News Flash

श्री. बा. : व्यासंगी, जिज्ञासू लेखक

ग्रंथालयात येणाऱ्या माहितीशोधकांना हवे ते मिळालेच पाहिजे, ही जणू त्यांची नैतिक जबाबदारी होती.

|| प्रतिभा गोपुजकर

श्री. बा. जोशी… कोलकात्याच्या राष्ट्रीय ग्रंथालयात संपादक म्हणून ३२ वर्षें सेवा बजावणारे विलक्षण ग्रंथप्रेमी लेखक. मोजकेच लेखन करूनही रसिकप्रियता लाभलेल्या श्री. बां.चे नुकतेच निधन झाले. त्यांच्याविषयी…

 

पाच-सहा वर्षांची एक मुलगी आणि तिचा हात धरून गिरगावातल्या खाडिलकर रोडवरून मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात जाणारा २२-२३ वर्षांचा एक तरुण हे चित्र माझ्या मनावर स्पष्ट कोरले गेलेले आहे. असे जाणे-येणे अगदी एक-दोन वेळाच झाले असावे. ही मुलगी मी होते आणि तो तरुण म्हणजे माझे सख्खे काका श्रीकृष्ण बापूराव  तथा श्री. बा. जोशी. यानंतर मात्र लवकरच ते कोलकात्याला गेल्यामुळे त्यांची भेट झाली ती १९६१ साली मुंबईला त्यांच्या लग्नाच्या वेळीच!

अत्यंत मितभाषी स्वभाव. चेहरा बऱ्याचदा गंभीर. क्वचित मिश्कील व्हायचा; पण क्षणभरच. लहान वयात त्यांच्याकडे आर्किषत व्हायला हे अडसरच होते. पण रुक्मिणीकाकू याउलट स्वभावाची. ती खळखळून हसायची. भरभरून बोलायची. खोटं खोटं रुसायचीसुद्धा. या दोन विजातीय ध्रुवांचं मीलन खूप प्रेमाचं झालं, हे मात्र खरं. क्वचित कोणी नातेवाईक कोलकात्याला गेले तर तिथला तपशील कळायचा. काकांची अंतर्देशीय पत्रं मात्र यायची. त्यावरील कागदाचा कणही वाया न घालवता उभी-आडवी लिहिलेली. संकोची आणि भिडस्त स्वभावामुळे अगदी जवळची अशी घरातली माणसं सोडली तर मुंबई-पुण्याकडे नामांकित व्यक्तींबरोबर त्यांचे विस्तारित मैत्र असले तरी त्यांनी गोतावळा जमवलेला जाणवला नाही. यातल्या कित्येकांना काकांच्या घरच्यांविषयी क्वचितच माहिती असायची. आम्ही मुलं मोठी होऊन आमचा पत्रव्यवहार सुरू झाला तेव्हा मात्र त्यांचं व्यक्तिमत्त्व आमच्या मनात आकार घेऊ लागलं. माझे दोन्ही भाऊ कोलकात्याला असताना काही काळ त्यांच्या सहवासात आले. त्यांच्याकडून गप्पांमधून कळत गेलं- हा माणूस खूप रसिक आहे. नाटक, सिनेमा, कलाविष्कारांची त्याला उत्तम जाण आहे. खाण्यातला दर्दी आहे. कोलकात्यातील प्रसिद्ध ‘अंबर’, ‘सागर’ या रेस्टॉरंटमधून जाऊन जेवायची त्यांना हौस होती. सामिष भोजनालाही ना नव्हती. माझ्या भावाला ते एका सुप्रसिद्ध बाऊल गायकाच्या खासगी मैफलीला घेऊन गेल्याची व परतताना ते बंगाली भाषा आणि संगीत याबद्दल भरभरून बोलत असल्याची आठवण त्याने लिहून ठेवलेली आहे. ही रसिकता शब्दप्रयोगांतही होती. आपल्या एका पुतणीचं नाव त्यांनी आग्रहाने ‘गीतांजली’ ठेवण्यास सुचवले.

श्री. बा. जोशी कोलकात्याच्या राष्ट्रीय ग्रंथालयामध्ये मराठी पुस्तक सूची विभागाचे प्रमुख संपादक होते हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे मराठी पुस्तकांविषयी त्यांना माहिती असेच; पण ते प्रत्येक पुस्तक चाळत असत, हे महत्त्वाचं. इतर भाषांतील समकालीन पुस्तकांची ओळख करून घेणं, हेही ते करत. आणि भावाने म्हटल्याप्रमाणे, ‘हे संपूर्णपणे सरकारी कर्मचाऱ्यांच्या आचारसंहितेच्या विरुद्ध होतं.’

कोलकात्याच्या राष्ट्रीय ग्रंथालयातील तीसेक वर्षांचा काळ हा त्यांच्यासाठी खूप सुखावह होता. पदोन्नती वगैरे कटकटीत न गुंतता या पुस्तकवेड्या माणसाने पुस्तकांच्या राज्यात स्वत:ला झोकून दिले होते. त्यांनीच लिहिले आहे : ‘खंडोबाचा वाघ्या जसा ओवाळून टाकलेला असतो, तसं मी पुस्तकांवरून स्वत:ला ओवाळून टाकलं होतं.’ ग्रंथालयात येणाऱ्या माहितीशोधकांना हवे ते मिळालेच पाहिजे, ही जणू त्यांची नैतिक जबाबदारी होती. महाराष्ट्रातून तिथे गेलेल्या विविध क्षेत्रांतील नामांकित व्यक्तींना त्यांनी हवे ते संदर्भ सहजगत्या दिले, हे त्या व्यक्तींच्या परतल्यावरच्या बोलण्यातूनच कळायचे. कोलकात्याचे ग्रंथालय हे त्यांचे जणू दुसरे घर होते आणि तिथली पुस्तकजत्रा हा सणसोहळा! अनेकांना त्यांनी या सोहळ्याची मजा चाखविली.

या साऱ्याचा परिपाक त्यांच्या ज्ञानप्रवाही लेखनात झाला. त्यांनी प्रामुख्याने लेख लिहिले असले तरी बंगालीतून मराठीत ‘बादशाही अंगठी’, ‘कपिलीकाठची कहाणी’, ‘बंकिमचंद्र’ तसेच ‘अंत नाही’  व ‘प्रलाप’ हे बादल सरकार यांच्या नाटकांचे अनुवादही (अप्रकाशित) केले. त्यांनी ‘शांतता! कोर्ट चालू आहे’चे बंगाली भाषांतर केले. याखेरीज ७०-७५ इतर भाषांतील लघुकथांचेही भाषांतर त्यांनी मराठीत केले. पण लोकांपर्यंत पोहोचली ती त्यांच्या लेखांचे संकलन करून झालेली पुस्तके… ‘संकलन’, ‘उत्तममध्यम’ आणि ‘गंगाजळी’चे चार भाग! मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे २००९ साली त्यांना ‘ग्रंथोपासक’ पुरस्कार देण्यात आला.

स्फुटलेखनाचा हा श्री. बां.नी केलेला प्रयोग केवळ ‘संकलन’ या नावाखाली जाऊ शकत नाही. सु. रा. चुनेकरांसारखे विद्वान गृहस्थ म्हणतात, ‘हे लेखन हा ‘ज्ञानकोश आणि शब्दकोश यांच्या मधला, वेगळा लेखन प्रकार आहे. ते वाचताना नकळत आपलीही बहुश्रुततेची, ज्ञानाची पातळी उंचावते.’ विषयांचे वैविध्य, सोपी भाषा, नम्र भूमिका यामुळे त्यांचे लिखाण रा. ग. जाधवांनी म्हटल्याप्रमाणे, ‘मराठी वाचनसंस्कृतीला पोषक’ असे उतरते, संग्राह्य ठरते.’ त्यांनी श्री. बां.चा उल्लेख ‘ज्ञानमार्गी’ म्हणून केला आहे. मं. वि. राजाध्यक्ष लिहितात, ‘भरगच्च माहिती ते देत असतात, पण तज्ज्ञतेचा सूर न लावता! वर्षानुवर्षांच्या एकाग्र आणि आत्मसात केलेल्या वाचनातून समृद्ध झालेली स्मरणशक्ती त्यामागे आहे.’ संतकवींपासून इंग्रजी लेखकांपर्यंत सर्वांची सुवचने त्यांच्या लेखनातून सहज हाती लागतात. त्यांच्या ‘संकलन’ पुस्तकाचे मुखपृष्ठ व्यंकटेश माडगूळकरांनी मोठ्या कल्पकतेने केले आहे असे वाटते. फुलदाणीतील फुले सुंदर असली तरी त्यांची रचनाही तितकीच महत्त्वाची- हे माडगूळकरांनी सूचकतेने दाखवले आहे.

श्री. बां.चे बारीक चिमटे छान मिश्कील असायचे. गिरगावातल्या चाळीतल्या बिऱ्हाडांचे वर्णन करताना ते लिहितात, ‘पंचांगापलीकडे पुस्तकं ही चीज अनोळखी असणारी ही वस्ती.’ विनोदाची त्यांना किती आवड होती हे त्यांनीच सांगितलंय- ‘ग्रंथालयशास्त्राचा अभ्यास केल्यावर कळलं, ८१७ व ८२७ हे वर्गक्रमांक अनुक्रमे ‘अमेरिकन विनोद’ व ‘ब्रिटिश विनोद’ या विषयांचे. ग्रंथालयात गेल्यावर पावलं आधी त्या क्रमांकांकडे वळत.’ मं. वि. राजाध्यक्ष तर म्हणतात, ‘श्री. बां.च्या ‘गंभीर’ म्हटल्या जाणाऱ्या विषयांवरील लेखांत विनोद सदैव सळसळत असतो. कधी स्पष्टपणे, तर कधी फिकटपणे. त्यात विनोदाच्या विविध कळा आहेत. शाब्दिक कोटी अथवा श्लेषपासून सूचकतेच्या, सूक्ष्मतेच्या बिकट, फसव्या पायऱ्यांपर्यंत. तो अंगचा आहे, टाळता येण्यासारखा नाही.’

श्री. बां.च्या लेखनाचं आणखी एक वैशिष्ट्य सांगितलंच पाहिजे. ते असं की, त्यांनी चटकन् चार पैसे मिळतील या मोहाने ज्यात स्वत:ला रुची वा रस नाही त्यावर लिहिण्याचा मोह सदैव टाळला. मध्यमवर्गीय परिस्थितीतही त्यांनी हे बंधन स्वत:वर घातलं होतं, हे महत्त्वाचं. पण हे रसायनच वेगळं होतं. एकीकडे स्वत:च्या धन-कमतरतेची जाणीव, तर दुसरीकडे जाज्ज्वल्य स्वाभिमान. ग्रंथालयातील ही नोकरी त्यांनी ३२ वर्षे बढती न स्वीकारता केली. त्याच्या आर्थिक कळाही सोसल्या. आपल्या ग्रंथप्रेमाबद्दल ते लिहितात, ‘ग्रंथांनी अधिष्ठिल्या दिशा / सरली अबोधाची निशा’ असं संतवचनाच्या चालीवर म्हणावं, तर लागलीच ‘परी परवडती ना खिशा / न्यून ते इतुकेची/ असा वात्रट विचार डोकावतो.’ पण या खंतीसोबतच साहित्याविषयीचा प्रखर स्वाभिमानही होता. कोणाकडूनही काही मिळालं तर त्याची या ना त्या रूपाने परतफेड तत्परतेनं होत असे. मॅजेस्टिक प्रकाशनाने दिलेला पुरस्कार त्यांनी स्वीकारला; परंतु तो अनेक सेवाभावी संस्थांमध्ये वाटूनही टाकला.

माधव आचवल हे त्यांचे सख्खे मित्र आणि साडूही. श्री. बां.नीच म्हटल्याप्रमाणे, येथे बहुधा ‘वाचनप्रेम’ नात्यापेक्षाही श्रेष्ठ असावे. त्यांच्या लेखनातला आचवलांचा उल्लेख आहे तो असा- ‘भेटीमध्ये नातीगोती निघण्यापेक्षा नव्या-जुन्या पुस्तकांच्या गप्पा रंगायच्या.’ त्यांच्याच आग्रहावरून श्री. बां.नी निवृत्तीनंतर बडोद्याला वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला असावा. मुंबईतल्या जागांचे फुगलेले भाव हेही कदाचित त्यामागचे कारण असेल. आचवलांच्या अकाली निधनाने या निर्णयाला वेगळेच वळण लागले. उच्चार केला नाही तरी श्री. बा. त्यानंतर एकाकी झाले. नातेवाईकांनी आग्रह करूनही ते मुंबईला यायला धजावले नाहीत. पाच-सात वर्षांपूर्वी काकू गेल्यावर तर त्यांना जणू विरक्तीच आली.

अत्यंत संकोची स्वभाव, आपल्यामुळे कोणालाही कणभरही त्रास होऊ नये, ही वृत्ती. वयपरत्वे आपल्याला पाहुण्यांचा आदरसत्कार पुरेसा जमणार नाही ही भीती… या साऱ्यामुळे कोणाच्याही ‘येऊ का?’ या पृच्छेला त्यांचे उत्तर ‘नको’ यायचे. या त्यांच्या वागण्या-बोलण्याचा क्वचित गैर अर्थही काढला गेला. पण श्री. बां.ची वरकरणी नाराजी डावलून कोणी त्यांच्याकडे गेले तर मात्र त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरही प्रगट व्हायचा. काय करू आणि काय नको असे त्यांना होऊन जायचे.

वयाची नव्वदी पार करून काका गेले. आपल्या सर्वांसाठी त्यांची भरगच्च ‘गंगाजळी’ मागे ठेवली आहे. अजून कितीतरी टिपणे त्यांनी काढलेली होती. ती टिपणे, त्यांची पै-पै साठवून गोळा केलेली ग्रंथसंपदा आठवली की आपल्यासारखेच आणखीही कोणीतरी पोरके झालेय याची जाणीव होते.

gopujkars@hotmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2021 12:06 am

Web Title: editor of the national library in kolkata akp 94
Next Stories
1 रफ स्केचेस : जहांगीरच्या पायऱ्या
2 अरतें ना परतें… : खुज्या सावल्यांचा काळ
3 मोकळे आकाश… : बटर आणि सुरी
Just Now!
X