येत्या शनिवारी, १४ फेब्रुवारीला ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड कप क्रिकेटचा महारणसंग्राम सुरू होत आहे. माध्यमांतून त्याची हवा तयार करण्यासाठी नेहमीप्रमाणेच जोरदार आटापिटा सुरू आहे. क्रिकेटचा प्रचंड फॅन असलेला बॉलीवूडचा शहेनशहा बिग बी अर्थात् अमिताभ बच्चन या वर्ल्ड कपमध्ये कॉमेन्टेटर बॉक्समध्ये समालोचक म्हणून हजेरी लावणार आहे. टीव्ही चॅनेल्सवर वर्ल्ड कपची प्रचंड जाहिरातबाजी कधीचीच सुरू झाली आहे. परंतु क्रिकेटचे चाहते मात्र शांत आहेत. त्यांच्यात पूर्वीसारखी प्रचंड उत्सुकता, उत्कंठा वगैरे कसलीच भावना अजून तरी दिसत नाहीए. खरं म्हणजे गेल्या वेळी भारताने वर्ल्ड कप जिंकलेला असताना आणि समस्त भारतवासी क्रिकेटचे दीवाने असताना ही चिडीचूप शांतता..? काय असेल यामागचं कारण? लोक अति क्रिकेटला कंटाळलेत? की सचिन, द्रविड, कुंबळेसारखे महान खेळाडू आज आपल्या संघात नाहीत म्हणून त्यांचा रस कमी झालाय? की भारतीय क्रिकेट संघटनेतील भयावह राजकारण आणि त्यात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराचा हा परिपाक आहे? काय घडलंय काय नेमकं?

‘स्कोर काय आहे?’
प्रश्न अगदी मोजक्या तीन शब्दांतला. सलगीच्या सहज सुरातला. अपेक्षित उत्तरही तसंच. काही मोजक्या व मुद्देसूद शब्दांतलं. ‘किती गडी बाद?’, ‘धावसंख्या किती?’, अन् सामना मर्यादित षटकांचा असल्यास ‘नेमकी किती षटकं संपलीत?’ बस्स. त्या क्षणी या प्रश्नांच्या उत्तरांशिवाय आणखी काय हवं?
याचसोबत गेल्या २५ वर्षांत आणखीन एक जोडप्रश्न असे. कधी कधी त्या प्रश्नास (अरेरे!) अग्रक्रम दिलेला. भले क्रिकेट सांघिक खेळ असो, भले बेशरम व बेफाम संघटकांच्या लेखी टीम इंडिया खेळत असो, तुमच्या-माझ्यासारख्या करोडोंसाठी भारताचा राष्ट्रीय संघ तिरंगी झेंडय़ाखाली खेळत असो, भले प्रश्न विचारणारा मराठीभाषक असो वा भय्या वा मद्रासी वा मियाँ असो.. ‘सचिनच्या धावा किती?’; आणि तो बाद झाला असल्यास ‘त्याला ढापलं गेलं तर नाही ना?’
प्रश्न अन् पोटप्रश्न तीन- तीन शब्दांचे. अपेक्षित उत्तरंही आठ- दहा- बारा शब्दांची. सारे संभाषण अर्धा- एक- दीड मिनिटाचं. ज्याला प्रश्न विचारला गेला आहे त्यानं कान छोटय़ा-मोठय़ा ट्रान्झिस्टरला लावलेला. त्यावर जाहिराती चालू असल्यास किंवा षटक अपूर्ण अवस्थेत असल्यास, किंवा काही मठ्ठ कॉमेन्टेटर समीक्षणात धावता स्कोर सोबत सांगत नसल्यास (हा अडथळा अधिक नित्याचा व सोशिकतेचा अंत पाहणारा!) हे संभाषण लांबलं जायचं ते उत्कंठापूर्ण शांततेत!
अशी असंख्य संभाषणं क्रिकेटवेडय़ा भरतखंडात- म्हणजे भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेशात- ज्याची लोकसंख्या १९४७ मध्ये होती ४० कोटी आणि आता फोफावत गेलीय नको तितक्या दीडशे कोटींपर्यंतच्या जनसमूहापर्यंत नव्हे तर जनसागरापर्यंत. शाळा-कॉलेजांतील कट्टय़ांवर व कॅन्टीनमध्ये, धाब्यांवर व पानबिडी दुकानांसमोर, रस्त्या-रस्त्यांवर, बस-ट्रेनमध्ये, शेजाऱ्यापाजाऱ्यांत, पुष्कळदा सर्वस्वी अनोळखी माणसांत हा करोडोंचा परिवार जोडणारे परवलीचे शब्द : ‘स्कोर किती आहे?’ अनोळखी लोकांना बोलकं करण्याची, त्यांना मौन सोडायला लावण्याची जादू या तीन शब्दांत होती. परकेपणाचं कुलूप उघडायला लावणारी चावी या तीन शब्दांची. धर्म, भाषा, जात, पोटजात, लिंग, वर्ण या साऱ्या भिंती तोडून एक अतिविशाल, राष्ट्रव्यापी परिवार उभा करण्याची शक्ती या तीन मोजक्या शब्दांत : ‘स्कोर काय आहे?’  या प्रश्नात मौल्यवान माहितीची- म्हणजे स्कोरची धावती देवाणघेवाण.. जी सतत अपडेट- अद्ययावत केली जात असे. आणि ही प्रक्रिया अखंड चालणारी..
माझं शालेय शिक्षण नाशिकच्या न्यू हायस्कूलमध्ये झालं. क्रिकेट हा खेळ महागडा म्हणून आंतरशालेय स्पर्धेत आमचा संघ उतरवला जात नसे. पण गमतीची गोष्ट म्हणजे बऱ्याच वर्गाचे, इयत्तांचे संघ खेळत. अगदी सीझन (लेदर) चेंडूनं खेळत. मुलं पॅडस् लावून फलंदाजी करत. चौरंगी-पंचरंगी स्पर्धेतील सी. के. नायडू, प्रा. देवधर, विजय र्मचट, विजय हजारे, लाला अमरनाथ, महंमद निस्सार, अमरसिंग, खंडू रांगणेकर प्रभृतींचे किस्से त्याकाळी आमच्या कानावर येत. रेडिओ खूप कमी घरांत असे. आम्ही काहीजण तेव्हाही बीबीसी व रेडिओ ऑस्ट्रेलियावरून कसोटी समालोचने ऐकायचो. आजही आम्हा काहीजणांना त्या काळातील भारतीय, ऑस्ट्रेलियन, इंग्लंड संघांतील ९५ टक्के खेळाडूंची नावे पटापट सांगता येतील. या गोष्टी बालपणातल्या. १९४६ पासूनच्या.
१९४८-४९ ची (म्हणजे ६६-६७ वर्षांपूर्वीची!) आठवण सांगतो. जॉन गोडार्ड या गोऱ्या कप्तानाच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडियन संघ भारतीय दौऱ्यावर आला होता. वीक्स-वॉलकॉट या जबरदस्त जोडीसह स्टॉलमेयर आणि रे, गोमेझ अन् क्रिस्तियानी, जोन्स, ट्रिम व फग्र्युसन असे उत्तमोत्तम खेळाडू त्या संघात होते. शेवटच्या कसोटीत भारताला विजयासाठी सुमारे साडेतीनशे धावांची गरज होती. विजय हजारे व रुसी मोदी यांच्या मोठय़ा भागीदारीने भारताला विजयपथावर नेले होते. पुढे किल्ला लढवत होता- आदल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणारा दत्तू फडकर.
त्यावेळी शाळेतील वर्गात कुणाचेच लक्ष लागत नव्हते. तेव्हा टीव्ही नव्हता. रेडिओही घरोघर नव्हते. शाळेजवळ एका हॉटेलात रेडिओ होता आणि तो जोरात लावलेला होता. वर्गातला कुणी ना कुणी हलक्या पावलाने जायचा व ताजा स्कोर घेऊन यायचा. तसा कटच आपसूक रचला गेला होता.
आम्हाला वाटत होतं की, आमची शाळेतून हॉटेलपर्यंतची ये-जा चोरपावलानं होतेय. सरांना आम्ही अंधारात ठेवलंय. पण नंतर सरच आमच्या कटात सामील झाले. एवढेच नव्हे तर कटाचे सूत्रधार बनले. त्यांनीच आमची रांग लावून दिली आणि स्कोरची ताजी खबर जाणून घेण्यात तेही सहभागी झाले. परंतु प्रश्न होता- त्या दिवशीच्या चहापानानंतरच्या दीड तासाचा.. म्हणजे शाळेतील शेवटच्या दोन तासांचा. मात्र त्या वेळातील दोघंही शिक्षक आनंदाने आमच्या कटाचे साथीदार बनले. ‘स्कोर काय आहे?’ची ताजी बातमी घेत राहिले.
नाशिकला ‘माधवराव चिवडा’ प्रसिद्ध. मुंबईतील कसोटी सामन्यात त्यांचा स्टॉल लागायचा. ब्रेबर्न स्टेडियममधील सर्वात स्वस्त- म्हणजे ईस्ट स्टँडची सीझन तिकिटे ते आम्हाला मूळ किमतीत मिळवून देत. पुढे नाशिकच्या दैनिक गावकरी व साप्ताहिक रसरंगसाठी लिहू लागलो. आणि मुंबईतही क्रीडा-पत्रकारितेचाच व्यावसायिक पेशा स्वीकारला. आता नाशिकहून मित्रमंडळी मुंबईतील कसोटी तिकिटांसाठी पैसे पाठवू लागली. ६६-६७ ला गॅरी सोबर्सचा जगज्जेता विंडीज संघ भारतात आला. त्याचं सर्वाना स्वाभाविकच प्रचंड आकर्षण होतं. त्यामुळे त्यावेळी तिकिटांसाठी माझ्याकडे काही हजार रु. पाठवले गेले. मला फार तर दोन तिकिटे मुश्किलीने मिळवता आली असती. एवढी तिकिटे आणायची कुठून?
पण मी होतो ‘स्कोर काय आहे?’ परिवारातला. तिकीट विक्री सुरू होण्याच्या आदल्या रात्री नऊपासूनच ब्रेबर्न स्टेडियमसमोर रांगेत उभा राहायला गेलो. तेव्हा अशी रांग लागायची. पोलीस आधी रांग लागू द्यायचे. मग अचानक सर्वाना हाकलायचे. बरेच जण मग फैलावायचे मरीन ड्राइव्हवर. जरा वेळाने पुन्हा रांग लागायची. पोलीसही ती लागू द्यायचे व अचानक पुन्हा आम्हाला पिटाळायचे. हा प्रकार रात्री नऊपासून मध्यरात्रीपर्यंत चालू राहिला. आम्ही काहीसे वैतागलो. आणि आम्ही असे गाफील अवस्थेत असताना अचानक लावलेली रांग पोलिसांनी कायदेशीर ठरवली. आम्हा क्रिकेटवेडय़ांचे या रांगेतले क्रमांक तीनशे-चारशेच्या पुढचेच असावेत. तशा परिस्थितीतही आम्ही अनेकांनी मध्यरात्रीपासून सकाळी आठ-नऊपर्यंत तग धरला. रांगेतील पाठीमागच्यांचा दबाव आणि आमच्यापुढील तीनशे-चारशे जणांत होत असलेली घुसखोरी वाढतच होती. अशा परिस्थितीत एका विलक्षण गोष्टीची जाणीव झाली : आमच्या पुढील तीनशे-चारशे व एव्हाना पाचशेपर्यंत वाढत गेलेली मंडळी एकमेकांशी नाव घेऊन बोलत होती. म्हणजे ते सगळे एकसाथ आले होते! त्यांची धट्टीकट्टी शरीरयष्टी, हुकमत गाजवण्याची लकब, काही अंशी त्यांची भाषा सूचित करत होती, की ते सगळे पोलीस दलातले होते किंवा त्यांचे आप्तेष्ट तरी. कुंपणच शेत खात होते.
सकाळी आठ-साडेआठच्या सुमारास आम्ही बरेचसे (मध्यमवर्गीय) रांगेतून बाहेर फेकले गेलो. तिथून गेलो ‘म. टा.’च्या कचेरीत. संपादक द्वा. भ. कर्णिकांनी विचारलं : ‘तुझा अवतार असा का? सकाळच्या प्रहरी तू असा घामाघूम कसा?’ त्यांना सारं सांगितलं. ते म्हणाले, ‘लगेच बातमी लिहून काढ!’ बातमी छापून आली. पोलिसांतून संपादकांकडे विचारणा झाली. संपादकांनी त्यांना सुनावून घेतलं. पण त्या काही तासांत, ‘स्कोर काय आहे?’ या निरागस प्रश्नाची भीषण व भ्रष्ट बाजू प्रकर्षांने नजरेसमोर आली. खेळाचा बाजार मांडला जातोय, हे स्वानुभवातून जाणवलं.
पुढे क्रीडा-पत्रकारितेत रमत गेलो. विविध क्षेत्रांतील कर्तबगार, स्वच्छ, समविचारी वा अभ्यासू व्यक्तींच्या संपर्कात येत गेलो. क्रिकेटकडे येणाऱ्या लाखो, करोडो, अब्जावधी रुपयांच्या ओघात खेळाचे बाजारीकरण अटळच होते. एकीकडे क्रीडाकौशल्यांच्या जोपासनेत परिपूर्णतेचा ध्यास होता. पण त्याचबरोबर सामना-सौदेबाजी, तऱ्हेतऱ्हेची सौदेबाजी आणि सर्वोच्च पातळीवरून विविध करारांमार्फत लुटमार यातून एका आनंददायी खेळाभोवतीचे भ्रष्ट व भीषण वलय प्रकाशात येत राहिलं. परिणामी ‘स्कोर काय आहे?’ अशी विचारणा हळूहळू कमी होऊ लागली. कारण या स्कोरची शुद्धताच संशयाच्या भोवऱ्यात सापडत गेली. हन्सी क्रोनिए, महमंद अझरुद्दीन यांच्यासह पाकिस्तानचे आसिफ इक्बाल, सलीम मलिक, वसिम अक्रम, वकार युनूस आदी आठ-दहा कर्णधार या आरोपांनी कलंकित झाले. अन् ‘स्कोअर काय आहे?’ विचारताना क्रिकेटशौकिनांच्या मनात कडवटपणा, निराशा घर करू लागली.
पण हे सारं केवळ क्रिकेटमध्येच घडत होतं?
अमेरिकेतील व्यावसायिक आणि हेवी व्ॉट बॉक्सिंगमधील सिंडिकेट जगजाहीर आहेत. बेसबॉल हा अमेरिकेचा लाडका खेळ. त्यातील घोटाळेही जगजाहीर आहेत. फुटबॉल हा खेळांचा बादशहा. जगात सर्वात लोकप्रिय खेळ. पण त्यातील सौदेबाजीही पराकोटीला पोहोचलेली! ब्राझील, इटली अशा फुटबॉलमधील अव्वल देशांपासून ते आशिया, आफ्रिका, युरोपमधील डझनावारी देशांतील सौदेबाजी, भ्रष्टाचार, गैरव्यवहार वेळोवेळी उघडकीस आलेले आहेत. ‘फिफा’ या जागतिक संघटनेतील सर्वोच्च पुढाऱ्यांचे चाळे ब्रिटिश क्रीडा-पत्रकारांनी चिकाटीने जनतेसमोर आणले आहेत. पण तरीही या खेळाची लोकप्रियता न घटता उलट वाढीसच लागलेली दिसते आहे.
भारतीय क्रिकेटबाबतही असंच घडेल का?
येथे काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.
पहिली गोष्ट : भारतीय जनमानसावरील क्रिकेटची घट्ट पकड आणि क्रिकेटची त्यातील मक्तेदारी. तिला शह देणारा कोणताही खेळ आजवर समर्थपणे या देशात उभा राहिलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण त्या मक्तेदारीला बारीक बारीक तडे जरूर पाडले गेले आहेत. याचं श्रेय मी सर्वप्रथम देईन केरळ, हरियाणा, मणिपूर आणि दारू व ड्रग्जच्या विळख्यात फसण्याआधीच्या पंजाबला, गोपीचंदच्या अकॅडमीला, तसेच दिग्वीजय सिंग बाबू ऊर्फ के. डी. बाबू या हॉकीतील जादूगाराच्या लखनौ स्पोर्ट्स हॉस्टेल हॉकी संघाला. केरळने अ‍ॅथलेटिक्स, जलतरण, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल व बॅडमिंटन हे खेळ गेली ४० वर्षे जोपासले. पंजाबने भर दिला हॉकी, अ‍ॅथलेटिक्स, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कुस्ती, बॉक्सिंग, सायकलिंग आदी खेळांवर. क्रीडासंस्कृतीचं बीजारोपण करण्यात केरळ, मणिपूर, पंजाब व हरियाणा आघाडीवर होते व आहेत. शांतपणे व संथपणे, क्रिकेटवर टीका न करता त्यांनी पर्यायी खेळांची पाळंमुळं रोवली आहेत.
त्याखालोखाल मी श्रेय देईन माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व वसंतराव साठे यांना. १९८२ मध्ये दिल्लीत नवव्या एशियाडचे दिमाखदार संयोजन त्यांनी केलं. एशियाडचे स्टेडियम, तलाव, हॉल आदी बांधकामादरम्यान किमान ५० अनामिक मजूर दगावले- हा प्रचंड काळा डागही भीषण! पण याच संयोजनातून ऑलिम्पिक खेळांच्या कौशल्यांची, प्रेक्षणीयतेची अभूतपूर्व मेजवानी कोटय़वधी भारतीयांना मिळाली. वसंतराव साठे यांनी आग्रहपूर्वक आणलेल्या रंगीत टीव्हीने तर लोकांच्या डोळ्यांचे पारणेच फेडले. इंदिराजींनी हा सारा खटाटोप केला तो एशियाड भरविण्यास तयार नसलेल्या मोरारजी देसाई व चरणसिंग या जनता पार्टीच्या पंतप्रधानांना खिजवण्यासाठी! क्रीडा प्रोत्साहन हा विषय त्यांनी अजेंडय़ावर घेतलाच नव्हता. आणि त्यांचा हा उपक्रम अधुराच होता, हे भारताचं दुर्दैव!
१९८२ मध्ये उफाळून आलेली ऑलिम्पिक खेळांची लाट पुढे ओसरत गेली. मग पुन्हा भरतीच्या लाटा येण्यासाठी तब्बल २५ वर्षे वाट पाहावी लागली. दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धा अधिक गाजल्या त्या सुरेश कलमाडी, ललित भानोत, व्ही. के. वर्मा प्रभृतींच्या, त्यातील कंत्राटदारांच्या, नोकरशहांच्या प्रचंड भ्रष्टाचारामुळे. अशा मंडळींच्या टोळ्यांनी भरपूर हात मारून घेतला. पण तरीही २००९ ते २०१२ लंडन ऑलिम्पिकदरम्यान क्रीडामंत्री अजय माकन वा क्रीडा खात्यातील काही नोकरशहा यांनी काही उमद्या योजनाही राबविल्या. सुमारे दोन हजार निवडक खेळाडूंवर सातशे-आठशे कोटी रुपये खर्च केले. कधी नाही इतकी- म्हणजे सहा पदके (लंडन ऑलिम्पिकमधील एक हजार पदकांपैकी सहा पदके!) भारताच्या खात्यात जमा झाली.
भारतीय क्रिकेटसाठी सध्या पडता काळ आहे. भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवासन यांची वस्त्रे न्यायालयीन निवाडय़ात नव्हे, तरी न्यायालयीन निरीक्षणात उतरवली गेली आहेत. सचिन, सेहवाग, द्रविड, लक्ष्मण, युवराज, गांगुली, झहीर, कुंबळे यांची जागा घेणारे तारे, स्टार्स जोवर उदयास  येत नाहीत तोपर्यंत भारतीय क्रिकेटने चेहरा गमावलेला असेल.
पण नेमकी हीच हालत आहे भारतीय हॉकीचीही! आणि फुटबॉल आज सर्वाधिक गर्दी खेचत असताना जागतिक रँकिंगमध्ये पहिल्या दीडशे संघांतही स्थान मिळवू न शकणारा भारतीय संघ- फुटबॉल शौकिनांच्या हृदयातसुद्धा स्थान मिळवू शकलेला नाही.
इथेच क्रिकेटची मर्यादा क्रिकेटची चाकर बनते. शंभर देशांमध्ये सातवे-आठवे स्थान भारतीय हॉकीचे. तर दोनशे देशांत भारतीय फुटबॉल तळाच्या ५० देशांमध्ये आहे. याउलट, कसोटी क्रिकेटमध्ये भारत दहा देशांत सातवा. शंभर-दोनशे देशांत पहिले वा पहिल्या तीनांत येण्यापेक्षा दहा देशांत तिसरे, दुसरे, पहिले येणे किती सोपे! हेच क्रिकेटचं भाग्य! आज ना उद्या, चार-पाच वर्षांनी नवीन सेहवाग-झहीर आदी भारताला गवसतीलही! तरीही मला व माझ्यासारख्यांना जाणवतं की, ‘स्कोर किती आहे?’चा जमाना पुन्हा येणं फार कठीण. गेले ते दिवस!  

 वि. वि. करमरकर