News Flash

अमेरिकेतले दीपोत्सव

अमेरिकेत ऑक्टोबरपासून डिसेंबर-जानेवारीपर्यंत साजऱ्या केल्या जाणाऱ्या विविध धर्माच्या वैविध्यपूर्ण सणांमध्ये दिव्यांचं अस्तित्व आणि महत्त्व आश्चर्यकारक आहे.

| October 26, 2014 12:00 pm

अमेरिकेतले दीपोत्सव

अमेरिकेत ऑक्टोबरपासून डिसेंबर-जानेवारीपर्यंत साजऱ्या केल्या जाणाऱ्या विविध धर्माच्या वैविध्यपूर्ण सणांमध्ये दिव्यांचं अस्तित्व आणि महत्त्व आश्चर्यकारक आहे. अमेरिकेतला दीपोत्सव दिवाळीपासून सुरू होतो आणि एक जानेवारीनंतर संपतो.
अमेरिकेसारख्या समृद्ध आणि प्रगत देशात राहून स्वत:चं आणि मागे राहिलेल्या आप्त-स्वकीयांचं आयुष्य सुकर आणि सुंदर करण्याच्या हेतूने रोज हजारोंच्या संख्येने जगातल्या कानाकोपऱ्यातून लोक अमेरिकेत डेरेदाखल होत असतात. बेकायदेशीररीत्या आलेल्यांचे कायदेशीरपणे तिथे राहण्याचे प्रयत्न त्यांना स्थैर्य मिळण्यात अडथळा आणतात. परंतु कायदेशीररीत्या आलेल्या लोकांना इथे स्थिरता लगेचच अनुभवता येते. परदेशात आयुष्याला स्थिरता आल्यावर आपल्या देशाच्या मातीचा सुवास आठवायला लागतो. आपले सण, समारंभ साजरे करावेत असं प्रकर्षांने वाटायला लागतं. बहुतेक सणांना धार्मिक पाश्र्वभूमी असते. अमेरिकेत प्रत्येकाला आपल्या धर्माचे पालन करायला अर्थातच संपूर्ण मुभा आहे. (तशी ती नसती तरच नवल!) आधुनिक अमेरिकेच्या अस्तित्वाला कारण झालेले ‘मे फ्लॉवर’मधले प्रवासी धर्मस्वातंत्र्याच्या वेडानेच तर आले ना!
वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळे सण वर्षभर साजरे केले जातात. सणांचं आणि प्रकाशाचं अतूट नातं बहुतेक सर्वच धर्मामध्ये दिसून येतं. अमेरिकेत ऑक्टोबरपासून डिसेंबर-जानेवारीपर्यंत साजऱ्या केल्या जाणाऱ्या विविध धर्माच्या वैविध्यपूर्ण सणांमध्ये दिव्यांचं अस्तित्व आणि महत्त्व आश्चर्यकारक आहे. अमेरिकेतला दीपोत्सव दिवाळीपासून सुरू होतो आणि एक जानेवारीनंतर संपतो.lr23ग्रेगोरिअन कॅलेंडरप्रमाणे (इंग्लिश कॅलेंडर) सर्वात प्रथम येतो तो आपला दिवाळीचा सण. आपल्या मित्रमंडळींबरोबर दिवाळी साजरी करायला हिंदू लोकांना आवडते. पण अमेरिकेत हिंदूंची संख्या  अल्प असल्यामुळे या सणाचं महत्त्व काहीसं मर्यादित होतं. दिवाळीत येथील भारतीय धान्यांची दुकानं मात्र आवर्जून मिठाई, लक्ष्मीपूजनाची सामग्री, अत्तरं, वेगवेगळ्या सुवासिक उदबत्त्या, कधी स्टीलची भांडी, भेटकरड अशा वस्तू ठेवतात. भारतीयांसाठी खास सामान ठेवणारी दुकानं नवीन ड्रेसेस, कॉस्च्युम ज्वेलरी, आकाशकंदील, रांगोळीचे सामान आणि भारतीय महिलांना आवडणाऱ्या अशा प्रकारच्या कितीतरी वस्तू ठेवतात.
नातेवाईक जवळ राहत असले तर संध्याकाळी ते सर्वजण एकत्र जमतात. फराळाचे पदार्थ बनविणे, घराला दिव्यांची रोषणाई करून आकाशकंदील लावणे, जागा असली तर रांगोळी काढणे- या गोष्टी आपल्या भारतातील नातेवाईकांची आठवण काढत इथली भारतीय मंडळी करत असतात. अमेरिकेत हिंदू लोकांनी बांधलेल्या देवळांची संख्या बरीच मोठी आहे. सगळे सणवार, पूजा वगैरे या मंदिरांमध्ये मोठय़ा धामधुमीत साजऱ्या होतात. यानिमित्ताने ही मंडळी देवळांवर दिव्यांची रोषणाई करतात. लक्ष्मीपूजन करतात. काही धार्मिक कार्यक्रमही करतात. लक्ष्मीपूजन संध्याकाळी करायचे असते, त्यामुळे ज्यांना ते आपल्या घरी करायची इच्छा असते, त्यांना सहज जमण्यासारखे असते. एरव्ही सणाकरिता सुट्टी नसल्याने सण साजरा करायला शनिवार-रविवारसाठी थांबावे लागते. दिवाळीचा कार्यक्रम भारतीय लोकांची मंडळं जोरदार साजरा करतात. एकत्र जेवणे, फटाके वाजवणे, लहान-मोठय़ांचे करमणुकीचे कार्यक्रम, वेगवेगळ्या (सणाला शोभणाऱ्या) स्पर्धा, कधी भारतातून खास सणासाठी आलेल्या कलावंतांचे कार्यक्रम अशी एकच धामधूम असते. अमेरिकेच्या कॅलेंडरवर जरी दिवाळीचा सण नसला तरी इथल्या भारतीय लोकांसाठी मात्र दिवाळी हाच वर्षांतला पहिला दिव्यांचा सण आहे.
हानुका हा ज्युईश लोकांचा सण. इंग्लिश कॅलेंडरप्रमाणे हानुकाच्या सेलिब्रेशनची सुरुवात ख्रिस्तपूर्व १६५ मध्ये झाली. हा सण ज्युईश लोक त्यांच्या कॅलेंडरप्रमाणे साजरा करतात. इंग्लिश कॅलेंडरप्रमाणे हा साधारण डिसेंबरच्या मध्यास सुरू होतो. ज्यूंबरोबर झालेल्या युद्धात सीरियन लोकांची हार झाली. माघारी जाताना युद्धात हरलेल्या फौजांनी जेरुसलेमच्या ज्युईश देवळाची प्रचंड नासधूस केली. ज्युईश लोकांच्या देवळात कायम तेवणाऱ्या सात दिव्यांचा मनोरा असतो. शत्रूच्या फौजांनी केलेल्या विनाशात मंदिरामधल्या मनोऱ्यातल्या फक्त एका दिव्यात एक दिवस पुरण्याइतकेच तेल शिल्लक होते. नवीन तेल गाळायला निदान आठ दिवस लागणार होते. चमत्कार झाला आणि इतके थोडेसे तेलदेखील आठ दिवस पुरले. आधुनिक मनोरा आणि त्यातल्या नऊ  मेणबत्त्या या घटनेचे प्रतीक आहेत. आठ दिवसांकरता आठ आणि एक मोठी मेणबत्ती रोज एक नवी मेणबत्ती प्रज्वलित करायला. मोठय़ा मेणबत्तीला ‘शमा’ म्हणतात. पहिल्या दिवशी दोन मेणबत्त्या (शमा आणि एक मेणबत्ती- उजवीकडून डावीकडे अशा क्रमाने)आणि रोज एक नवी मेणबत्ती लावली जाते. घरात खास जेवणात भरपूर तेलाचा वापर करून लॅट्की- म्हणजे बटाटय़ाचे पॅनकेक्स, चीज आणि चीज घालून केलेले वेगवेगळे पदार्थ, डोनट्स, मांसाचे पदार्थ यांची रेलचेल असते. चीज जास्त खाण्याच्या या प्रथेशी जोडलेली एक पारंपरिक कथा आहे. जूडिथ नावाच्या तरुण विधवेने एका दुष्ट सीरियन सरदारावर- जो गावातल्या सगळ्या ज्यूंना छळत होता- चीज आणि दारूचा इतका भडिमार केला, की शेवटी तो शुद्ध हरपून पडला. जूडिथने मग त्याचा वध करून गावात आनंदी आनंद पसरविला.
या सणानिमित्ताने संध्याकाळी जेवणं झाल्यावर ड्रेडल नावाचा एक खास फासा असतो, त्याने खेळ खेळला जातो. या फाशावर चार बाजूंना तेलाच्या जादूच्या वाक्यातला एकेक शब्द लिहिलेला असतो. प्रत्येक शब्दाचे ‘मूल्य’ ठरलेले असते. चॉकलेटं, शेंगा असं काहीबाही घेऊन हा खेळ खेळतात. सणाच्या प्रत्येक दिवशी घरातल्या मुलांना चॉकलेटं किंवा पैसे भेट म्हणून देण्याची प्रथा मात्र तशी नवीनच (नाताळातून प्रेरणा घेऊन) आहे.
२४-२५ डिसेंबरला सुरू होणाऱ्या नाताळाचं वर्णन दिव्यांच्या उल्लेखाशिवाय करताच येणार नाही. येशूच्या जन्माच्या वेळी आकाशात नवीन उगवलेल्या तेजस्वी ताऱ्यांनी नाताळाचं प्रकाशाबरोबरचं नातं अतूट केलेलं आहे. मेणबत्त्यांचा वापर ख्रिसमसच्या झाडावर, घरांच्या खिडक्यांमध्ये होत असे. त्याचा संबंध सगळ्यांना प्रकाशाची वाट दाखविणाऱ्या येशूच्या जन्माशी जोडलेला होता. थॉमस अल्वा एडिसनने विजेचा शोध लावला तेव्हा त्याचा मदतनीस होता एडवर्ड जॉन्सन. त्यांनी १८८२ मध्ये ख्रिसमसच्या झाडाभोवती गुंडाळायला छोटय़ा विजेच्या दिव्यांची माळ तयार केली. सुरुवातीला खूप महाग असलेली माळ १९२० पर्यंत सगळ्यांना परवडेल अशी स्वस्त झाली आणि घराभोवतीच्या बागा, लहान-मोठय़ा इमारती, झाडं, एकूण सारा परिसर नाताळच्या सणाला झगमगून जाऊ  लागला. आज नाताळचं प्रकाशाबरोबरचं नातं अगदी घट्ट झालेलं आहे. व्हाइट हाऊसमधलं झाड, रॉकफेलर सेंटरमधलं झाड आणि बिल्टमोर हाऊस या अमेरिकेतल्या सर्वात मोठय़ा घरामधली झाडे ही सगळ्या अमेरिकेत त्यांच्या उंचीमुळे आणि त्यांच्यावर चमचमणाऱ्या लक्षावधी छोटय़ा दिव्यांमुळे आपले रेकॉर्ड टिकवून आहेत. ही झाडे १०० फुटांहून जास्ती उंच असतात. त्यांच्यावर जवळजवळ २५ ते ३० हजार छोटे दिवे लखलखत असतात.
अमेरिकेच्या भौतिकवादाला शोभेल अशा तऱ्हेनेच अमेरिकेत नाताळ साजरा होतो. हा सण जरी ख्रिश्चन लोकांचा असला तरी जवळच्या नातेवाईकांनी एकत्र येणे, ख्रिसमसचं झाड, त्याच्याखाली ठेवायच्या भेटवस्तू, झाडाचं, घराचं डेकोरेशन, वेगवेगळे केक, कुकीज, चॉकलेटं खाणं, लगेचच येणाऱ्या नवीन वर्षांचं स्वागत- हे सगळं इतर धर्माचे लोकही करताना दिसतात. lr24रोषणाई बघायला लोकांचे जथ्थेच्या जथ्थे रात्री बाहेर पडतात. ही रोषणाई गाडीतून न उतरता बघता येते. ‘डिस्ने’ने लोकप्रिय केलेली कॅरॅक्टर्स, ‘फेरिटेल’मधली मंडळी, लोकप्रिय कलाकार, पशु-पक्षी, फुलं, शहरातली स्मारकं सगळ्यांच्या प्रतिकृती दिव्यांनी झगमगत असतात. ख्रिसमसची लोकप्रिय गाणी पाश्र्वसंगीत म्हणून वाजत असतात. प्रत्येक मोठय़ा शहरामध्ये असे डिस्प्ले, जत्रा, प्रदर्शनं यांची मोठी धामधूम असते. छान हवा, सुट्टय़ा, सगळीकडे उत्साहानं भरलेलं वातावरण, झगझगाट, चकचकाट असं सगळं भारलेलं वातावरण पटवून देत असतात, की नाताळ हा अमेरिकेतला सगळ्यात मोठा दिव्यांचा सण आहे.
दिवाळी, नाताळसारखी धार्मिक पाश्र्वभूमी २६ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत साजऱ्या केल्या जाणाऱ्या ‘क्वांझा’ या सणाला  नाही. हा सण तसा नवीनच आहे. १९६६ साली प्रथम हा सण साजरा केला गेला. डॉ. मौलाना करेंगा यांच्या प्रयत्नांनी हा सण अस्तित्वात आला. अमेरिकेत पूर्व आफ्रिकेतून आलेले कृष्णवर्णीय लोक बरीच वर्षे गुलामीत राहिले. अब्राहम लिंकन यांनी मोठय़ा प्रयत्नांती गुलामगिरी नष्ट केली. हळूहळू कृष्णवर्णीय लोक इतर (जास्तकरून श्वेतवर्णीय) लोकांमध्ये मिसळून गेले तरी आपण सगळे आफ्रिकन आहोत, आपली अशी वेगळी संस्कृती आहे, ही जाणीव त्यांना व्हावी या विचारांनी डॉ. करेंगा यांनी या सणाची रूपरेखा आखली. ‘क्वांझा’चा अर्थ नवीन पीक. (अर्थातच नवीन पिकाचा अमेरिकेत राहणाऱ्या कृष्णवर्णीय लोकांशी फारसा संबंध दिसत नाही.) हा सण अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, इंग्लंड, ब्राझील, जमैका या देशांमधले कृष्णवर्णीय साजरा करतात. हानुकाला लावतात तशाच मेणबत्त्या क्वांझालाही प्रज्ज्वलित (रोज एक याप्रमाणे) करतात. रोज किनारा (मेणबत्तीचा स्टँड) मध्ये एक मेणबत्ती लावणं, गोडाधोडाचं जेवण, आफ्रिकन प्रथा सांगणारी गाणी, गोष्टी, लहान मुलांना भेटी असा कार्यक्रम असतो.
नाताळाकरता असलेले रंग हिरवा आणि लाल, हानुकाचे रंग आकाशी आणि सोनेरी आणि क्वांझाचे रंग काळा (लोकांचा वर्ण), लाल (लोकांच्या लढय़ाचं प्रतीक) आणि हरित (आशावादाने भरलेला भविष्यकाळ). प्रत्येक दिवसाचं एक तत्त्व असतं आणि त्याच्या अनुषंगाने रोज घरामध्ये चर्चा होते. (निदान तशी ती व्हावी असा उद्देश तरी असतो.) पहिल्या दिवसाचं तत्त्व आहे- एकता (उमोजा), दुसऱ्या दिवशीचं तत्त्व- सहकार्य आणि दाइत्व (उजिमा), निर्मिती (कूंबा), श्रद्धा (इमानी), इ. सात दिवसांची सात प्रतीके.
हा सण अमेरिकेत तसा नवीनच आहे. आफ्रिकेतून गुलाम म्हणून आणलेले आफ्रिकन लोक आफ्रिकेच्या पूर्व भागातले आहेत. त्यांची भाषाही स्वाहिली नाही. (आफ्रिकेच्या बऱ्याच भागांत स्वाहिली ही बोलीभाषा आहे.) आपल्या मूळ संस्कृतीपासून बराच काळ दूर राहिल्यावर तिथल्या आपल्या बांधवांबरोबर जवळीक साधणं जरा कठीणच असलं तरी अशक्य नसावं. आपल्या जन्मभूमीपासून वर्षांनुवर्षे लांब राहिलो तरी आपली पाळंमुळं दूर देशाच्या मातीत खोल खोल रुजलेली आहेत आणि जगभरात विखुरलेल्या आपल्या सगळ्या बांधवांचा वारसा एकच आहे, ही जाणीव सगळ्या कृष्णवर्णीयांना यानिमित्ताने समाधान देत असेल.
..तर असे हे अमेरिकेतले प्रकाशाचा सन्मान करणारे दीपोत्सव. थंडीचे दिवस लवकरच संपतील आणि नंतर येणाऱ्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळेल, ही उमेद आणि आशा सगळीकडे सारखीच दिसते.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2014 12:00 pm

Web Title: diwali light festiwal in us
टॅग : Diwali
Next Stories
1 ‘अक्षरधारा’चे असिधारा व्रत
2 अस्मितांचा अर्थ आणि अर्थाची अस्मिता
3 उलगडत जाणारं गाणं
Just Now!
X