News Flash

मोकळे आकाश..: टोल की टाळाटाळ :

टाळाटाळ करण्याची प्रवृत्ती या बेशिस्तीमधून आणि बेफिकिरीतूनच जन्म घेते.

डॉ. संजय ओक sanjayoak1959@gmail.com

गिरगाव.. जुन्या मुंबईचे हृदय. या धडधडणाऱ्या हृदयात शतकाहून अधिक काळ ताठ कण्याने उभ्या असलेल्या अनेक वाडय़ा-वस्त्या आहेत. प्रत्येकाचे काहीतरी विशेष गुणधर्म आहेत, इतिहास आहे. अनेक धुरंधरांचे ते जन्मस्थान आहे. काही गोष्टी मात्र तेथे समसमान आहेत. अनेक वाडय़ांमधून आजही रात्री दर तासाला टोल वाजविण्याची पद्धत आहे. रात्रीच्या नि:शब्द, नीरव शांततेत ते दर तासाचे ठोके दूरवर ऐकू जातात. एका वस्तीचे संपले की शेजारच्या वस्तीतून ऐकू येतात आणि साऱ्या वस्ती, वाडीला त्याची सवय लागते. टोलमुळे वाडीची झोपमोड होत नाही, तर त्या नादमाधुर्याने अंगाई गायल्याचा साक्षात्कार होतो. मुंबई बदलली, उपनगरं वाढली आणि चौकीदाराचे रूपांतर सिक्युरिटी एजन्सीत झाल्यावर भांडुप-मुलुंडमध्ये टोल ऐकू येण्याची शक्यता मावळली.

गिरगावातले हे टोल माझ्या मनात विचारांची आवर्तने सुरू करतात. टोलाला नाद असतो, लय असते, सातत्य असते. आणि मुख्य म्हणजे शिस्त असते. टोलचे अस्तित्व आपण शाळेसाठी मान्य केले होते. नको असलेला भूगोलाचा तास संपल्याची घोषणा दामू शिपाई या टोलनेच करीत असे आणि आम्ही मुले त्याची चातकासारखी वाट पाहत असू. शाळेत असताना एकदा तरी ती घंटा वाजवून टोल ऐकवण्याची महत्त्वाकांक्षा आम्ही अनेक वर्षे उराशी बाळगली होती आणि एकदा दामूचा डोळा चुकवून अवेळी ती वाजवल्याबद्दल वर्गातल्या व्रात्यसम्राट शिंत्रेच्या पार्श्वभागावर अख्खा भूगोल उमटविण्याचा चमत्कार सरांनी केला होता. पुढे कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये काम करताना ऑर्थर रोड तुरुंगाच्या काळ्याकभिन्न भिंतीआडून टोलचा नाद रस्त्यात कानावर यायचा आणि टोलनादाची सांगड भीतीच्या शिरशिरीशी जोडली जायची. ‘सब ठीक  है’ या टोलाबरोबरच्या आरोळीमागचे रहस्य उलगडणारी पर्यवेक्षिका स्मिता आठवायची आणि टोलपद्धतीची एकंदरच सांगड आयुष्यातल्या शिस्तबद्धतेशी घातली जायची.

टोल म्हणजे घडय़ाळाच्या काटय़ांशी केलेली हातमिळवणी. आयुष्याला चाकोरीबद्ध करून घेण्याची लावलेली सवय म्हणजे टोलचा स्वीकार. चारचे टोल ऐकल्यावर पाचचे टोल गादीत लोळपटत ऐकायचे नाहीत. आणि रात्री अकराचे टोल ऐकणे म्हणजे जागरणाची परिसीमा! नव्या पिढीच्या एकंदरच आयुष्य जगण्याला पूर्णपणे छेद देणारे असे हे टोल- माझ्यासारख्या सेवानिवृत्त व्यक्तीला मात्र ‘म्युझिक’ वाटतात, ते उगीच नाही!

माणूस मुळातच शिस्तशून्य असतो. अघळपघळ वागणे, अरबट चरबट खाणे आणि मोकळाढाकळा दिवस ढकलणे, ही त्याची मूळ प्रवृत्ती. वयाच्या तिसऱ्या वर्षी जम्बो किड्स, रिचमंड किंवा शिशुविहारमध्ये अडकल्यावर त्याची टोलशी आणि पर्यायाने शिस्तबद्धतेशी पहिली तोंडओळख होते. ही नवी जोखडे सहज स्वीकारण्याजोगी नसतातच. पण पर्याय कुठे असतो? टोलसंस्कृती वानराचा नर करते. विशिष्ट गोष्टी विवक्षित वेळेतच पूर्ण करून घेण्याची शिस्त लावते. बेशिस्तीला शिस्तीचे जू स्वीकारावे लगते. काहींना ते कुंपण वाटते, तर काहींना कोंदण. ज्या व्यक्ती शिस्तीचे रूपांतर स्वयंशिस्तीत करतात त्यांना सुयश प्राप्त होताना दिसते. शिस्त आणि स्वयंशिस्त यांमधला नेमका फरक हाच तर असतो. शिस्त लादली जाते, स्वयंशिस्त सवयीची होते. एक बाहेरून थोपवली जाते, तर दुसरी आतून उमलते. एक झुगारून देण्याच्या बंडखोरीला आमंत्रित करते; तर दुसरी आयुष्यभर दरवळत राहते.

टाळाटाळ करण्याची प्रवृत्ती या बेशिस्तीमधून आणि बेफिकिरीतूनच जन्म घेते. ती पाणफुटीसारखी पसरते आणि तिचा अस्ताव्यस्त तवंग आयुष्यावर पसरतो. ईप्सित यश दुर्मीळ होते आणि माणसं नशिबाला दोष देतात. पण आपण टोलांचा निरोप ऐकला नाही, आत्मसात केला नाही, हे त्यांना समजत नाही. एखादे काम थोडय़ा वेळात, चांगल्या प्रतीने पूर्ण करायचं असेल तर ते कार्यालयातील रिकाम्या गप्पिष्टाकडे देण्याऐवजी व्यग्र मुंगळ्याकडे द्या. तो प्रत्येक कामासाठी वेळेचे नियोजन करायला शिकलेला असतो. आणि त्याला न पडलेले टोले व न थांबणारी टिकटिक ऐकू येत असते.

..जुन्या मुंबईत मेट्रो येईल. वाडय़ा-वस्त्या इतिहासजमा होतील. टॉवर संस्कृती फोफावेल. आणि काटय़ाच्या घडय़ाळाची जागा डिजिटल वॉचेस आणि क्लॉक्स घेतील. टोल वाजणे आणि देण्याची प्रथा अस्तंगत होईल. माणसे हातावर हेल्थ बॅण्ड्स बांधायला लागतील. हाताच्या मनगटावरील काळ्या स्क्रीनमध्ये हार्ट रेट, पल्स रेट, एसपीओ २; नॉन इनव्हेजिव्ह बीपी, चाललेले अंतर, वापरलेल्या कॅलरीज् आणि शरीरातील फॅट्स दाखवतील. हातावरचे हे नवे हेल्थ बॅण्ड्स अगदी सकाळी प्रत्येक दिवसाची उद्दिष्टे ठरवतील आणि माणसांचा दिनक्रम या नव्या, न वाजणाऱ्या आणि ऐकू न येणाऱ्या टोलांना बांधला जाईल. ‘चांगले आरोग्य’, ‘स्ट्राँग इम्युनिटी’ हे सध्या परवलीचे शब्द आहेत. टाळाटाळ नको, चाकोरीतली शिस्त सहर्ष स्वीकारा, हाच संदेश हळूहळू अस्तंगत होणारे हे टोल आपल्याला देत आहेत. त्यांच्या नादात खूप माया दडली आहे. गरज आहे त्यांना समजून घेण्याची.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2021 12:31 am

Web Title: dr sanjay oak article on ringing bell tradition in girgaon zws 70
Next Stories
1 अंतर्नाद : डमरू  हर कर बाजे..
2 अपरिचित काकोडकर
3 ओरखडे आणि आठवणी…
Just Now!
X