News Flash

मोकळे आकाश.. ; जनाब-ए-आली..

युरॉलॉजिस्टच्या घरातला गळका नळ दुरुस्त करायला लागणारा प्लंबर हा डॉक्टरपेक्षा महत्त्वाचा वाटतो तो उगाच नाही.

डॉ. संजय ओक sanjayoak1959@gmail.com

‘अपनी तो जैसे-तैसे,

थोडी ऐसे या वैसे,

कट जायेगी..’

‘लावारिस’ चित्रपटातील हे गाणे चाळीसएक वर्षांपूर्वी लिहिलं, गायलं गेलं तेव्हा कोणाच्या स्वप्नातही आलं नसेल, की पुढे एक काळ असा येईल की खरोखरच रोजची जिंदगी ऐसी-तैसी ढकलायची वेळ येईल आणि आपण एकमेकांना विचारायला लागू.. ‘आपका क्या होगा जनाब-ए-आली..’

करोनाच्या या काळात जीवनाचे संदर्भ हरवले आहेत. ‘दिवस ढकलणं’ या वाक्प्रचाराची प्रचीती इतकी प्रखरतेनं येईल असं कधी वाटलं नव्हतं. सकाळ बदलली की मी अस्वस्थ होतो.. चिडचिडेपणाची पुटं माझ्या प्रत्येक कृतीवर चढू लागतात आणि त्याचा इतरांना त्रास होतो. रोज सकाळी आठ-नऊच्या सुमारास थिएटरचे कपडे घालून, हातात ग्लोव्हज् घालून सर्जिकल नाइफला हात घातला नाही तर माझी घालमेल सुरू होते. सध्या करोनाच्या काळात माझं नेमकं हेच झालं आहे. आणि जसजसे निर्बंधांचे दिवस वाढू लागतात, तसतसे एखाद्या खवचट शेजाऱ्यासारखं माझं दुष्ट मन मला विचारू लागतं- ‘आपका क्या होगा जनाब-ए-आली?’

करोनाचा हा सी-सॉ असाच किती काळ चालणार याचा अंदाज बांधता येत नाही. लाटा म्हणाव्यात तरी किती? कधी खळाळती, फेसाळती, तर कधी त्सुनामी! तेव्हा या प्रश्नाचं उत्तर जनाब-ए-आलींना स्वत:लाच शोधावं लागणार, हेच त्रिवार सत्य आहे.

तेव्हा आता नितांत जरुरी आहे अंतर्मुख होऊन स्वत:चा शोध घेण्याची. मॅनेजमेंटच्या सिद्धांतानुसार- ‘अ प्रोसेस ऑफ इंटर्नलायझेशन.’ मग कदाचित आपल्या मनाच्या तळाशी आपल्यालाच आपलं एक फारा वर्षांपूर्वीचं कसब सापडेल.

स्किल्स आर नेव्हर किल्ड. दे आर टू बी नर्चर्ड्, व्हेन नीडेड. या कौशल्य-बीजांची कदर त्याकाळी कदाचित झाली नसेल, पण आजच्या बदललेल्या काळात त्यांची गरज भासत असेल. पोळी-भाजी केंद्रावर जाऊन आपण रात्रीचं जेवण घेऊन घरी जाऊ, हे कधी कोणी कल्पिलं होतं? ‘एकदा पिऊन तरी पाहा..’ ही टॅगलाइन असणारा चहा आपण घरापेक्षा बाहेर पिऊ, त्यातही वैविध्य निर्माण होईल आणि आपण ते स्वीकारल्यामुळे अनेकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील, हे तरी आपल्याला कुठे जाणवलं असेल? नवरा आणि मुलं शाळेत गेल्यावर केक करण्याचं आपलं कौशल्य व्यावसायिक स्तरावर वाढविणारी आई पाहिल्यावर ‘आई कुठे काय करते?’ म्हणणाऱ्यांनी मूग गिळावेत, हेच श्रेयस्कर. आजच्या गृहउद्योगाचे उद्याच्या विस्तारीत कॉपरेरेट क्षेत्रात पर्यवसान होतानाही ‘लिज्जत’ने आपल्याला शिकवलं आहे. हे सारं आपल्याला जमायचं असेल तर सर्वप्रथम स्वत:चा शोध, सत्याचा स्वीकार आणि प्रामाणिक प्रयत्न या त्रिसूत्रींचा अंगीकार करावयास हवा. ‘सारं सारं संपलं आहे’ याचेच कर्कश्श पडघम जेव्हा समाज वाजवीत असतो तेव्हा मनाच्या खिडकीतून एक प्रामाणिक प्रयत्नांची झुळूक येते आणि कानांना सुखावते. झुळूक येण्यासाठी खिडकी उघडण्याची तसदी मात्र आपण घ्यायला हवी.

‘शिक्षणाच्या आयचा घो’ या माझ्या आवडत्या सिनेमात एक शॉट आहे. मुलाच्या औषधोपचाराची गरज पूर्ण करण्यासाठी चाळीत राहणारा भरत सकाळी लवकर उठून गाडय़ा पुसण्याचं काम  घेतो. ओळखीचे लोक पाहतील म्हणून क्षणभर गाडीआड दडतो. भरतने आपल्या चष्म्याआडच्या डोळ्यांमधून, नखे कुरतडण्याच्या हावभावातून हा शॉट जिवंत केलाय. dignity of labour आणि psuedo-self-dignity  यांचं जेव्हा द्वंद्व होतं तेव्हा भुकेलं पोट आजवर न केलेली हलकी कामंही प्रसंगी कमी किमतीत करायला भाग पाडतं. माझ्या ओळखीच्या अनेकांना गेल्या वर्षांत करोनाने नवे पर्याय धुंडाळायला ‘मजबूर’ केलं आहे. मी इथे ‘लाचार’ हा शब्द मुद्दाम टाळतो आहे. कारण माझ्या मते, नव्या वाटा शोधणं ही आज समाजातली अपरिहार्यता आहे; त्याला असहायतेची किनार मी जोडू इच्छित नाही. बेस्ट हेल्प इज सेल्फ-हेल्प.

तेव्हा यापुढे आपण परिश्रमांना सन्मान द्यायला शिकलं पाहिजे. आपल्या संस्कृतीत बारा बलुतेदारांना मान होता तो उगीच नाही. युरॉलॉजिस्टच्या घरातला गळका नळ दुरुस्त करायला लागणारा प्लंबर हा डॉक्टरपेक्षा महत्त्वाचा वाटतो तो उगाच नाही. उच्च शिक्षणापेक्षा कुशल कारागिरी महत्त्वाची आहे. स्किल्स युनिव्हर्सिटीज् नुसत्या उभारून भागणार नाही. तो शिक्षणाचा नवा धंदा होईल. पण त्या कौशल्यपूर्ण परिश्रमांना मान्यता, मानधन आणि सन्मान देण्याचा संदेश हा करोनाचा काळ देतो आहे हे जाणलं पाहिजे.

समझे? जनाब-ए-आली!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2021 1:03 am

Web Title: dr sanjay oak articles about corona impact on the life zws 70
Next Stories
1 थांग वर्तनाचा! : सामाजिक भांडवल
2 चवीचवीने.. : जमवा आवजो..  (भाग १)    
3 ‘युरो’ फुटबॉलची लाइफलाईन
Just Now!
X