मराठी साहित्याला नावे ठेवणारे (माझ्यासारखे) पुष्कळ आहेत. अपेक्षाभंग अथवा असमाधान यातून उमटलेला उद्गार म्हणजे मराठी साहित्याला लावली जाणारी ‘तोकडे’, ‘अपुरे’, ‘खुजे’ आदी विशेषणे. परंतु, जरा अन्य भाषांमध्ये येणारे साहित्य वाचले की मराठीचे डोके फूटभर उंच असल्याचेच जाणवते. ‘एक आझाद इसम’ हे अनुवादित पुस्तक वाचल्यावर तर मराठी साहित्य वास्तव आणि कल्पना यांची बेमालूम एकवट करणारे आहे याचा अभिमान वाटतो. अमन सेठी यांचे हे पुस्तक वाचताना भाऊ पाध्ये यांची कोणती तरी कादंबरी वाचत असल्याचा जसा भास होत होता, तसा अनिल अवचट यांनी लिहिलेली कितीतरी शब्दचित्रे lr18डोळ्यापुढे उभी राहात होती. खेरीज बाबुराव बागुल, मनोहर तल्हार, उद्धव शेळके, दि. बा. मोकाशी, अरुण साधू यांच्या कथा-कादंबऱ्याही आठवत राहिल्या.
‘अ फ्री मॅन’ असे मूळ शीर्षकाचे हे पुस्तक बांधकाम कामगारांच्या जगण्याचा अभ्यास करण्यासाठी मिळालेल्या एका अभ्यासवृत्तीतून तयार झाले आहे. चौक, पदपाथ, आडोसे, बागा आदी ठिकाणी राहणाऱ्या अन् पडेल ते अंगमेहनतीचे काम करणाऱ्यांची पाहणी एवढेच या पुस्तकात नाही. बराच काळ अशा कामगारांसोबत राहून, त्यांचे बोलणे ध्वनिमुद्रित करून आणि त्यांच्या वर्तनशैलीचे जवळून निरीक्षण करून लेखकाने सडाफटिंग कष्टकरी कसा असतो ते मांडले आहे. दिल्लीच्या सदर बाजार भागातल्या बारा टुटी या चौकाची ही कथा हळूहळू अश्रफ नामक एका भणंग, सडय़ा व कलंदर माणसाची जीवनकथा बनून जाते. अमन सेठी मूळचे पत्रकार असल्याने प्रश्न विचारण्यामागची त्यांची जिज्ञासा, चिवटपणा, समाजाच्या तळाच्या घटकाचे जगणे जाणून घेण्याचे कुतूहल त्यांच्या लेखनात दिसते. तब्बल पाच वर्षांचा अभ्यास आणि सहवास यातून जे साकारले, ते ‘नुक्कड’ नावाच्या एका गाजलेल्या िहदी मालिकेसारखेही भासत राहते. मात्र, त्यात जसा एक रोमँटिसिझम वावरायचा तसा त्याला ‘एक आझाद इसम’ आसपास फटकू देत नाही. आपल्या िहदी चित्रपटांनी दारिद्रय़, बेकारी, कष्ट यांचा फार गौरव केलेला आहे. सेठी यांनी दरिद्री व कष्टकरी माणसाचे कमालीचे आत्मकेंद्री, पुनरुक्तिपूर्ण आणि अस्थिर जगणे प्रभावीपणे सादर केले आहे. म्हणूनच की काय, या ‘रिपोर्ताज’मध्ये पात्रांच्या तोंडून ना चित्रपटाचे संदर्भ येतात, ना राजकारणाचे. या पात्रांपुढे कसलेही महान स्वप्न नाही, महत्त्वाकांक्षा नाहीत. मिळेल ते काम आणि त्यात कसब मिळवून कमाई करायची, व्यसने आणि जगण्यापुरते खाणे-पिणे करायचे; बचत अथवा गुंतवणूक झाली तर झाली, अन्यथा नाही असे राहायचे. मत्री, निष्ठा, श्रद्धा, प्रेम यात गुंतायचे नाही.. या वास्तवदर्शी पुस्तकात लेखक-पत्रकार अमन सेठी अशीच सारी माणसे दाखवत राहतात.
अश्रफ, रेहान, ललू, जेपी, सतीश हे कष्टकरी आपला भूतकाळ वजा करून जगणारे आहेत. तो उकरून काढण्यातच सेठी यांचा फार वेळ जातो. पण ही सारी माणसे तशी अत्यंत हुशार, विसंगती टिपणारी, कित्येक सामाजिक चालीरीतींचे वैयथ्र्य स्पष्ट सांगणारी आणि मुख्य म्हणजे निरुपद्रवी आणि अल्पसंतुष्ट आहेत. त्यांना बोलते करून लेखकाने अनेक धंदे व व्यवसाय-उद्योग यांमधले गरव्यवहार अथवा बारकावे उघड केले आहेत.
रेल्वेत सामानाची चढउतार करणाऱ्या एका कामगारटोळीची कामाची तऱ्हा आणि रेल्वे खात्यातला भ्रष्टाचार असो की ट्रकमधून धान्य उतरवताना सांडलेले धान्य वेचून व ते विकून दारूचा गुत्ता चालवणाऱ्या कल्याणीची कहाणी असो की संसदेच्या कार्यालयातली कागदपत्रे रद्दीत विकण्याचा कार्यक्रम असो, कसाई कोंबडी कापताना व ती विकताना काय गडबड करीत असतो त्याचा किस्सा असो, सेठी यांनी हे सारे निवेदन त्या त्या कष्टकरी पात्रांच्या नजरेतून आपल्या लेखणीत इतके छान उतरवले आहे की बस्स! भारत केवढा बदमाश देश आहे हे कळल्यामुळे अस्वस्थ व्हायला होते. गरीब मजुराला वापरून व्यापारी व पसेवाले लोक सारे अनतिक, भ्रष्ट व्यवहार कसे करीत राहतात, हे समजल्यावर भयंकर राग येतो.
भारतातला कष्टकरी माणूस जे वास्तव पाहतो अन् अनुभवतो, त्याने तो दु:खी होतो. पण आपली शक्तिहीन स्थिती आणि रोजगार यामुळे तो नाइलाजास्तव या अध:पतनात वाटेकरी होत असतो, याची जाणीव हे पुस्तक करून देते. स्वाभिमान, मूल्यप्रीती त्यांच्यातही असते, पण भुकेपुढे ती बाजूला ठेवावी लागते. सेठी यांच्यासारखा एक संवेदनशील पत्रकार त्यांच्यासोबत राहून हे सारे सांगतो तेव्हा कार्ल मार्क्‍सने ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ लिहून जगाला केवढा मोठा ठेवा दिला याची राहून राहून याद येते. ज्यांचा उल्लेख आरंभी केला, ते सारे लेखक मार्क्‍सवाद, समाजवाद, गांधीवाद यांनी भारलेले होते. सेठी तसे नाहीत. साम्यवाद राज्यकर्ता म्हणून संपून जाण्याच्या दशकात काही वष्रे आधी ते जन्मले, तरीही कामगार-कष्टकरी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था आहे. आजकालच्या पत्रकारितेच्या झगमगाटात त्यांचे वेगळेपण नि:संशय आश्वासक आहे. सेठी यांच्या या पुस्तकाचा अवधूत डोंगरे यांनी केलेला मराठी अनुवाद अचूक व प्रत्ययकारी आहे.        
एक आझाद इसम- अमन सेठी, अनुवाद- अवधूत डोंगरे,
समकालीन प्रकाशन, पुणे.
पृष्ठे- १९२, मूल्य -२०० रुपये.

जयदेव डोळे