21 November 2019

News Flash

‘ज्ञान प्रबोधिनी’ची सुवर्ण वाटचाल

भारत. रविवार, ९ जून २०१९. ठीक ५० वर्षांपूर्वी याच तारखेला पुण्यात ‘ज्ञान प्रबोधिनी प्रशाले’ची स्थापना झाली.

|| अविनाश धर्माधिकारी

स्वामी विवेकानंदांच्या संकल्पनेतील ‘जीवनदायी शिक्षण’ हे ध्येय समोर ठेवून गेली पन्नास वर्षे कार्यरत असलेल्या पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी प्रशालेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्ताने संस्थेच्या सर्वव्यापी कार्याचा मागोवा..

भारत. रविवार, ९ जून २०१९. ठीक ५० वर्षांपूर्वी याच तारखेला पुण्यात ‘ज्ञान प्रबोधिनी प्रशाले’ची स्थापना झाली. कालच्यासारखा तो दिवस मला आठवतो. ५० वर्षे अशी क्षणात संपून गेली. टिळक रोडवरच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून पाचवीमधून मी नुकताच सहावीत गेलो होतो. ज्ञान प्रबोधिनी प्रशाला सुरू करण्याआधी तिचे संस्थापक डॉ. विनायक विश्वनाथ पेंडसे (नंतरच्या आयुष्यात आम्ही त्यांना ‘आप्पा’ म्हणायचो.) यांनी विविध शाळांतल्या, त्या- त्या इयत्तेतल्या पहिल्या तिघांची नावं-पत्ते मागवून घेतले होते. ज्ञान प्रबोधिनी प्रशालेतल्या प्रवेशासाठी त्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या. मी पाचवी ‘अ’मध्ये पहिल्या तीनात आलो होतो, हा काही माझा दोष नाही. वडील बोटाला धरून ज्ञान प्रबोधिनीत घेऊन गेले म्हणून गेलो. समोर कागद आले म्हणून चाचण्या दिल्या. एके दिवशी कळलं, नव्या सुरू होणाऱ्या ‘ज्ञान प्रबोधिनी’ नावाच्या शाळेत मला सहावीसाठी प्रवेश मिळाला. ती शाळा सुरू झाली ९ जून १९६९ ला. तेव्हा शाळेला स्वत:ची वास्तू नव्हती, म्हणून न्यू इंग्लिश स्कूलमध्येच वर्ग चालायचे. सकाळच्या वेळी न्यू इंग्लिश स्कूलच्या आतल्या छोटय़ा मैदानावर आम्ही रांगा करून उभे आहोत, नुकतेच महाविद्यालयात जाऊ  लागलेले विश्वनाथ गुर्जर (त्यांना आम्ही ‘विसुभाऊ’ म्हणतो.) आणि सुभाष देशपांडे हे मुलांना सूचना देत आहेत, ही प्रतिमा माझ्या डोळ्यांसमोर अजूनही लख्ख आहे. ५० वर्षांपूर्वी सुरू झाला असा एक गमतीशीर, आनंददायक आणि भारावून टाकणारा प्रवास.

ज्ञान प्रबोधिनी या संस्थेची स्थापना ८ ऑगस्ट १९६२ ला झाली होती. पहिली सात वर्षे संस्थेचे अनेक शैक्षणिक उपक्रम सुरू होते. त्यातून जगद्विख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नीतू मांडके, तितकेच असामान्य मानसशास्त्रज्ञ डॉ. अशोकराव निरफराके, असामान्य कवयित्री, विचारवंत आणि कार्यकर्त्यां स्वर्णलता भिशीकर अशी अनेक नावं सांगता येतील असे प्रतिभावंत आकाराला आले. मग केंद्र सरकारच्या रीतसर मान्यतेनंतर १९६९ साली ‘ज्ञान प्रबोधिनी प्रशाला’ सुरू झाली. ती केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाशी (सी. बी. एस. ई.) संलग्न होती. मान्यता देण्यापूर्वी केंद्र सरकारचं पथक पाहणीसाठी आलं होतं. यांच्याकडे स्वत:ची जागा नाही, वास्तू नाही, खेळाचं मैदान नाही, पैसेही नाहीत; तरीपण यांच्या शाळेला मान्यता देण्यात यावी, असा अहवाल त्या पथकानं दिला. तसा अहवाल देण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण होतं- अत्यंत तळमळीची, त्यागी आणि समर्पणपूर्वक काम करणारी माणसं. अर्थात तो काळही त्याग आणि तपश्चर्येला दाद देणारा होता. त्यावेळचे शिक्षणमंत्री त्रिगुण सेन यांनी वैयक्तिक लक्ष घालून शाळेला मान्यता दिली. ज्ञान प्रबोधिनी संस्था आणि प्रशाला यांची स्थापना करणारी सगळी टीम हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक. मूळ संस्थापक डॉ. वि. वि. पेंडसे हे तर संघाचे पूर्णवेळ प्रचारक होते. फाळणीपूर्वीच्या काळात ते लाहोरला प्रचारक म्हणून काम करायचे. पुढे त्यांनी मानसशास्त्र विषयात पीएच.डी. केली. त्यांच्या पीएच.डी.चा प्रबंधही ‘नेतृत्वगुण विकसन’ हा होता. त्या संकल्पनेतूनच त्यांनी ज्ञान प्रबोधिनी प्रशालेची स्थापना केली. संघाचे स्वयंसेवक शाळा स्थापन करत आहेत आणि १९६९ मध्ये तत्कालीन केंद्र सरकार त्यांच्या समर्पणाकडे पाहत कुठलेही बा निकष पूर्ण नसताना मान्यता देत आहे, हे आपल्या राष्ट्रीय सहिष्णुतेचं आनंददायक दृश्य आहे.

‘बुद्धिवंतांचं शिक्षण’ ही मानसशास्त्रातल्या पीएच.डी.ला धरून ज्ञान प्रबोधिनी प्रशाला स्थापन करण्यामागची आप्पांची मूळ संकल्पना होती. विशेष बुद्धिमत्ता असलेली मुलं आणि नंतर मुलींचीही शाळा १९७५ पासून सुरू झाली. अशी मुलं-मुली निवडून घ्यायची, त्यांना राष्ट्रीय शिक्षण देऊन भारताच्या विविध समस्यांचा अभ्यास आणि आपापल्या व्यक्तिमत्त्वानुसार त्यातलीच एक समस्या निवडून त्यावर आयुष्यभरासाठी काम करायचं, अशी प्रबोधिनीच्या शिक्षणामागची कल्पना आहे. त्यासाठी आप्पांनी त्यांच्या टीमबरोबर मानसशास्त्रीय चाचण्या तयार करून १४० आय. क्यू. म्हणजे बौद्धिकदृष्टय़ा विशेष असलेल्या मुलामुलींची निवड करायची. या विचारांचा पाया विवेकानंदांच्या अध्यात्मविचारात आहे. विवेकानंदांनी शिक्षणाची व्याख्या अशी केली आहे : Education is the manifestation of perfection already in man…मनुष्यामध्ये मुळातच असलेल्या पूर्णत्वाचं प्रकटीकरण म्हणजे शिक्षण! ‘पूर्णत्व तुझ्यात आहेच. पण तू ते ओळखलं पाहिजेस आणि जीवनात व्यक्त केलं पाहिजेस..’ ही माणसाच्या माणूसपणाची खास भारतीय व्याख्या आहे. शिक्षण म्हणजे नुसती पुस्तकं, पुढे नोकरी मिळवण्यासाठी नुसते मार्क्‍स असं नसून विवेकानंदांचाच शब्द आहे- जीवनदायी शिक्षण! शिक्षण केवळ ‘जेवणदायी’ न ठरता ते ‘जीवनदायी’ असायला पाहिजे, असं आम्ही गंमत म्हणून म्हणायचो. तिचा पाया विवेकानंदांनी अत्यंत विवेकनिष्ठ पद्धतीनं मांडलेल्या भारताच्या विज्ञाननिष्ठ अध्यात्मविचारांत आहे. त्या संस्कारांची पायाभरणी करून मनुष्यघडण. उद्या प्रत्येकाला करिअर, नोकरी आणि सन्मानानं जगण्यासाठी पैसे मिळवायचे आहेतच; पण ते स्वत:चं व्यक्तिमत्त्व आणि करिअरच्या माध्यमातून! म्हणून बुद्धिवंतांची निवड करून, त्यांच्यातल्या नेतृत्वगुणांची जोपासना करून भारताच्या समस्या सोडवायला या मुलांनी पुढे आपल्या जीवनात काम करणं, ही प्रबोधिनीच्या शिक्षणपद्धतीची मूळ संकल्पना. पुढे पी. व्ही. नरसिंह राव यांनी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री असताना आवर्जून प्रबोधिनीला भेट दिली. १९८५ मध्ये पंतप्रधान राजीव गांधींनी नवशिक्षण धोरण मांडलं. त्यात ‘जवाहर नवोदय विद्यालय’ ही संकल्पना आहे; तीत थेट नसेल, पण  प्रबोधिनीचं निदान बीज आहेच. बहुजन, दलित, आदिवासी समाजातली बुद्धिमान, चुणचुणीत मुलं निवडून त्यांच्या विशेष शिक्षणाची व्यवस्था म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय. आज अशा विद्यालयांमधून जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये गोरगरीब वर्गातली अत्यंत हुशार मुलं-मुली कर्तृत्व गाजवताना दिसतात.

१९६९ मध्ये आमचा प्रवास सुरू झाला तेव्हा सकाळच्या वेळात तीन तास व्हायचे. दिवसा तिथं न्यू इंग्लिश स्कूलचे वर्ग चालायचे. त्या वेळेत मैदानावर कचकावून खेळायचं आणि मातीनं भरलेले कपडे घेऊन तसंच संध्याकाळी तासाला येऊन बसायचं. अंधार पडला की रात्री पुन्हा दोन तास व्हायचे. लवकरच टिळक रोडच्या पलीकडं आयुर्वेदाचार्य निलंगेकर महाराज वैद्य यांच्या आशीर्वादामुळं संस्थेला जागा मिळाली. मंदिर वाटेल अशी दिमाखदार वास्तू आज तिथं उभी आहे. तिचं बांधकाम सुरू झालं तेव्हाच आमचे वर्गही तिथं होणं सुरू झालं होतं. शिक्षणातील तो एक नवा प्रयोग होता. आम्ही त्या प्रयोगाची पहिली फळं आहोत. उदा. भाषेशी परिचय होण्यासाठी आधी देवनागरी लिपीतून इंग्रजीचं शिक्षण हा विचार आचार्य विनोबांनी मांडला होता. देवनागरी ही तर शास्त्रशुद्ध, सर्व ध्वनींचं योग्य प्रकटीकरण करणारी लिपी आहे. इंग्लिश शिकण्याची आमची सुरुवात देवनागरी लिपीतून झाली. आम्ही ज्यांचे आयुष्यभरासाठी ऋणी आहोत असे शिक्षणाला समर्पित असणारे शिक्षक आम्हाला लाभले. इंग्लिश शिकवायला आम्हाला तेव्हा सावरकर बाई होत्या. ‘प्रेमात न्हाऊ  घालणाऱ्या आमच्या आजी’ अशी त्यांच्याबद्दलची आजपर्यंत प्रतिमा आहे. आज जर आमचं इंग्रजी बरं असेल, तर त्याचं सर्व श्रेय सावरकर बाईंचं. तसंच हिंदी शिकवणाऱ्या मावशीसारख्या प्रेमळ डॉ. दुर्गा दीक्षित. सर्व विषयांची अशी यादी सांगता येईल. गणित व संस्कृतबद्दल आमच्या मनात प्रेम निर्माण करणारे ‘वामनराव’! पांढरंशुभ्र धोतर, कुर्ता आणि टोपी घालणारे वामनराव आता ‘भाऊ’ म्हणून ओळखले जातात. पुढे निगडीमध्ये मुलामुलींसाठीची महाराष्ट्र बोर्डाची शाळा त्यांनीच सुरू केली. माझ्या वर्गातल्या मुलांना गणित आणि संस्कृत उत्तम आलं पाहिजे ही आपली जबाबदारी; त्यात कुणी कमी पडत असेल तर अशांसाठी पहाटे पाच वाजता स्वत:च्या घरी कोणतंही शुल्क न घेता ते विशेष वर्ग घ्यायचे. समर्पितांची अशी एक पिढीच्या पिढी उभी राहिली आणि तिने पुढच्या पिढय़ा ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत घडवल्या.

प्रशाला हेसुद्धा साध्य नाही, तर देशाचे कार्यकर्ते घडवण्याचं ते साधन होतं. ते नुसत्या पुस्तकी शिक्षणातून घडावेत असं नाही, तर एकीकडे सी. बी. एस. ई.त दहावी-बारावी करताना त्यांनी देशप्रश्नांचा अभ्यास केला पाहिजे, या भूमिकेतून ज्ञान प्रबोधिनीचे वेगवेगळे विभाग सुरू झाले, बहरले. संस्था सुरू झाली तेव्हा तिचे पहिले अध्यक्ष होते आप्पासाहेब कोटीभास्कर. कोटीभास्कर उद्योगसमूहाचे मूळ संस्थापक-निर्माते. आधुनिक काळातली शिक्षणसंस्था आर्थिकदृष्टय़ा स्वत:च्या पायावर उभी असायला हवी, त्यासाठी शिक्षणसंस्थेला स्वत:ची उत्पन्नाची साधनं पाहिजेत, म्हणून तुम्ही कारखाने चालू करा, असं त्यांनी आप्पांना सुचवलं. त्यातून ज्ञान प्रबोधिनीनं कॅपॅसिटर्स तयार करण्याचा कारखाना चालू केला. त्यावेळी कॉलेजच्या पहिल्या वर्षांत असलेला तरुण मुलगा सुभाष देशपांडे यानं तो सांभाळला. पुढे त्यांनी आपलं आयुष्य त्या कार्याला अर्पण केलं. मग कात्रज घाटाच्या पलीकडे खेड-शिवापूर आणि कोंढणपूर हा पाया धरून ग्राम-विकसनाच्या प्रकल्पांना सुरुवात झाली. शाळेचे विद्यार्थी म्हणून आम्ही तिथं श्रमकार्य केलं. डोक्यावर पाटय़ा वाहिल्या, झाडं लावली, रस्ते बांधले. पुढं खेड-शिवापूरला एक कारखानाही सुरू झाला. शेतीवर आधारीत विशेष शिक्षण देण्यासाठी कृषी तांत्रिक विद्यालय सुरू झालं. नवनवीन संशोधन होऊन भारतीय संस्कृतीचं आधुनिक मोठेपण विज्ञाननिष्ठ पद्धतीनं मांडलं गेलं पाहिजे म्हणून संस्कृतवर संशोधनाची प्रयोगशाळा चालू झाली. ‘आयुर्वेद’ हा भारताचा मोठा ठेवा म्हणत भूतकाळाची नुसती पूजा नको, तर आयुर्वेदावर आधुनिक संशोधन झालं पाहिजे म्हणून त्याला वाहिलेलं केंद्र सुरू झालं. स्वत: आप्पांचा अभ्यासाचा विषय मानसशास्त्र. बुद्धिवंतांपासून सुरू करून सर्व समाजाला समाविष्ट करून घेणारं शिक्षण उभं करण्यासाठी आधुनिक मानसशास्त्राची जोड पाहिजे म्हणून मानसशास्त्र संशोधिका सुरू झाली. आज ती नावारूपाला आली आहे. तिथं मानसशास्त्रातलं पदव्युत्तरपासून पीएच.डी.पर्यंतचं रीतसर यू. जी. सी. मान्यताप्राप्त केंद्रही आहे. नवनवीन विषयांवर मूलभूत संशोधन तिथं चालतं.

बघता बघता संस्थेचा कार्यविस्तार होत गेला. निगडीला सर्वासाठीची शाळा, परिसरात ग्राम-विकसन, कार्यकर्ते तयार करणाऱ्या संस्था, मोठं क्रीडासंकुल आकाराला आलं. सोलापूरला मूळची केळकर दाम्पत्यानं त्यागपूर्वक सुरू केलेली बालशिक्षण मंदिर ही शाळा त्यांनी ज्ञान प्रबोधिनीला देऊन तिथंही शिक्षणाचं मोठं केंद्र उभं राहिलं. जवळच्या हरळी या ठिकाणी ग्रामविकासाचा प्रकल्प, ग्राम विकसनाची शाळा असा कार्याचा विस्तार झाला. त्यातून देशासाठी कार्य करणाऱ्या पिढय़ा आकाराला आल्या.

अर्थातच हे सर्व होत असताना काही आक्षेपही येत असतात, काही त्रुटीही असतात. मुळात आपण सगळे जण माणसं आहोत. बुद्धिवंत निवडून, त्यांच्यातल्या नेतृत्वगुणांची जोपासना करून, त्यांनी स्वत:ला देशासाठी समर्पित करावं, हा विचार असताना असे किती समर्पित निर्माण झाले, हा प्रश्न कुणीही जरूर विचारू शकेल. आम्हा सर्वाचंच हे म्हणणं आहे, की ते १०० टक्के असावेत. पण ते तेवढे नाहीत. फक्त बुद्धिवंतांची निवड करणारी ही संकल्पनाच ‘एलिटिस्ट’ आहे, असंही काहींचं म्हणणं आहे. कदाचित हे मान्य करावं लागलं तरी आप्पांनी मूळ कल्पना मांडताना एक छान विधान केलं होतं. ते सांगायचे, ‘classes to massesl’! सुरुवात जरी बुद्धिवंतांना निवडून करत असलो तरी आपल्याला समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायचं आहे. त्यांच्या प्रश्नांचा अभ्यास करून, त्यांच्या सुखदु:खाशी एकरूप होऊन काम करायचं आहे. पुन्हा- असं किती जणांनी केलं, हाही एक वैध प्रश्न जरूर उपस्थित करता येईल. १४० आय. क्यू.चे असल्यामुळं कळत-नकळत या मुलांमध्ये स्वत:च्या बुद्धिमत्तेबद्दलचा अहंकार तयार होतो असंही बोललं जातं. ते स्वत:चं कोंडाळं करून राहतात असंही ऐकू येतं. त्यात सत्याचा अंश असू शकतो हे नाकारून चालणार नाही.

मनुष्यशक्ती घडवणं आणि वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडं जात त्यांनी देशाला समर्पित करणं, हेच मुळात सतीचं वाण आहे. समाजात कुणी हे काम करायला उभा राहतो तेव्हा त्याला तशी माणसं मिळणं हेही अवघड होऊन बसतं. याचं भान ठेवून प्रबोधिनीच्या कार्याचं मूल्यमापन केलं पाहिजे. शिक्षण आणि संस्कार ज्ञान प्रबोधिनी प्रशालेतून घेत जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये स्वयंप्रेरणेनं काम करणारे, ज्यांनी आपलं आयुष्य प्रबोधिनीच्या कार्यालाच वाहिलं असेही मोठय़ा संख्येनं उभे राहिले, हे निश्चित.

त्यागपूर्वक उभं राहणाऱ्या कामाचं आपल्या देशात एक दु:खद वैशिष्टय़ असतं.. मूळची द्रष्टी व्यक्ती समोर ‘व्हिजन’ ठेवून काम सुरू करते; तिच्या पश्चात त्या कामाचा प्रेरणास्रोत तसाच राहतो असं नाही. बघता बघता त्या कामाचा मठ बनतो आणि ‘मागील पानावरून पुढं’ असं काम सुरू राहतं. मात्र, प्रबोधिनीच्या बाबतीत हे निश्चित आहे, की आप्पांनी विचारपूर्वक पुढच्या पिढय़ा घडवल्या, त्यांच्याकडं कामं सोपवली. आता तर आप्पांच्या नंतरची दुसरी नव्हे, तर तिसरी-चौथी पिढी कामाला पुढं येताना दिसते. अनेकांनी  ग्राम-विकसनाचं काम, आरोग्य क्षेत्रातील काम, पाणलोट क्षेत्र विकासाचं काम हाती घेतलंय, तर कुणी स्वत:ला राष्ट्रीय एकात्मतेला वाहून घेतलंय. पुढच्या पिढय़ाही त्याच ताकदीनं, समर्थपणे उभ्या राहिल्यात, हे निश्चित.

अशा कामांपुढे सरकारी अडचणींचे डोंगर उभे असतात, हे आपल्या देशाचं आणखी एक दुर्दैव. या सरकारी यंत्रणेत काम करून, नंतर माझ्या परीनं प्रशासनाच्या क्षेत्रात काम उभं करताना, असं का होतं, याचं अंतिम उत्तर मला सापडत नाही. १९६९ मध्ये वास्तू, साधनं, पैसे नव्हते; पण तळमळ होती. म्हणून शाळेला मान्यता द्या, म्हणणारं सरकारी वातावरण आणि आज सरकारी अडचणींचे डोंगर पार करतच पुढं चालू राहणारं काम. मॅक्स वेबर सरकारी यंत्रणेला ‘नेसेसरी इव्हिल’ म्हणून गेला. पण ते ‘इव्हिल’ का असावं, याचं उत्तर प्रत्यक्षात आणण्याचा माझाही प्रयत्न चाल३ आहे. ज्ञान प्रबोधिनी प्रशालेची ५० र्वष पूर्ण होताना एका बाजूला जीवनाच्या विविध क्षेत्रांत मोठं काम उभं राहिलेलं दिसतंय; तरीही सतत पुढचं काम करत राहण्याची मूळ भावना, असमाधानही आहेच. असंतोष हे बीज फळाचं भान ठेवून ज्ञान प्रबोधिनीचं काम चालू आहेच. म्हणून पुढील ५० वर्षांसाठीही ज्ञान प्रबोधिनीच्या कामाला सर्व शुभेच्छा!

abdharmadhikari@yahoo.co.in

First Published on June 9, 2019 12:14 am

Web Title: education maharashtra right to education
Just Now!
X