13 July 2020

News Flash

टपालकी : हुप्पा हुय्या..!

मद्या पब्लिकला सौतावानी स्लीम करन्याची ‘जिम्मे’दारी तुमी सौताच्या खांद्यावर घेवाच सदाभौ.

(संग्रहित छायाचित्र)

कौस्तुभ केळकर- नगरवाला

जिगरी मतर सदाभौ यांस,

दादासाहेब गांवकरचा दंडवत.

तबियत सांभाळून ऱ्हावा सदाभौ. उगा डायेटिंगच्या वाटंला जाशीला आन् तुमची झीरो फिगर मायनसमंदी जायाची. आवं, समद्या जगाला मंदीची लागन झालीया सध्याच्याला. तिथं तुमच्या झीरो फिगरला नजर लागाया नगं. सदाभौ.. आवं, तुमच्याकडं बगून समद्या ममईला अ‍ॅशिडीटी हुते. तुमी मस भजीपाव, न्हाईतर पावभाजी खावा. न्हाईतर जिलेबी- फाफडा. तुमच्या तोळामासा बाडीमंदी शेंटीग्रामनं सुदीक भर पडत न्हाई.  बगून आमी लई शेंटी हुतो सदाभौ. आवं, ईस्वेस्वराची किरपा हाई तुमच्यावर. हसमुख सुरत, सिंगलपसली बाडी आन् डोईवर काळंभोर दाट केसं. तेबी फोर्टी प्लसच्या उमरला! तुमी फकस्त याचं शिक्रेट वप्पन करा, समदी दुनिया तुमास्नी फॉलो करंल बगा. आवं, आजूबाजूला नजर टाका वाईच. समदीकडं सुटलेली प्वाटं आन् चमकीले टाळू. आमचं येक दोस्त हाईत पुन्याचं. पुन्याला मंजी येनी टाईम, रेनी टाइम. बायकोपोरासंगट शापिंगला गेल्ते त्ये. येकदम बारीश सुरू. पोरंग भिजायला नगं म्हून बायकूनं पोराला बापाच्या प्वाटाखाली हुभा क्येला. त्यो पोरगा कोरडाठाक. बापाच्या मोटय़ा प्वोटाची किरपा. आजूबाजूचं समदं पब्लिक मोबाईलवर फोटू काडून ऱ्हायलं समदीकडं व्हायरल. आमच्या दोस्ताला कुटं त्वांड आन् प्वाट दाखवाया जागा ऱ्हायली न्हाई बगा. तवापासून आत्तापत्तुर.. चार म्हैनं बादलीभर घाम गाळतुया रोज जिममंदी. पन आजून छटाक येट कमी हुईना. जिमवालं मस पसं घेत्यात. नुस्तं येट अ‍ॅन्ड वॉच. कितीबी येट क्येला तरी त्येचं येट कमी हुईना. आव, इधात्यानं परत्येकासाटी काहीबाही येट प्रोग्राम फिक्स केलेला असतुया, सदाभौ. त्येच्यामंदी आपुन ढवळाढवळ करून उपेग न्हाई. धा हजारात यखांदाच तुमच्यावानी जलम घेतुया. येटप्रूफ. तवा खावो, पिवो, ऐश करो. तुमची तबियत हमेशा मस्त ऱ्हानार. डायेटिंग वगरा बाकी पापी दुनियेसाटी. आमास्नी तुमाला बगितला की मिथुनदा आठीवतो.

जिमी, जिमी, जिमी.. आजा आजा आजा.. त्यो जिमवाला कितीबी बोलावून ऱ्हावू दे तुमास्नी; तुमी तिकडं फिरकत बी न्हाई. तुमी जिम-नास्तिक हाईत. पन जिमवाल्यांचं द्य्ोव हुनार तुमी. परत्येक जिममंदी उद्याच्याला तुमचा फोटु. जिमवालं जाहिरात करनार.. ‘‘आमची जिम ज्वाईन करा आन् चार म्हैन्यात सदाभौवानी स्लीम होवा..’’

समद्या पब्लिकला सौतावानी स्लीम करन्याची ‘जिम्मे’दारी तुमी सौताच्या खांद्यावर घेवाच सदाभौ.

तुमी जिमचा ईशय काडला अन् आमास्नी आमचं आबासायेब आठीवलं. सहा फूट उंच. तगडी श्टीलबाडी. तुमचं सिक्स पॅकवालं झक मारतील अशी दणकट बाडी. पलवान हुते त्ये. मस कुस्ती मारल्या हैत त्येन्नी. रोज तालमीत जानार. हजार हजार जोरबठका. येक दिसबी खंड न्हाई. तगडा खुराक. त्या टायमाला पचास हजार दिल्तं ग्रामपंचायतीला देणगीदाखल. तालीम बांधायासाटी. गावच्या पोरास्नी तामडय़ा मातीची वढ वाटाया पायजेल, कुस्तीचा शौक हवा म्हून लई परयत्न क्येले. रोज तालमीत जानार. सौता मेहनत करनार. पोरास्नी नवीन नवीन डाव शिकविनार. कोल्हापुराहून वस्ताद बोलावल्यालं. खुराकाला पकं कमी पडलं की सौताच्या खिशातून देनार. कंदी बी तालमीच्या रस्त्यानं जावा.. खिडकीतून तामडय़ा मातीचा धुराळा उडताना दिसायचाच. शड्डचा आवाज कानावर पडायचाच. हुप्पा हुय्याचा आवाज घुमायचाच. आबासायेबांची मेहनत रंग लाई. गावच्या पलवानाला हिंद केसरीचा किताब गावला. आबासायेब लई खूश जाल्ते तवा. कुस्तीचा आमास्नी फारसा शौक न्हवता. पर आबासायेबांमुळं तालमीची सवय लागली. आज बी रोज येक घंटा तालमीत जातुया. मेहनत करतुया. तुमी शिटीवालं म्हनत्यात तसं. लाकूड पकडा हातामंदी. मंजी टच् वूड सदाभौ. आजपत्तुर तापाची गोळी बी न्हाई घ्येतली कंदी. समदी आबासायेबांची आन् इस्वेस्वराची किरपा. गाव आता-आत्तापत्तुर निरोगी हुता. सुद्द हवा. मेहनती लोक आन् समाधानी वृत्ती.

पर आता औघड हाई. आवं, तालीम ओस पडून ऱ्हायलीय. तालमीत जानारं राणादा कमी होवून ऱ्हायल्येत. हाताला मोबाईलचा चाळा आन् बुडाखाली फटफटी. तालमीत जायला नगं. रानात घाम गाळायला तयार न्हाईत पोरं. तबियत मजबूत कशी हुनार? जरा मौसम बदलला की खोकत्यात. शिंकत्यात. ताप भरतुया. डागदरकडं पळत्यात. गावाची तबियत नाजूक होवून ऱ्हायलीया सदाभौ..

सदाभौ, आमचं कुलकर्नी मास्तर तुमास्नी ठावं हाईतच. रिटायर्ड होवून बी धा-बारा र्वस झालीत. पर टायर्ड न्हाई जालं आजून. टुकटुकीत हाईती. येकदम तंदुरुस्त. बी. पी. न्हाई की शुगर न्हाई. येकदम आपल्या बच्चनसायेबावानी ताडताड चालत्यात. साक्षरतेचं काम करत्यात. सरकारी योजनांची म्हाईती देत्यात लोकास्नी. योगासनाचं वर्ग चालीवत्यात. दिनभर धावपळ चालू असती मास्तरांची. इतकी र्वस जाली मास्तरांनी कंदीबी तालमीचा शौक क्येला न्हाई की जोरबठका काढल्या न्हाईत. कुटलंबी पथ्यपानी न्हाई. येकदम स्लीमट्रीम. येक डाव मास्तरान्ना ईचारलं म्या.. ‘‘मास्तर, तुमच्या निरोगी तबियतीचं राज काय?’’

मास्तर हसलं. मोटा श्वास घ्येतला. म्हणलं, ‘‘दादू, देह द्य्ोवाचं मंदिर हाई. त्येला व्यायामाचा नवेद दाखीवलाच पायजेल. आमी तुमच्यावानी जोरबठका न्हाई काडल्या कंदी. पर आजून बी रोज सूर्यनमस्कार घालतुया. योगासनं करतू. परत्येकाचं तंत्र येगळं आसंल, पर आपलं शरीर यंत्र हाई येक. त्येला तेलपानी करायाच हवं. रोजच्या रोज. आधा घंटा तुमी सौताच्या शरीरासाटी द्यायाच पायजेल. सकाळच्याला फिरायला जावा. योगा करा. तालमीत जावा. न्हाईतर शिटीवाल्यांसारीक जिममंदी जावा. आपल्या शरीराचे स्नायू रोज हलते ऱ्हायला पायजेल. रोज कसरत, म्हेनत पायजेलच. झेपेल तशी. मानूस चालता-फिरता ऱ्हायला पायजेल. न्हाईतर चरबी नावाचा गंज चढतू. मंग धा रोगांचं झ्येंगाट मागं लागतंया. े जालं शरीराच्या आरोग्याचं. मनाचं बी आरोग्य जपाया पायजेल दादू. समाधान पायजेल. जिंदगीत पका पायजेलच. त्येच्यासाटी कष्ट, ढोरम्हेनत घ्याया लागतीच. पर त्येच्यापायी मनाची शांती हरवली तर कसं चालेल? कन्च्या बी परिस्थितीत समादानी ऱ्हायला पायजेल. े जमलं की खाल्ल्यालं अंगी लागतंया. देहाच्या मंदिरातला तबियतीचा देव परसन्न होतु. समद्या रोगराईपासून आपल्या देहाचं रक्षन करतु. व्यसन, पापकमाई, भांडनतंटा, गुंडगिरी े समदे शत्रू हाईत. निंद हराम हुते त्यापाई. मन खात ऱ्हातं आपलं आपल्यालाच. खाल्ल्यालं अंगी लागत न्हाई. तबियतीच्या देवाचा कोप होतु. मन आन् शरीर दोगं बी निरोगी पायजेल. तवाच परत्येक मानूस निरोगी हुईल. देशाची तबियत बी तंदुरुस्त ऱ्हाईल.’’

सदाभौ, मास्तरांचं पाय धरलं म्या. सौ बात की एक बात. काय भारी बोल्ले मास्तर. मास्तरांचं आशीरवाद आपल्या समद्यान्ला लाभनार बगा. आपलं म्हातारपन सुखात जानार.

सदाभौ, आमी वळखून हाई तुमास्नी.

भले तुमी कंचाबी डी.-डी. डायेट प्लान फालो न्हाई करत, पर तबियतीसाटी काहीबाही करत असनारच. मार्निग वाक, न्हाईतर झुंबा. गेलाबाजार आमच्या वैनीसायेबाच्या तालावर डान्स. तुमी कितीबी बाता मारा. तुमी ढीग जिम- नास्तिक आसशीला, पर तबियतीच्या देवावर तुमची भक्ती सौ फीसदी असनारच. असायलाच पायजेल. शेवटपत्तुर हातीपायी धड पायजेल आपुन. कुनावर बोज नको. जिंदगीचा हर लम्हा आनंदात जगाया पायजेल. तुमी, आमी आन् माज्या समद्या देसावर आरोग्यदेवतेची अशीच किरपा ऱ्हावू दे. ईडापीडा टळो. रोगराईचा ईस्कोट होवू दे. जिम-नास्तिक चालंल, पर व्यायामावर समद्यांची श्रद्धा आसू दे. तवाच समद्यांची तबियत फॅन्टास्टिक हुईल. हमलोग फीट अ‍ॅन्ड फाईन पायजेलच.

लोकल आन् ग्लोबल आरोग्य बी सुदाराया पायजेल. आपल्या धरणीमातेच्या तबियतीची काळजी बी आपुनच घ्यायला पायजेल. प्लास्टिकबंदी, वृक्षसंवर्धन, लोकसंख्या नियंत्रण, जलसंधारण, इंधनबचत, प्रदूषण नियंत्रण याची ‘जिम्मे’दारी प्रत्येकाची हाई. आपुन आपली जबाबदारी झटकून चालनार न्हाई. अंगन, गाव, देस, पृथ्वी समदं सोच्छ ठेवलं पायजेल. प्रदूषणमुक्त. तरच ग्लोबल वाìमग, अवकाळी पाऊस, मान्सूनचं बिगडलेलं टाइमटेबल या रोगांपासून धरनीमाता मुक्त हुईल.

सदाभौ, येक ऱ्हायलंच की! आपल्या देसाचा दयोव लोकशाही. लोकशाहीचा दिवाळसण मंजी विलेक्शन. सण मतदानाचा हक्क बजावून साजरा करायला ईसरू नगा. आपल्या राज्याचं विलेक्शन हाई इक्कीस तारखंला. सोमवारी. तुमा शिटीवाल्यांची वंगाळ हॅबीट ठाव हाय आमास्नी. शनिवार, ईतवार, सोमवार.. तुमचा सुटीचा हिशेब येकदम पक्का आसतुया. तुमी लगोलग गाडी काडनार आन् मंग टूरटूर. थोडंसं उन्नीस- बीस चालंल, पर इक्कीस न्हाई. इक्कीस तारखंला बोटाला शाई लावायाच पायजेल. तरच राज्याचं आरोग्य चांगलं ऱ्हानार.

हिथं नास्तिक नगं

मतदान-आस्तिक पायजेल.

राज्याची, देसाची तबियत सुदारंल.

लोकशाहीची तालीम मजबुत हुईल.

आन् आनंदाचं, समृद्दीचं हुप्पा हैया

मनाच्या कानात ऐकू ईल.

जुग जुग जियो, सदाभौ!

तुमचा जीवाभावाचा दोस्त..

दादासाहेब गांवकर

kaukenagarwala@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2019 2:09 am

Web Title: dieting tapalki article abn 97
Next Stories
1 बहरहाल : मघई जर्देदार
2 नाटकवाला : ‘पत्नी’
3 संज्ञा आणि संकल्पना : दे धक्का!
Just Now!
X