श्री. मा. भावे – lokrang@expressindia.com

‘सांगतो ऐका’ (१३ सप्टेंबर) या सदरात भारताचे माजी राष्ट्रपती आणि प्रकांड विद्वान डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या काही आठवणी जागवल्या होत्या. डॉ. राधाकृष्णन यांचे एकूणच व्यक्तिमत्त्व हे बहुआयामी होते. त्याबद्दल..

Senior educationist writer Meena Chandavarkar passed away
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका मीना चंदावरकर यांचे निधन
Amol Kolhe, mic, Bhosari Constituency,
Video : …अन अमोल कोल्हे यांनी ‘त्या’ व्यक्तीच्या हातातून माईक का खेचला? राजकीय सभ्यतेचे दिले उदाहरण
sharad pawar, madha lok sabha constituency, ncp, bjp
माढ्यात शरद पवारांची भूमिका महत्त्वाची
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..

डॉ. राधाकृष्णन हे पट्टीचे वक्ते होते. मुळात त्यांचा आवाजच घनगंभीर आणि परिणामकारक होता. इंग्रजी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व असाधारण होते. आणि विषय कुठलाही असो, त्याची उत्कृष्ट सजावट करून ते मांडीत. खूप वर्षांपूर्वी- बहुतेक १९६० साल असेल- पुण्याला एस. पी. कॉलेजात पं. राजराजेश्वरशास्त्री द्रविड यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. सत्कार समितीचे अध्यक्ष दत्तो वामन पोतदार होते. त्यांचे हिंदी भाषण नेहमीप्रमाणेच प्रसादपूर्ण झाले. ते म्हणाले की, या सत्काराला आम्ही डॉ. राधाकृष्णन यांना मुद्दाम पकडून आणले आहे. कारण त्यांच्या रूपाने सारा देशच या सत्काराला उपस्थित आहे. त्यानंतर डॉ. राधाकृष्णन यांच्या इंग्रजी व्याख्यानाने सर्व श्रोतृवर्ग भारल्यासारखा झाला. डॉ. राधाकृष्णन यांनी आपल्या संपूर्ण भाषणात पं. राजराजेश्वरशास्त्री द्रविड यांचे नावही घेतले नाही. त्यांनी अनेक संस्कृत श्लोकांच्या साहाय्याने भारतीय संस्कृती व तिचे संचित या दोन्हीची इतकी सुंदर ओळख करून दिली की सर्व जण द्राक्षं चघळल्यासारखे आनंदित झाले. आणि सर्वात शेवटी डॉ. राधाकृष्णन पं. राजराजेश्वरशास्त्री द्रविड यांना उद्देशून एकच वाक्य म्हणाले, ‘And you Sir, are the custodian of this incomparable treasure!’ भारावलेले श्रोते क्षणभर टाळ्या वाजवण्याचेच विसरले. आणि दोन मिनिटांनी सभागृहाचे छप्पर खाली कोसळले की काय असं वाटणारा टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.

पं. नेहरू आणि लालबहादूर शास्त्री हे दोन पंतप्रधान डॉ. राधाकृष्णन यांच्या कारकीर्दीत दिवंगत झाले. रेडिओवरून डॉ. राधाकृष्णन यांनी या दोन्ही पंतप्रधानांच्या कर्तृत्वासंबंधीची जी श्रद्धांजलीपर भाषणे केली ती अतिशय परिणामकारक होती. मृत्यूचे अनेक संस्कृत श्लोकांच्या साहाय्याने त्यांनी केलेले वर्णन अप्रतिमच होते. त्यानंतर कधी इतकी सुंदर व्याख्याने नभोवाणीवर ऐकायला मिळाली नाहीत.

१९६५ साली ना. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या मृत्यूला ५० वर्षे झाली होती. तेव्हा Servants of India Society ने विशेष समारंभ आयोजित करून व्याख्यानासाठी डॉ. राधाकृष्णन यांना बोलावले होते. विमानतळावर राष्ट्रपतींचे स्वागत करण्यासाठी महापौर, मंत्री व अन्य राजकीय व्यक्ती हजर होत्या. डॉ. कुंझरु हे Servants of India Society चे अध्यक्ष होते व ते एका बाजूला काहीसे अंग चोरून उभे होते. डॉ. राधाकृष्णन विमानातून उतरल्यावर त्यांचे लक्ष डॉ. कुंझरु यांच्याकडे गेले. आपल्या स्वागतासाठी आलेल्या राजकीय व्यक्तींकडे पूर्ण दुर्लक्ष करून ते डॉ. कुंझरु यांच्यापाशी गेले आणि त्यांनी डॉ. कुंझरु यांची ओळख तेथील सर्व राजकीय व्यक्तींशी करून दिली. डॉ. राधाकृष्णन हे त्या दिवशी थोडेसे आजारी होते. त्यामुळे त्यांनी थोडक्यात भाषण केले. त्यांनी आधीच सांगितले की, ना. गोखले यांच्याविषयी मला खूप बोलावयाचे आहे, पण प्रकृती बरी नसल्याने मला व्याख्यान आटोपते घ्यावे लागणार आहे.

जे तरुण एखाद्या कार्यासाठी धडपडत असतील आणि काही कारणाने त्यांची कुचंबणा होत असेल तर त्यांना मदत करून त्यांची कामे पूर्ण करून द्यायला ते उत्सुक असत. प्रा. सोवनी- जे पुढे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक झाले- यांनी १९४८ साली एल्फिन्स्टन कॉलेजातून नोकरीस सुरुवात केली तेव्हा ते ‘assistant lecturer’ या पदावर काम करीत होते. सरकारने त्या वर्षी उच्च शिक्षणाचा मूलभूल विचार करण्यासाठी डॉ. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला होता. त्यानिमित्ताने ते मुंबईत आले असता एल्फिन्स्टन कॉलेजला भेट देण्याकरता आले होते. कॉलेजातील सर्व प्राध्यापकांची एक सभा प्राध्यापक कक्षात होऊन त्यांच्यासमोर डॉ. राधाकृष्णन यांचे व्याख्यान झाले. प्राध्यापकांची ओळख करून देण्यात आली. सोवनी कनिष्ठ असल्याने त्यांची ओळख सर्वात शेवटी करून देण्यात आली. सोवनींनी सांगितले, ‘I am an assistant lecturer.’ तेव्हा डॉ. राधाकृष्णन थोडेसे चिडून म्हणाले, ‘Is there such a category?’ ही गोष्ट लक्षात ठेवून डॉ. राधाकृष्णन प्राचार्याशी बोलले आणि सोवनी यांना कनिष्ठ पदावरून उचलून थेट lecturer म्हणून बढती देण्यात आली.

दुसरे उदाहरण महादेव सखाराम मोडक यांचे. पुण्याच्या फग्र्युसन महाविद्यालयातून १९२४ साली एम. ए. झाल्यानंतर ते स्वत:चे पैसे साठवून लंडनला गेले. तेथून हिंदुस्थानातील वर्तमानपत्रांसाठी ‘लंडनची बातमीपत्रे’ ते लिहीत असत. तसंच हिंदुस्थानी वर्तमानपत्रांतील माहिती ते लंडनमधील इंग्रजी वृत्तपत्रांकडे पाठवीत. यातून त्यांना जी मिळकत होई त्यावर त्यांचा चरितार्थ चाले. त्यांनी ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये तत्त्वज्ञान विषयात ‘डॉक्टरेट’ मिळवण्यासाठी नाव नोंदवले. ‘Spinoza and Upanishads : A comparative study’ हा विषय त्यांनी अभ्यासासाठी निवडला. दोन वर्षांत त्यांनी आपला प्रबंध पुरा करून लंडन विद्यापीठाकडे पाठविण्याची तयारी केली.

मोडक ‘Indian Studentls Union and Hostel’ या संस्थेच्या वसतिगृहात राहत. डॉ. राधाकृष्णन त्यावेळी ऑक्सफर्ड विद्यापीठात व्याख्याने देण्यासाठी येत. तेथून ते सवड काढून लंडनला वारंवार येत व त्याच वसतिगृहात राहात. लंडनच्या मुक्कामात ते बटरड्र रसेल व लॉर्ड हाल्डेन यांची भेट घेत असत. त्यामुळे मोडक व डॉ. राधाकृष्णन यांची ओळख झाली. तेव्हा मोडक यांच्या मनात विचार आला की, विद्यापीठाकडे आपला प्रबंध देण्यापूर्वी तो डॉ. राधाकृष्णन यांच्याकडून तपासून घ्यावा. म्हणून त्यांनी हा विषय डॉ. राधाकृष्णन यांच्याकडे काढला. ‘अवश्य तपासू. असं करू की रोज दोन तास तू आणि मी तुझा प्रबंध एकत्र वाचू. आठ दिवसांत आपलं हे काम संपेल.’ आणि खरोखरच डॉ. राधाकृष्णन यांनी तो प्रबंध काळजीपूर्वक तपासला. चुका दुरूस्त केल्या आणि त्यावर आपला उत्तम अभिप्रायही त्यांनी लिहून दिला. नंतर ते म्हणाले, ‘तू ‘गीतारहस्य’ वाचलंच असशील?’ ‘हो. अनेकदा!’ मोडकांनी उत्तर दिले. ‘मग त्यात माझा उल्लेख तू वाचला असशील?’ डॉ. राधाकृष्णन. मोडकांनी आपल्याजवळील ‘गीतारहस्य’च्या इंग्रजी भाषांतराची प्रत काढली आणि त्यात डॉ. राधाकृष्णन यांच्या शोधनिबंधाचा उल्लेख आला होता तो त्यांना दाखवला. डॉ. राधाकृष्णन गहिवरून हसले आणि म्हणाले, ‘लोकमान्यांनी ‘गीतारहस्य’च्या उपोद्घातात माझा उल्लेख करून मला आशीर्वादच दिला आहे.’

पुढे मोडक यांचा प्रबंध विद्यापीठाने मान्य केला व त्यांना ‘डॉक्टरेट’ पदवी दिली. तेव्हा डॉ. राधाकृष्णन यांनी त्यांना सुचवले की, हा प्रबंध पुस्तकरूपाने प्रसिद्ध करावा. खूपदा डॉ. राधाकृष्णन यांची पुस्तके Allen & Unwin या प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होत. याच प्रकाशकाकडे मोडकांनी आपला प्रबंध पाठवावा अशी त्यांनी सूचना केली. नंतर एक इशारावजा सूचनाही केली की, ‘हे प्रकाशक तुला प्रकाशन खर्चातला काही वाटा तू उचलावास असंही म्हणतील. त्यांना उत्तर देण्यापूर्वी तू माझा सल्ला घे.’ पण मोडकांना लंडनमध्ये राहण्याचा खर्चच जिथे परवडत नव्हता, तिथे ते प्रकाशकाला पैसे कुठून देणार? मोडक लगेचच हिंदुस्थानात परतले.

मोडक पुढे जुन्या मध्य प्रांताच्या शिक्षण खात्यात नोकरी करू लागले व चढत चढत त्या खात्याचे दुय्यम सचिवही झाले. या काळात डॉ. राधाकृष्णन यांच्याशी त्यांचा पत्रव्यवहार चालत असे. डॉ. राधाकृष्णन जेव्हा नागपूरला येत तेव्हा ते मोडकांना भेटल्याखेरीज जात नसत.

आपण पुष्कळ माणूसघाण्या व्यक्ती पाहतो. त्या आत्ममग्न असतात आणि कोणाचीही भेट घेताना त्यांना आनंद होत नाही. पण काही व्यक्ती मनुष्यांशी सख्यत्वाचे नाते जोडायला उत्सुक असतात. डॉ. राधाकृष्णन हे या दुसऱ्या वर्गातील होते. आपण प्राध्यापक आहोत, आपला नावलौकिक आहे, आपण उत्कृष्ट वक्ते आहोत याबद्दलची कोणतीही आढय़ता त्यांच्यात नव्हती. विद्यार्थ्यांच्या घरीदेखील जाऊन त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींशी ते ओळख करून घेत. कोलकात्याला डॉ. पी. सी. भट्टाचार्य नावाचे नामांकित तत्त्वज्ञ होऊन गेले. आपल्याकडील चार्वाकाच्या जडवादी तत्त्वज्ञानाचा त्यांनी मार्क्‍सवादी दृष्टिकोनातून आढावा घेऊन ‘लोकायत’ नावाचे पुस्तक लिहिले होते. (या पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉ. स. रा. गाडगीळ यांनी केला आहे.) डॉ. भट्टाचार्य यांच्या या संशोधनाचा तत्कालीन सोव्हिएत युनियन व इतर कम्युनिस्ट देशांत फार गौरव झाला व त्या- त्या देशातील बहुतेक सर्व विद्वत् मंडळांवर त्यांची मानद सभासद म्हणून नेमणूक झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी त्यांचे जवळचे संबंध असले तरी ते कम्युनिस्ट पक्षाचे ‘कार्ड होल्डर’ नसावेत. कॉम्रेड डांगे यांचे जावई बानी देशपांडे यांनी लिहिलेल्या एका पुस्तकावरून कम्युनिस्ट पक्षात गदारोळ झाला व बानी देशपांडे, रोझा आणि कॉम्रेड डांगे यांची कम्युनिस्ट पक्षातून हकालपट्टी झाली. या वादाच्या अवस्थेत बानी देशपांडे यांचे हे पुस्तक भट्टाचार्याकडे अभिप्रायासाठी देण्यात आले होते. असो. हे जरा विषयांतर झाले.

प्रस्तुत लेखक आणि डॉ. भट्टाचार्य यांची योगायोगाने ओळख झाली व त्यांनी मला डॉ. राधाकृष्णन आणि इतरही विद्वानांबद्दलच्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या. डॉ. भट्टाचार्य हे डॉ. राधाकृष्णन यांचे विद्यार्थी होते. डॉ. भट्टाचार्याचे वडील त्यावेळच्या बंगाल प्रांताचे लेखापाल (A. G.) होते. डॉ. राधाकृष्णन यांनी डॉ. भट्टाचार्यामार्फत त्यांची ओळख करून घेतली व ते बऱ्याचदा लेखापालांच्या घरी येऊ लागले व त्यांच्या कुटुंबाशी समरस झाले. ही हकीगत सांगताना डॉ. भट्टाचार्य मिश्किलपणे म्हणाले, ‘डॉ. राधाकृष्णन यांचा एक मेहुणा लेखापालांच्या कचेरीत अधिकारी होता. त्याच्यावर लेखापालांची मर्जी राहावी, हाही डॉ. राधाकृष्णन यांचा हेतू असावा.’

सुरेंद्रनाथ दासगुप्ता हे नाव बंगालमधील विद्वत् क्षेत्रात अतिशय आदराने घेतले जाई. ते अनेक वर्षे कलकत्ता विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचा इतिहास इंग्रजीत चार खंडांमध्ये लिहिला आहे. हे पुस्तक अतिशय नावाजले गेले. डॉ. राधाकृष्णन हे कलकत्ता विद्यापीठात प्रा. दासगुप्ता यांचे कनिष्ठ सहकारी म्हणून काम करीत असत. डॉ. राधाकृष्णन यांची माणसं जोडण्याची प्रबळ इच्छा सर्वज्ञात आहे. प्रा. दासगुप्ता हे तर त्यांच्या विभागाचे प्रमुख. त्यामुळे डॉ. राधाकृष्णन दासगुप्तांच्या घरी वारंवार जात असत. साहजिकच दासगुप्तांची मुलगी चैत्राली हिच्याशी त्यांची जिव्हाळ्याची ओळख झाली. चैत्राली हीदेखील प्रज्ञावती मुलगी होती. तिने मोठं झाल्यावर रवींद्रनाथ टागोरांच्या वाङ्मयाचा सखोल अभ्यास करून त्यावर पुस्तके लिहिली. कलकत्त्यातील सार्वजनिक कार्यातही ती लक्ष घालीत असे. तिने केलेल्या कार्याचा गौरव म्हणून शांतीनिकेतन विद्यापीठाने तिला ‘दक्षिणोत्तमा’ ही पदवी दिली.

माझा व चैत्रालीबाईंचा जवळचा परिचय होता. त्या मला आपल्या वडिलांबद्दल, कुटुंबाबद्दल आणि लहानपणाविषयी अनेक हकिगती सांगत असत. त्यांनी मला एकदा पुढील गमतीदार किस्सा सांगितला : डॉ. राधाकृष्णन राष्ट्रपती झाल्यावर चैत्रालीबाईंना असे वाटले की आपण दिल्लीला जावे व डॉ. राधाकृष्णन यांची भेट घ्यावी. बघू या तरी, ते आपल्याला ओळखतात की नाही! चैत्रालीबाईंना त्यांच्या कामानिमित्ताने दिल्लीला वर्षांतून दोन-तीनदा तरी जावे लागे. अशाच एका फेरीच्या वेळी बाईंनी डॉ. राधाकृष्णन यांना पत्र पाठवले की, ‘मी अमुक अमुक तारखेला दिल्लीस येत असून, अमुक अमुक हॉटेलात उतरणार आहे. तुमची भेट व्हावी अशी दारुण इच्छा आहे.’

बाई दिल्लीला गेल्या. त्या हॉटेलात जातात तोच तिथला मॅनेजर म्हणाला की, ‘‘बाईसाहेब.. अहो, सकाळपासून राष्ट्रपती भवनातून फोन येत आहेत की, चैत्राली दासगुप्ता आल्या की नाही? त्यांनी पाठवलेली गाडी तुमच्यासाठी पार्किंग क्षेत्रात उभी आहे.’’ बाईंनी झटपट पोशाख बदलून राष्ट्रपती भवनात जाण्याची तयारी केली आणि राष्ट्रपतींनी पाठवलेल्या गाडीतून त्या राष्ट्रपती भवनात पोहोचल्या. राष्ट्रपतींचे सचिव पायरीवर त्यांची वाट पाहत उभेच होते. त्यांनी चैत्रालीबाईंना ताबडतोब राष्ट्रपतींच्या दालनात नेले. डॉ. राधाकृष्णन त्यावेळी थोडे आजारी होते आणि म्हणून आपल्या बिछान्यावर तक्क्याला टेकून बसले होते. बिछान्याशेजारी चैत्रालीबाईंसाठी एक खुर्ची ठेवलेली होती. राष्ट्रपतींनी थोडे उठल्यासारखे करून बाईंचा हात धरून त्यांना खुर्चीत बसवले आणि ते त्यांच्याशी जुन्या काळच्या गप्पा मारण्यात हरवून गेले. ‘तुझी भावंडे काय करतात? वडिलांचे जुने विद्यार्थी कुणी भेटतात का?’ अशासारख्या गप्पा सुरू झाल्या. पाहता पाहता दोन तास निघून गेले. शेवटी राष्ट्रपतींचे सचिव दालनात आले व ते राष्ट्रपतींना म्हणाले की, ‘‘आपल्या भेटीसाठी अनेक लोक खोळंबून राहिले आहेत, तेव्हा काय करायचे?’’

डॉ. राधाकृष्णन म्हणाले, ‘‘अरे, ही घरचीच आहे. तू पाठवून दे त्या लोकांना आत!’’ लोक येऊन भेटून जायला लागले. प्रत्येक जण येऊन भेटून गेला की राष्ट्रपती चैत्रालीबाईंना त्याच्याविषयी काहीबाही सांगत असत. नंतर नागालँडमधील एक शिष्टमंडळ आले. बहुतेक या शिष्टमंडळाला काही नाजूक राजकीय घडामोडींविषयी राष्ट्रपतींशी बोलावयाचे होते. आणि एक तिऱ्हाईत व्यक्ती तिथे उपस्थित असताना तो विषय काढावा की नाही, या शंकेत ते पडले होते. डॉ. राधाकृष्णन म्हणाले, ‘असे बिचकू नका. ही माझी नवी सेक्रेटरी आहे. तिच्यासमोर काही बोलायला हरकत नाही.’ आणि चैत्रालीबाईंना म्हणाले, ‘तूही इथेच बैस. किती वर्षांनी भेटते आहेस!’

त्यानंतर काही वेळाने चैत्रालीबाईंनी त्यांचा निरोप घेतला.

चैत्रालीबाई त्यांचे दिल्लीतील काम संपवून कलकत्त्याला पोहोचल्या; आणि ते नागा लोकांचे शिष्टमंडळही कलकत्त्याला भेट द्यायला गेले. या शिष्टमंडळासाठी एक स्वागत समारंभ चैत्रालीबाईंच्याच संस्थेने योजला होता. तेथे पुन्हा हे शिष्टमंडळ व बाईंची गाठ पडली. तेव्हा त्या लोकांनी बाईंना विचारले, ‘अहो, तुम्ही तर राष्ट्रपतींच्या सेक्रेटरी आहात. आणि आता इथे कशा?’ बाई हसत हसत म्हणाल्या, ‘मी फक्त दोन तासांपुरती त्यांची सेक्रेटरी होते.’

डॉ. राधाकृष्णन यांनी भारतासाठी बजावलेली महत्त्वाची कामगिरी म्हणजे भारत व तत्कालीन सोव्हिएत युनियन यांच्यातील चिरकालीन मैत्रीसंबंधांची सुरुवात त्यांनी करून दिली. त्यावेळी (१९५२-५३ साली) संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेपुढे काश्मीरचा प्रश्न वारंवार चर्चेला येई. सुरक्षा परिषदेच्या नकाराधिकार असणाऱ्या पाच देशांपैकी सोव्हिएत युनियन वगळता इतर चार देश कायम भारताच्या विरोधी असत. सोव्हिएत युनियन बहुधा तटस्थ राही व त्यामुळे पाकिस्तानला आपल्या कारवायांसाठी जगाचा पाठिंबा आहे असे मिरवता येई. १९५२ साली असाच एक निकराचा प्रसंग आला आणि सोव्हिएत युनियनने आपला नकाराधिकार भारताच्या बाजूने वापरला तरच भारताची अडचणीतून सुटका होणार होती. त्यावेळी भारताचे सोव्हिएत युनियनमधील राजदूत या नात्याने डॉ. राधाकृष्णन यांनी स्टालिनची भेट घेऊन सोव्हिएत युनियनने भारताच्या बाजूने नकाराधिकार वापरावा यासाठी स्टालिनचे मन वळवले. तिथून पुढे आजपर्यंत भारत आणि सोव्हिएत युनियन (आणि त्याचा आताचा वारस रशिया) यांच्यातील सहकार्य अखंड सुरू आहे.