29 January 2020

News Flash

ज्येष्ठ नागरिक आणि शेअर बाजार

महागाईच्या काळात संपत्ती गाठीशी बांधण्याचा चांगला मार्ग म्हणजे शेअर बाजार. त्यात जोखीम असते हेही तितकेच खरे, पण म्हणून त्यावर जसा आंधळा विश्वास टाकू नये, तशीच

| March 9, 2014 07:30 am

महागाईच्या काळात संपत्ती गाठीशी बांधण्याचा चांगला मार्ग म्हणजे शेअर बाजार. त्यात जोखीम असते हेही तितकेच खरे, पण म्हणून त्यावर जसा आंधळा विश्वास टाकू नये, तशीच त्याकडे पाठही फिरवू नये.. तर त्याचा विचारपूर्वक वापर करून चार पैसे गाठीला कसे बांधता येतील, या दृष्टीने व्यवहार करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.
मागील लेखात महागाई आणि गुंतवणुकीचा परस्परसंबंध या विषयावर लिहिल्यावर अनेक ज्येष्ठ नागरिकांनी दोन प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पहिली प्रतिक्रिया होती- हल्ली शेअर बाजारात पसे गुंतवणारे म्युच्युअल फंड फारसे उत्पन्न देत नाहीत. आणि दुसरी प्रतिक्रिया होती- सेवानिवृत्तीनंतर आता शेअर बाजाराची जोखीम घेता येत नाही. या दोन्ही प्रतिक्रिया वस्तुस्थितीला धरून आहेत. उतारवयात माणसाची जोखीम घेण्याची कुवत घटते, किमानपक्षी आहे ते टिकले तरी भरपूर झाले असाच दृष्टिकोन असतो. त्यात काही चुकीचे नाही. पण शेअर बाजार म्हणजे प्रचंड जोखीम आणि नुकसान, असे न म्हणता महागाईला मात देण्याचा एक पर्याय  म्हणून त्याकडे बघितले तर कदाचित काही मध्यम मार्ग शोधता येईल. आजच्या लेखाचा तोच उद्देश आहे.
सुरुवातीला आपण पहिली प्रतिक्रिया पाहू. शेअर बाजाराने गेल्या काही वर्षांत फारसे चांगले उत्पन्न दिलेले नाही. (काही मंडळींच्या मते, चांगले उत्पन्न म्हणजे १५ टक्के व अधिक). गेल्या तीन वर्षांत निफ्टीकडून ५.५८ टक्के  चक्रवाढ दराने उत्पन्न मिळाले आहे. पण एक वर्ष (१०.२६ टक्के) व पाच वष्रे (१७.८१ टक्के) या कालावधीकडे बघितले तर तुलनात्मकरीत्या बरी परिस्थिती दिसते. आता कुणी म्हणेल, म्युच्युअल फंड विक्रेते केवळ चांगले उत्पन्नाचे आकडे तेवढे दाखवतात आणि वाईट आकडय़ांकडे मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. कदाचित तसे अनुभव काही गुंतवणूकदारांना आले असतीलही. पण याच आकडय़ांकडे थोडे अधिक गंभीरपणे बघावे लागेल, तेव्हाच वस्तुस्थितीचा बोध होणे शक्य होईल. २००८ च्या जानेवारी महिन्यात शेअर बाजाराने उच्चांक गाठला. त्यानंतर आजवर म्हणजे गेली सहा वष्रे शेअर बाजार त्या उच्चांकापेक्षा फार वर जाऊ शकला नाही. पण मधल्या काळात म्हणजे साधारणत: २००८ च्या अखेपर्यंत बाजाराने नीचांकी पातळीदेखील गाठली होती, त्यामुळेच आज पाच वर्षांचे आकडे समाधानकारक (की चांगले) आहेत. बाजार घसरलेला पाहून भीतीपोटी विक्री करणाऱ्या गुंतवणूकदारांना २००८ च्या अखेरीस आणि २००९ च्या सुरुवातीला प्रचंड नुकसान सहन करावे लागले. तसेच २००९-२०१० साली बाजार सुधारल्यावर बाजारात पसे गुंतवणाऱ्या मंडळींना पुढील तीन-चार वर्षांत बाजाराने फारसे काही दिले नाही. या सगळ्या घडामोडींकडे बघितल्यावर एक गोष्ट सहज समजते. शेअर बाजारात दर साल दर शेकडा अमुक एक उत्पन्न मिळावे अशी अपेक्षा बाळगणे योग्य नाही. शेअर बाजार कोसळतो तेव्हा शेअर विकत घ्यावेत आणि जेव्हा तो वर चढतो तेव्हा विकून निघून जावे, हीच योग्य नीती आहे. ज्यांना हे शक्य नाही त्यांना ‘सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान’मध्ये पसे गुंतवायला सांगितले जाते.
‘सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान’ (एसआयपी)मध्ये पैसे गुंतवणाऱ्या मंडळींनी देखील स्वत:च्या पोर्टफोलिओच्या अ‍ॅसेट अलोकेशनकडे लक्ष ठेवायला हवेच. १० टक्के शेअर्स आणि ९० टक्के फिक्स्ड इन्कम असे अ‍ॅसेट अलोकेशन घेऊन काही जण सुरुवात करतात. ‘एसआयपी’देखील तसाच आखलेला असतो. वर्षअखेरीस शेअर बाजाराने चांगले उत्पन्न दिले- अगदी ५० टक्के उत्पन्न दिले असे गृहीत धरू, की मग वर्षअखेरीस अ‍ॅसेट अलोकेशन बिघडले आहे असे म्हणत नाहीतच, उलट आणखी पसे शेअर बाजारात घेऊन येताना दिसतात. हीच वेळ फार महत्त्वाची असते. वर्षअखेरीस थोडे शेअर विकून किंवा अधिक पसे फिक्स्ड इन्कममध्ये गुंतवून १०टक्के शेअर्स आणि ९०टक्के फिक्स्ड इन्कम असे अ‍ॅसेट अलोकेशन पुन्हा आणले तर कदाचित वर उल्लेख केलेली ‘वरच्या भावात विक्री’ शक्य आहे. बाजार खचला असेल तर काही पसे शेअर्समध्ये गुंतवून पुन्हा १०टक्के शेअर्स आणि ९०टक्के फिक्स्ड इन्कम असे अ‍ॅसेट अलोकेशन मिळवणे शक्य आहे- यालाच खालच्या भावात खरेदी करणे असे म्हणता येईल. एकदा हे स्वस्तात खरेदी आणि महागात विक्री हे समीकरण जमले की शेअर बाजारात फारसे पसे मिळत नाहीत, असे म्हणायची वेळ येणार नाही.
पण हे सगळे सांगणे सोपे आहे. प्रात्यक्षिक करायला गेलो की भीती आणि हाव यांचा सामना उत्तरोत्तर रंगत जातो आणि उतारवयात शेअर बाजारात येण्याची उमेद राहत नाही. यावर काय उपाय करता येईल का? निश्चितच करता येईल. सर्वप्रथम आपल्याला किती पसे गमावले तरी चालू शकते, ते शोधून काढा. काही मंडळी म्हणतील, माझ्या एकूण गुंतवणुकीपकी १ लाख रुपये बुडाले तरी हरकत नाही. काही मंडळी म्हणतील की, मी जास्तीत जास्त ५० हजार रुपये घालवू शकतो, तर काही मंडळी सहज ५ लाख रुपयांचा आकडा सांगतील. हिशेबासाठी सोयीस्कर म्हणून आपण १०० रुपये गमावले तरी चालतील, असे गृहीत धरू. आता या १०० रुपयांपकी ७० रुपये (७०टक्के पसे) राष्ट्रीयीकृत बँकेत (किंवा तत्सम सुरक्षित पर्यायात) गुंतवावेत. पाच वर्षांअखेरीस आपले १०० रुपये परत मिळतात. उरलेले ३० रुपये शेअर बाजारात गुंतवावेत. या ३० रुपयांचे काहीही बरे-वाईट झाले तरी भांडवल सुरक्षित राहते. शेअर बाजारापासून दूर पळणाऱ्या मंडळींना सुरुवात करायला हा मार्ग केव्हाही चांगला आहे. हळूहळू भीड चेपली, की तुमच्या गरजा आणि तुमची जोखीम घेण्याची कुवत लक्षात घेत ठरवलेल्या अ‍ॅसेट अलोकेशन सांगेल तेवढे पसे शेअर्समध्ये गुंतवायला हरकत नाही.
भारतीय शेअर बाजारात जोखीम कमी करून यशाची शक्यता वाढवायची असेल तर आणखी एक मार्ग आहे. शेअर्समध्ये पसे गुंतवणाऱ्या म्युच्युअल फंडांमध्ये पसे गुंतवताना बाजाराची व्हॅल्युएशन बघावी. निफ्टी प्राइस अर्निग रेशो (किंमत उपार्जन गुणोत्तर)- ‘पीई’, हे एक उत्तम मानक म्हणून वापरता येते आणि ही माहिती ‘एनएसई’च्या वेबसाइटवर आणि बहुतांश बाजारविषयक वेबसाइट्सवर सहज मिळते. ‘पीई’ १२ पेक्षा कमी असेल तर बाजारात पसे गुंतवावेत किंवा निफ्टी विकत घ्यावा आणि जेव्हा बाजार वर चढेल तेव्हा पीईदेखील वर चढेल. ‘पीई’वर चढू लागला की हळूहळू विक्री करावी आणि ‘पीई’ २५ च्या वर असेल तर मूळ गुंतवणुकीच्या १०टक्के पेक्षा जास्त पसा शेअर्समध्ये ठेवू नये. ‘पीई’ कमी असणे म्हणजे शेअर बाजार स्वस्त असणे (१२ किंवा त्यापेक्षा कमी) आणि ‘पीई’ जास्त असणे म्हणजे (२५ किंवा त्यापेक्षा जास्त) मार्केट महाग आहे, असा साधा-सोपा निकष आहे. या निकषावर पसे गुंतवणाऱ्या म्युच्युअल फंडांच्या काही योजना बाजारात आहेत. अर्थात, या पद्धतीला यश येण्याकरिता आपल्या अंगी प्रचंड शिस्त आवश्यक आहे आणि दीर्घ मुदतीत (८-१० वष्रे) ही पद्धत आपल्या पदरी चांगले उत्पन्न टाकू शकते.  
शेअर बाजारावर आंधळा विश्वास टाकू नये. शेअर बाजाराकडून दरसाल अमुक उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा ठेवू नये. वाईट आíथक वातावरणात चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घेतले किंवा चांगल्या योजनांमध्ये पसे गुंतवले, तर जेव्हा कधी अर्थव्यवस्था सुधारते तेव्हा चांगले पसे हाती लागू शकतात. महागाईवर मात करण्याचा आणि संपत्ती जमवण्याचा हा एक उत्तम मार्ग असू शकतो. शेअर बाजाराकडे पाठ फिरवू नका, एवढे मात्र नक्की! 

First Published on March 9, 2014 7:30 am

Web Title: elderly people and stock market
टॅग Stock Market
Next Stories
1 सूर्य-चंद्र श्रेष्ठ कोण?
2 समृद्धीच्या शोधाची गोष्ट!
3 केवळ आणि निव्वळ समन्वयवादी दृष्टी
Just Now!
X