जाहीर चर्चासत्रात कधी भाग घेण्याची पाळी आली की एक प्रश्न मला हटकून विचारण्यात येत असे : ‘स्त्री असून तुम्ही स्त्रीसमस्येवर आधारीत असं काहीच कसं हाताळलं नाहीत? नाटक नाही, की चित्रपट नाही, की टी. व्ही. मालिका नाही. असं का?’ सुरुवातीला मला ओशाळं वाटत असे. मग मी काहीबाही समर्थन करी.
पण वरचेवर या प्रश्नाचा भडिमार होऊ लागला तेव्हा मात्र मी त्रासू लागले. हा काय कहार आहे? केवळ मी बाई आहे म्हणून मी बायकांची वकिली केलीच पाहिजे, ही सक्ती का? मी माणूस पण आहे, आणि माणसाबद्दल लिहिते. उगाच पक्षपात का करायचा? मी स्वत: अंध नाही; पण माझ्या एका चित्रपटात (‘स्पर्श’) मी एका अंध व्यक्तीच्या अंतरंगात शिरून त्याची व्यथा मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न नव्हता का केला? कोणत्याही कलाकाराला- विशेषत: लेखकाला- परकायाप्रवेश करण्याची कला साध्य झाली तरच तो विषयाला न्याय देऊ शकतो. प्रत्येक अनुभव स्वत:च घेणं त्याला शक्य नसतं. पण डोळे उघडे ठेवून वावरलं तर हृद्य विषयांचा तुटवडा त्याला कधीच भासणार नाही. शेक्सपीअरचं लाखमोलाचं विधान आहेच की- ‘अवघे जग ही एक रंगभूमी आहे!’ आजपर्यंत मी कधीच ठरवून विषय शोधत गेले नाही. विषयच माझा मागोवा घेत येतो, असा माझा प्रांजळ अनुभव आहे.
या खेपेला नेमकं तसंच झालं. एका नारीनिकेतनात काही कामास्तव मी गेले होते. तिथे अग्निदिव्यामधून गेलेली एक बाई मला भेटली. तिने आपली थक्क करून सोडणारी कथा मला ऐकवली. त्यापाठोपाठच दोन-तीन अस्वस्थ करून सोडणाऱ्या सत्य घटना वृत्तपत्रांतून माझ्या वाचनात आल्या. महिलांवरच्या अत्याचाराच्या. मी आतून ढवळून निघाले. सुन्न झाले. आणि मग मनाच्या खोल गाभाऱ्यातून उसळी मारून तिघीजणी थेट वर आल्या. माझ्या समोर अवतरल्या. तिघींच्या व्यथा वेगवेगळ्या होत्या. आपापली कर्मकथा त्या भरभरून मला सांगू लागल्या. मी म्हटलं, ‘थांबा गं.. जरा सावकाश.. मला लिहून घेऊ दे.’ त्यांची होरपळ शब्दरूपाने माझ्या कागदावर उमटत गेली. नवीन नाटक निर्माण झालं.. ‘माझा खेळ मांडू दे.’
त्याचं थोडक्यात कथानक असं आहे : सेवा श्रॉफ या विधवा आहेत. त्या एकटय़ा राहतात. त्यांच्याकडे मोठी जागा आहे. त्याहीपेक्षा मोठं मन आहे. गरजू स्त्रियांना माफक दरात पेइंग गेस्ट म्हणून त्या ठेवून घेतात. त्यांना आसरा देतात. त्यांच्या आश्रयाला आलेल्या तिघींची कथा या नाटकात उलगडते. सगळ्यात वडील आहेत- मामी. कळायला लागायच्या आतच आपल्या सख्ख्या मामाच्या वासनेची त्या शिकार झाल्या. आईने बजावले-‘आपलेच दात आणि आपलेच ओठ. बाहेर कुठे बोलू नकोस. अब्रू जाईल.’ आता आणखीन काय अब्रू जायची शिल्लक होती? समाजनीतीचा पहिला धडा त्या शिकल्या. आपल्या आईकडूनच. एका वर्षांच्या आत मामानं त्यांचं लग्न लावून दिलं. नवरा नपुंसक होता. ‘त्या रात्री मी शांत झोपले,’ मामी म्हणाल्या. पण दुसऱ्या दिवशी सकाळी सासूनं पाठीवरून हात फिरवला आणि सांगितलं, ‘नवऱ्याच्या जागी तू मामंजींची सेवा कर. त्यांनाच पती मान.’ दोन रात्री ही ‘सेवा’ घडल्यावर तिसऱ्या रात्री मामींनी सुरा खुपसून सासऱ्याचा खून केला. खटला खूप गाजला. मामींनी पुढची बारा वर्षे मेंटल हॉस्पिटलमध्ये काढली. (मला नारीनिकेतनमध्ये भेटलेल्या त्या महिलेची ही कहाणी होती. मला स्वत:ला एवढी सनसनाटी कथा सुचणं शक्य नव्हतं.)
पद्मिनीचा जन्म गरीब घराण्यातला. दोन बहिणी. त्यातली एक अपंग, म्हणून घरी आर्थिक ओढाताण. जात्याच हुशार असल्यामुळे शिष्यवृत्ती मिळवून पद्मिनी बी. कॉम. झाली. बँकेत चांगली नोकरी मिळाली. जाड चष्म्यामुळे तिचे लग्न जमेना. पण अचानक तिला एक मागणी आली. या मुलाची कुणा परधर्मीय मुलीबरोबर भानगड असल्याची कुणकुण कानावर आली होती; पण तिच्याकडे घरच्यांनी काणाडोळा केला. लग्न झाले. तिच्या नोकरीवर डोळा ठेवून ही मागणी घातलेली होती. नवऱ्याचा पगार यथातथाच होता. आपण आपलं वेगळं बिऱ्हाड थाटू असं आमिष दाखवून, गोड बोलून नवऱ्याने पद्मिनीला आपल्या बँकेतून कर्ज घ्यायला लावलं. मालाडला तिच्या पैशाने छोटा फ्लॅट घेतला. आणि मग त्या नव्या जागेत आपल्या मैत्रिणीला घेऊन तो दाखल झाला. परिस्थिती असह्य़ होऊन पद्मिनी घराबाहेर पडली. तिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. ऑफिसमधले एक वरिष्ठ अधिकारी कारखानीस यांनी तिला खूप साहाय्य केले.
रिबेकाची कहाणी अगदीच वेगळी होती. मर्सी मिशनजवळच्या उकिरडय़ात कापडात गुंडाळलेलं एक बंडल सिस्टर्सना सापडलं. केळीच्या आणि अंडय़ाच्या टरफलांतून उपसून त्यांनी तान्ह्य़ा रिबेकाला बाहेर काढलं. तिला मिशनमध्ये वाढवलं. लाघवी स्वभाव, लोभस रूप आणि असामान्य कलागुण यांच्या जोरावर ती चमकली. पुढे टी. व्ही.मध्ये नावारूपाला आली. गोवर्धन नावाच्या एका दुर्जन दलालाने तिला आपल्या सापळ्यात पकडले. केवळ त्याच्यातर्फेच काम करण्याचा करार तिच्याकडून लिहून घेतला. मग ‘बी’ दर्जाच्या चित्रपटांतून ‘सी’ दर्जाच्या भूमिका ती करू लागली. एकदा उत्तान हावभाव करायला नकार दिल्यामुळे गोवर्धनने सेटवरच तिच्यावर हात उगारला. तेव्हा एक सहा फुटी तगडा जवान फिल्मी हीरोप्रमाणे तिच्या मदतीला धावून आला, अन् गोवर्धन पसार झाला. डेव्हिड हा फाइट मास्टर कांगाचा पट्टशिष्य होता. स्वत: अप्रतिम करामती करीत असे. तो रिबेकाचं रक्षण करू लागला. सतत सहवासाचे रूपांतर स्नेहात झाले. दोघांनी लग्न ठरवले आणि ईस्टरचा मुहूर्त पक्का केला. ते एकत्र राहू लागले. पण दुर्दैव! पेरलेल्या सुरुंगांमधून हीरो (म्हणजेच त्याचा डबल-डेव्हिड) धावत जातो असा शॉट होता. कंट्रोलवर खुद्द कांगा बसले होते. अलीकडे ते जास्त पिऊ लागले होते. आज ते नशेत धुत्त होते. दृश्य सुरू झाले. डावी-उजवीकडे फुटणाऱ्या सुरुंगांमधून वाट काढीत डेव्हिड पळू लागला. कांगांनी दहा सेकंद आधी चाप ओढला. एक सुरुंग उंच वर उडाला तो डेव्हिडला घेऊनच. (ही घटना आपल्या हिंदी सिनेसृष्टीत प्रत्यक्ष घडलेली आहे. एका प्रख्यात फाइट मास्टरचा हा दुर्दैवी किस्सा सर्वश्रृत आहे.)
या तिघींच्या कथा भडक वाटतील. पण वास्तव हे कल्पनाविलासापेक्षाही अद्भुत असू शकतं असं म्हणतात. Truth is stranger than fiction!
संतोष कोचरेकरने ‘महाराष्ट्र रंगभूमी’च्या बॅनरखाली नाटक प्रस्तुत करण्याची इच्छा दर्शविली. मी आनंदाने संमती दिली..
माझ्या मनात बऱ्याच दिवसांपासून खोल कुठेतरी एक सल डाचत होती. ती म्हणजे व्यावसायिक मराठी रंगभूमीच्या कारभारात भिनलेली गैरव्यवस्था. निर्माता कितीही कर्तबगार असला तरी एकूण यंत्रणाच अशी काही सापळ्यात अडकली होती, की अनेक वेळा त्याला हात टेकावे लागत. तालमीच्या बाबतीत नटांची अनियमितता, प्रवासाच्या धकाधकीत सेटची होणारी दुर्दशा, घोषित केलेल्या वेळेला चोखपणे नाटक कधीही सुरू न करण्याचा अलिखित नियम या आणि अशा अनेक त्रुटी मला ग्रासत असत. एखाद्या कणखर निर्मात्याला खरंच का या प्रांतात काही सुधारणा नाही करता येणार? आपणच हे आव्हान पत्करलं तर..?
मी संतोषला फोन केला. माझं ‘स्वगत’ त्याला बोलून दाखवलं. माझ्या बोलण्याचा रोख त्याला तात्काळ कळला. ‘समजलो,’ तो म्हणाला- ‘तुम्हाला स्वत: निर्माता व्हायचं आहे.’ स्पष्ट बोलण्यात संतोष कुणाला हार जाणारा नव्हता. ‘मॅडम! तितकं सोपं नाहीये ते. अनेक मोहिमा लढवाव्या लागतात. नगरपालिका, कंत्राटदार, जाहिरातदार, प्रेसवाले, सेन्सॉर बोर्ड, थिएटरवाले, दलाल, बॅकस्टेज, तंत्रज्ञ, नट, प्रेक्षक- नाना पगड लोकांना तोंड द्यावं लागतं. तुम्हाला या गोष्टींचा सुतराम अनुभव नाही. ठीक आहे. घ्या उडी! पण निदान मॅनेजर तरी जबरदस्त हवा. दणकट!’
खरी गोष्ट! मी क्षणभर गप्प राहिले. मग जरा बाचकत म्हटलं, ‘तू होतोस का व्यवस्थापक? तुझ्यापेक्षा दणकट कुणी मिळणं कठीण.. बोल.’
संतोष मोठय़ाने हसला. ‘काय मॅडम, तुम्ही पण-निर्माता बनायला आलेल्याला तुम्ही मॅनेजर बनवता?’
आणि मग प्रचंड खिलाडू वृत्तीने त्याने नाटकाच्या व्यवस्थापनाची जिम्मेदारी स्वीकारली.
संस्थेला नाव हवं होतं. दुर्दैवाने आता ‘द्वयी’ द्वयी राहिली नव्हती. नुकताच माझ्या वाचनात तुकारामाचा एक अभंग आला होता. त्याचा अंतिम चरण होता-
‘मांडियेला खेळ
कौतुके बहुरूप
आपुले स्वरूप
जाणतसे.’
संस्थेचं नाव ठरलं.. ‘कौतुक’!
पात्रांची जुळवाजुळव करायला आम्ही सुरुवात केली. चार गुणी अभिनेत्री आणि त्यांच्या भोवती फिरणारे चार उपग्रह हवे होते. जाहिरातपट-सम्राज्ञी रिबेकाची अवघड निवड सगळ्यात सोपी ठरली. कारण ती घरीच सापडली. माझी मुलगी- विनी. रिबेकाचा अवखळपणा, प्रासंगिक अगतिकपणा, तिचा नखरा, पाश्चिमात्य संस्कार, मॉडेलिंगच्या व्यवसायामुळे बोलण्या-चालण्यात भिनलेला डौल हे सर्व लक्षात घेता ही निवड अचूक होती. त्यात जराही पक्षपात नव्हता, असं मी शपथपूर्वक सांगायला तयार आहे. पद्मिनीची भूमिका वरकरणी साधी वाटावी. पण नेमकी म्हणूनच ती आव्हानकारक होती. आतून घुसमटणारी, पण वरकरणी आपली शांत प्रतिमा जपणारी पद्मिनी. तिच्या वाटय़ाला रिबेकाप्रमाणे रंगतदार नाटय़प्रसंग नव्हते, की मामीप्रमाणे तिला ‘तालीमार’ संवाद नव्हते. आणि तरीही तिला आपली अंत:करणाला भिडणारी कैफियत मांडायची होती. हे काम करायला छान समर्थ अभिनेत्री मिळाली- ज्योती सुभाष. NSD ची पदवीधर आणि आमचा दिल्लीचा मित्र प्रा. गोविंद देशपांडे (लेखक.. ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’) याची धाकटी बहीण. ज्योतीने पद्मिनीच्या वेदनेचे पैलू अतिशय उत्कटपणे, पण तितक्याच अलगदपणे उकलून दाखवले. प्रसन्न, दिलदार, पण शिस्तप्रिय आणि व्यवहाराचे भान ठेवणारी सेवा श्रॉफ म्हणून रजनी वेलणकर दाखल झाली. तिने ‘शेजारी’मध्ये काम केलं असल्यामुळे ती बोलूनचालून ‘सख्खी’च होती. आता स्त्रीपात्रांमध्ये राहता राहिली मामी. मी माझ्या नाटकांमधून रेखाटलेल्या समस्त व्यक्तिचित्रांमधले हे सर्वात प्रभावी पात्र म्हणता येईल. सहस्र पदर असलेले. बिथरलेली संशयी वृत्ती, कधी तोल जाईल सांगता येणार नाही, कडवट विनोदबुद्धी, मार्मिक संभाषणचातुर्य मिरवणारी आणि विक्षिप्तपणाच्या आडून मायेचा वर्षांव करणारी मामी माझी आवडती मानसकन्या होती. तिला न्याय देणारी अभिनेत्री हवी होती. सुधा करमरकरचं नाव पुढे आलं. रंगभूमीशी निगडित अशा कुटुंबामध्ये जन्म झाल्यामुळे सुधाला लहानपणापासूनच नाटकाचे बाळकडू मिळाले. पुढे तिने बालनाटय़ चळवळ यशस्वीरीत्या चालवली आणि छोटय़ांच्या नाटकांत मजेदार भूमिकाही केल्या. तिची ‘चेटकीण’ विशेष गाजली. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘मला काही सांगायचंय’, ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘दुर्गी’, ‘थँक्यू मिस्टर ग्लाड’ आणि अशा अनेक नाटकांमधून तिने प्रमुख भूमिका केल्या होत्या. साहजिकच तिच्या नावाचा खूप दबदबा होता. ‘‘ती तयार होईल का?,’’ मी बिचकतच विचारलं.
‘‘पाह्यचं. आपण दार ठोठावायचं.’’
आम्ही दार ठोठावलं. सुधानं दार उघडलं. अगदी सताड! मामी करायला ती आनंदानं तयार झाली.
‘‘तुम्हाला अगदी हवी तशी मामी मिळाली,’’ संतोष म्हणाला.
‘‘हो तर! शिवाय नाव आहे..’’ मी उत्तरले.
यावर टाळी वाजवून संतोष म्हणाला, ‘‘वा! आता तुम्ही अगदी निर्मात्यासारखं बोललात!’’
मात्र अनेकजणांनी धोक्याचा कंदील दाखवला.
‘‘पहा बरं. तुमचं दोघींचं एक दिवसही जमणार नाही..’’ ‘‘डोईजड प्रकरण होईल..’’ ‘‘भलत्या भानगडीत पडू नकोस..’’ इ. इ.
जरा जड पारडं असलेल्या दोन बायका म्हटल्या की त्यांचं कदापि पटणं शक्य नाही, असा एक सर्वसामान्य समज आहे. सुधाने आणि मी तो समज खोटा पाडला. आमचे छानच जमले. एवढंच नाही, तर सगळय़ाच टीमशी तिचं चांगलं जमलं. विनी आणि ती एकमेकींना चिडवत असत- ‘‘तू काय बाई, नाटकाची हिरवीन् (हीरॉइन), तेव्हा तुझा मान पहिला.’’ असला त्यांचा पोरकटपणा चाले.
सुधाने अपेक्षेप्रमाणे फार सुंदर काम केले. सुरेशचंद्र पाध्ये यांनी ‘सकाळ’मध्ये लिहिले- ‘‘सुधा करमरकर यांनी आपल्या मनोज्ञ अभिनयसामर्थ्यांने इतके आविष्कार घडवले आहेत, की ही भूमिका केवळ त्यांच्यासाठीच लिहिली गेलीय असं वाटावं.’’ पुरुषजातीविषयीचा मनस्वी तिटकारा मामींच्या वाक्या-वाक्यातून डोकावत असे. पद्मिनीच्या आणि त्यांच्या पहिल्या भेटीचा प्रसंग..
पद्मिनी : नमस्कार. तुमचं संपूर्ण नाव काय?
मामी : कशाला हवंय? रासनकार्ड का भरायचंय?
पद्मिनी : तसं नव्हे.
मामी : ऐका.. संपूर्ण नाव. सौभाग्यवती वत्सला मुकुंद जोगदेव. झालं समाधान? का उखाणा घेऊ?.. तुमचं पुरं नाव?
पद्मिनी : पद्मिनी. पद्मिनी नाईक.
मामी : आहा.. आहा.. पूर्ण नाव! मी कसं साग्रसंगीत सांगितलं. नवऱ्याचं किंवा बापाचं नाव मधे घातल्याशिवाय म्हणे बाईचं नाव पुरं होत नाही.. पद्मिनी ‘कोण’ नाईक?
पद्मिनी : पद्मिनी ‘कुणी नाही’ नाईक.. (पद्मिनी झट्कन आत जाते.)
मामी अतिशय सुंदर लेस विणतात. पडदे, टेबलक्लॉथ, परकर.. (हल्ली परकराला कुणी लेस लावीत नाही. किंबहुना, अलीकडे परकर नेसतंच कोण?) मामींची या लेसकामामुळे थोडी मिळकत होते.
पद्मिनी : किती सुंदर विणता तुम्ही!
मामी : न विणायला झालंय काय? बारा वर्षे एवढं एकच काम केलं. धागा धागा अखंड विणला. मुखाने ‘विठ्ठल, विठ्ठल’ मात्र नाही हो कधी म्हटलं.. का, ते विचारा.
पद्मिनी : का ते?
मामी : कारण विठ्ठल पुरुष! देव असला तरी पुरुषच ना?
मामींच्या वेडाची झलक दाखवणारा प्रवेश सुधा फार अप्रतिम करत असे. अंगावर रोमांच उभे राहात. पद्मिनीच्या हातून काचेच्या बांगडय़ांचं भिंडोळं खाली पडतं.
पद्मिनी : अर्र्र.. तीन फुटल्या.
मामी : आहांहां! ‘फुटल्या’ नाही- ‘वाढवल्या’ म्हणावं.. फुटतं ते नशीब. आवड दिसत्येय बांगडय़ांची!
पद्मिनी : हो. लहानपणापासून. सुंदर रंग आणि गोड आवाज.. किण-किण-किण.
मामी : हं! बांगडय़ांचा आवाज म्हणजे बाईच्या गुलामगिरीची नांदी.. लग्नामध्ये नवरीला कोपरापर्यंत बांगडय़ा चढवायच्या.. सौभाग्यलेणं म्हणून! खरा उद्देश- सून काय करते त्याची वार्ता मिळत राहावी. सून पाखडत्येय का दळत्येय, का भाजी चिरत्येय, का नुसतीच हातावर हात ठेवून बसून राहिलीय- हे बांगडीच्या आवाजावरून कळतं. बाईच्या प्रत्येक दागिन्यामागे एक डाव आहे बरं. जोडवी का घालायची पायात? तर बाईची पावलं वाजली पाहिजेत. खण् खण् खण्.. कुठे गेली? फार दूर तर नाही गेली? भलतीकडे तर नाही गेली? ही पाहा-माजघरात आहे.. आता ओसरीवर.. पुढे अंगणात.. अंगणातून परसात.. परसातून विहिरीकडे.. खण् खण् खण्.. हे काय? विहिरीच्या काठावर चढली?
(सेवा आणि रिबेका आत येतात.)
पद्मिनी : वाचली बिचारी!
चार पुरुष पात्रांपैकी कारखानीस या सहृदय बँक ऑफिसरसाठी शशिकांत शिर्सेकर या अनुभवी नटाची नियुक्ती झाली. त्यांचे व्यक्तिमत्त्व या भूमिकेला अगदी साजेसे होते. रिबेकाच्या मागे लागलेला दुष्टग्रह गोवर्धन याचे दोनच लहान प्रवेश आहेत. तेही फ्लॅशबॅकमध्ये. चंदू पारखी या गुणी नटाने हा छोटा रोल स्वीकारून त्याचे चीज केले. आपल्या ढिल्या चालीतून, बेरकी कटाक्षांमधून आणि खोल खर्जातल्या संवादातून त्याने गोवर्धनचा भेसूरपणा उभा केला. एरवी इंदुरी नजाकत आणि मूर्तिमंत विनम्रपणाचा अवतार चंदू पारखी रंगमंचावर पाऊल ठेवताच नखशिखान्त बदलून जात असत. स्टंटहीरो साकार केला दिलीप गुजर या सहा फुटी उमेदवाराने. दिलीप एअर इंडियात नोकरीला होता. एक हौस म्हणून तो नाटकाकडे वळला. टोनीचा रोल संदीप कुलकर्णीने केला. त्यावेळी तो नुकताच उगवत होता. त्यानंतर पुढल्या कारकीर्दीत तो बऱ्याच मराठी नाटक- सिनेमांमधून ‘तळपला’ म्हणायला हरकत नाही.
संगीताची जबाबदारी राहुल रानडेकडे आणि प्रकाशयोजना माधव पटवर्धनकडे सुपूर्द करण्यात आली. संच जमला. गुरुवार, ३१ जुलै १९८६ रोजी ‘माझा खेळ मांडू दे’चा शुभमुहूर्त झाला.
(क्रमश:)    

narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
this is a wedding card not aadhar card
आधार कार्ड नव्हे ही आहे लग्नाची पत्रिका! विश्वास बसत नसेल तर एकदा क्लिक करा अन् नीट बघा