मृदुला दाढे- जोशी – mrudulasjoshi@gmail.com

चाचाजींच्या औषध कंपनीत राजकुमार रुळलाय. त्याला स्टोर मॅनेजरची बढतीही मिळालीय. पहिल्या पगारानंतर मिसेस डिसासाठी नवी हॅट घेऊन राजकुमार घरी जातो. त्यानंतरचा प्रसंग, संवाद आणि ललिता पवार यांचा अभिनय हे सगळं इतकं उच्च दर्जाचं आहे, की डोळे पुसतच हा प्रसंग बघावा लागतो! बोलण्यात टिपिकल गोवन टोन.. डोळ्यांत या लेकरासाठी अपार माया.. त्या मायेपोटी आलेला हक्क गाजवण्याची सवय.. हे सगळं ललिताबाई जगल्यात. मिसेस डीसांना घेऊन राजकुमार हॉटेलमध्ये जेवायला जातो तेव्हाचं ‘नाइन्टीन फिफ्टी सिक्स’ हे मस्त फडकतं गाणं.. मूड बदलणारं!

What Hemant Godse Said?
हेमंत गोडसे छगन भुजबळांच्या पाया पडल्यानंतर म्हणाले, “मी आशीर्वाद”..; काळाराम मंदिरात नेमकं काय घडलं?
suryakumar yadav
सूर्यकुमार यादवनं यशासाठी श्रेय दिलेली ‘मसल मेमरी’ म्हणजे काय?
Dilip Mohite patil,Shivajirao Adhalarao Patil
“आमच्यावर अविश्वास दाखवलात तर…”, पक्षप्रवेशावेळी मोहिते पाटलांचा शिवाजीराव आढळरावांना इशारा
buldhana, prataprao jadhav marathi news, buldhana lok sabha bjp marathi news
“प्रतापराव जाधव खासदार झाल्यावर भेटतच नाही”, भाजप आमदारांची टोलेबाजी; म्हणाले, “दोन महिन्यांतून एकदातरी…”

राजकुमार आणि आरती एकमेकांवर अनुरक्त झालेत. पण ‘इजहार’ कुणी, कसा, कधी करायचा? एकांतात भेटल्यावर कितीही उसनं अवसान आणलं तरी ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’ हे सांगताना नि:शब्द झालेली दोघं शेवटी नजरेतून बोलून मोकळी  होतात.

‘दिल की नजर से, नजरों के दिल से..’
(शैलेन्द्र, लता, मुकेश)

हा फक्त शब्द-खेळ नाही. ‘दिल की नजर, नजर का दिल!’ खरंच.. मनाच्या दिठीनं, दिठीच्या हृदयातून.. काय असेल ते रहस्य? मला उलगडायचंय हे गूज. गीत बनून आता ओठांपर्यंत पोचलंय ते. काय नाव द्यावं त्याला? कसं झेलावं हे सौख्य? कुठलीतरी अनामिक ओढ मला खेचून नेतेय! काहीतरी हरवतंय. पण खूप काही मिळतंयसुद्धा! काय ‘माजरा’ आहे हा- कुणी सांगेल का?

वाल्ट्झ ठेक्यावरचं अत्यंत प्रसन्न, मधाळ डय़ुएट आहे हे. मुकेशचा टोन अतिशय लोभस. लताबाईंचा आवाज गोडव्याची चरमसीमा गाठतो. ‘क्यूं बेखबर यू खिंची सी चली जा रही मैं’ म्हणताना ‘क्यूं’ अक्षरावर पंचम आहे. पण या पंचमावरून ‘बेखबर’च्या कोमल धैवतावर त्या ज्या पद्धतीनं जातात, ते अतक्र्य आणि दैवी आहे. त्या स्वरांमधली आस ज्या श्रुतीनं भरलेली आहे ती फ्रीक्वेन्सी सापडणं मुश्कील. त्या ‘बेखबर’ शब्दातलं भान हरपून जाणं.. स्वत:ला विसरणं या एका स्वरात सांगून गेल्यात लताबाई. ‘खिंची सी’ हाही असाच दिव्य उच्चार. पण एवढय़ानं हे प्रकरण संपत नाही. पुढे ‘ये बात क्या है’ गाताना ‘है’ वर काय घडतं? असल्या जीवघेण्या जागा काळजात नाजूक वार करून जातात. कितीही वेळा ऐकल्या, गायल्या तरी ‘ती’ स्फटिकस्पष्टता, ‘ते’ टायमिंग आणि सर्वात कठीण ‘तो’ भाव त्यात आणता येत नाही.. गळ्यातून ‘त्यासारखं’ काहीतरी जातं (हासुद्धा भासच!). ‘ते’ जात नाही.. जाणारही नाही. ‘कोई हमें बता दे’ला लताबाई मिंड घेऊन खालच्या धैवतावर येतात. आपण ट्रान्समध्ये गेलेलो असतो.

या गाण्याचा इंट्रो पीससुद्धा काही सांगायला निघालेला, मध्येच थांबलेला असा आहे. आणि एका क्षणी अकॉर्डियनचा पीस एक दिव्य शलाका उजळावी तसा येऊन जातो. आणि ‘तो’ अनुभूतीचा क्षण त्यातून जिवंत होतो.. हे कसं झालं? सहज असेल? नकळत?

‘क्यूं तुम पराये दिल में समाये..’ हे कोडं सुटत नाही. पण जन्मांतरीची खूण मात्र पटलेली असते.

आपण ‘आरती’ नसून ‘आशा’ आहोत, हे आरतीनं बरेच दिवस सांभाळलेलं बिंग फुटायची वेळ येते. नेमका आरतीचा वाढदिवस असतो. ती राजकुमारला ‘येऊ नकोस’ असं सांगते. पण योगायोगानं चाचाजी नेमकं राजकुमारलाच केक घेऊन घरी पाठवतात. अपरिहार्यपणे नजरानजर होते. पार्टीसाठी खास वेश परिधान केलेली आरती शुभेच्छा स्वीकारत असते. जिला आपण ‘आपल्या’तली समजलो, ती चक्क ‘मालकीण’ निघावी? का केली असेल तिनं आपली क्रूर चेष्टा? आरतीच्या चेहऱ्यावरचे रंग उडतात. राजकुमारला काय आणि कसं समजवावं, हे तिला उमगत नाही. त्यातच चाचाजी त्याला गाण्याचा आग्रह धरतात. आतून प्रचंड दुखावलेला राजकुमार गातो..

‘सब कुछ सीखा हमने, ना सीखी होशियारी
सच है दुनियावालों के हम है अनाडी..’
(शैलेंद्र, मुकेश)

काय चुकलं लोकांचं? साध्या साध्या गोष्टी आपल्याला समजल्या नाहीत. सगळं शिकलो जगात; पण ही चतुराई, वागण्यातले डावपेच समजले नाहीतच  की. मग अडाणीच आहोत आपण. दुनियेनं खूप समजावलं.. सगळेच ‘आपले’ नसतात. पण काळजातली जखम सांभाळत सगळ्यांसाठी जळलं हृदय हे. सगळ्यांना आनंद देत राहिलो मी. शमेवर  स्वत:च झडप घालून जाळून घेण्याचा परवान्यासारखा माझाही हट्टच की! मनाचं वैराण वाळवंट होताना स्वत:च्या डोळ्यांनी बघितलं.. प्रेमाचा रंग कसा फिका होतो ते समजलं.. पैशासाठीच जीव टाकणार सगळे जण.. त्यापेक्षा महत्त्वाचं काही नाही. आता खरे-खोटे सगळेच चेहरे समोर आले. इथं आतला आवाज दाबला जातो. भावनांना शून्य किंमत असते या जगात.. फार सुंदर, सोनेरी स्वप्नं होती माझी.. ज्या एका ताऱ्याकडे प्राणांची दिठी लावली, तोच निखळला.

शैलेन्द्रला या व्यथेची नेमकी ठसठसणारी जखम अंतर्बा जाणवलीय. त्याशिवाय हे असं लिहिणं शक्यच नाहीये. काय प्रवाह आहे भाषेला! किती सहज व्यक्त होणं! ना कसली अवघड रूपकं, न कसली सूचकता. त्या राजकुमारच्या स्वभावासारखं सरळ कैफियत मांडणं..

गाण्याची सुरुवात थोडी आक्रमक पीसनं होते. कारण आतून बसलेला धक्का त्यात जाणवायला हवाय.. आणि मग गाणं एक संयत मूड पकडतं. त्यात उपरोध आहे, व्यथा आहे, निराशा आहे.. मुकेशचा आवाज एक बापुडवाणा टोन घेऊनच येतो. ही निरागसता आपल्यात नसते. आसपासही दिसत नाही. पण इथं भेटली की त्या निरागसतेला कडकडून मिठी मारावीशी वाटते. पडद्यावर न पाहताही, कथा माहीत नसतानाही हे गाणं रडवू शकतं, याहून मोठी कुठली पावती असू शकते?

विमनस्क स्थितीत पार्टीतून निघून गेलेल्या राजला भर पावसात शोधायला निघालेली मिसेस डीसा त्याला घरी घेऊन येते. दुसऱ्या दिवशी राज घर सोडून जायला निघतो. त्याच्या वागण्याने प्रचंड दुखावलेली मिसेस डीसा तापानं फणफणत असते. ‘आईच्या तोंडावर पैसे फेकून तिच्या दुधाचं कर्ज फेडणारी हीच औलाद!’ असं कळवळून म्हणते. राजची चित्रं विकल्याचा बहाणा करत त्याला पैसे दिलेले असतात, तेही  त्याला परत करते तेव्हा राजचा बांध ढासळतो. दोघं ढसाढसा रडतात. हिंदी चित्रपटांच्या इतिहासात मुद्दाम शूट केलेले वाटूच नयेत असे जे प्रसंग आहेत त्यातला हा सर्वोच्च दर्जाचा एक अविस्मरणीय प्रसंग आहे. दगडाला पाझर फोडणारा.

दरम्यान, ‘मॉडर्न मेडिसिन’ या राज काम करत असलेल्या कंपनीकडून एक महाभयंकर चूक होते. विषाच्या बाटल्यांचे बॉक्स फ्लूच्या औषधांमध्ये मिसळून जातात. तो माल परत घ्यायला चाचाजी नकार देतात. आणि नेमकं तेच औषध मिसेस डीसाला अजाणतेपणी दिलं जातं. राज आणि आरतीचे आपसातले गैरसमज मिटतात, पण चाचाजींचा विरोध तीव्र होत जातो. ‘तू ऐकलं नाहीस तर मी राजकुमारचा काटा काढीन..’ हे ते निक्षून सांगतात. अत्यवस्थ झालेल्या मिसेस डीसाला भेटण्यासाठी आरतीला बोलवायला राज तिच्या घरी जातो. मात्र तिथे त्याला वेगळा धक्का बसतो. चाचाजींच्या धमकीमुळे राजला तोडायला निघालेली आरती ‘हे ऐषोआराम मला तू कधीच देऊ शकणार नाहीस, मला विसरून जा,’ असं सांगते. दुखावलेला राज जाताना मात्र तिला कळवळून  सांगतो- ‘या दुनियेच्या पलीकडे एक दुनिया आहे, जिथे माणूस सोन्याचांदीच्या तराजूमध्ये तोलला जात नाही. ही दुनिया होती, आहे आणि राहील!’ मनाविरुद्ध त्याला तोडण्याचं अपरंपार दु:ख आणि पश्चात्ताप यानं आरती कोसळते..

‘तेरा जाना, दिल के अरमानों का लूट जाना’
(शैलेन्द्र, लता मंगेशकर)

‘ते रा जा ना..’ चार अक्षरी मुखडा. त्या चार अक्षरांत सामावलेलं दु:ख. तू गेलास म्हणजे काय काय निघून गेलं आयुष्यातून! माझी स्वप्नं, माझं प्रारब्ध सगळं तुझ्यात होतं. तुझा-माझा आनंद, दु:ख सगळं एक होतं. आत्ताच तर आपण आणाभाका घेतल्या प्रेमाच्या. हा चंद्र..अतूट नातं आहे आपल्याशी त्याचं. प्रत्येक वेळा तुझी आठवण करून देईल मला तो. मी रडून माझ्या अश्रूंना वाट करूनही देईन.. पण या मनाला कोण समजावणार?

अनेक कोनातून या गाण्याचा वेगळेपणा जाणवतो. मुळात फक्त चार अक्षरी मुखडा. ‘एस. जे.’ अर्थात शंकर जयकिशन आणि शैलेंद्र यांना खात्री होती की, चार अक्षरांत ती वेदना मांडता येईल! आणि चंद्राचा संदर्भ उगीच येत नाही. त्याचं मूळ आधीच्या गाण्यांशी आहे. या वेडय़ा माणसाला भावना समजाव्यात म्हणून ‘वो चांद खिला’ म्हणत त्या चंद्राला साक्षी ठेवलं. ‘हम खो चले, ‘चांद’ है या कोई जादूगर है?’ असा प्रश्न याला पडला.. मग तो चंद्र बघून हे सगळं आठवणारच ना?

‘मैं रो कर रह जाऊंगी,
दिल जब जिद पर आयेगा,
दिल को कौन मनायेगा?’

म्हणजे या ठिकाणी मी आणि माझं हृदय वेगळे आहोत.. कारण मी आता परिस्थितीपुढे शरणागती पत्करली असं क्षणभर मानू.. पण माझं मन? त्याला नाही समजत या व्यवहारी गोष्टी.. शैलेंद्र इथं एक अद्भुत किमया करून जातो. ‘स्व’ आणि ‘मन’ यांची इथं फारकत झालेली दिसते.

आरतीच्या काळजातलं सगळं तुफान त्या पियानोच्या सुरांमध्ये फुटून बाहेर येतं. (पडद्यावर नूतनची बोटं पियानोवर योग्य दिशेने फिरतात.) त्याला जोड त्या अतिशय तीव्र अशा व्हायोलिन्सची. त्यात केवढा प्रचंड फोर्स आहे! एक पाव क्षण विराम येतो आणि लता नामक दिव्य स्वरात ती चार अक्षरं अक्षरश: अश्रूंनी भिजूनच उमटतात. ‘ना’ अक्षरावर ढोलक त्यात सामील होतो. दु:खी गाण्याची लय धीमी असावी वगैरे संकेत एस. जे.ना कधीच मानवले नाहीत. उलट, सगळा भावनिक कल्लोळ पेलायचं सामथ्र्य त्यांच्या वाद्यमेळात होतं. अंतऱ्यातल्या प्रत्येक ओळीला बासरी दुजोरा देते. एकटं सोडत नाही त्या भावनेला. इंटरल्युड्समध्ये मुख्य पीसला जोडून अंतऱ्याला अचूक नेऊन सोडणारा एक छोटासा ‘टेल पीस’ ठेवण्याची शैली इथंही दिसते. सारंगीचा पाव क्षणाचा टेल पीस काळजात कळ उठवून जातो.

खूप रडल्यावर बोलताना जो अस्फुट आवाज असेल, तो आवाज इथं लताबाईंचा लागलाय. त्या प्रत्येक अक्षरात एक हुंदका आहे. ‘ते रा जा ना’ हे चार स्वर ‘सा ग म प’ या चार स्वरांवर आहेत. पण प्रत्येक स्वराला पुढच्याचा कण देत, ती आस भरत लताबाई गातात. गंधाराला रिषभ आणि मध्यमाला गंधार जोडत त्या श्रुती भरत ही अक्षरं आली नसती तर..? त्यातही ते स्वर एकाच वजनाचेही नाहीत. ‘फेड इन.. फेड आऊट’चं त्यांचं विलक्षण तंत्र वापरून बाई गायल्यात. खरा जीवघेणा प्रकार तर पुढे आहे. ‘कोई देखे ऽऽऽ’  हा एकार ज्या पद्धतीने आंदोलीत केलाय, ते सुचतं कसं, गायलं जातं कसं, हे प्रश्न अनुत्तरितच राहणार. आपल्या हातात फक्त स्तब्ध होऊन ऐकणं आहे. अंतऱ्याच्या ओळी खालच्या स्वरावरून वर चढत जातात.. तीव्रता वाढत जाते.. आणि एका क्षणी शब्द संपतात. मग एका आर्त लकेरीलाच तिथे जागा असते. याला म्हणतात गाणं ‘रचणं’.. ते ‘चढवत’ ‘कळसाला’ नेणं. एस. जे.चं गाणं ही अशी एक ठासून भरलेली कॅप्सूल असते. त्यांचं गाणं एकदा त्यातल्या शब्दांसाठी, एकदा वोकल पार्टसाठी, एकदा orchestration साठी असं ऐकावं लागतं. पडद्यावर नूतनच्या चेहऱ्यावरचे ते जखमी भाव बघितल्यावर आपले डोळेही कोरडे राहू शकत नाहीत.

त्या विषारी औषधानं मिसेस डीसाचा करुण अंत होतो, हे राजकुमारला समजतं. राजचं तोंड बंद करण्याचे, त्याला मारण्याचे प्रयत्न होतात. त्यालाच अटक होते. आरती खुनाचा आळ स्वत:वर घेते. ‘माझ्या मनातून तुम्ही साफ उतरलात!’ हे चाचाजींना जेव्हा आरती निक्षून सांगते, तेव्हा त्यांची सदसद्विवेकबुद्धी जागी होते आणि आपल्याच कंपनीच्या विषारी औषधामुळे मिसेस डीसाचा जीव गेला हे ते कबूल करतात.

घराला कुलूप लावून निघण्याच्या तयारीत असलेल्या राजकुमारला मिसेस डीसाच्या प्रत्येक वस्तूत तिचं अस्तित्व जाणवतं. हलणारी आरामखुर्ची सुचवत असते की, ‘बाळ, मी इथंच आहे. नको जाऊस घर सोडून.’ त्यावेळी राज कपूरच्या चेहऱ्यावरचे भाव.. ते गूढ अस्तित्व यांनी अंगावर काटा येतो. एका आईचा आपल्या लेकरात किती जीव गुंतलेला असतो! आपल्याही डोळ्यांतून घळघळा अश्रू वाहायला लागतात. त्याच क्षणी समोर आरती उभी असते. या वेडय़ाला जन्मभर सांभाळण्याचं वचन दिलेलं असतं ना तिनं! पाश्र्वभूमीवर ‘सच है  दुनियावालो’ ऐकू येत असतं. एक श्रेष्ठ  कलाकृती अनुपम दिग्दर्शन, संगीत, अभिनय यामुळे परमोच्च बिंदूला पोचलेली असते. या सगळ्याच कलाकारांना एक कडक सलाम करून म्हणावंसं वाटतं, ‘तुम्हाला आम्ही कधीच विसरू शकणार नाही. माणूसपण जिवंत ठेवलंत आमचं. ये कर्ज रहेगा आप का हमपर!’

‘के  मर के  भी किसी को याद आयेंगे
किसी के  आँसुओं में मुस्कुरायेंगे..’
हे खरं केलंत तुम्ही!
‘जीना इसी का नाम है।’
(उत्तरार्ध)