‘एका लालसेने’ हा मंजुल बजाज या लेखिकेच्या इंग्रजी कथासंग्रहाचा डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके यांनी मराठीत केलेला अनुवाद आहे. समकालीन भारतीय लेखक- लेखिका इंग्रजी भाषेत कोणत्या प्रकारचे साहित्य लिहितात, त्यांच्या आस्थेचे विषय काय आहेत.. हे समजून घेण्यासाठी एक नमुना म्हणून हा अनुवादित कथासंग्रह महत्त्वाचा आहे. बजाज यांनी या कथासंग्रहात भारतातल्या विविध राज्यांतील, गाव-खेडय़ांतील, शहरांतील लोकांचे जीवन, त्यांच्या मनोव्यापाराचे विविध पदर यातील कथांमधून उलगडून दाखवले आहेत. कथांमधील पात्रांचे सशक्त व्यक्तिचित्रण आणि कोणत्याही सामाजिक संकेतांचा दबाव न घेता थेटपणे व्यक्त होणे हे बजाज यांच्या लेखनाचे, कथांचे वैशिष्टय़ आहे. स्वार्थलोलुपता, लालसा, माणसांचे कामजीवनासंबंधीचे विचार, इच्छा-आकांक्षांची तृप्तता न झाल्यास माणसांना येणारी विफलता असे सारे काही त्यांच्या कथांमध्ये कोणताही आडपडदा न ठेवता चितारलेले आहे. आपल्याकडे ज्या प्रकारची समाजरचना आहे, त्यात स्त्रीच्या सर्वच प्रकारच्या इच्छा-आकांक्षांना दुय्यम लेखले जाते, त्यातूनही एखादीनं आपल्याला हवे तसे जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर अशा स्त्रीला नैतिकतेच्या कठोर चौकटीतून पाहिले जाते. साहित्यातही अशा सामाजिक परिस्थितीचेच तर प्रतिबिंब उमटते.. मात्र बजाज यांच्या कथांमधील नायिका अशा रूढ वाटेने चालण्याचेच नाकारतात. या नायिकांना आत्मभान आहे. स्वत:च्या आनंदासाठी काही करण्यातून त्यांना अपराधगंड येत नाही, हेच या कथांचे बलस्थान आहे. याशिवायही भवतालात सतत घडत असणाऱ्या व्यावहारिक, राजकीय, आर्थिक बदलांचे तीव्र भान लेखिकेला आहे. या बदलांकडे ती संवेदनशीलतेने आणि अनेक कोनांमधून पाहते. या साऱ्याचा प्रत्यय या कथासंग्रहातील कथा वाचताना येत राहतो.

‘एका लालसेने’ – मंजुल बजाज,

अनुवाद – डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके,

मेहता पब्लिकेशन हाऊस,

पृष्ठे- २६४, किंमत- ३२० रुपये.