‘मी सायली जाधव. माझी बहीण तुमच्याकडे औषधाला येते- वृषाली सावंत. तिनं फोन केला होता ना तुम्हाला?’ ती स्मार्ट तरुणी केबिनमध्ये येत म्हणाली.
‘हो, हो. आत्ताच आला होता त्यांचा फोन. बसा ना!’
‘मॅडम, हे माझे पती सारंग जाधव आणि हा आमचा मुलगा सोहम्.’
तिनं परिचय करून दिला. ‘सोहम्ला गेली दोन वर्षे सायनसायटिसचा त्रास होतोय. वृषालीताई केव्हाची मागे लागली होती तुमच्याकडे जा म्हणून. शेवटी आम्ही आज यायचं ठरवलंच.’
सोहम्च्या आजारासंबंधी चर्चा झाल्यावर मी त्यांना सोहम्ची दिनचर्या म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तो काय करतो हे विचारलं. माझ्या या प्रश्नावर जाधव पती-पत्नींनी आधी एकमेकांकडे बघितलं. मग सारंग जाधव म्हणाले, ‘म्हणजे सोहम् ना खूप पाणी प्यायचा. आम्हीही ‘बरंच आहे की’ असं वाटून त्याला कधी विरोध केला नाही.. ’
‘हे पाहा व्यक्तीची प्रकृती, व्यायाम, कष्ट, आहार, उन्हात काम करतो की ए.सी.त, अशा बऱ्याच घटकांवर ‘तहान’ अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची तहान वेगळी. इतकंच काय, एका व्यक्तीची तहानसुद्धा वर्षभर सारखी नसते. ऋतूप्रमाणे बदलते. उन्हाळ्यात जास्त तहान लागते, थंडीत कमी लागते, हे आपण अनुभवतो ना? मी असा एक निश्चित आकडा सांगणंही चूकच ठरेल की नाही?’
‘ते ठीक आहे. पण तुम्ही ‘पाणी पिऊ नये’ अशा ज्या वेळा सांगितल्या आहेत, तेव्हाच नेमकी तहान लागत असेल तर?’ सारंगचा प्रश्न.
‘त्याला पर्याय आहेत. तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर तहान लागत असेल, तर तुम्ही सूर्योदयापूर्वी उठा आणि तहान शमेल इतकंच पाणी प्या. ते नळाचं (अर्थात गाळून) प्या. फ्रीजमधलं किंवा माठातलं नको. या पद्धतीनं पाणी पिण्यासाठी उठून, पाणी पिऊन लगेच झोपू मात्र नका. सूर्योदयापूर्वी उठणं शक्य नसेल तर उठल्यावर चहासारखं गरम पाणी प्या. ते जास्त जाणारच नाही.
दुसरा मुद्दा जेवतानाचा. जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर पाणी नको. जेवताना थोडं-थोडं पाणी प्यायलं तर जेवणानंतर तहान लागत नाही, हा अनुभव आहे. करून बघा. रात्री तर आजकाल जेवणंच उशिरा होतात सगळ्यांची. जेवण झाल्यावर तासाभरात झोप. इथेही जेवताना प्यायलेल्या पाण्यानं तहान शमते. त्यातूनही तहान लागत असेल तर गरम पाणी प्यावं.’
‘हां.’
आता कुठे जाधवसाहेबांचं थोडं समाधान झाल्यासारखं वाटलं मला.
‘बरं, आता सोहम्चा दिनक्रम सांगा.’
‘सकाळी सात वाजता त्याची शाळा असते. सहा वाजता तो उठतो. जाताना मी त्याला मोठा ग्लास भरून म्हणजे साधारण ३५० एमएल दूध देते. त्यात ते जाहिरातीतलं हेल्थ ड्रिंक घालते. ते त्याला आवडतं. शाळेत तो ९।। वाजता पोळी-भाजी खातो. शाळा सुटल्यावर म्हणजे दीड वाजता पोळीभाजीचा दुसरा डबा खातो. तिथून तो क्लासला जातो. सहा वाजता तो घरी आला की मी त्याला काहीतरी खायला देते आणि सकाळसारखंच दूध देते. मग तासाभरानं त्याला एक ग्लास फ्रूट ज्यूस देते. साधारण ९ वाजता आम्ही जेवतो. रात्री झोपताना मी त्याला पुन्हा सकाळसारखं दूध देते. तरी याची प्रतिकारशक्ती वाढतच नाही हो. दर दोन महिन्यांनी आजारी पडतो हा आणि मुख्य म्हणजे जेवत नाही नीट. भूकच लागत नाही म्हणतो,’ सायलीनं एका दमात सगळं सांगून टाकलं, ते ऐकूनच मला दम लागला.
‘तुम्ही त्याला भूक लागायला अवसरच कुठे देताय?’ मी न राहवून म्हटलं.
‘म्हणजे?’
‘म्हणजे, संध्याकाळी सहा ते रात्री १० या ४ तासांत तुम्ही त्याला ७०० मिली दूध, २०० मिली फळाचा रस असा मारा करताय. त्यातच त्याचं पोट भरत असेल. भूक कशी लागणार?’
‘पण कॅल्शियमसाठी त्याला दूध भरपूर द्यायला हवं ना?’ सायलीचा काळजीयुक्त प्रश्न.
आहारातील कुठलाही घटक- सगळ्यांसाठी भरपूर प्रमाणात आणि अनिवार्य कसा असू शकतो हे मला अजून कळलेलं नाही. हे गैरसमजांचं लोण कोण पसरवतं कुणास ठाऊक?
‘असं काऽऽही नसतं. एकतर दूधानं कफ वाढतो. त्यात म्हशीचं दूध असेल तर जास्तच कफकारक! तुम्ही ते दिवसाला जवळजवळ लिटरभर देताय त्याला. म्हणजे प्रमाणही जास्त होतंय. त्यात आणि कुठलंतरी हेल्थ ड्रिंक मिसळून देताय. कुठल्याही हेल्थ ड्रिंकमध्ये सामान्यत: साखरेचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे दूध पचायला जड होतं आणि साखरेपासून शरीरात कफच तयार होतो.’ मी समजावून सांगितलं.
‘पण डॉक्टर, मग त्याला प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्स कशी मिळणार? ती मिळाली नाहीत तर बॉडी आणि ब्रेन स्ट्राँग कसा होणार?’ (किती हे गैरसमज!)
‘का? अन्नातून मिळेल ना? एक चमचा हेल्थ ड्रिंक उपयोगी की जेवण उपयोगी?’
‘पण जाहिरातीत तर दाखवतात ना, त्यात भरपूर प्रोटीन्स असतात म्हणून!’
‘अरे देवा! जाहिराती! आरोग्य क्षेत्रात यांची दखलपात्र लुडबूड चालू आहे खरी. एका हेल्थ ड्रिंकच्या जाहिरातीत बिनधास्त म्हटलं होतं, ‘कुठल्याही धार्मिक कार्यात आपण दुधाला एकटं सोडत नाही (म्हणजे त्यात काहीतरी घालतो.) मग तुमच्या लाडक्या मुलाला तुम्ही एकटं दूध कसं देता? त्यात आमचं हेल्थ ड्रिंक मिसळा.’
एका जाहिरातीत तर असं दाखवलं होतं की, रात्री जागून अभ्यास करणाऱ्या आठ-नऊ वर्षांच्या एका मुलाला (याला रात्री जागून अभ्यास करायची खरं तर गरज आहे का?) रात्री बारा वाजता त्याची आई प्रेमानं हेल्थ ड्रिंकयुक्त दूध प्यायला आणून देते आणि तो कंटाळलेला मुलगा ताजातवाना होऊन अभ्यासाला लागतो. थोडक्यात, या जाहिरातींचा सूर असा असतो की, ‘आपको अपने लाडले से प्यार है और उसके सेहत की फिक्र है- तो फिर आप हमारा हेल्थ ड्रिंक उसको जरूर पिलाइये।’ किंवा ‘आप आपके लाडले को हमारा हेल्थ ड्रिंक नहीं पिलाती? फिर उसके सेहत की तो वाट लगने ही वाली है, लेकिन इससे ये साबित होता है, आपके प्यार में कुछ कमी सी है।’.. पालकांना असं वाटायला लावण्यात या जाहिराती यशस्वीही होतात. प्रत्येक जाहिरात ही खरीच असते, वा जनसामान्यांच्या लेकरांच्या काळजीनं मल्टिनॅशनल कंपन्या हेल्थ ड्रिंक्स बनवतात. किंवा डॉक्टर आणि वैद्य या जाहिरातींना विरोध करतात, कारण त्यांच्या लहानपणी त्यांचे असे लाड झाले नाहीत, अशा कैक अंधश्रद्धा या जाहिरातीपायी पसरल्या आहेत. गल्लाभरू उत्पादक, आरोग्य क्षेत्राचा गंध नसलेले त्यांचे जाहिराततज्ज्ञ आणि पैशासाठी त्यांचं प्रसारण करणारी माध्यमं यांच्या षड्यंत्राला शिक्षित म्हणवणारे पालक बळी पडतात, तर बिचाऱ्या अशिक्षितांची काय कथा? त्यांनी तर शिक्षित पालकांना स्वत:चा आदर्श मानलेलं असतं आणि आमचे वैद्य बांधव हे सगळं निस्तरत असतात, तितक्याच प्रेमानं प्रत्येक रुग्णाचे गैरसमज दूर करत असतात.
‘सायलीताई, प्रोटीन्सची जास्त गरज व्यायाम किंवा कष्ट करणाऱ्यांना. सोहम् काही व्यायाम करतो का?’ मी विचारलं.
‘पूर्वी तो बॅडमिंटन खेळायचा. पण आता नववी-दहावी म्हणून आम्ही त्याचा खेळ बंद केलाय.’ (इनका बस चले तो ये बच्चों की नींद तक बंद कर सकते हैं। आणि मग पालकांचं सगळं लक्ष, सगळं प्रेम आहारावर केंद्रित होतं.)
‘मग त्याला जेवणातली प्रोटीन्स पुरेशी आहेत. हेल्थ ड्रिंकची गरजच नाही. हेल्थ ड्रिंकमधली कृत्रिम तत्त्वं शरीराला खरोखर किती उपयोगी पडतात, त्यांचे दुष्परिणाम काय होतात, हेही आपल्याला नक्की माहीत नाही. म्हणून तुम्ही सोहम्चा अतिद्रवाहार बंद करा आणि त्याला नीट जेवू दे.’
‘तो जेवतच नाही ना पण! भूक लागत नाही म्हणतो. त्यासाठी काही औषध द्यायचं का?’ सारंग जाधवांचा प्रश्न.
‘नको. द्रवाहार बंद केला आणि व्यायाम चालू केला की आपोआप भूक लागेल. सगळ्या समस्यांची उत्तरं ‘गोळ्यां’नी सुटत नसतात.’ मी म्हटलं.
‘जाहिरातीत ते असं कसं सांगतात बरं?’ अजून जाहिरातीचा बागुलबुवा उतरला नव्हता तर!
‘जाहिरात ही कंपनीच्या उत्पादनाची विक्री वाढावी यासाठी केली जाते. त्यात त्या उत्पादनाचं कौतुक केल्याशिवाय आपण ते विकत घेऊ का? साहजिकच जाहिरातीत कंपनी आपल्या उत्पादनाची भलामणच करणार. जागरूकता आपण दाखवायला हवी.’ मी पोटतिडकीनं सांगत होते खरं! जाधवांना किती पटलं त्यांचं त्यांना माहीत!
आपले पूर्वज आपल्यापेक्षा कितीतरी जास्त कष्ट करायचे. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमताही आपल्यापेक्षा जास्त होत्या. याचं कारण पोषणासाठी ते ‘नैसर्गिक आहारीय’ पदार्थावर अवलंबून असायचे, हेल्थ सप्लीमेन्ट्सवर नव्हे!
आज समाज या हेल्थ सप्लीमेन्ट्सच्या नादी लागतो. त्यात पैसाही जातो आणि आरोग्यही बिघडतं. ‘तेल गेलं, तूप गेलं आणि हाती धुपाटणंही नाही’ अशी अवस्था होऊन बसते. हे थांबवायचं असेल तर आपण विचार करायला शिकायला हवं. नाही का?