05 July 2020

News Flash

प्रचार? नव्हे, विखार!

साल १९९१. दिनांक २२ मे रोजीची भली सकाळ माझ्या अजून लख्ख स्मरणात आहे.

|| बालाजी सुतार

देशातील आजवरच्या कुठल्याच निवडणुकीत आताच्याइतका प्रचाराचा स्तर खालावलेला नाही. देशाच्या पंतप्रधानांनीच जिथे ताळतंत्र सोडले, सभ्यता आणि संस्कृतीशी फारकत घेतली, तिथे इतरांकडून  काय अपेक्षा करणार?

साल १९९१. दिनांक २२ मे रोजीची भली सकाळ माझ्या अजून लख्ख स्मरणात आहे. सकाळी सहाच्या बसनं तालुक्याच्या गावी जाण्यासाठी मी माझ्या गावाच्या एका टोकाला असलेल्या बसस्टँड नामक चौकात आलो. तेवढय़ा सकाळी तिथं अगदी मोजकी दोन-चार माणसं होती आणि अत्यंत अभद्र असा सूर लावून त्यातला एक पस्तिशीतला माणूस अक्षरश: ओक्साबोक्शी रडत होता. काय झालं म्हणून विचारायला कुणी जवळ गेलं तेव्हा त्यानं सांगितलं, राजीव गांधींना अतिरेक्यांनी मारलं रात्री. बॉम्ब उडवला आणि चिंधडय़ा. हे सगळं त्यानं कुणी अतिशय नजीकचा नातेवाईक अकस्मात जावा, इतक्या आतून फुटलेल्या दु:खाच्या उमाळ्यानं सांगितलं आणि सडकेकडेच्या भुईवर उकिडवा बसून तो हमसत राहिला.

१९९१ साली मी १५-१६ वर्षांचा होतो. आज इतकी वर्ष झाली, ‘पंतप्रधान मारले गेले’ म्हणून कळवळून रडणारा तो माणूस मला अजून अधूनमधून आठवत राहतो. तो माझ्याच गावातला. टीचभर वावरात कष्ट उपसणारा सरळ, साधा, भाबडा शेतकरी. तो काही काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता नव्हता. किंबहुना, राजकारणाशी त्याचा काहीएक संबंध नव्हता. क्वचित रेडिओवर त्यांचं भाषण ऐकण्यापलीकडे ‘राजीव गांधी’ या नावाशी त्याचा काहीही परिचय नसेल. तरीही त्या हत्येनं एका आडगावातला तो माणूस उरी फुटून जखमी झाला होता.

‘‘भ्रष्टाचारी नंबर वन’ म्हणून त्यांच्या जीवनाचा अंत झाला..’’ असं परवा देशाचे विद्यमान पंतप्रधान ज्यांच्याबद्दल जाहीर सभेतून म्हणाले, त्या ‘मिस्टर क्लीन’ राजीव गांधींना सामान्य जनतेच्या मनात काय स्थान होतं, याचं तो रडणारा शेतकरी निदर्शक होता असं मला कायम वाटत आलं आहे. त्याला कदाचित ‘बोफोर्स’ही ऐकून माहीत असेल. तरीही!

राष्ट्रीय नेत्यांबद्दल निष्कपट प्रेम बाळगून असणारा समाज असलेला एक मोठाच काळ या देशात होऊन गेलेला आहे. मोहनदास करमचंद गांधींना ‘बापू’, जवाहरलाल नेहरूंना ‘चाचा’, इंदिरा गांधींना ‘इंदिराम्मा’ अशी घरगुती संबोधनं वापरणारा; अगदी यांच्या विरुद्ध विचारधारा मानणाऱ्या अटलबिहारी वाजपेयींनाही ‘अटलजी’ अशा आपुलकीयुक्त आदरभावानं संबोधणारा हा देश आता देशाच्या पंतप्रधानांना जाहीरपणे ‘फेकू’ म्हणण्यापर्यंत गेला, हा आपला प्रवास विदारक गमतीदार आहे.

१९९१ च्या त्या निवडणुकीत मी मतदार नव्हतो. त्यानंतरच्या सगळ्या निवडणुकांत मी ‘मतदार’ म्हणून, क्वचित प्रसंगी ‘कार्यकर्ता’ म्हणूनही सक्रिय होतो. ‘कार्यकर्ता’ अर्थात गावपातळीवर. गाव म्हणजे खेडेगाव. निवडणुका ‘लागायच्या’ तेव्हाच गावात ‘राजकीय जागृती’ व्हायची असा तो काळ होता. एरवी गावातल्या माणसांचा राजकारणाशी संबंध ग्रामपंचायतीपलीकडे नसे. फार तर पंचायत समिती. झेडपीतसुद्धा कुणाची काही वैयक्तिक कामे निघत नसत. त्यापुढची- म्हणजे विधानसभा, लोकसभा ही ठिकाणं लोकांच्या खिजगणतीतच नसत. तो काहीतरी फारच वरचा मामला असे. त्या निवडणुकांत आपापला स्थानिक नेता सांगेल त्यानुसार मतदान करणारा मोठा समूह गावागावांत असे. निवडणुका म्हणजे ‘कार्यकर्त्यांची चंगळ’ असं फार काही तेव्हा नव्हतं. माझ्या जन्माआधीच्या काळात आमच्या बीड जिल्ह्यत खासदार होऊन गेलेल्या, पैशांच्या दृष्टीनं स्वत:च भणंग असलेल्या, ज्यांच्या कार्यकर्त्यांना आपल्याच पदरच्या भाकऱ्या खाव्या लागत असत, अशा क्रांतिसिंह नाना पाटील किंवा कॉम्रेड गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या आठवणी जिल्ह्यतले लोक अजूनही आदरानं काढतात. १९९१ नंतर आर्थिक उदारीकरण वगैरे प्रकार घडून आले. बाजार यंत्रणांनी समाजजीवनावर भयावह आक्रमणं केली. पाचव्या-सहाव्या वेतन आयोगानं मध्यमवर्गीयांकडे खाऊनपिऊन वर उरेल एवढा पैसा येऊ  लागला. गावोगावी भूमाफिया निर्माण झाले. ‘दादा’, ‘भाई’, ‘अण्णा’ नामक गळ्यात, हातात पाव-पावशेर वजनाचे सोन्याचे कडे घालून हिंडणारे ‘युवा नेते’ गावगन्ना पैदा झाले आणि राजकारण, निवडणुका, नेते आणि कार्यकर्त्यांनीही स्वत:चे रंग आमूलाग्र बदलून घेतले. कुठल्याही मार्गानं सत्तासुंदरीची प्राप्ती व्हावी, एवढीच अतीव महत्त्वाकांक्षा उरात बाळगणारी पुढारी मंडळी चहूमुलखी उदंड झाली.

आधीच्या निवडणुका साध्या असत. सातत्यानं लोकांमध्ये वावरणारे उमेदवार असत. कुणीही उठला आणि पटकन् पक्ष बदलून जिथून तिकीट मिळेल तिकडे जाऊन उभा राहिला, असं आताइतकं सर्रास होत नसे. प्रचारातही उमेदवाराच्या आणि त्याच्या पक्षाच्या चिन्हाच्या नावानं कण्र्यातून होणारा एकसारखा ओरडा वगळता काही नसे. आठवडी बाजाराचा दिवस साधून एखादी चिमूटभर सभा होई आणि मग थेट मतदानच असे. आता मागची काही वर्ष निवडणुका अधिकाधिक श्रीमंत होत गेल्या आहेत. आकर्षक वेष्टनात कुरूपातली कुरूप वस्तू विकावी तसं आता निवडणुकांचं स्वरूप झालं आहे. व्यापारी पद्धतीनं नेते तयार केले आणि लोकशाहीच्या बाजारात विकले जाताना दिसत आहेत. उदाहरणार्थ, ‘गदर’ या चित्रपटात पाकिस्तानात जाऊन हातपंप उपसून हाणामारी करणारा सनी देओल यावेळी लोकसभेचा उमेदवार आहे. तर सभांमध्ये त्याच्या हातात कायम एक हातपंप देऊनच त्याचा प्रचार करवला जात आहे. कारण ‘पाकिस्तानविरोधी देशभक्ती’ला या निवडणुकीत ‘मार्केट’ आहे.

‘नरेंद्र मोदी’ हे याच बाजारव्यवस्थेचं अपत्य आहे. समाजमाध्यमांवर मोदींना ‘शेठ’ म्हणूनच संबोधलं जातं. ज्या अत्यंत व्यापारी पद्धतीनं, केवळ नफ्या-तोटय़ाचा विचार करून मोदींनी मागची काही वर्ष राजकारण केलं आहे, ते पाहता त्यांना ‘शेठ’ म्हणायचा मोह कुणालाही होईल. इथं प्रथम ही गोष्ट कबूल करायलाच हवी, की देशातल्या बहुसंख्य मतदारांनी लोकशाहीसंमत मार्गानं मोदींना पंतप्रधानपदी बसवलं आहे. तेव्हा मतदारांच्या त्या कौलाचं स्वागतच व्हायला हवं. लोकशाही हा डोकी मोजण्याचाच खेळ असतो. लोकशाहीची शक्ती आणि मर्यादाही हीच आहे. त्यामुळे ‘यथा राजा तथा प्रजा’ हे राजेशाहीत जेवढं खरं; तेवढंच ‘प्रजेच्या लायकीप्रमाणे नेता’ हे लोकशाहीत खरं असतं. खुद्द प्रजा बाजाराचा अविभाज्य भाग बनते, तेव्हा नेतेही मार्केटिंगच्याच प्रक्रियेतून येणार हे उघड आहे.

एकेकाळी उदारमतवादी, मध्यममार्गी म्हणून नावाजली जाणारी इथली प्रजा मागच्या आणि याही निवडणुकीत नरेंद्र मोदींसारख्या नखशिखांत भडक रंग असलेल्या नेत्याच्या मागं एवढय़ा बहुसंख्येनं का गेली असेल? कोणताही शक्तिमान नेता हा मुख्यत: काळाच्या रेटय़ातून घडत असतो. चतुर नेता ही काळाची मागणी ओळखतो आणि त्या काळातल्या लोकांच्या भावनांच्या लाटांवर स्वार होऊन सिंहासन काबीज करतो. हिटलर, मुसोलिनीपासून डोनाल्ड ट्रम्पपर्यंतची एकहाती सत्तासूत्रं हस्तगत करणारी माणसं या काळाच्या मागणीचीच प्रतीकं आहेत. अर्थात, या नावांशी मोदींची तुलना करण्याचा हा प्रयत्न नाही. या प्रत्येकाची ‘व्यक्ती’ म्हणून, ‘राजकीय नेता’ म्हणून असलेली बलस्थानं व मर्यादा परस्परभिन्न आहेत. साम्य एकच आहे की, यांच्या उदयामागची कारणं, परिस्थिती खूपच साधर्म्य असलेली आहे.

काँग्रेसच्या ज्या ६०-७० वर्षांच्या कारकीर्दीचा सत्ताधारी नेत्यांकडून हल्ली सातत्यानं नकारात्मक उल्लेख केला जातो, ती कारकीर्द या निवडणुकांत सामान्य लोकांनाही तशीच नकारात्मक का वाटते आहे? इतकी नकारात्मक, की लोकांनी मोदींना अफाट बहुमतानं सत्तेच्या शीर्षस्थानी नेऊन बसवावं? मोदींच्या गत- निवडणुकांतील देदीप्यमान विजयाची कारणं मोदींच्या नव्हे, काँग्रेसच्याच कारकीर्दीत सापडतात. मोदींनी कितीही नाकारलं तरीही या देशाच्या उभारणीमध्ये असलेलं काँग्रेसचं योगदान अजिबातच डळमळीत होऊ  शकणारं नाही. त्याच योगदानाच्या बळावर एकेकाळी काँग्रेसनं दगड उभा केला तरी तो निवडून येई अशी परिस्थिती होती. पाठीशी असलेल्या त्या असामान्य लोकशक्तीचा काँग्रेसनं, विशेषत: सत्तरीच्या दशकात आणि पुढेही आतापर्यंतच्या काळात कितपत आदर केला होता? लोकशाहीच्या नावाखाली काँग्रेसनं प्रांतोप्रांतीचे केवळ सरंजामदार पुन:पुन्हा सत्तास्थानांवर नुसते बसवलेच नाही, तर ते सशक्तही होत राहतील याची अखंड काळजी घेतली. धर्मनिरपेक्षतेला अतिशय बेगडी रूप दिलं. सुप्तपणे जातीवाद जोपासला. सर्वकाळ जाती-धर्माची गणितं लक्षात घेऊन निवडणुकांची तिकिटं दिली. या गोष्टी खऱ्याच नाहीत काय? पिढय़ान् पिढय़ा हेच चालत आल्यावर लोकांना त्याचा उबग येऊ  नये तर काय व्हावं?

काँग्रेसची सत्ताचालनाची ही सुस्त अजगरी शैली हीच आजच्या नरेंद्र मोदींची जननी आहे. मोदींवर रास्त दोषारोपण करताना काँग्रेसच्या अपरंपार चुकांना क्षम्य मानण्याचं काही कारण नाही. विशेषत: काँग्रेसच्या बेगडी धर्मनिरपेक्षतेला मोदींनी उघड धर्मभेदानं कडवट उत्तर दिलं आहे. ज्या गोष्टी काँग्रेसनं कायम आडून आडून केल्या, त्याच मोदींनी अतिशय उघडपणे केल्या आहेत. आजच्या अनागोंदीचे ‘मोदी’ हे मूळ कारण नाहीये; तर ‘मोदी’ हा इथल्या पूर्वापार अनागोंदीचा घाबरवून टाकणारा राजकीय परिणाम आहे.

तरीही- काँग्रेसच्या या पापांच्या पार्श्वभूमीवरदेखील ‘पंतप्रधान’ म्हणून मोदींची कारकीर्द वाईटच आहे, हे वास्तव आहे. ‘पाशवी’ हे विशेषण वापरता येईल एवढं बहुमत हाती असून आणि पक्षात, सरकारात एकहाती सत्ता असूनही मोदींना देशाचं काहीही ठळक भलं करता आलेलं नाहीये. किंबहुना, त्यांच्या काळात विरूपच अधिक घडून आलं आहे. ज्या निश्चलनीकरणाचा, जीएसटीचा सुरुवातीला अवाढव्य गाजावाजा केला गेला, त्या ‘क्रांतिकारक’ निर्णयांचा नुसता उच्चारसुद्धा या निवडणुकीत स्वत: मोदीही करत नाहीत, हीच गोष्ट त्या निर्णयांची फलश्रुती सांगणारी आहे. मोदी त्याबद्दल बोलत नाहीत आणि ज्याबद्दल बोलतात, ते बोललं नसतं तर बरं झालं असतं, असं वाटण्याइतकी त्यांच्या अव्वाचे सव्वा  वायफळ बोलण्यानं अब्रू घालवून घेतली आहे. पंतप्रधान बोलत आहेत तर ते गंभीरपणे ऐकलं पाहिजे असं वाटण्याऐवजी ‘आता हा बावा काय धमाल उडवेल’ याचीच उत्कंठा अधिक लागते. मोदींसारख्या पट्टीच्या वक्त्याला- त्याहूनही देशाचे पंतप्रधानपद भूषवणाऱ्या नेत्याला हे शोभणारं नाही. एवढय़ा महत्त्वाच्या स्थानावर बसलेला नेता तोंड उघडतो आणि लोक चेष्टेनं हसायला लागतात, हे वाईट, गंभीर आहे. परवा- ‘ढगाळ वातावरण असल्यामुळे एअर स्ट्राइक पुढे ढकलावा असं तज्ज्ञ लोकांनी सुचवल्यावर त्याच ढगांच्या आडोशामुळे आपली विमानं पाकिस्तानी रडारवर दिसणार नाहीत असं मी सुचवलं,’ असं मोदी म्हणाले. त्यासंबंधीच्या ‘गुजरात भाजप’च्या ट्वीटवर एका मोदीसमर्थकानं ‘सर, मैं भी भक्त हूँ, लेकीन कसम से ये थोडा ज्यादा हो गया..’ असा प्रतिसाद दिल्याचं वाचलं, आणि आता ‘भक्तां’नाही हे प्रकरण झेपेनासं झालंय की काय, असं वाटून गेलं.

या देशाच्या अर्ध्या भागात सातत्यानं अवर्षण असतं, अर्ध्या भागात सातत्यानं पूरपरिस्थिती असते. ऋतुमान अत्यंत लहरी झालं आहे. ‘कृषिप्रधान देश’ हे बिरूद अभिमानानं मिरवणाऱ्या या भूमीत शेतीचा व्यवसाय शेवटचे श्वास मोजतो आहे. एकूण राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा केवळ १५ टक्क्यांच्या आसपास उरलेला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना खंड नाहीए. जिच्या बळावर महासत्ता होण्याची स्वप्नं आपण पाहत होतो, ती तरुणाई बेकारीनं ग्रासली आहे. निश्चलनीकरण आणि गुंतागुंतीच्या जीएसटीमुळे छोटे धंदे आणि मध्यम उद्योग संकटात आले आहेत. धार्मिक विद्वेष अभूतपूर्व वाढलेला आहे. जातीजातींतला असंतोष सातत्यानं उफाळून येतो आहे. स्त्रियांवरच्या अत्याचारांना पायबंद बसलेला नाहीए. वीतभर गावाच्या गरजेइतकी वीज अजून नीट पुरवता येत नसताना बुलेट ट्रेनबद्दल बोललं जात आहे. देशभर मोठमोठय़ा महामार्गाची बांधणी चालू असताना ग्रामीण भागातले रस्ते मात्र अजूनही ‘डायरेक्देवानंच दिलेल्या अवस्थेत’ आहेत. माझ्या गावात महिन्यातून केवळ तीन-चार वेळा नळाला फक्त दोनेक घागरी पाणी येतं. पुढच्या महिन्यात वेळेवर पाऊस आला नाही तर या नळातून दोनेक घागरी नुसती कोरडी हवा बाहेर येईल. ही माझ्या एका अपवादात्मक गावाची परिस्थिती नाही, हे महाराष्ट्रातल्या व देशातल्या काही लाख छोटय़ा गावांमधलं वास्तव आहे. वाडय़ा-खेडय़ांची पाणीपरिस्थिती तर नेहमीच ‘भीषण’च्या पलीकडची असते.

यंदाच्या निवडणुकीच्या प्रचारात आणि एरव्हीही या कशाहीबद्दल मोदी चकार शब्द काढत नाहीत. ते त्रेतायुगात होऊन गेलेल्या नेहरूंच्या वाईट कारभाराबद्दल बोलतात, पाकिस्तानबद्दल बोलतात. इथले ‘काही लोक’ कसे पाकिस्तानधार्जिणे आहेत याबद्दल बोलतात. सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइकबद्दल बोलतात. समर्थकांच्या मनात उभ्या असलेल्या ‘हिंदू देशभक्त’ या आपल्या बुलंद प्रतिमेला तडा जाणार नाही अशाच गोष्टी त्यांनी जाणीवपूर्वक या निवडणुकीच्या ऐरणीवर आणल्या आहेत. मग दहशतवादाच्या आरोपाखाली कैदेत राहून जामिनावर बाहेर आलेल्या प्रज्ञासिंह ठाकूरला थेट लोकसभेचं तिकीट देणं त्यांना गैर वाटत नाही. त्यांच्या कारकीर्दीत मॉब लिंचिंगला देशभर ऊत येतो, देशभक्त/देशद्रोही असण्याच्या अत्यंत उथळ व्याख्या रूढ केल्या जातात, कुणी आपल्या घरात काय शिजवून खावं हे ठरवण्याचे अधिकार इतरांकडे जातात.. यातल्या कशाहीबद्दल गंभीरपणे काही विधान करावं असं मोदींना वाटत नाही. त्याऐवजी ते ‘बालपणी मगर पकडली, हिमालयात गेलो, पस्तीस वर्षे भिक्षा मागितली, १९८७-८८ साली डिजिटल कॅमेरा वापरला (!)’ वगैरे गोष्टींवर गंभीरपणे बोलतात. त्यांच्या याच लीलांचं त्यांच्या चाहत्यांना अपरंपार कौतुक असतं. निर्बुद्धांच्या एवढय़ा अट्टल टोळ्या त्यांच्यामागं उभ्या आहेत, की परवा ‘टाइम’ या नियतकालिकानं त्यांना ‘डिव्हायडर इन् चीफ’ हे विशेषण बहाल केलं तर तोही त्यांचा सन्मानच आहे असं वाटून त्यांच्या अभिनंदनाची पोस्ट त्यांच्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाकडून लिहिली गेल्याचं जगानं पाहिलं. कींव यावी अशा स्वत:च्या या बिनडोक दैवतीकरणाबद्दलही मोदी अवाक्षर बोलत नाहीत.

‘फूटपाडय़ांचा मुकादम’ असा ‘डिव्हायडर इन् चीफ’चा अनुवाद परवा फेसबुकवर वाचायला मिळाला. ही पदवी सार्थच वाटावी असा एकूण कारभार आहे. देशातल्या जनतेमध्ये यापूर्वी कधीही नव्हती अशी उभी फूट मोदींच्या काळात निर्माण झाली आहे. मोदींचा कारभार वाईट आहे असं सांगणारे सहाशे कलावंत बाहेर आले की लगोलग ‘मोदीच हवेत’ असं सांगणारे नऊशे कलावंत बाहेर येतात. फुटीचं हे लोण कलावंतांपासून, लेखकांपासून खाली समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत जाणीवपूर्वक पेरलं गेलेलं आहे. सगळेच ‘इझम्’ संपुष्टात येऊन केवळ ‘मोदीसमर्थक’ आणि ‘मोदीविरोधक’ अशा दोनच गटांमध्ये मोदींनी देशाला विभागून ठेवलं आहे. या निवडणुकीत हीच फूट देशाचं भवितव्य ठरवणार आहे.

या दोन्ही गटांचा रहिवास एवढय़ा प्रचंड विरुद्ध टोकांवर होतो आहे, की एका ज्येष्ठ आणि जाणत्या पत्रकारानं मागच्या आठवडय़ात लिहिलेली ‘पंतप्रधानांना ‘फुल्याफुल्या’ म्हटले तर चालेल का?’ अशी नोंद दिसली, तेव्हा भाषेच्या त्या ढळलेल्या तोलाचं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही. फुल्यांच्या जागी नेमक्या शिवीचा बोध होईल अशी अक्षररचना त्या वाक्यात अर्थातच केलेली होती. प्रत्युत्तर म्हणून भक्तगणांनीही मग ‘फुल्याफुल्या’ वगैरे शाब्दिक कसरतींचा अजिबात वापर न करता मुक्तकंठानं त्या पत्रकाराच्या झोळीत शिवीमौक्तिकं बहाल केली. समाजातल्या या सर्वस्तरीय ढळलेल्या तोलाचं कारकत्व निर्विवादपणे मोदींकडे आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर त्यांचा ‘कुतिया’ असा उल्लेख करणाऱ्या व्यक्तीला खुद्द मोदी ट्विटरवर फॉलो करत होते याची इथं मुद्दाम आठवण काढता येईल.

‘मोदींनी कितीही द्वेषाची भाषा बोलू देत; माझ्याकडून मी मोदींना केवळ प्रेमच देईन..’ अशा एखाद्या सत्संगातल्या बाबा-बापूच्या तोंडी शोभेल अशा भाषेच्या साह्यनं यंदाच्या निवडणुकीत मोदींचा पाडाव करण्याचं स्वप्न पाहणारे राहुल गांधी स्वप्नपूर्ती करण्यामध्ये कितपत यशस्वी होतील, हे पाहणं मनोरंजक ठरणारं आहे. त्यांचं हे स्वप्न प्रत्यक्षात येऊ  नये यासाठी मोदींपेक्षाही त्यांच्याच पक्षातली मणीशंकर अय्यर आणि सॅम पित्रोदांसारखी मंडळी जोमानं कार्यप्रवण झाल्याचं मागच्या काही दिवसांत पाहायला मिळालेलं आहेच.

तूर्तास आपण २३ मेची वाट पाहूयात.

निवडणुका पूर्वीसारख्या साध्यासुध्या असू देत, की यंदाच्या निवडणुकीसारख्या विखारी बाजारू; जनतेच्या हाती वाट पाहण्याशिवाय काहीच नसतं.

majhegaane@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2019 12:12 am

Web Title: election in india 4
Next Stories
1 ढवळून काढणाऱ्या जगण्याची गोष्ट
2 बेलसरची लढाई
3 विश्वकर्मा
Just Now!
X