डॉ. नीलम गोऱ्हे – neelamgorhe@gmail.com

‘हमाल पंचायत’, ‘एक गाव, एक पाणवठा’, ‘कष्टाची भाकर केंद्र’ आदी असंख्य उपक्रम आणि चळवळींमध्ये अग्रणी असलेले डॉ. बाबा आढाव उद्या (१ जून रोजी) वयाची ९० वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्यासोबत अनेक चळवळींत साथ करणाऱ्या नेत्या-कार्यकर्तीचा लेख..

Bhavana gawali vs rajashree patil
“तिकीट कापल्यामुळे खंत वाटली, पण आता प्रचारासाठी…”, भावना गवळींनी थेट सांगितलं
raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’
riche class Nariman Point Air India Economy Tata Group
नवश्रीमंत वर्गाचा नवा मंत्र!

डॉ. बाबा आढाव हे आयुष्यभर कष्टकरी व अंगमेहनत करणाऱ्या कामगारांचे नेते राहिले आहेत. ते समाजवादी विचारांचे आहेत. त्यांना महात्मा जोतिराव फुले यांच्या विचार आणि कृतीचे पाईक म्हणता येईल अशा प्रकारचे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य व मार्गदर्शन करून त्यांच्याबरोबरीने आंदोलनांत सहभागी होणारे ते एक आजन्म कार्यकर्ते व कार्यकर्त्यांचे नेते आहेत.

मी १९७५ च्या सुमारास युवक क्रांती दलाचे काम करायला लागले. त्यानंतर मी मुंबईची युवक क्रांती दलाची सरचिटणीस म्हणूनही काम करत होते. त्यावेळी माझा डॉ. बाबा आढाव यांच्याशी परिचय झाला. ते आणीबाणीचे दिवस होते. त्या काळात जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन, तसेच मराठवाडा विद्यापीठाचे प्रश्न असतील, विकासाचे प्रश्न असतील, मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा प्रश्न असेल अशी अनेक आंदोलने केली. पुणे शहरामध्ये युवक क्रांती दलाचे मध्यवर्ती कार्यालय होते. आमचे बरेच ज्येष्ठ कार्यकर्ते व नेते पुण्यातीलच होते. त्यामुळे पुण्यात कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचा आमचा सातत्याने संबंध येत होता. त्या काळात ‘मनोहर’ साप्ताहिक हे कार्यकर्त्यांशी चांगल्या प्रकारे संवाद असलेले नियतकालिक शरद महाबळ चालवीत होते. यादरम्यान सामाजिक विषमता निर्मूलनाच्या लढय़ामध्ये जे नेते विविध क्षेत्रांत काम करत होते, त्यांत डॉ. बाबा आढाव हे अग्रणी होते. मला आठवते त्याप्रमाणे लातूरला विषमता निर्मूलन शिबीर १९७७-७८ च्या सुमारास झाले होते. त्या शिबिरामध्ये मला बोलण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळेला मी नुकतीच उदगीरला भेट देऊन आले होते व उदगीरला काही काळ राहायचा माझा विचार होता. त्या शिबिरात बोलताना मी एकूणच मराठवाडय़ातील महिलांची परिस्थिती मांडली होती. त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. डॉ. बाबा आढावांनी त्यावेळी मला चांगलेच प्रोत्साहन दिले होते असे आठवते.

पुण्यात बाबा आढाव यांचे ‘कष्टाची भाकर केंद्र’ होते. त्यात जनाबाई सुर्वे व इतर अनेक महिला काम करत होत्या. ‘स्त्री’ मासिकाच्या संपादिका विद्याताई बाळ यांनी मला सांगितले, ‘‘तू या झुणका-भाकर केंद्राला भेट दे व त्यांच्या कामावर लेख लिही. तिथल्या महिलांची सुख-दु:खं समजून घे.’’ मला आठवते, त्यावेळी या केंद्रात तब्बल १२ पोती पिठाच्या भाकरी होत असत. ३०० ते ४०० क्विंटल कांदे-बटाटे लागत. एवढा त्यांचा व्याप होता. ‘ना तोटा, ना नफा’ तत्त्वावर कामगार व हमालांसाठी खासकरून हे केंद्र चालवले जात होते. मी त्याला भेट दिली. तिथल्या कष्टकरी महिलांशी बोलले. त्यांच्या कैफियती ऐकल्या. त्या कोणत्या प्रेरणेतून काम करताहेत, हे समजून घेतले. त्यावर आधारित माझा लेख ‘स्त्री’ मासिकामध्ये प्रकाशित झाला होता. तशी ती माझी बाबांशी पहिली औपचारिक ओळख म्हणता येईल. त्या महिलाही खूप खूश झाल्या. कारण त्यांचे फोटो आणि त्यांची नावे पहिल्यांदाच प्रसिद्ध झाली होती आणि त्यांना एक ओळख मिळाली होती. त्यांचं काम दाखवायला बाबा मला मग सगळीकडे घेऊन गेले. त्यातून रेल यार्डमध्ये काम करणारे कामगार, कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये काम करणारे कामगार अशा वेगवेगळ्या श्रमिकांशी माझा जवळून परिचय झाला.

१९८४ मध्ये आम्ही ‘स्त्री आधार केंद्र’ स्थापन केले. तत्पूर्वी १९८१ मध्ये मृणालताई कोठारी, मीना इनामदार, लीलाबाई रासकर, शेलार गुरुजी अशा आम्ही सगळ्यांनी मिळून ‘क्रांतिकारी महिला संघटना’ स्थापन केली होतीच. तिच्या पहिल्या वर्धापनदिन कार्यक्रमाला डॉ. बाबा आढाव आणि वसुधा सरदार यांना आम्ही बोलावलं होतं. बाबांना हडपसरमध्ये कष्टकरी आणि बहुजन समाज चांगलाच ओळखत होता. कारण त्यांच्या युनियनमध्ये हडपसरचे अनेक कार्यकर्ते होते. बाबांचा संबंध विविध संघटनांशी होता. त्यांनी महात्मा फुले यांच्या विचारप्रसारार्थ एक प्रचारफेरी काढली होती. महात्मा फुले यांचे हडपसरमध्ये कार्य होते. त्यांना मानणारे लोक होते. त्यामुळे १९८२ साली प्रत्यक्ष कामामध्ये बाबा सहभागी झाले. आम्ही एकत्रितरीत्या काही विषय हाताळले. त्यात शेपूटवाला बाबा तसेच ताईमहाराज नावाचं एक अंधश्रद्धेचं प्रस्थ होतं.. हे प्रश्न आम्ही हाताळले. त्याचदरम्यान आणखीन एक बिकट प्रश्न आमच्यासमोर आला.. तो म्हणजे परित्यक्ता स्त्रियांचा!

बहुजन समाजातील परित्यक्तांच्या पुनर्विवाहास त्याकाळी समाजाचा विरोध होता. त्यांनी कुठल्याही पद्धतीने नवऱ्याचा हिंसाचार किंवा छळ सहन करायला लागला तरी हू की चू करायचे नाही अशा पद्धतीचा एक प्रचंड दबाव त्यांच्या मनावर होता. त्या वेळेला परित्यक्तांच्या प्रश्नावर पहिल्यांदा बाबांनी एक कार्यक्रम ८ मार्चच्या महिला दिनानिमित्ताने घेतला. त्यांनी आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांनाही बोलावले होते. त्यानंतर पाच-सहा वर्षांनी ज्या महिलांना अशा प्रकारच्या कौटुंबिक छळाला सामोर जावे लागते अशा महिलांचे आंदोलन हळूहळू महाराष्ट्रभर उभे राहिले. या आंदोलनाला ऊर्जा देण्याचे काम डॉ. बाबा आढाव यांनी केले. या काळात शीलाताई आढाव आम्हाला भेटत असत. त्यांचा एक दवाखाना होता. डॉ. सुनंदा अवचट याही त्यांचा दवाखाना त्याच ठिकाणी चालवत असत. माझी सुनंदा व अनिल अवचट यांच्याशी तिथे अनेकदा भेट होत असे. आरोग्य व महिलांचे मानसिक स्वास्थ्य याबद्दल काय काम करता येईल, याबद्दल आमच्यात चर्चा होत. इतके उत्कृष्ट विषयतज्ज्ञ आम्हाला मिळाल्याने त्यातून आमच्या भूमिका व आमची धोरण अधिकाधिक समृद्ध व धारदार होत गेली.

डॉ. बाबा आढाव यांचं एक आवडतं वाक्य म्हणजे ‘अमुक एक प्रश्न ऐरणीवर आलाय’ हे असे. महाराष्ट्रातले अनेक महत्त्वाचे प्रश्न ऐरणीवर आणण्यामध्ये त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. पुढे परित्यक्तांच्या आंदोलनाबरोबरच महिला सत्यशोधक परिषदाही ‘स्त्री-आधार केंद्रा’ने आयोजित केल्या होत्या. महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती व जयंती शताब्दीनिमित्ताने आम्ही १९८९, १९९० व १९९१ अशी तीन वर्षे साजरी करायचं ठरवलं. त्यावेळी आम्ही २५ महिला सत्यशोधक परिषदा आयोजित केल्या होत्या. त्यातील पहिली परिषद आम्ही अनेक महिला संघटनांनी एकत्र येऊन स्त्री-मुक्ती आंदोलन संपर्क समितीतर्फे आयोजित केली होती. तिचे डॉ. बाबा आढाव हे कार्याध्यक्ष होते, तर महिलांचा जाहीरनामा मांडण्याची जबाबदारी माझ्यावर होती. तत्कालीन पंतप्रधान तसेच समाजकल्याण मंत्री आदी सरकारचे प्रतिनिधी या कार्यक्रमासाठी आले होते. शिवाजी मराठा संस्थेच्या पटांगणामध्ये झालेल्या या परिषदेमध्ये पहिल्यांदा आम्ही स्त्रियांच्या अधिकारांची सनद मांडली. या कार्यक्रमात डॉ. बाबा आढाव यांच्या विविध संघटनांचा- महात्मा फुले समता प्रतिष्ठान, कष्टाची भाकर केंद्र, हमाल पंचायत आदींचा- मोठा सहभाग होता. नंतर मात्र स्त्री आधार केंद्राने बारामती, पवनानगर, फलटण अशा अनेक ठिकाणी स्थानिक महिला संस्थांच्या सहभागाने या परिषदा घेतल्या.

या आमच्या परिषदांना डॉ. बाबा आढाव अनेकदा आले होते. तिथे येऊन आमची जी अपेक्षा होती त्यानुरूप महिलांच्या स्त्री व पुरुष समानतेच्या चळवळीमध्ये ‘पुरुषांचा सहभाग काय असावा’ या विषयावर बोलताना अत्यंत प्रामाणिकपणे आणि अत्यंत नि:संदिग्धपणे डॉ. बाबा आढाव यांनी जी भूमिका मांडली, त्याचा परिणाम निश्चितपणे समाजावर होत होता. आम्ही हक्काने बाबांना कार्यक्रमाला बोलवत असू. तसंच त्यांचे जे खास जिव्हाळ्याचे आंदोलनांचे विषय होते, त्यात माझाही सहभाग असे.

यात थोडासा फरक पडला तो मी दलित चळवळीत थेट काम करायला लागले तेव्हा! त्यावेळी आमच्या वाटा थोडय़ा वेगळ्या झाल्या, हे खरे असले तरीसुद्धा माझ्या कामांसंबंधातले त्यांचे ममत्व कायम होते. मला आठवतं, सत्यशोधक पद्धतीने विवाह लावायचे होते. पण या पद्धतीने सविता सुडे आणि हरिश्चंद्र सुडे या कार्यकर्त्यांचा विवाह लावायची वेळ आली तेव्हा असा उपासक वा गुरुजी कुठे मिळणार? म्हणून मग ती भूमिका मीच बजावली. सत्यशोधक पद्धतीने मी या दोघांचा विवाह लावला तेव्हा बाबा एवढे खूश झाले! त्या लग्नाचे खूप कौतुक केले गेले. हुंडा नाही, कुठल्याही प्रकारचे मानपान नाही, अशा प्रकारे समानतेच्या आधारावर हे लग्न आम्ही लावले. सुडे परिवार आजही उत्तम सामाझिक काम करतो आहे.

डॉ. बाबा आढाव यांना खूप आव्हाने पेलावी लागली. बाबांचा स्वभाव लक्षात घेता मी नक्कीच म्हणू शकते की, ‘एकला चलो रे’ हा त्यांचा स्वभाव आहे. पण तरीही त्यांनी त्यांच्या परीने अनेक नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी चांगला संवाद राखला. त्यांनी सगळ्यांना बरोबर घेण्याचे खूप प्रयत्न केले. परंतु तरीही त्यांच्यात काही ना काही अंतर पडले असावे. कुठे विचारांचे अंतर, तर काही ठिकाणी समाजवाद की मार्क्‍सवाद आणि जातीअंताचा वाद.. त्यामुळे काही वेळा जेवढे एकजुटीने त्यांना सहकार्य मिळायला हवे होते तेवढे मिळाले नाही असे मला वाटते. मी  स्वत: जरूर मांडते की, स्त्रियांची चळवळ स्वतंत्र असायला पाहिजे. स्त्रियांच्या चळवळीला अत्यंत चांगल्या पद्धतीने सहकार्य करण्याची, त्यासाठी स्वत: ठाम भूमिका घेण्याची इच्छाशक्ती डॉ. बाबा आढाव यांनी दाखवली.  आजही माझे त्यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे.

मी आमदार झाल्यावर बाबांना मुद्दाम भेटायला गेले होते. आताशा एखाद्या कार्यक्रमात आमची कधीतरी गाठभेट होते. किंवा कधी त्यांनी कुणाला माझ्याकडे पाठवले तर मी त्यांना नेहमीच शक्य ते सहकार्य करते. १९९९ पासून ते २०१४ पर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना अंगमेहनती कामगारांच्या प्रश्नांवर आझाद मैदानात अनेक वेळा ते धरणे धरून आले होते. काही वेळा विधीमंडळात ते आल्याचं कळे. परंतु मला त्यावेळच्या सरकारने कधी बोलावलं नाही. २०१४ मध्ये युतीचे सरकार आल्यानंतर बाबांना माझ्याशी फार संवाद साधावासा वाटला नाही.  याला कारण कदाचित आमच्यातले वैचारिक मतभेदही असतील; परंतु सरकार व त्यांच्यात फारसा संवाद झाला नाही. तरीही बाबांकडून मी त्यांचे जे काही प्रश्न असतील ते वेळोवेळी समजावून घेतले, ऐकून घेतले आणि ते विधीमंडळात सातत्याने मांडत आले आहे.

त्यांचे एक वाक्य मला आठवते.. ते एकदा म्हणाले होते, ‘महिलांना आणि अनेक कार्यकर्त्यांना मी सातत्याने बरोबर घेतो, जोडतो; पण कार्यकर्त्यांच्या मनातली ऊर्जा कायम कशी ठेवायची, हा प्रश्न मला पडतो.’ मलाही असेच वाटते की, हा खरंच प्रश्न आहे. आज आपण बघतोय की, त्रिवार तलाकचा विषय नुकताच केंद्र सरकारने धसासा लावला. ही कायदाबदलाची शक्ती आता सय्यदभाईंच्या व मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या पाठीशी उभी आहे. परंतु ती उभी राहिल्यावरसुद्धा काहींची ऊर्जा टिकते, तर काहींची थांबते, वेगळे वळण घेते, ही वस्तुस्थिती आहे. अशावेळी एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे डॉ. बाबा आढावांनी सामाजिक चळवळींना ऊर्जा देण्याचं जे काम अविरतपणे केलं, त्याकरता आपण समाजाने त्यांचं ऋणी राहायला हवं.

अनेक बाबतीत माझे त्यांच्याशी मतभेद असू शकतात. मुख्य म्हणजे माझ्या कामाबद्दल व मी शिवसेनेत असल्याबद्दल त्यांची वेगळी मते असू शकतील. परंतु माझ्या मते, डॉ. बाबा आढावांचे जे काम आहे ते कायम लोकांच्या मनात चिरायू राहील अशा प्रकारचे काम आहे. काही वेळा त्यांच्या मताप्रमाणे काम करणे मला शक्य नसले तरीसुद्धा त्यांच्या कार्यामधून जी ऊर्जा आणि प्रश्नांची समज मला आली, त्याबद्दल मी कायम त्यांची ऋणी राहीन. स्त्री आधार केंद्र, क्रांतिकारी महिला संघटना आणि महाराष्ट्राभरातील महिला समतेच्या चळवळीमध्ये महात्मा जोतिराव फुले यांच्यानंतर डॉ. बाबा आढाव यांचे नाव इतिहासात आणि वर्तमानातही नोंदले गेले आहे, हे आपण आज त्यांना शुभेच्छा देताना अभिमानाने नक्कीच म्हणू शकतो.

(लेखिका महाराष्ट्र विधान परिषदेत आमदार आहेत.)