांचे विशेष म्हणजे त्या जे जे गायल्या, ते सर्व रेकॉर्ड झाले आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर जेवढय़ा मॅचेस खेळला, त्या सर्वाचे व्हिडीओ उपलब्ध आहेत, तसेच.
कलावंतांचे ध्वनिमुद्रण, ध्वनिमुद्रण करू न देणारे कलावंत, सोय असूनही मोठय़ा कलाकारांचे न होऊ शकलेले ध्वनिमुद्रण, ध्वनिमुद्रणातील अडचणी आणि त्यातील किस्से अशा अनेक पैलूंवर या पुस्तकात प्रकाश टाकला गेला आहे.
गोहरजान, मलकाजान, मास्टर मदन यांच्या आयुष्यातील घटना वाचताना आपण चक्रावतो. ‘तोतया बालगंधर्व’ ही कल्पनाही आपण करू शकत नाही; पण ते सत्य आहे.
रेकॉर्ड्सचा इतिहास दोन व्यक्तींच्या उल्लेखाशिवाय पुढे जाऊच शकत नाही. एक म्हणजे बालगंधर्व व दुसरे कुंदनलाल सैगल. सैगलबद्दल फार छान माहिती या पुस्तकात आहे. ‘बाबुल मोरा’मुळे सैगल अजूनही आपल्या स्मरणात आहे. ७८ आरपीएम रेकॉर्ड्सचे हे दोघे सम्राट होते.
गाण्याच्या कथा-व्यथा सांगताना लेखकाने एखादे गाणं दुसऱ्याचा नावावर कसे जाते, याचा जो उल्लेख केला आहे तो मनोरंजक आहे. पण ही चूक की व्यापारी क्लृप्ती, याचा शोध अदलाबदल झाल्यावर लावता येतो का, हे पाहावयास हवे.
सोलापूरवासी असल्यामुळे सोलापूरचे कलाकार व त्यांच्या रेकॉर्ड्स यावर लेखकाने मोठय़ा प्रेमाने लिहिले आहे. यातूनच मेहबूबजान ऑफ सोलापूर यांच्यावर शोधकार्य करून, माहिती मिळवून त्यांनी ती प्रसिद्ध केली आहे.
वंदे मातरम्, मराठी कवी, रहिमत खाँ, सुंदराबाई, मौजुद्दीन खाँ, रेकॉर्ड्सच्या लेबलवरील विविधता, रेकॉर्ड्समधील साहित्यिक विविधता, संतरचनांवरील रेकॉर्डिग्ज, स्वातंत्र्यलढा आणि त्याबाबतच्या ध्वनिमुद्रिका, जगभरातील आर्चिज, लंडन परिषद, गावोगावचे ध्वनिमुद्रिका संग्राहक, सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड्स कलेक्शन या सर्वाबद्दल लेखकाने अतिशय सविस्तरपणे लिहिले आहे. ते मुळातूनच वाचावे.
अशा प्रकारे बहुसंपन्न असे हे पुस्तक आहे. यातल्या सगळ्या लेखांची पूर्वप्रसिद्धी वृत्तपत्रांमधील सदरामध्ये झालेली आहे. परंतु त्याचे पुस्तक करताना त्यावर पुन्हा एकदा नव्याने हात फिरवणे आवश्यक होते. तसेच अधिक विस्ताराने लिहिणेही अपेक्षित होते. यातील काही विषयांची व्याप्ती एवढी मोठी आहे, की त्यावर खंडरूपाने काळ, कलाकार, तंत्रज्ञान यांची सांगड घालून क्रमवारीने लिहिणे अधिक प्रशस्त होईल. ‘आनंदयात्रा’ हे या लेखकाने लिहिलेले पहिले पुस्तक, आणि दुसरे हे. ‘ध्वनिमुद्रिकांच्या दुनियेत’ ही धावती सफर घडवून आणल्याबद्दल जयंत राळेरासकर व पद्मगंधा प्रकाशनाचे अभिनंदन.

‘ध्वनिमुद्रिकांच्या दुनियेत’- जयंत राळेरासकर,
पद्मगंधा प्रकाशन, पृष्ठे- १५१,
मूल्य- १६०रुपये.
संजय संत – sanjayrsant@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2015 12:10 pm

Web Title: dhwani mudrakanchya duniyet
Next Stories
1 शोध.. समर्थकृत दखनी-उर्दू रचनांचा!
2 नाटय़ाचार्य देवलांची ‘दुर्गा’
3 नूडल्सची गुंतावळ