17 January 2021

News Flash

‘किशोर’चे मंतरलेले दिवस

सुमारे पंचवीस वर्षे संपादन करणाऱ्या ज्ञानदा नाईक यांनी केलेले सिंहावलोकन..

किशोरवयीन मुलांच्या अनेक पिढय़ांमध्ये उत्तम साहित्याची जाण, मूल्यसंस्कार तसेच विज्ञानदृष्टी रुजविणाऱ्या ‘किशोर’ मासिकाच्या पन्नाशीच्या टप्प्यावर त्याचे सुमारे पंचवीस वर्षे संपादन करणाऱ्या ज्ञानदा नाईक यांनी केलेले सिंहावलोकन..

माझ्या खूप चांगल्या ओळखीच्या असलेल्या क्राइम ब्रांचच्या उच्चपदस्थ बाईंच्या कन्येच्या विवाहाचे निमंत्रण आले होते. नुकताच अमेरिकेहून परतलेला माझा धाकटा भाऊ जयदेव आणि मी संध्याकाळी सातच्या सुमारास चांदणी चौकातल्या एका मोठय़ा लॉनवर गेलो होतो. वधू-वरांना व बाईंना भेटून बुफेसाठी एका छोटय़ा टेबलापाशी बसलो. तिथे एक निमंत्रित बसले होते. आमच्या गप्पा सुरू झाल्या. नावांची देवाणघेवाण झाली. भावाचे नाव ऐकल्यावर तात्यांच्या ‘माणदेशी माणसे’ पुस्तकाविषयी ते भरभरून बोलले. आणि माझ्याकडे बघून म्हणाले, ‘व्यंकटेश माडगूळकरांची कन्या म्हणजे तुम्ही ज्ञानदा नाईक ना?’ मी थोडंसं हसून मान डोलावली.

‘अहो, तुमचे ‘किशोर’ मासिक वाचून आमची पिढी घडली. सगळे अंक मी वाचले होते. पण तुम्हाला कधी भेटण्याचा योग येईल असं वाटलं नव्हतं.’ आनंदित मुद्रेने ते म्हणाले. महाराष्ट्रातल्या कुणा जिल्ह्य़ाचे ते पोलीस कमिशनर होते. आम्हा भावंडांना त्यांच्याकडे येण्याचे त्यांनी आग्रहाचे निमंत्रण दिले.

एव्हाना आमच्या टेबलाभोवती आणखी चार-पाच जण जमा झाले होते. हसून नमस्कार करून एक जण म्हणाले, ‘अरे वा, तुम्ही ज्ञानदा नाईक ना? फार छान वाटलं. मी ‘किशोर’ मासिकाचा फॅनच होतो!’ कुणी सांगितले, ‘प्रत्येक वर्षीचे ‘किशोर’चे अंक आम्ही बाइंड करून ठेवले आहेत.’ कुणी म्हणाले, ‘अंक वाचून मला पुढच्या आयुष्याची दिशा मिळाली.’ आणखी एक जण म्हणाले, ‘तुम्ही संपादित केलेले ‘किशोर’चे दहा खंड मी बालभारती कार्यालयातून माझ्या मुलांसाठी विकत आणले आहेत. त्यांनीही ते वाचलेत. आणि पुन:पुन्हा वाचत असतात.’

बोलताना माझ्या लक्षात आले, की ती सगळी कमिशनर ऑफ पोलीस, असिस्टंट पोलीस कमिशनर अशा वरिष्ठ दर्जाची मंडळी होती. मला ‘किशोर’मधून निवृत्त होऊन काही वर्षे लोटली होती. आपल्या कामाची प्रशंसा ऐकून मी भारावून गेले होते. गार वारं अंगावर घेत आम्ही टेकडी उतरून घरी परत निघालो. जयदेव म्हणाला, ‘ताई, तू महाराष्ट्रात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहेस. आय एम प्राऊड ऑफ यू.’

‘किशोर’ मासिक! पार दिल्लीपर्यंत त्याचा बोलबाला होता. ‘किशोर’ची कार्यकारी संपादिका होण्याच्या सुमारे दहा-बारा वर्षे आधीच माझा ‘किशोर’मध्ये प्रवेश झाला होता. वयाच्या २२ व्या वर्षी माझा पहिला लेख ‘किशोर’मध्ये छापून आला. त्याचे तेव्हा खूप अप्रूप वाटले होते. त्यावेळचे ‘किशोर’चे कार्यकारी संपादक वसंत शिरवाडकर यांचे कौतुकाचे पत्र आल्याचेही मला स्मरते. ‘किशोर’ १९७१ च्या सुमारास सुरूझाला. दहा ते पंधरा वयोगटातील मराठी वाचक मुलांना त्यातून अभिरुचीसंपन्न, दर्जेदार असे साहित्य उपलब्ध झाले. तो काळ अद्भुतरम्य बालकथांचा होता. जडणघडणीच्या या वयात मुलांना विविध विषयांचे ज्ञान, त्यांचे जीवनाशी संबंध व संदर्भ, उत्तम संस्कार ‘किशोर’मधून दिले जाऊ लागले. वसंत शिरवाडकरांनी ‘असे हे विलक्षण जग’ ही अभिनव लेखमाला लिहून वाचकांना जगाचे भान दिले. त्यांच्यानंतर वसंत सबनीस या नामवंत साहित्यिकाचा ‘किशोर’ला संपादक म्हणून लाभ झाला. ‘किशोर’ची समृद्ध परंपरा त्यांनी पुढे चालविली. सबनीसकाका माझ्या वडिलांचे मित्र होते.

ही नोकरी करण्याआधी मी स्वतंत्रपणे अनेक उद्योग केले. पी. डी. ए. व थिएटर अ‍ॅकॅडमीच्या नाटकांमधून व दूरदर्शनवर भूमिका केल्या. हॅण्डिक्राफ्ट व अ‍ॅंटिक्सचे दुकान चालवून पाहिले. उद्योग-व्यवसाय करून पाहिला. महाराष्ट्र व भारत सरकारसाठी लघुपटनिर्मिती केली. ‘चिंगी आणि चिमी’ हा बालचित्रपट भारत सरकारच्या चिल्ड्रन फिल्म सोसायटीसाठी लिहिला व दिग्दर्शित केला. वृत्तपत्रांच्या रविवार बालपुरवण्या संपादित केल्या. मुलांसाठी पुस्तके लिहिली. नाना गोष्टी करून पाहिल्या. पण त्यातली कुठलीच गोष्ट दीर्घकाळ करत राहावी असे तीव्रतेने वाटले नाही. वयाने तिशी गाठली. नवरा दूरदर्शनमध्ये प्रोडय़ुसर होता. लेक आठ-नऊ वर्षांची झाली होती.

एके दिवशी वृत्तपत्रांत पाठय़पुस्तक मंडळाची जाहिरात पाहिली. ‘किशोर’ मासिकासाठी कार्यकारी संपादक पाहिजे. वयोमर्यादा, शिक्षण, पात्रता, अनुभव अमुक तमुक. मी सगळ्या अटींमध्ये बसत होते. काम आवडीचे वाटले. वडिलांमुळे वाचणं, पाहणं, फिरणं, ऐकणं, अनुभवणं, निरीक्षण करणं अशा सवयी मी जोपासत आले होते. जीवनाच्या वाटेवर जे जे सुंदर, उदात्त मिळाले ते वेचून पदरात भरून ठेवण्याची वृत्ती जपली होती. लहान वयात मी वडिलांबरोबर तळ्याकाठी, नदीकाठी वावरले. मोठेपणी आमच्या धायरीच्या शेतात त्यांच्याबरोबर काम केले. अभयारण्यात भटकले. वनस्पतींचे, फळाफुलांचे, कीटकांचे, पाखरांचे, वनचरांचे विलक्षण विश्व मला त्यांच्यामुळे समजले. शालेय वयापासून त्यांनी मला मराठीतील उत्तमोत्तम अशी भरपूर पुस्तके आणून दिली. घरी अनेक साहित्यिक येत. त्यांच्या चर्चा कानावर पडत. घरात पुस्तकांचे समृद्ध जग होते. त्यातून वाचनवेड जोपासले गेले. साहित्याची समज आली. वडिलांच्या शेजारी बसून चित्रे काढायला शिकले. रंगसंगती, कम्पोझिशन्स यांचे भान आले. घरी असलेली जगभरातल्या थोर चित्रकारांची चित्रे पाहिली, चरित्रे वाचली. या सगळ्यामुळे चित्रकलेची जाण निर्माण झाली. फोटोग्राफीचा छंदही मी वडिलांकडूनच घेतला होता. कुठेही जाताना कॅमेरा बरोबर असावा, हा त्यांचा कटाक्ष. एखादा ऐटबाज कोंबडा, देखणा.. डौलदार वृक्ष, भावपूर्ण चेहऱ्याचा वृद्ध कॅमेऱ्यात बंदिस्त करायला शिकले.

माझ्या मनात आले, मला असलेली मुलांसाठी लिहिण्याची आवड आणि संपादनासाठी आवश्यक असलेली साहित्याची जाण, चित्रकलेचे ज्ञान, निसर्ग व मानवी जीवनाविषयीचे प्रेम ही शिदोरी आपल्याजवळ आहे. नोकरीमुळे सांसारिक जीवनाला थोडे स्थैर्य येईल. प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे! मी ‘किशोर’च्या कार्यकारी संपादकपदासाठी अर्ज करून टाकला. मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. ‘तुम्हाला ‘किशोर’चे संपादक का व्हायचे आहे?’ मुलाखतीत विचारले. ‘नव्या पिढीशी संवाद साधण्याचे हे प्रभावी माध्यम आहे. त्यातून एका पिढीला संस्कार, मूल्ये, नवनिर्मितीच्या प्रेरणा, जगण्याचे भान देता येईल. ‘किशोर’चे स्वरूप बदलून बदलत्या काळाशी सुसंगत असे नव्या पिढीचे व्यासपीठ बनवण्याचे माझे स्वप्न आहे. त्याचे स्वरूप अद्ययावत, आधुनिक आणि अधिक आकर्षित करता येईल.’ मी उत्तर दिले.

१९८३ च्या नोव्हेंबरमध्ये हातात लेटर ऑफ अपॉइंटमेंट घेऊन ‘नीलम बिल्डिंग, वरळी, मुंबई’ येथे ‘किशोर’ मासिकाच्या कार्यालयात हजर झाले. संपादकांनी आत बोलावल्याचे शिपायाने सांगितले. आत गेले. समोरच्या खुर्चीत ऐसपैस बसलेल्या, प्रसन्न चेहऱ्याच्या, भारदस्त व्यक्तिमत्त्वाच्या संपादकांना थोडे हसून म्हणाले, ‘नमस्कार सबनीसकाका. तुमच्या हाताखाली काम करण्याची ही संधी मला खूप आवडेल.’ त्यांचे उत्तर ऐकून मी थक्कच झाले. ते म्हणाले, ‘अगं वेडे, माझ्या हाताखाली नाही, माझ्याच जागी तू येणार आहेस.’

मला ‘किशोर’च्या उगवत्या पिढीशी नव्याने सुसंवाद साधायचा होता. कथांचे स्वरूप, लेखांचे विषय, चित्रांचे आशय आणि अभिव्यक्ती यांची विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी जवळीक असायला हवी असा अट्टहास मनात होता. परंपरांची डोळस उजळणी व्हावी यावर कटाक्ष होता. संस्कारांची समृद्धी व्हावी, रचनात्मकतेचा वेध घ्यावा आणि नकारमूल्यांचे दमन करावे अशी तळमळ होती. उमेदीच्या तरुण लेखकांचा व चित्रकारांचा संच निर्माण करायचा होता. किशोरवय ओलांडून तारुण्यात पदार्पण केलेले हे प्रतिभावंत तरुण किशोरांच्या सहसंवेदना अनुभवू शकतील असा विश्वास होता.

हळूहळू नव्या दमाच्या तरुणांचा ‘किशोर’ कार्यालयात राबता वाढला. त्यात अरुण कालवणकर, प्रभाकर भाटलेकर यांसारखे नव्या जाणिवा, संवेदना आणि प्रयोगक्षमता असणारे तरुण नवनवे प्रयोग करू लागले. अर्थात त्यांच्याबरोबरच पद्मा सहस्रबुद्धे, प्रभाशंकर कवडी, राम वाईरकर, श्याम फडके, रवी परांजपेंसारखी बुजुर्ग मंडळी ‘किशोर’च्या चित्रमयतेत भर टाकत होती. त्यांच्याकडून मला चित्रकलेकडे बघायची दृष्टी मिळाली आणि नव्या चित्रकारांकडून प्रायोगिकतेचे धाडस एक आव्हान म्हणून स्वीकारण्याची बेधडक वृत्ती अंगी बाणली. आधुनिक मतप्रणाली, नवनवे विषय, नवे विचार, कल्पकता आणि वेगळी शैली घेऊन, अभिव्यक्ती घेऊन ताज्या दमाच्या तरुण लेखकांचा मोठय़ा प्रमाणात समावेश झाला. माझ्या विचारांना आणि कल्पनांना त्यांनी मोठा कॅनव्हास दिला.

जे सर्वोत्तम आहे तेच ‘किशोर’मधून देण्याची जिद्द घेऊन संपादकीय विभागातील मंडळी मोठय़ा उत्साहाने कामाला लागली. वारंवार मीटिंगा, चर्चा होऊ लागल्या. सगळेच नव्या ऊर्मीने, नव्या ईष्र्येने पेटले होते. हा-हा म्हणता आमचा पहिला दिवाळी अंक जवळ आला. साल होतं १९८४! माझे सहाय्यक संपादक मुकुं द बोचरे यांना साहित्याची उत्तम जाण होती. कामावर त्यांची श्रद्धा होती. प्रामाणिकपणे, बारकाईने आणि मन:पूर्वक काम करण्याची वृत्ती होती. त्यांचे प्लस पॉइंट्स ‘किशोर’च्या जडणघडणीत महत्त्वाचे ठरले. माझे इतर सहाय्यक शैला सुरवसे, रवी मानेंसह आम्ही अनेक नामवंत साहित्यिकांना व नव्या दमाच्या कसदार लेखकांना स्वत: जाऊन भेटत राहिलो. त्यांच्याकडून वेगवेगळ्या विषयांवर लिहून घेतले. झपाटल्यासारखे आम्ही काम करत होतो. नव्याने उभारलेल्या चित्रकारांची टीमही हिरीरीने यात भाग घेत होती. दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ वेगळे हवे होते. त्यावेळचे जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधील पेंटिंगचे प्रोफेसर षांताराम पवार अत्यंत कल्पक व जीनियस चित्रकार म्हणून गाजत होते. त्यांना जाऊन भेटले. ‘हा माझा पहिला दिवाळी अंक आहे. तो वेगळा आणि उत्कृष्ट व्हावा म्हणून तुमची मदत पाहिजे.  पाठय़पुस्तक मंडळाचे मानधन कमी आहे, पण तरीही मुखपृष्ठ लेआऊट आणि काही चित्रकृती तुम्ही कराव्यात अशी विनंती करायला मी आले आहे. तुम्ही मला नाही म्हणणार नाही या खात्रीने आले आहे.’ मी एका दमात सारं बोलून टाकलं. ते छान हसले. म्हणाले, ‘उत्तम अंक काढण्याची तुमची तळमळ मला जाणवली. मी चित्रे करीन.’

या दिवाळी अंकात मराठी भाषेतील दिग्गज साहित्यिकांबरोबरच त्या काळातले नव्या दमाचे लेखकही सहभागी झाले होते. नामवंत चित्रकारांबरोबरच ताज्या दमाचे चित्रकारही होते. दिवाळी अंक प्रचंड खपला. खपाच्या कितीतरी पटीनं जास्त आमचा उत्साह वाढला. बालसाहित्यात नवनवे प्रयोग आम्ही सुरूकेले. एप्रिल-मेमधला सुट्टी विशेषांक म्हणून चांगला लठ्ठ अंक काढण्याची नवी प्रथा सुरू केली. त्याला तर अपेक्षेबाहेर प्रतिसाद मिळाला. पत्रांचा पाऊस पडला. कथा, कविता, ललित, वैज्ञानिक, वैचारिक असे वेगवेगळे आकृतिबंध एकत्र करून नव्या प्रकारचे साहित्य विद्यार्थ्यांना दिले. मुलांना कुठे सरळ, आखूनरेखून दिलेल्या रेषेत चालणे आवडते? त्यांना कधी तिरपे, कधी नागमोडी जायलाच आवडते. शिवाय वेगवेगळ्या लयीत त्यांना पुढे जायचे असते. तोचतोचपणा, ठरावीकपणा, साचेबंदपणा या साऱ्याचेच त्यांना वावडे असते. हा विचार करून ‘किशोर’मधून साहित्य, चित्रे, चित्राकृती देताना मुलांच्या अभिवृत्तीशी, भावविश्वाशी आणि बदलत्या मनोव्यापाराच्या ती जवळची कशी होतील यावर संपादक म्हणून मी नेहमीच कटाक्ष ठेवला.

नवनवे आधुनिक, वैज्ञानिक, सामाजिक बदल ‘किशोर’च्या साहित्यात प्रतिबिंबित व्हावेत असा अट्टहास ठेवला. भाषा साधी, सोपी आणि प्रभावी असावी, वाक्यरचना लहान असावी व शब्दसंख्या मर्यादित असावी याबद्दल आग्रही राहिले. ‘किशोर’ अधिकाधिक वाचकाभिमुख व्हावा यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे आवश्यक होते.. सुसंवाद आवश्यक होता. म्हणून मग ‘किशोर’मध्ये काय असावे आणि काय नसावे, याबद्दल विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया मागवण्यास सुरुवात केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्यानुसार आम्ही बदल सुरूकेले.

दुसरा टप्पा होता- विद्यार्थ्यांना लिहिते करणे आणि त्यांना ‘किशोर’चे व्यासपीठ उपलब्ध करून देणे. अनेक विषय घेऊन आम्ही त्यांच्या लिखाणाची सदरे सुरूके ली. मुलांनी लिहिलेले साहित्य व त्यांनी काढलेली चित्रे यांचा सहा पानांचा विभाग सुरू झाला. नवोदित लेखक व चित्रकार विद्यार्थ्यांतूनच निर्माण व्हावेत म्हणून आम्ही ‘किशोर’तर्फे विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, वाडय़ा-वस्त्यांवर, शाळांमध्ये, दगडखाण कामगारांच्या मुलांच्या शाळेमध्ये जाऊन, आदिवासी पाडय़ांत जाऊन मुलांच्या लेखन व चित्र कार्यशाळा घेऊ लागलो. वसंत बापट, महावीर जोंधळे यांच्यासारखे कवी तसेच साहित्यिक विजया वाड, प्रवीण दवणे आणि नामवंत चित्रकार त्यांना मार्गदर्शन करत. राज्यभर शाळांमधून चित्रकला स्पर्धा घेतल्या जात. कार्यशाळांमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून त्यांचे लेख, कथा, कविता, चित्रे, इलस्ट्रेशन्सना ‘किशोर’मधून दरमहा प्रसिद्धी देणे सुरू झाले.

विद्यार्थ्यांना सर्वोत्तम तेच द्यावे ही आमची बांधिलकी होती. म्हणून विशेषांक काढण्याची परंपरा सुरू केली. लोककला, नाटय़कला, संरक्षण दले इत्यादी या अंकांचे विषय होते. या विशेषांकांना मोठा प्रतिसाद मिळाला. ‘किशोर’चे स्वरूप बदलत गेले. विद्यार्थ्यांचा सहभाग वाढत गेला. खपाच्या आकडय़ांत भरीव वाढ झाली. अनेक पुरस्कार मिळाले. ‘किशोर’चा अंक खेडय़ापाडय़ांतील मुलांपर्यंत पोहोचावा यासाठी त्याचे वितरण राज्यातील जि. प. शाळांपर्यंत सुरू केले. खप लाखांवर गेला.

भावी पिढीला आणि बालवाङ्मयाच्या अभ्यासकांना काय देता येईल याचा विचार निवृत्तीचा काळ जवळ आल्यावर मी करू लागले. एक दूरगामी प्रकल्प डोळ्यासमोर आला. ‘किशोर’च्या पहिल्या अंकापासून जे जे उत्कृष्ट साहित्य प्रसिद्ध झाले, त्याचे कथा, कविता, कादंबरी, एकांकिका, चरित्र, छंद.. असे वेगवेगळे खंड करायचे. खंडाचा आकार ‘किशोर’ अंकाएवढाच ठेवायचा व आतील सजावट मूळ ‘किशोर’सारखीच करायची. त्यामुळे तरुण चित्रकारांना व पुढच्या पिढीला प्रभाशंकर कवडी, राम वाईरकर, पद्मा सहस्रबुद्धे, श्याम जोशी अशा चित्रकारांची चित्रे अभ्यासायला मिळतील. ‘किशोर’ने केलेल्या वाङ्मयीन आणि सांस्कृतिक कार्याचा आलेख या खंडांच्या रूपाने ग्रंथबद्ध होईल. माझ्या सेवानिवृत्तीपर्यंत (डिसेंबर २००८ पर्यंत) सहा खंड प्रसिद्ध झाले. पाच खंडांचे काम तयार होते.

‘‘किशोर’ वाचत आम्ही मोठे झालो, ‘किशोर’ने संस्कार दिले, स्नेह दिला, साहित्याची जाण दिली, चित्रांची दृष्टी दिली..’ असे सांगणारे नव्या पिढीचे तरुण जेव्हा भेटतात तेव्हा २५ वर्षांच्या माझ्या ‘किशोर’च्या साथसंगतीबद्दल कृतकृत्य वाटते. मन भरून येते.

कुठलीच सोबत वा साहचर्य दीर्घकाळ अथवा कायमस्वरूपी नसते. अर्थात हे दूर होणे भौतिक पातळीवरचे असते. मानसिक पातळीवर ही एकरूपता, तादात्म्य, आपलेपण टिकूनच असते. दोघांनी एकमेकांना बरेच काही दिलेले असते. ‘किशोर’चे आणि माझे नाते असेच आहे!

wlokrang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2021 6:47 am

Web Title: dnyanada naik article about balbharati kishor magazine for children zws 70
Next Stories
1 नवतंत्रज्ञान रूपात..
2 पन्नाशीतला  ‘किशोर’
3 चवीचवीने.. : खात राहा, खिलवत राहा!
Just Now!
X