दोन महिन्यांच्या माझ्या अथक उपदेशानंतर संदीप सोळा लिटरवरून पाच लिटरवर आला. मग एकदा माझ्यासमोर बसून त्यानं निकरानं सांगितलं, ‘आता यापेक्षा मी कमी नाही येऊ शकत. पण तुम्ही पाण्याचा अन् सर्दीचा संबंध का लावलाय?’ त्यानं न राहवून विचारलं.
‘मी नाही, शास्त्रानंच लावलाय.’
‘क’ म्हणजे जल किंवा पाणी. या जलापासून जो निर्माण होतो तो कफ. पाणी किती प्यावं, याप्रमाणेच पाणी कधी प्यावं, याचेही नियम आहेत. सकाळी सूर्योदयानंतर, जेवणानंतर लगेच, रात्री झोपण्यापूर्वी- या पाणी पिण्याच्या अयोग्य वेळा आहेत. नेमक्या याचवेळी आपल्याला पाणी प्यायला वेळ मिळतो. हे चुकीच्या वेळी प्यायलेलं पाणी चुकीच्याच वळणाला जातं. पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती, याबाबतीतही बरेच गैरसमज आहेत.
भिडे म्हणून आमचं एक वैद्य दाम्पत्य आहे. पती-पत्नी दोघंही आमचे मित्र आणि आयुर्वेदाचे साधक! त्यांचा मुलगा सुश्रुत बोलायला शिकत असतानाच शुभंकरोति, भीमरूपी, वदनी कवळ घेता.. अशा श्लोकांबरोबर भिडय़ांनी त्याला आयुर्वेदातले काही श्लोकही शिकवले. सुश्रुत मेधावी बालक! ते श्लोक आणि त्यांचे अर्थ तो घडाघडा म्हणायचा. त्याच्या बोबडय़ा बोलात ते ऐकून छान वाटायचं! तर हे सुश्रुताचार्य मोठय़ा शिशूत गेल्यानंतरची गोष्ट! मोठय़ा शिशूत डबा सुरू झाला. ‘पोळीभाजी’चाच डबा असावा हा शाळेचा नियम होता. दुपारी मुलं डबे खायला बसली की मुलांच्या टीचर, त्यांच्या पाण्याच्या बाटल्या काढून घ्यायच्या. पूर्ण डबा खाऊन झाला कीच त्या बाटल्या मुलांना मिळायच्या. सुश्रुतनं टीचरकडे बाटली मागून बघितली, पण व्यर्थ! तीन-चार दिवस त्यानं वाट पाहिली. पाचव्या दिवशी त्यानं बंड पुकारलं. ‘मला जेवताना पाणी पिण्याची सवय आहे. मला बाटली द्या, नाहीतर मी जेवणारच नाही,’ म्हणून बसला फतकल मारून. टीचरची पंचाईत! कारण बहुतेक शिक्षित आणि जागरूक आप्तांच्या मते, मुलं जेवताना फार पाणी पितात आणि जेवण राहतं बाजूला, त्यांच्या पोटात काहीच जात नाही. म्हणून हा ‘बाटल्या बाजूला ठेवण्याचा’ नियम बनवला होता ना!
‘बॅड हॅबिट! यु आर गुड बॉय नो? गुड बॉइज् ड्रिंक वॉटर आफ्टर टिफीन.’ टीचरनं सुश्रुतला अगम्य असलेल्या भाषेत समजावलं.
‘नाही पण माझे आई-बाबा सांगतात-
अजीर्णे भेषजं वारि जीर्णे वारि बलप्रदम्।
भोजने चामृतं वारि भोजनान्ते विषप्रदम्।।
(बाळ सुश्रुत रॉक्स टीचर शॉक्स!) ‘काय म्हणालास?’ टीचरनी भानावर येऊन विचारलं. आपल्या बोबडय़ा बोलीत छोटय़ा सुश्रुताचार्यानी तो श्लोक पुन्हा ऐकवला.
‘म्हणजे?’ टीचर भांबावल्या. शाळा मीडियम इंग्लिश! इथे मराठीची वानवा. संस्कृत म्हणजे तर परग्रहावरची भाषा वाटते ना!
पण भिडय़ांनी मुलाला चक्रव्यूहातून बाहेर यायलाही शिकवलं होतं. ‘म्हणजे अन्न पचलं नसेल तर थोडं थोडं गरम पाणी प्यावं म्हणजे ते औषधासारखं उपयोगी पडतं. अन्न पचल्यावर तहान लागली की आवश्यक तेवढं पाणी प्यावं. त्यामुळे शक्ती येते. (इथे दंडातली बेटकुळी, पक्षी सिक्स पॅक्सपैकी एक पॅक दाखवला जायचा.) जेवताना थोडं थोडं पाणी प्यायलं की ते अमृतासारखं असतं आणि जेवण झाल्यावर लगेच पाणी प्यायलं तर ते विषासारखं असतं.’ सगळं पाठांतर आचार्यानी गंभीर चेहऱ्यानं टीचरना ऐकवलं. टीचरचे डोळे कौतुकानं पाणावले. दुसऱ्या दिवशी सुश्रुतच्या आईला शाळेत पाचारण करण्यात आलं. तिनं ‘पाण्याचा महिमा’ समजावून सांगितल्यावर सगळ्याच मुलांना जेवताना पाणी प्यायचं स्वातंत्र्य मिळालं.
खरं तर सुश्रुतच्या वयाच्या मुलांवरच आयुर्वेदाचे- आरोग्याला हितकर असे संस्कार व्हायला हवेत. दुर्दैवानं आज आपण त्यांच्यावर केवळ ‘कीटाणूवाद’ थोपवतोय.
पण ‘पाणी कमी प्या. तहान लागेल तेव्हाच आणि तहाने इतकंच पाणी प्या,’ असं सांगितल्यावर लोक अन्य पेयं प्यायला मोकळे. तापात तोंडाला चव नाही म्हणून ‘मिरिंडा पिणारे’, हॉटेलमध्ये पेल्यातलं अस्वच्छ पाणी पिण्यापेक्षा ‘स्टरलाइज्ड कोका-कोला’ पिणारे, बंद कॅनमधला र्निजतुक फळांचा रस पिणारे- हे सगळे स्वत:च्या नकळत त्यांच्या आजारांना (खत) पाणी घालत असतात आणि औषधांच्या कामावर पाणी ओततात. वर परत ‘तुम्ही फक्त पाण्याबद्दलच बोलला होतात,’ असं म्हणायला मोकळे. ‘हे नियम सगळ्याच द्रव पदार्थाना लागू होतात,’ असं सांगायची सवय आता मी लावून घेतली आहे.
‘सुंदर अक्षर हा एक सुरेख दागिना आहे.’ ‘मरावे परी कीर्तिरुपी उरावे’ अशी शाश्वत सत्यानं भरलेली सुभाषितं आमच्या लहानपणी आम्ही ऐकायचो. पण आता आमचे रुग्ण आरोग्यविषयक निरनिराळी ‘शाश्वत’ सुभाषितं बनवतात आणि वैद्यांनाच ऐकवतात. त्यातलं एक गाजलेलं सुभाषित म्हणजे ‘नारळाचं पाणी तब्बेतीला चांगलं असतं’ म्हणजे जणू ते कुणीही, कधीही, कितीही प्यावं-नो प्रॉब्लेम! यच्चयावत रुग्णालयाच्या बाहेर तर या शहाळंवाल्यांचे ठेले इतके चालतात ना? आतल्या रुग्णाला दमा असू दे नाहीतर जलोदर, भेटायला जाणारा प्रत्येक स्नेही शहाळं घेऊन जाणार! ‘जरा नारळपाणी प्या, चांगलं असतं, बरं वाटेल.’ असा एक गोड उपदेशही करणार.
आपल्याच मनानं नियमितपणे नारळपाणी पिणारा एक मोठा वर्ग आपल्याकडे वाढीस लागला आहे. तो म्हणजे ‘गर्भिणी!  मला एकदा रात्री उशिराच्या गाडीनं परगावी जायचं होतं. घरातून बाहेर पडले तर रिक्षा मिळण्यापूर्वी साठेकाकू भेटल्या. या माझ्या जुन्या पेशंट. त्यांच्याबरोबर एक तरुण स्त्री  होती. ‘या नारळपाणी प्यायला’, काकूंनी मला हसून आमंत्रण दिलं. ‘नको. घाईत आहे. गाडी पकडायची आहे.’ मी म्हटलं.
‘ही माझी सून बरं का.’ काकूंनी त्या तरुणीची ओळख करून दिली. काकू माझ्या पेशंट असल्यानं, सुनेचा मलाच नव्हे तर साक्षात आयुर्वेदालाच विरोध (शत्रूचा मित्र तो आपला शत्रू या न्यायानं!) आहे-असं काकू मला नेहमीच सांगायच्या.
‘नमस्कार.’ मी सूनबाईंकडे सस्मित बघत म्हटलं. ‘आता काय, जेवणानंतरची शतपावली का?’
‘हो ना!’ काकू म्हणाल्या. ‘ही आणि अमित रोजच बाहेर पडतात जेवणानंतर. पण काल अमित गेलाय दिल्लीला. म्हणून मग मी येते हिच्याबरोबर. आता नारळपाणी घेऊन परतू घरी. सूनबाईंकडे विशेष आहे ना!’
‘अच्छा, हो का? कितवा महिना?’ मी परत विचारलं.
‘तिसरा. तिची टेस्ट ढ२्र३्र५ी आल्यापासून रोज रात्री नारळपाणी घेतेय ती! चांगलं असतं ना?’ काकूंनी निरागसपणे विचारलं.
‘रोज घेते? ते ही रात्री? जेवणानंतर?’ माझे आश्चर्यमिश्रित प्रश्न बाहेर पडले.
‘हो, का?’ काकू लगेच काळजीत पडल्या. खरं तर मला उशीर होत होता. (पण आम्हा वैद्य मंडळींचं हे असंच असतं. आमच्या डोळ्यासमोर कुणीही स्वत:च्या आरोग्याला इजा करणारी गोष्ट करत असेल, तर आम्हाला ‘फुकटचा सल्ला’ दिल्याशिवाय राहवतच नाही.) तरी मी थांबलेच तिथं.
‘कधीतरी, पंधरा दिवसांतून एकदा, दुपारच्या चहाच्या ऐवजी नारळपाणी पिणं ठीक आहे. पण रोज नको. रात्री जेवणानंतर तर मुळीच नको. तुला सर्दी होऊ शकते. पण त्याहीपेक्षा बाळाला पुढे कफाचे आजार होण्याची शक्यता जास्त असते.’ (पुन्हा तीच चऱ्हाटे, ते वळणे, चालली काथ्याकूट..) साठय़ांच्या सुनेला असा ‘उरफाटा’ सल्ला देणारी मी ‘एकमेवाद्वितीयच’ भेटली असेन. साहजिकच तिनं माझा हा सल्ला ज्या कानानं ऐकला, त्याच कानानं बाहेर सोडून दिला. सध्या तिच्या बाळाला माझ्याकडेच बाळदम्यासाठी औषध चालू आहे. ती तिच्या बाळाला जेव्हा पहिल्यांदा घेऊन आली तेव्हा मी तिला काहीच बोलू शकले नाही, इतकी ती अपराधगंडांनं ग्रासली होती. वाईट याचंच वाटतं की त्या छोटय़ा जिवाला त्रास होतोय!
‘तुम्ही आजाराच्या कारणांचा इतका कशाला काथ्याकूट करता? औषध द्या आणि विषय संपवा ना!’ आमच्या एका उच्चशिक्षित नातेवाईकानं मला हा सल्ला दिला.
‘तुम्ही असं म्हणताय. पण आमचे आचार्य म्हणतात की, आजाराचं कारण शोधून ते दूर केलं की आजाराचा निम्मा उपचार केला असं होतं. तसं नाही केलं तर आजार बराच होत नाही. आणि मी त्यांचंच ऐकायला हवं नाही का?’
‘पण इतर डॉक्टर कुठे तुमच्यासारखं ‘पथ्य’ सांगतात?’  त्यांचा प्रतिप्रश्न.
‘म्हणून तर आजार जुने होतात ना? पाण्याची भरलेली टाकी तुम्हाला रिकामी करायची असेल, तर ती टाकी भरणारा नळ बंद नको का करायला?’
‘सर्वमेव परित्यज्य शरीरमनुपालयेत्’ आजारी पडल्यावर इतर सगळे उद्योग सोडून आधी शरीराची मरम्मत करून घ्यावी. कुठलाही आजार एक वर्षांपेक्षा जुना झाला तर तो बरा व्हायला अवघड होऊन बसतो. शिवाय मग तो एकटा राहत नाही. एक आजार अन्य आजारांना आमंत्रण देत असतो. एका सर्दीतून पुढे सायनसायटिस, नाकाचं हाड वाढणं, नासार्श (ल्ली२ं’ स्र्’८स्र्), दमा, खोकला असे अन्य कष्टसाध्य आजार उद्भवू शकतात.
इति ‘सर्दि’ निमित्तेन ‘पाणी’ आख्यानं सम्पूर्णम्।