News Flash

आगामी : फिन्द्री

उबदार गुलाबी दुपटय़ातून डोकावणाऱ्या त्या हासऱ्या गोंडस मुलीशी या नऊ महिन्यांत तिची मैत्रीच झाली होती.

(संग्रहित छायाचित्र)

पणजी, आजी, आई आणि मुलगी अशा प्रत्येक पिढीतील स्त्रीच्या वाटय़ाला आलेल्या नकुशीपणाच्या वाटा उलगडून दाखवणारी डॉ. सुनीता बोर्डे यांची ‘फिन्द्री’ ही कादंबरी ‘मनोविकास प्रकाशना’तर्फे प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने या कादंबरीचा संपादित अंश..

नऊ महिने नऊ दिवस, ‘बाई’ची ‘आई’ होण्याच्या संक्रमणाचा सर्वागसुंदर काळ! वाढत्या पोटागणिक वाढणाऱ्या उत्सुकतेचा अन् वाढणाऱ्या मायेचा काळ. प्रत्येक क्षण आपणच आपल्यात गुंतत जात आपल्याच उदरातील आपल्याच अंकुराशी एकरूप होण्याचा काळ! कालच नववा महिना संपला, नऊ महिने काढले; पण आता शेवटचे नऊ दिवस काढणं किती कठीण झालंय, नाही? एक एक क्षण बाळाच्या प्रतीक्षेत जणू युगासारखा वाटतोय. संगीताने आसपास नजर फिरवली. दवाखान्याचं ते वेटिंग रूम म्हणजे सर्जनाचा हिरवा मेळाच! सर्जन हाच सगळ्यांमध्ये ओळखीचा एक समान धागा! स्त्रीचं सर्जनाच्या हिरवळीशी असलेलं नातं आदिम आहे. आदिम काळापासून एकमेकांत गुंफत चालत आलेल्या निसर्गातील नवनिर्मितीच्या या शृंखलेचा आपणही एक अंश आहोत याचं अतीव समाधान तिच्या मनात तरळून गेलं. दिवसभर काम करून शेतातच बाळंत होणाऱ्या, दगडानं बाळाची नाळ तोडून पटकुरात गुंडाळून बाळ घरी घेऊन येणाऱ्या बाळाची पाचवी होत नाही तोच पुन्हा कामाला जुंपल्या जाणाऱ्या किती तरी स्त्रियांची नाळ आहेच ना जोडलेली नवनिर्मितीशी? किती तरी जणींनी सोसल्या असतील मातृत्वाच्या कळा, तेव्हा कुठे जुळल्या असतील काळाच्या कडय़ा एकमेकांत घट्ट! खरं तर मातृत्वाच्या कळा कळल्याशिवाय आई होण्यात काय अर्थ? नैसर्गिक प्रसूती हा स्त्रीचा जन्मसिद्ध हक्कच ना? पण मायकळेच्या किंकाळीनंतर मिळणाऱ्या मुक्ततेच्या श्वासालाही हल्ली काळानं भुलीचं इंजेक्शन तर दिलं नसेल ना? संगीताच्या मनात विचार आला. सरावानं तिची नजर समोरच्या भिंतीवरच्या पोस्टरकडं गेली. उबदार गुलाबी दुपटय़ातून डोकावणाऱ्या त्या हासऱ्या गोंडस मुलीशी या नऊ महिन्यांत तिची मैत्रीच झाली होती. पलीकडंच एक पोस्टर लावलेलं होतं- ‘येथे गर्भलिंग तपासणी केली जात नाही. मुलगी वाचवा! देश वाचवा!’

नकळत संगीताचा हात पुन्हा कुशीवर विसावला. बाळाची मंद हालचाल तळहाताला जाणवताच मनभर लपेटलेली क्षणापूर्वीची अस्वस्थता चिमणी उडून जावी तशी भुर्रदिशी उडून गेली! ‘खरंच, जे हजारो वर्षांपूर्वी बुद्धांनी सांगितलं ते आजही माणसाला का कळत नसेल बरं?’ ती मनाशीच म्हणाली.

‘‘काय सांगितलं होतं गं आई बुद्धानं? मला पण सांग ना!’’ तळहाताला हलकेच स्पर्श करत गर्भातलं पिल्लू विचारत होतं!

‘‘पिल्लू, ती एक गोष्ट आहे!’’ संगीता म्हणाली.

‘‘सांग ना गं आई मग मला, तू रोज जशा गोष्टी सांगते तशी हीपण गोष्ट सांग ना!’’ पिल्लू म्हणालं.

‘‘ऐक हं! प्राचीन काळी कौशल नावाचे एक महाजनपद होते. त्याचा एक राजा होता. त्या राजाचं नाव होतं प्रसेनजित! एकदा काय झालं, तथागत भगवान बुद्ध कौशल नगरीत गेले. राजानं त्यांचं आनंदानं स्वागत केलं. भोजनानंतर राजा भगवान बुद्धांशी धम्मावर चर्चा करत बसला. तेवढय़ात महालातून एक दूत आला. त्याने राजाला सांगितलं, की महाराणीने एका कन्येला जन्म दिलाय. हे ऐकून राजाला खूप दु:ख झालं. राजा मनात दु:खी झाला आहे हे भगवान बुद्धांनी त्याच्या चेहऱ्यावरून लगेच ओळखलं. ते राजाला म्हणाले, ‘‘हे राजा, तू कन्येच्या जन्माने दु:खी होऊ नकोस. स्त्रिया खरोखरच पुरुषांपेक्षाही सरस असतात. या जगात स्त्रिया बुद्धिमान, चारित्र्यवान, गुणवान असतात. कन्या या नेहमीच पुत्रापेक्षा चांगली संतती सिद्ध होतात. या कन्येच्या जन्माचे स्वागत कर, तिचे योग्य पालनपोषण कर!’ राजाला बुद्धांचं बोलणं ऐकून गहिवरून आलं, त्याने आनंदानं आपल्या कन्येचा स्वीकार केला.’’ संगीता म्हणाली.

‘‘असंहेऽ का? बरं झालं. मग बुद्धाच्या उपदेशाप्रमाणे आता सगळेच आपल्या मुलीचा आनंदानं स्वीकार करत असतील, हो ना?’’ पिल्लू म्हणालं.

‘‘नाही गं, पिल्लू! असं झालं असतं, तर कशाला दवाखान्यात ‘मुलगी वाचवा! देश वाचवा’ अशा पाटय़ा लावाव्या लागल्या असत्या? पण ते काहीही असो, तू मात्र मुलगी म्हणूनच जन्माला यायचंस हं, मला मुलगीच हवी आहे.’’ संगीता मुलगी या शब्दावर जोर देऊन म्हणाली.

‘‘आई, तू दररोज मला हेच का सांगत असतेस गं?’’

‘‘काय?’’

‘‘मुलगी म्हणूनच जन्माला ये! मुलगी म्हणूनच जन्माला ये!’’

‘‘तू आधी मुलगी म्हणून जन्माला ये तर खरं! मग तुला सांगेन मला मुलगीच का हवी? आता सांगून काय उपयोग? तुला काहीच नाही समजणार!’’

‘‘तू सांगून तर बघ ना, मला सगळं समजतं! तू सांगितलेल्या सगळ्या गोष्टी माहितेयेत मला! सांग ना गं आई!’’

‘‘माझ्या पिल्ला! मला पुन्हा एकदा मुलगी होऊन जगायचंय गं! लहानपणी आई वजरीनं अंग घासून मळाच्या काळ्या वळकुटय़ा काढायची, तशा जन्मापासून माझ्या अस्तित्वाला चिकटलेल्या या ‘फिन्द्री’पणाच्या वळकुटय़ा घासून काढय़ाच्यात! हो बाळा, मला मुलगीच हवीय कारण मला फेकायचंय हे ‘फिन्द्री’पण!’’ संगीताचा आवाज घोगरा झाला.

‘‘फिन्द्री? फिन्द्री म्हणजे काय गं आई?’’

‘‘बाळा, फिन्द्री म्हणजे.. फिन्द्री असते!’’

‘‘सांग ना गं, आई! फिन्द्री कशी असते? सांग ना आज फिन्द्रीची गोष्ट!’’

‘‘हो हो.. सांगते! किती तुझी गडबड? पण माझ्या दोन अटी आहेत.’’

‘‘कोणत्या?’’

‘‘पहिली अट- तू माझ्यापोटी मुलगी म्हणूनच जन्माला यायचंस!’’

‘‘दुसरी अट?’’

‘‘दुसरी अट- फिन्द्रीची ही गोष्ट संपेपर्यंत हुं.. हुं.. हुं.. म्हणून होकाऱ्या द्यायच्या, झोपायचं नाही! कबूल? खिरणाई मला गोष्ट  सांगायची, तेव्हा मीही अशाच होकाऱ्या द्यायचे बरं का!’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2021 12:33 am

Web Title: dr sunita borde findri novel abn 97
Next Stories
1 मोकळे आकाश.. : ‘आबू, माश्क!’
2 थांग वर्तनाचा! : ‘आपण-ते’ सत्य की आभास
3 चवीचवीने.. : बाबांच्या हातचं!
Just Now!
X