News Flash

गायतोंडय़ांची कुटुंबप्रमुख

गोव्याच्या स्वातंत्र्यलढय़ात महत्त्वपूर्ण योगदान असलेले डॉ. पुंडलिक गायतोंडे यांच्या पोर्तुगीज पत्नी एदिला गायतोंडे यांनी लिहिलेली ‘आत्मकथा’ ही अलवार प्रेमकहाणी तर आहेच;

| March 1, 2015 01:55 am

गोव्याच्या स्वातंत्र्यलढय़ात महत्त्वपूर्ण योगदान असलेले
डॉ. पुंडलिक गायतोंडे यांच्या पोर्तुगीज पत्नी एदिला गायतोंडे यांनी लिहिलेली ‘आत्मकथा’ ही अलवार प्रेमकहाणी तर आहेच; शिवाय अविरत संघर्षांचीही ती कथा आहे. राष्ट्रप्रेमाच्या दृष्टीने परस्परविरोधी असणं अपेक्षित असलेल्या या दाम्पत्याचं सहजीवन हा निखळ मानवतेचा समृद्ध अनुभव आहे..
‘‘आयुष्यात प्रथमच मी भारतीय माणूस पाहत होते! त्याच्या काळ्याभोर डोळ्यांत एक विलक्षण चमक होती. त्याची बोटे नाजूक आणि लांब होती. तो अतिशय देखणा होता. त्याच्या व्यक्तिमत्त्वाने मी पूर्णतया भारावून गेले.. आणि अशा तऱ्हेनं एका विलक्षण दैवयोगाने डॉ. पुंडलिक गायतोंडे- माझे ‘लिका’ माझ्या आयुष्यात प्रवेश करते झाले!’’
..एदिला गायतोंडे यांच्या ‘आत्मकथा’ या पुस्तकामधला हा परिच्छेद वाचतो आहे आणि मग जाणवतंय, की हे तर विशुद्ध ‘इन्फॅचुएशन’- सध्याच्या पिढीच्या भाषेत ‘क्रश’! पण सध्याच्या पिढीला ‘क्रशेस’चंही काही वाटत नाही. तसं १९४३ साली अगदी युरोपमधेही नसणार.. नव्हतंच. प्रथमदर्शनी प्रेमाचं पूर्णत्व विवाहामध्ये बघण्याचा तो काळ! आणि या गोव्याच्या भारतीय तरुण डॉक्टरशी विवाह करू बघणारी, प्रेमात खुळावलेली ती एदिला नावाची पोर्तुगीज तरुणी! ते दोघं लिस्बनमध्ये भेटले खरे; पण लिस्बन हे त्या दोघांचंही गाव नव्हतं. ती होती आझोरीश या पोर्तुगीज बेटावरची कन्या. ही बेटं पोर्तुगालपासून हजार मैलाहून जास्त अंतरावर विसावलेली आहेत. अटलांटिक समुद्राच्या त्या मोकळ्या हवेवर वाढलेली, संगीताची आतून विलक्षण आवड असलेली ती वधू.. आणि गोव्याच्या भूमीतला, सारस्वत ब्राह्मण असलेला तो उमदा, देखणा, पोर्तुगीज भाषा सफाईनं बोलू शकणारा डॉक्टर वर. त्या लग्नानं आपलं उभं आयुष्यच बदलणार आहे; निर्वासिताचं जगणं प्रत्यही आपल्या वाटय़ाला येणार आहे, हे एदिलाला तेव्हा कळलं असेल?  पुढे मडगाव, म्हापसा, ठाणे, मुंबई, नवी दिल्ली, लिस्बन आणि अखेर लंडन अशा नाना शहरांमध्ये आपला मुक्काम कधी सुखात, कधी चिंतेत, कधी स्थैर्यात, कधी स्मरणरंजनात जाणार आहे याची कल्पना तिला खचितच नसणार. पण जेव्हा मधुचंद्रासाठी तिच्या नवऱ्यानं गोवामुक्ती संग्रामामधील त्याचे कैदेत असलेले मित्र ज्या पेनिशच्या तुरुंगात होते ते ठिकाण निवडलं, तेव्हा तिला- बाईला आतून नवरा स्वच्छ कळतो तसा तिचा ‘लिका’ कळला असावा. पुरती कळली असली पाहिजे तिला नवऱ्याची गोव्याच्या स्वातंत्र्याची ओढ.. सुस्थिर आयुष्य स्वातंत्र्यसंग्रामात लोटून द्यायला तयारच नव्हे, तर अधीर असलेली त्याची योद्धय़ाला साजेशी ऊर्मी! पण तिलाही एक मोठं युद्ध लढायचं होतं- अगदी वेगळ्या स्तरावरचं- याची चाहूल मात्र भारतात पोचल्याखेरीज तिला आली नसावी. इकडे भारतात पुंडलिकाच्या निर्णयानं अनेक वादळं उठली होती. कुटुंबीयांना वाळीत टाकलं जाण्याची शक्यताही ग्रामीण गोव्यात असंभव नव्हती. खेरीज तत्कालीन संदर्भात (खरं तर आजही लागू होणाऱ्या संदर्भात) आपल्या जाती-धर्मामधली मुलगी मुलाने शोधली नसल्याचं दु:खही असणारच. पण पुंडलिकाची आई म्हणाली, ‘लग्न केले तेव्हाच ती आपली झाली. बस्स! आता ती आपली म्हणूनच राहणार.. या घरात येणार!’ मग नव्या वधूला साडी नेसवली गेली. ‘शकुंतला’ असं एदिलाचं नवं नामाभिधान झालं. डॉ. पुंडलिक मात्र या कशातच नसावेत. एकीकडे त्यांना अर्थार्जनाची निकड होती, तर दुसरीकडे सालाझारच्या जुलमी राजवटीला शह देण्याची इच्छा! म्हणून मग सरकारी दवाखान्यातली नोकरी न स्वीकारता त्यांनी खासगी वैद्यकीय व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला. ते जमलं नाही म्हणून त्यांनी वर्षभरातच पुन्हा पोर्तुगालला परतायचा निर्णय घेतला. बोटीत बसण्याआधी थोडय़ाच अवधीपूर्वी त्यांना म्हापशाच्या मोठय़ा खासगी हॉस्पिटलची ‘ऑफर’ आली. मग त्यांनी म्हापशातच मुक्काम टाकला. पुंडलिक गायतोडय़ांचं नाव गोवाभर होत होतं. खुद्द पोर्तुगाल गव्हर्नर आणि त्याचे कुटुंबीय त्यांचे रुग्ण होते. पण त्याचवेळी गोव्यात गुप्त भूमिगत चळवळीलाही प्रारंभ झालेला होता. त्यांचा सख्खा भाऊ नंदा हा भूमिगत चळवळीमध्ये कार्यरत होता. सारं गोवा काहीतरी ठिणगी पडण्याच्या प्रतीक्षेत होतं. आणि तशी ती पडलीच. डॉ. पुंडलिकांनी ती पाडली! एका उच्चभ्रू समारंभामध्ये गोव्यामधली सगळी बडी सरकारी धेंडं असताना बॅ. कुलासो या सालाझारधार्जिण्या माणसानं म्हटलं, ‘‘इथेसुद्धा (गोव्यामध्येसुद्धा) पोर्तुगाल आहे!’’ (Aqui tambe’m e’ Portugal) एदिलाच्या ‘लिकांनी’ – गायतोडय़ांनी थंड आवाजात स्वच्छ शब्दात म्हटलं, ‘‘I Protest.’’  म्हटलं तर ते दोन शब्द होते; पण त्यानं गोव्याचा इतिहासच बदलला. एकतर ते शब्द राजमहालात राजासमोर राजाला दूषणं द्यावीत या प्रकारात मोडणारे होते. दुसरं म्हणजे हे म्हणणारी व्यक्ती ऐरीगैरी नसून गोव्यात आणि पोर्तुगालमध्येही आपलं नाव राखून असणारी होती. तिसरं म्हणजे- ब्रिटिशांची तुलनेत कायद्यानं चालणारी (किंवा तसा आभास निर्माण करणारी) ती राजवट नव्हती. सालाझार हा हुकूमशहा होता. गोव्यातली अशांतता ओळखून त्यानं थेट मोझांबिकमधील नीग्रो सैनिकांची पलटण गोव्यात उभी केली होती. असा माणूस आणि त्याची राजवट डॉ. गायतोंडे यांचे शब्द विसरून जाण्याची शक्यता नव्हतीच. लगोलग दोनेक दिवसांत डॉ. पुंडलिक गायतोंडे यांना अटक केली गेली. एदिलाला सर्वस्वच नाहीसं झाल्यासारखं वाटलं. डॉ. गायतोंडे पोर्तुगालच्या तुरुंगात पुष्कळ वर्षे होते. त्यांचा भाऊ नंदा ऊर्फ शिवानंद गायतोंडे यांनाही गोव्यात अटक झाली आणि दहा वर्षांची कैद सुनावली गेली. गोव्यातलं वातावरण तापलं. आंतरराष्ट्रीय राजकारणही तापलं. डॉ. गायतोंडे यांनी पुढे ते तापवतच नेलं. अटकेतून सुटका झाल्यावर ते मुंबईमार्गे दिल्लीला गेले. गोवामुक्तीसाठी ते पं. नेहरूंच्या हात धुऊन पाठी लागले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जगभर जाऊन गोव्याच्या जनतेची कैफियत त्यांनी मांडली. अखेरीस गोवा स्वतंत्र झाला. अनेकांचा हातभार त्यामागे होता. पण त्यात ‘डिप्लोमसी’ची खिंड बव्हंशी डॉक्टरांनीच लढवलेली दिसते. राज्यसभेचे ते खासदार म्हणून कार्यरत होते. पण गोव्यातली निवडणूक ते हरले आणि मग त्यांनी लंडनला जाऊन कॅन्सर संशोधनात स्वत:ला बुडवून घेतलं. गोव्याच्या भूमीच्या भूगोल-इतिहासावरची उत्तम पुस्तकं लिहिली.
आणि एदिला..? ती या साऱ्या लोकविलक्षण प्रवासात केवढी झोंबली गेली असेल हे न सांगताही समजू शकतं. तिच्या कथनात तिने पुरेसा गोड सूर (आदर्श भारतीय सुनेला साजेसा) लावला आहे. पण एखाद्या ठिकाणी खपली उघडी पडते आणि सुजाण वाचकाला ती जखम नीटच दिसते. तिच्या पुस्तकाचा अनुवाद प्रफुल्ल गायतोंडे यांनी केला आहे. तो अत्यंत उत्तम आणि प्रामाणिक आहे. अनुवादिका लेखिकेची धाकटी जाऊ असली तरी अनुवादामध्ये कुठेही घरगुतीपण नाही. मात्र, प्रस्तावनेत एके ठिकाणी प्रफुल्ल गायतोंडे म्हणतात, ‘त्यामुळे शकुंतलेला (एदिलाला) भारतीय सासुरवास ही काय चीज असते, हे कदाचित आजतागायत कळले नसेल.’ या दोघींच्या सासूबाई या मनानं मोठय़ा असल्याचा संदर्भ त्यामागे आहे. पण सासुरवास हा काय फक्त सासू थोडीच करते? घरचे, दारचे, परिस्थिती, समाज हे सारेच एखाद्या मुलीच्या सासुरवासाला कारणीभूत ठरू शकतात. साधी वाक्यं आहेत एदिलाची- त्यावरूनही अंदाज बांधता येतो. ‘‘सर्वानुमते ठरलं- मी आता युरोपियन पोशाख सोडून द्यावा व भारतीय साडी नेसावी. मी यापूर्वी कधीही साडी नेसले नव्हते, तरीही मला अवघडल्यासारखं वगैरे मुळीच वाटलं नाही!’’ यातलं ‘सर्वानुमते ठरलं’ हा शब्दप्रयोग रोचक आहे. त्या सर्वानुमतामध्ये एदिलाचं मत आहे की नाही, हे ठाऊक नाही. त्यापुढचं विधान तर अजूनच झकास आहे. अगदी आज कॉलेजात ‘सारी डे’च्या निमित्तानं एखादी युवती आईची साडी नेसते तेव्हा तिलाही सुंदर दिसण्याबरोबरच अवघडल्यासारखं वाटतं. दोन ढांगा टाकत जीन्समध्ये चालणाऱ्या त्या युवतीला साडी एखाद्या दिवसापुरतीच आवडते. मग एदिलाला काहीच अवघडल्यासारखं का बरं वाटलं नसावं? अगदी मजेत सांगायचं तर एक कारण असं असावं, की ती तिच्या नव्या, ताज्या प्रेमाच्या स्पर्शानं पुरती हरखून गेलेली असावी. पण खोलवर बघता ती स्थलांतरित माणसाची जी नव्या भूमीत रुजण्याची संघर्षकहाणी असते, तीच असणार. शोभा चित्रे यांनी त्यांच्या एका लेखात अमेरिकेत नोकरी करू लागल्यावर क्रमश: बांगडय़ा, कुंकू, साडी, चपला कशा अंगावरून अंतर्धान पावून त्या जागी अमेरिकी पोशाख आला याचं खुमासदार वर्णन केलं आहे. इथे एदिलाच्या बाबतीत गंगा उलटी वाहत होती. आणि साडीमुळे ती भारतीय झाली असंही नाही. भारतीय- खरं तर गोव्यात ती देशी माणसांना परकी वाटली असणार आणि तिथल्या पोर्तुगीज मंडळींना तिची साडी काही रुचली नसणार. नव्हे, रुचली नाहीच. एका पोर्तुगीज स्नेह्य़ांच्या भेटीला ती साडीत गेल्यावर ते स्नेही तिला नंतर कधीच भेटत नाहीत. मागाहून तिला कळतं, ‘मी (एदिला) साडी नेसून पोट दाखवीत त्यांना भेटायला गेले याबद्दल त्यांना मनस्वी खेद झाला. एका ख्रिश्चन स्त्रीकडून इतका विनयभंग..?’ धर्मागणिक स्त्रीच्या विनयभंगाची व्याख्या बदलताना आजही आपण बघतो. तेव्हा तर गोव्यातल्या ख्रिश्चन आणि हिंदू समाजामध्ये ती पुरती निराळी होती.
दोन धर्मामध्ये वास्तव्य करतानाचे ताणेबाणे एदिलाच्या लिखाणात पुष्कळदा आले आहेत. ती समतोल नजरेने दोन्ही बाजूंकडे बघताना दिसते. तिच्या दोन नणंदा लहान वयाच्या असतात आणि तिच्याकडे त्यांचा मुक्काम असतो. त्यांचे केस ती कापते आणि बॉल डान्सला नेते. मागाहून त्या जुन्या संस्कारी घरात खूप वादळ होतं. ती दुसरी बाजूही समजू शकते. एदिलानं लिहिलं आहे- ‘ही भयंकर लाजिरवाणी बातमी पाळोळ्यापर्यंत (सासरी) पोचली अन् त्याचक्षणी बाबा म्हापशाला येऊन दाखल झाले. पुढचं संभाषण विसरून जाणंच योग्य! मी त्यांच्या मुलींचं आयुष्य बरबाद केलं होतं. पुरुषांना अगदी चव्हाटय़ावर मिठी मारणाऱ्या त्या मुलींशी कुठलाच मुलगा कधीही लग्न करायला तयार होणार नव्हता. (त्या बॉल डान्समध्ये नाचल्यामुळे!) आणि सगळ्यात कहर म्हणजे ऊर्मिलाचे कापलेले केस! त्याकडे बघून सारे म्हणत होते, ‘कोण लग्न करील हिच्याशी? कुणीसुद्धा नाही.’ एदिलानं जुन्या, संथ काळात रमलेल्या हिंदू वळणाची सौम्य चेष्टा केलेली असली तरी याचा अर्थ ती ख्रिश्चन संस्कार आंधळेपणानं स्वीकारणारी नाही. सेंट झेवियरचं शव बघण्यासंदर्भात तिने धर्मातरीत होण्यासाठीच्या छळछावण्याही (‘इन्किवझी’) झेवियरनं चालवल्या असल्याचं नमूद केलं आहे. सुरुवातीला हिंदू बारशांमध्ये, सणांमध्ये रमणारी एदिला तिच्या गोवा मुक्कामामध्ये नंतर मात्र ख्रिश्चन संगतीमध्ये जास्त राहू लागल्याचं दिसतं. तिची संगीताची ऊर्मी हे त्यामागचं कारण असावं. पाश्चात्य संगीताचं प्रशिक्षण द्यायला तिनं क्लास उघडले. ज्या गावात जाईल तिथे पियानोची जुळवाजुळव करून स्वत:चंही शिक्षण व सराव तिनं चालू ठेवला. पण हिंदू विद्यार्थी कुणी पाश्चात्य संगीत ऐकायला वा शिकायला तिच्याकडे येणार नव्हतेच. पुढे पुढे तर राजकीय चळवळीमुळे ख्रिश्चन मंडळीही तिच्याशी संपर्क ठेवेनाशी झाली. स्थलांतरीत व्यक्तीचं एकटेपण एदिलानं अनुभवलं. पुढे दिल्ली मुक्कामातही तशी ती एकटीच राहिलेली दिसते. भारतीय पुरुषांशी लग्न केलेल्या परदेशी स्त्रियांचे दिल्लीमध्ये क्लब होते. तिथे ती सामील झाली खरी; पण तिथल्या कुचाळक्यांमध्ये तिचं मन रमलं नाही. गोवा मुक्त झाला तेव्हा ती लंडनमध्ये राहत होती. पोर्तुगालला परतीचा रस्ता तिच्यापुरता बंदच झाला होता. तिथे जास्त काळ राहती तर तिला अटकच झाली असती. पुंडलिक तर जगभर राजकारण साधत फिरत होते. एदिलाचं पुस्तक संपतं ते आशावादी, उत्साही, आनंदी टप्प्यावर. गोवा स्वतंत्र झाल्याची तार मिळताक्षणी ती लंडनहून परतते. गोव्याच्या सभेत ‘लिका’ बोलत असताना ती गर्दीत मागे भरल्या डोळ्यांनिशी उभी असते.
मी पुस्तक वाचून खाली ठेवलं आणि अनेक प्रश्न पडले. पहिला : गायतोंडे मंडळी गोवामुक्तीनंतरही गोव्यात का राहिली नाहीत? पण हा प्रश्न खवचटपणे पडला नव्हता. त्याचं काहीतरी खोल कारण असणारच असं वाटत राहिलं. दुसरा : एदिलाचं पुढचं आयुष्य कसं गेलं असेल?
कुणाला गाठावं? एदिलाबाई तर बहुतेक एव्हाना निर्वतल्या असणार. पण तरी सहज म्हणून फेसबुकवर नाव टाकलं- ‘एदिला गायतोंडे.’ आणि अहो आश्चर्यम्! एक सुंदर वृद्ध फोटो डोळ्यासमोर आला. २०१३ मध्ये टाकलेला तो देखण्या वृद्ध एदिलाचा फोटो बघताना वाटलं, ही तारुण्यात केवढी सुंदर दिसत असणार! तिचं हे सौंदर्य तिच्या पुस्तकात दिसत नाही. ती फेमिनिस्ट असावी. सौंदर्यापेक्षा कार्याला, बुद्धीला महत्त्व देणारी. तिला मूलबाळ नव्हतं. त्याबाबत तिनं जे पुस्तकात लिहिलं आहे ते महत्त्वाचं आहे. संक्रातीच्या हळदी-कुंकवाला एदिला जाते तेव्हा तिचा अनुभव ती असा मांडते : ‘‘अशा (घरगुती) संभाषणात भाग घ्यायला स्वत:चं मूलबाळ नसल्याने मी आपली श्रोत्याची भूमिका घेतली होती. ‘अरेरे, बिचारीचं केवढं दुर्दैव!’ कुणीतरी म्हटलंच. ‘केवढं सुदैव!’ मी मनात म्हटलं. कारण उघडपणे असं म्हणणं म्हणजे..’’ एदिलाचं ‘केवढं सुदैव!’ हे विधान आणि त्या परिच्छेदाच्या अखेरीस आलेली टिंबंही केवढी बोलतात! अशी ही एदिला फेसबुकवर आहे.  तिला मी रिक्वेस्टही टाकली आहे. पण ती बोलणार आहे का? काळाच्या दोन टोकावर उभे असलेले आम्ही दोघे.. एदिला आता नव्वदीपार असणार, मी तरुण आहे. एदिलाचं समृद्ध जगणं आठवणी साठवत असणार. माझं आता कुठे जगणं सुरू झालं आहे. पण हे पुस्तक वाचल्यापासून का कुणास ठाऊक, मला एदिलाची भूल पडली आहे.  पण एदिलाचा अकांऊट आठवडा झाला तरी तसाच आहे; अ‍ॅक्टिव्ह दिसत नाही. मग मी फोटोखालच्या कॉमेंट्स तपासल्या. त्यात मला नाव दिसलं शीला जयवंत यांचं! ‘मामी, तू छान दिसते आहेस’ असं त्यांनी लिहिलं होतं. मग त्यांना संपर्क करणं आलंच! त्या गोव्यात असतात, लेखिका-भाषांतरकार आहेत, हे गूगलवर कळलं. शीला जयवंतांनी माझ्या विनंतीला तत्परतेने प्रतिसाद दिला. एदिलाचा पक्का ठावठिकाणा, संपर्क त्यांच्याकडेही नव्हता. पण त्यांच्याकडून मला अनुवादिका असलेल्या प्रफुल्ल गायतोंडे आणि त्यांचे पती शिवानंद गायतोंडे यांचा पत्ता लागला. यथावकाश पुण्यात वास्तव्य करणाऱ्या प्रफुल्ल आणि ‘नंदा’ (शिवानंद) यांची माझी भेट झाली. प्रभात रस्त्यावरच्या त्यांच्या अभिजात नजरेनं नटलेल्या घरात बसलं की आधी काही वेगळं वाटत नाही. प्रभात रस्त्यावरची बव्हंशी घरं तशीच सुंदर असतात. पण तुमच्यासमोर बसलेला माणूस हा अग्वाद किल्ल्यात अनेक वर्षे कैदेत होता हे आठवलं की सारी नजरच बदलते. त्या सुखवस्तू घरामधलं गायतोंडे-रक्तामध्ये असणारं सुप्त बंडखोरीचं वारं मग तुम्हाला जाणवतं. फार छान बोलले दोघे. अजिबात आत्मस्तुती नाही. फापटपसारा नाही. सख्ख्या नात्यामध्येही कमी-जास्त असतंच; पण त्यात अडकल्याचं कसलंही चिन्ह नाही. माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर लगेचच मिळालं. निवडणूक हरल्याचा धक्का पुंडलिक गायतोंडे यांना असह्य़ झाला असावा असं नंदांचं- त्यांच्या सख्ख्या बंधूचं मत झालं. आणि खरंच, का असह्य़ होऊ नये? या माणसानं आपली उमेदीची वर्षे गोव्यासाठी व्यतीत केली होती. त्याच मातीतली हार त्यांना सहन झाली नसावी. दुसऱ्या प्रश्नाकडेही ते दोघे वळले आणि अत्यंत वेगळी माहिती कळली. ‘एदिलानं लंडनमध्ये संगीतशिक्षिका म्हणून खूप नाव कमावलं. ते अधेमधे गोव्याला येत असत. विशेषत: १७ फेब्रुवारीला गायतोंडे दिन साजरा करायला प्रफुल्ल-नंदा आणि पुंडलिक-एदिला ही जोडपी लंडनमध्येच वास्तव्य करत असल्याने तिथे त्यांचा उत्तम संपर्क होता. १७ फेब्रुवारीला गायतोंडे परिवार गोव्यात यायचा, मुक्तीसंग्रामातल्या सैनिकांना निमंत्रित करायचा, नातेवाईकांच्या भेटी व्हायच्या.’ या दिनाबाबत नंदांचं म्हणणं : ‘हा दिवस डॉ. गायतोंडे यांच्या केवळ स्मरणाचा नाही, सत्याग्रहींच्या आठवणीचा हा दिवस आहे. एदिला लंडनमध्ये असली तरी गोवा तिला अती प्रिय होतं. गायतोंडे परिवाराशी ती उत्तमरीत्या निगडीत राहिली. तिच्या ‘लिकां’च्या- पुंडलिक गायतोंडे यांच्या मृत्यूनंतरही. एदिलाच्या स्वभावात खाचाखोचाही होत्याच. प्रसिद्धीची तिला काहीशी भूक होती. तिने ‘लिका आणि मी’ यावर जास्त फोकस ठेवला. ती स्वत:पुरतं बघणारी वाटायची. नवऱ्याला आवडेल म्हणून सारस्वत रेसिपीज् करायची. कोकणी भाषाही ती बोलायला शिकली. आणि ती एक खंबीर स्त्री होती.’  ते दोघे सांगत होते ती निरीक्षणं पुस्तक वाचताना मलाही पुसटशी जाणवली होतीच. किंबहुना पुस्तकात नवऱ्याच्या कृतीमागे आपणच उभे असल्याचा भावही मला जाणवला. म्हणून मी विचारलं, ‘डॉक्टरांवर तिचा कितपत प्रभाव असे?’ नंदा लगोलग उत्तरले, ‘माझा भाऊ इतका खंबीर व पक्का होता, की She would not or could not change him..’ एदिलाचा त्या दिशेनं प्रयत्न मात्र जाणवतो पुस्तकात. मग प्रफुल्लताई सांगू लागल्या, ‘अतिशय खंबीर तीही आहेच. नवरा गेल्यावरही तिनं स्वत:ला कामात पुरतं गुंगवून घेतलं.’ ‘आता कुठे आहेत त्या?’ या माझ्या प्रश्नावर अनपेक्षित माहिती मिळाली. वयाच्या ९१ व्या वर्षी एदिलानं पुन्हा लग्न केलं! तिचा बालपणीचा पोर्तुगीज मित्र तिचा या वयात नवरा झाला. नंदा सांगत होते, ‘वृद्धापकाळी एकटेपणा येतो. नातलगही नव्हते जवळ. अशा arrangements तिकडे पुष्कळ प्रचलित आहेत. पण तरी जेव्हा ही बातमी तिनं माझ्या कानावर घातली तेव्हा मला आई गेल्याचं दु:ख झालं. अर्थात एदिलानं लगेचच सांगितलं की, आता मी गायतोंडे घराण्यातली वयानं सर्वात मोठी व्यक्ती आहे. I am head of Gaitonde famiy.
त्यांच्याकडून परतताना माझं मन विस्मयचकित झालं होतं.. आहे. एदिलानं इतक्या उशिरा लग्न केल्याचं मला विशेष काही वाटलं नाही. पण त्यानंतरही तिनं आपण गायतोंडे घराण्याची कुटुंबप्रमुख असल्याची जी ग्वाही दिली ती मला हृद्य वाटली. तरुण, अजाण वयात भारतीय पुरुषाच्या प्रथमदर्शनी प्रेमात पडलेल्या एदिलाचा नव्वदीनंतर दुसऱ्या लग्नानंतरही ‘गायतोंडे कुटुंबप्रमुख’ म्हणवून घेण्यापर्यंतचा प्रवास हा केवढा उत्कट आहे! आता ती एदिला पोर्तुगालमध्ये काय आठवत असेल? आमच्या या गप्पा तीन-चार महिन्यांपूर्वीच्या. आजची एदिलाची स्थिती मला पक्की ठाऊक नाही. पण ती असणार.. खंबीरपणे रोजचं जगणं जगत. आणि मागे सारं पोर्तुगीज जगणं, संस्कृती, भाषा असली तरी तिच्या हृदयापाशी गोवाच असणार.. आणि तिचा लिकाही! मी गेल्या वर्षी ‘लयपश्चिमा’ सदरात लिहिलेलं स्थलांतरीत गाण्याचं आख्यान कदाचित वाचकांना स्मरत असेल. ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ असं अमेरिकेतले रिकी मार्टीन, जे लो आदी कॅरीबियन बेटांवरचे गायक मनोमन गुणगुणत असतील असं मी त्यात म्हटलं होतं. ते गायक अमेरिकेत गात असले तरी त्यांचा किनारा कॅरीबियन होता. एदिलाचा किनारा कुठला म्हणायचा? पोर्तुगालचा की पोर्तुगालपासून हजारो मैलांवरच्या ज्या आझोरीश बेटावर ती जन्मली, वाढली तिथला? की गोव्याचा किनारा? मला वाटतं, डॉ. पुंडलिक गायतोंडे नावाचा किनारा तिचा हक्काचा असणार! आणि आज ती कुठे का असेना; तिच्या आठवणींच्या लाटा त्याच किनाऱ्यावर.. तिच्या लाडक्या ‘लिकां’च्या किनाऱ्यावर धडकत असणार!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2015 1:55 am

Web Title: edila gaitonde autobiography
Next Stories
1 मी नाटकाची निवड कशी करतो?
2 दृढ संकल्प जीवी धरावा..
3 प्रभातारा
Just Now!
X