राजेंद्र येवलेकर

मराठीत कसदार विज्ञानकथालेखन हे अभावानेच आढळते. विज्ञानकथांचा उद्देश हा विज्ञान समजून सांगण्याचा नसला, तरी त्यातून नकळत वाचकाला विज्ञानातील संकल्पनांचा आपोआप परिचय होत जातो. त्याशिवाय विज्ञानातील शक्यतांचा आवाकाही लक्षात येतो. अर्थात या विज्ञानकथांचे सूत्र हे नेहमीच मानवी मूल्यांशी नाळ जोडणारे असावे लागते. डॉ. संजय ढोले यांच्या ‘डिंभक’ या विज्ञानकथासंग्रहात आपल्याला जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, नॅनो तंत्रज्ञान अशा असंख्य विज्ञान शाखांतील नवनव्या संकल्पनांची सांगड घातलेली बघायला मिळते. ‘डिंभक’ हा त्यांचा पाचवा विज्ञानकथासंग्रह. नव्या दमाचे विज्ञानकथाकार म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली आहेच. त्याला साजेशा अशाच या कथा आहेत.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?

त्यांच्या या कथांमधील नायक हे सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने वाचकाला या कथा परक्या वाटत नाहीत. यातील कथासूत्रे मांडताना त्यांना ते विज्ञान विषयाचे प्राध्यापक असल्याचा निश्चितच फायदा झालेला आहे. कुठलीही संकल्पना आधी माहीत असेल तरच ते कथासूत्र विस्तारणे व सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडणे शक्य असते. त्यामुळे त्यांचे लेखन हे सामान्य माणसाला समजेल असे आहे. त्यासाठी वाचकाला विज्ञान शाखेचा परिचय असलाच पाहिजे, असे मुळीच नाही. आपल्या दैनंदिन जीवनातील सर्वच प्रश्नांना विज्ञानात उत्तरे आहेत असे नाही, कारण त्याहीपलीकडे असे काही आहे तेही यातून जाणवते. निसर्गचक्रात बदल करून आपण वाटेल ते करू शकतो हा माणसाचा अहंगंड असतो. त्यालाही टाचणी लावणाऱ्या कथा यात आहेत.

त्यामुळेच या कथा वाचकाला अंतर्मुख करतात. क्लिष्ट वैज्ञानिक परिभाषा सोपी करत ते या कथांची गुंफण अशा लालित्यपूर्ण पद्धतीने करतात की, कथाबीज भाषेशी एकरूप होऊन जाते. कुठेही तांत्रिक पद्धतीने माहितीवजा काही तरी सांगितले आहे, असे वाटत नाही. कथांतील वैज्ञानिक प्रयोगातील शक्यता व प्रसंगी धोकेही अंगावर शहारे आणतात. यातील कथांमध्ये समाजजीवन, त्यातील भावभावनांची गुंतागुंत, मानवी संवेदना, विज्ञान परिकल्पना, रहस्यमयता, अद्भूतता आहे. वाचकांची उत्कंठा ताणून धरण्याचे कसब ढोले यांना साध्य झालेले आहे.

‘डिंभक’ या मुख्य कथेत उल्केवर सापडलेल्या अंडकोशाच्या फलनातून निर्माण झालेला डिंभक कसा बाटलीतला राक्षस बनून जातो.. हे दाखवले आहे. त्याला स्वत:ची बुद्धी व शक्ती असण्याची वेगळी कल्पना या कथेत दिसते. मग त्याला नियंत्रणात आणण्यासाठी प्रा. शेंडे व प्रा. नाथ यांची धावपळ, खोल खड्डा खणून त्यात ती उल्का व ती डिंभकाची बाटली शिशाच्या वेष्टनात घालून गाडून टाकण्याची युक्ती.. हे सगळे वेगळे जग आहे. यात डॉ. नाथ हे प्राणिशास्त्रज्ञ आहेत, तर प्रा. शेंडे हे भौतिकशास्त्रज्ञ आहेत. याचा अर्थ, एखाद्या संशोधनात केवळ एकाच शाखेचे ज्ञान असूनही उपयोगाचे नसते. काही वेळा त्यात इतर ज्ञानशाखांची जोड लागते- ती शेंडे यांच्या रूपाने दिली आहे. ‘सुगाव’ या कथेतही गुन्ह्यंच्या तपासात भूतकाळातील ध्वनिलहरींची जशीच्या तशी निर्मिती करण्याच्या तंत्रज्ञानाने गुन्ह्यचा छडा लावण्याची युक्ती तशी गुंगवून ठेवणारी. यातील परिसर व पात्रे मात्र जवळची वाटणारी, त्यामुळे ही कथा प्रभाव पाडून जाते. आजकाल लोकसंख्या वाढतच असली तरी अनेक जोडपी ही अपत्यसुखापासून वंचित असतात. ‘विळख’ या कथेतील मीनल व मिलिंद या कलावंत दाम्पत्याची कथा अशीच वेगळ्या अंगाने जाणारी आहे. मीनलच्या गर्भाशयात एकाचवेळी बाळ व कर्करोगाच्या पेशी वाढत असतात. यात सरतेशेवटी मीनलला वाचवण्यासाठी गर्भाशय काढून टाकण्याची वेळ येते, पण मीनलची अपत्याची आस तसे होऊ  देत नाही. मग बाळ जन्मालाही येते, पण नंतर मीनलच्या पोटात कर्करोग वाढतो. अशा वेळी भौतिकशास्त्रज्ञ डॉ. सुरेश गोसावी तिला वाचवण्यात मदत करतात. या कथेतील आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर झुलवणारे चित्रण खिळवून ठेवणारे आहे. यात कोणतेही एक शास्त्र एकटय़ाने आपल्या समस्या सोडवण्यास पुरेसे नाही, हेच पुन्हा डॉ. ढोले येथे दाखवून देतात.‘सोनियाची खाण’ ही कथा माणसाला असलेल्या सोन्याच्या हव्यासाची आहे. यात डॉ. शिवराम मानेशिंदे हे सोने तयार करण्याच्या वेगळ्या प्रक्रियेचा शोध लावून श्रीमंत होतात, पण त्यात त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. निसर्गातील रंगद्रव्यांवर आधारित ‘पिंजक’ या कथेत मूळ काश्मीरचे वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. हमीद रेहमान हे व्यक्तीला अदृश्य करण्याचे तंत्रज्ञान शोधून काढतात, पण नंतर ते तंत्रज्ञान दहशतवाद्यांच्या हाती लागू नये यासाठी प्राणांचे बलिदान देतात. या संग्रहातील प्रत्येक कथा काही तरी वेगळेपण घेऊन आलेली आहे. त्यामुळे आपण शेवटच्या कथेपर्यंत कधी येऊन ठेपतो ते कळतही नाही.

‘डिंभक- डॉ. संजय ढोले’

मेहता पब्लिशिंग हाऊस,

पृष्ठे -१५४, किंमत – १९५ रुपये

rajendra.yeolekar@expressindia.com