News Flash

आणीबाणी

प्रसंग १९७३ च्या फेब्रुवारीदरम्यानचा. स्थळ पुण्याच्या प्रभात रोडवरचा एक बंगला. वेळ रात्रीची. त्या वेळी रस्त्यावरच्या एकूणच दिव्यांची संख्या आणि त्यांची प्रकाशमानता कमी असल्याने दिवेलागणीनंतर रस्त्यावर

| April 12, 2015 12:20 pm

आणीबाणी

प्रसंग १९७३ च्या फेब्रुवारीदरम्यानचा. स्थळ पुण्याच्या प्रभात रोडवरचा एक बंगला. वेळ रात्रीची. त्या वेळी रस्त्यावरच्या एकूणच दिव्यांची संख्या आणि त्यांची प्रकाशमानता कमी असल्याने दिवेलागणीनंतर lok02रस्त्यावर अंधारच असायचा. विश्वास ठेवावा की तेव्हा रात्री नऊ नंतर प्रभात रोड निर्मनुष्य असे. त्या जुन्या दगडी बंगल्यात वरती एक मीटिंग चाललेली. त्यामध्ये ठरणार होते की ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाचे प्रयोग चालू ठेवायचे की बंद करायचे. मीटिंग कुठल्या राजकीय पक्षाची अथवा एखाद्या जहाल संघटनेची नव्हती. तर पीडीए या हौशी नाटय़ संस्थेच्या कार्यकारिणीचीच होती. नाटक बंद करा असा संस्थेवर दबाव होता. याचे मुख्य कारण नाटक हे ब्राह्मणविरोधी आहे आणि नाना फडणवीसांची नालस्ती करणारे आहे. तेव्हाचे एकूण वातावरणच नव्या संवेदनांच्या नाटकांविरुद्ध होते. याला अजून एक कारण म्हणजे त्याच लेखकाचे मुंबईत सुरू असणारे नाटक ‘सखाराम बाइंडर’. हे नाटक अश्लील आहे असा त्यावर आरोप असलेला खटला कोर्टात दाखल झालेला. दोन पाटर्य़ा पडलेल्या. नाटक बंद करा म्हणणारे- त्यात पुण्याचे ज्येष्ठ वकील ग. नी. जोगळेकर, प्रभाकर पणशीकर, विद्याधर गोखले, रंगभूमी संशोधक वसंत शांताराम देसाई, पत्रकार ग. वा. बेहरे आणि काही राजकारणी या आघाडीवर, आणि चालू ठेवा- म्हणणाऱ्यांमध्ये सगळे हौशी प्रायोगिक रंगकर्मी, काही प्रसिद्ध लेखक, विचारवंत, पत्रकार, काही राजकारणीदेखील. दोन्हीच्या मध्ये सामान्य प्रेक्षक. घाशीरामचे पहिले १९ प्रयोग तर निर्विघ्न पार पडलेले. lr04मीटिंग बंगल्यात वरती रंगात आलेली. रस्त्याच्या समोरच्या बाजूच्या फुटपाथवर एकेक जण जमायला लागले तेव्हा रात्रीचे १० वाजून गेलेले. फुटपाथवर एकेक करत सगळे घाशीरामचे कलाकार आपापल्या सायकलीवरून जमायला लागले. घुसमट वाढत होती. उत्सुकता शिगेला पोहोचलेली की मीटिंगमध्ये काय निर्णय होतोय. घाशीरामचे प्रयोग करायचे की नाही? तसा कार्यकारिणीच्या सभेत ठराव येणार होता. यासाठी चर्चेला नाटकाचे दिग्दर्शक जब्बार पटेल आणि अनिल जोगळेकर यांनाच फक्त या मीटिंगचे निमंत्रण होते. फुटपाथवरच्या कलाकारांनी ठरवलं की निर्णय कळल्याशिवाय कुणी हलायचं नाही. आमची गजबज ऐकून फुटपाथजवळच्या बंगल्याच्या मालकांना वाटलं की समोर कुणी गेलंय की काय. त्यांना खरं कारण कळल्यावर मग सतरंजी आणि प्यायला पाणी आणून ठेवलं. फुटपाथवर सगळे सतरंजीवर बसून होते. आम्ही lr06जे करीत होतो त्यास चळवळीच्या भाषेत ‘एखाद्या विचारांना न पटणाऱ्या मुद्दय़ाविरुद्ध निषेधासाठी धरणं धरून बसणे म्हणतात,’ याचे आकलन आम्हाला नंतर झाले. जे होत होतं ते उत्स्फूर्त होतं. आतल्या घुसमटीमधून आलं होतं. समोरच्या बंगल्यातले कोण ठरवणार आम्ही नाटक करायचं की नाही ते? कुणी आम्हाला भडकावलेले नव्हते. पण कमालीची अस्वस्थता होती.
समोरची मीटिंग लांबत चालली होती. ‘नाटय़शास्त्र,  स्तानीस्लाव्की, मेयरहोल्ड, ब्रेश्ट, ग्रोटोवस्की, मेथड अक्टिंग’ या सगळ्यांची ‘फुली फुली’ काढत आमचं सगळं ‘स्टडी सर्कल’ सतरंजीवर बसून होतं. मग वाचलेलं आठवत गेलो की शरीरअभिनयाचा रशियन गुरू मेयरहोल्ड (१८७४-१९४०) याचा मृत्यू १९४० मध्ये स्टॅलिन राजवटीत घडवण्यात आला. त्याआधी त्याच्या बायकोला ठार मारण्यात आलं, बटरेल्ड बेश्टला (१८९८-१९५६) जर्मन नाझी राजवटीत होणाऱ्या घुसमटीपासून १९४१ मध्ये परागंदा होऊन अमेरिकेत काही काळ आश्रय घ्यावा लागला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर मग तो परत येऊन पूर्व जर्मनीत कार्यरत झाला. कोणत्याही विचारांची राजकीय सत्ता देशात जरी असली तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी अधिकाराशीही झगडा हा जगभराच्या कलाकारांना पाचवीला पुजलेलाच असतो. अगदी चार्ली चॅप्लिनदेखील यामधून सुटला नव्हता. तो डाव्या विचारसरणीला पाठिंबा देतो, म्हणून त्याची दीर्घकाळ उलटतपासणी झाली होती. तर तिकडे मुंबईत या सगळ्याचा कर्ता लेखक विजय तेंडुलकर आणि त्यांचे कुटुंब सामाजिक अवहेलनेमधून जात होते. त्यांना शिव्या देणारे धमक्यांचे निनावी फोन, घाण भाषेतली पत्रे येत होती. शिवसेनेने ‘सखाराम बाइंडर’चा चालू प्रयोग उधळला होता. कर्तारसिंग थत्ते नावाच्या एका वल्लीने त्यांना अशी नाटकं लिहिल्याबद्दल छडय़ादेखील मारल्या होत्या. त्या त्यांनी शांतपणे झेलल्याही होत्या. पण तेंडुलकर कमालीचे शांत! शांत कसले स्थितप्रज्ञच होते. ते सोसत होते. उलट आम्हाला धीर देत होते. त्या मानानं आम्हाला बसायला मिळालेली सतरंजी बरी होती. पण अस्वस्थता होतीच.
मीटिंगचे सूप वाजायला अखेर रात्री बारा-साडेबारा वाजले. पीडीए कार्यकारिणीच्या सदस्यांना कल्पना नव्हती की आम्ही समोर धरणं धरून बसलोय याची. सगळे वरिष्ठ सदस्य एकेक करत न बोलताच निघून गेले. lr05जब्बार, अनिल आमच्या बाजूला आले. त्यांच्या चेहऱ्यावरूनच निर्णय काय झाला असावा याचा अंदाज आला. अखेर ‘घाशीराम’चे प्रयोग ‘पीडीए’ने बंद करायचा निर्णय घेतला होता. आणखी दोन वरिष्ठ सदस्य मागून येताना दिसले, ते म्हणजे श्रीधर राजगुरू आणि दत्ता कळसकर.
श्रीधर राजगुरूंना आम्ही अण्णा म्हणायचो. ते वयाने मोठे, पण आमच्यात नेहमी मिसळून असायचे. जवळकीने आम्ही त्याला एकेरी संबोधित असू. त्याचा ‘पीडीए’ संस्थेशी १९५२ पासूनचा संबंध. नाटकांच्या सर्व व्यवस्थेची जबाबदारी अण्णाची. तालमी आयोजित करण्यापासून ते प्रयोग लावणे, नेपथ्य, बस ठरवणे, बुकिंगचा हिशेब घेणे, नाटकात काम करणाऱ्या मुलींच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांची अनुमती मिळवणे. मुख्य म्हणजे संस्थेतल्या सृजनशील कलाकारांच्या मागे भक्कम कोंदण होऊन उभे राहणे हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग आम्हाला जोडणारा दुवा होता. अण्णाच्या पत्नी अनिता राजगुरू या आमच्या वहिनीच. त्या मॉडर्न हायस्कूलमध्ये शिक्षिका होत्या. बालगंधर्व रंगमंदिरासमोरच्या गल्लीमधला त्यांचा ‘मोहोर’ या इमारतीमधला फ्लॅट हेच खरंतर पीडीएचं ऑफिस झालं होतं. त्याच्या घरी आमचे खायचे-प्यायचे लाड होत असत. संस्थेच्या नाटकांतून कामं करणाऱ्या अनेक मुली या वहिनींच्या शाळेतून पास झालेल्या विद्यार्थिनी असत. या दाम्पत्याचा आम्हाला लळा होता. दोघांची जब्बारवर मात्र खास मर्जी. त्यामुळे जब्बार हा सख्खा आणि आम्ही बाकीचे सावत्र अशी चेष्टा होत असे. अनेक तरुण कलाकारांची गुपितं हे दाम्पत्य सांभाळून असे. घाशीराम, महानिर्वाण, महापूर, तीन पैशांचा तमाशा, बेगम बर्वे अशा आमच्या अनेक गाजलेल्या नाटकांची निर्मिती अण्णाने केली. या कामी अरविंद ठकार हा त्याचा खास मदतनीस असायचा. राजगुरू पती-पत्नींनी ‘शिशुरंजन’ या आपल्या संस्थेमार्फत अनेक वर्षे बालनाटय़ाची चळवळ उभी केली. लहान मुलांसाठी दोघांनी असंख्य पुस्तके लिहिली. महाराष्ट्रात सर्वत्र मुलांसाठी कार्यशाळा घेतल्या. हे दोघेही अलीकडेच वृद्धापकाळाने गेले. अरविंद ठकारही गेला. दत्ता कळसकर संस्थेतले एक जुने नट. व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘सती’ या नाटकात प्रमुख भूमिका करीत असत. राज्य शासनात ते मोठे अधिकारी होते. तेही का कोण जाणे, पण आमच्याबरोबर आले.
रात्रीचा एक वाजायला आला होता. आता पुढे करायचं काय? सायकली हातात धरून चालत सगळे अलका चौकात कॅफे रिगलपाशी आले. मग बनमस्का, खारी, गुलकंद टोस्ट आणि अगणित चहा.  यावर चर्चा की नवीन संस्था काढून प्रयोग का करायचे नाहीत? चर्चा पहाटे दोनला थांबवायला लागली. कारण हॉटेल बंद करून लगेच उघडण्याचीच वेळ येणार होती आणि जब्बारला दौंडला परतायचे होते. त्याची ट्रेन पहाटे २.३० वाजता असायची. मग इतक्या रात्री त्याला स्टेशनवर कोणी सोडायचे ही चर्चा. सायकलवाले सुटले. स्कूटर असणारे जे अल्पमतात होते, त्यांच्यात मग वाद सुरू की इतक्या रात्री जब्बारला घेऊन कोण बोंबलत स्टेशनवर जाणार. तेव्हा मनेका गांधींनी आणलेला भटक्या प्राणिमात्रांबद्दलचा कायदा नव्हता, पण रस्त्यांवर रात्री मोकाट कुत्री ही असायचीच. ती हमखास स्कूटरमागे लागत. ते मग एकमेकांत ‘तू जा, तू जा’ करायला लागले की सायकलवाले त्यांना चिडवत की जो जब्बारला स्टेशनावर घेऊन जाईल तो नव्या संस्थेचा अध्यक्ष होईल.. अशी मजा.
काही दिवस गेले. अंदाजे मार्च ७३ च्या पहिल्या आठवडय़ात आमचा प्रकाशक मित्र प्रकाश रानडे यांनी नीलकंठ प्रकाशनातर्फे वसंत कानेटकरांच्या ‘अखेरचा सवाल’ या नव्या नाटकाचे जाहीर वाचन पेरूगेटजवळच्या भोपटकरांच्या वाडय़ात ठरवले होते. स्वत: कानेटकर नाटय़वाचन करणार होते. ते नाटक उत्तम वाचत असत. ‘अखेरचा सवाल’चे नंतर व्यावसायिक रंगभूमीवर भरपूर प्रयोग झाले. विजया मेहता आणि भक्ती बर्वे यांच्या भूमिका खूप गाजल्या. दामू केंकरे यांनी ते दिग्दर्शित केले. तेंडुलकरांच्या या दोन नाटकाबाबत कानेटकर अजिबातच अनुकूल नव्हते. नाटके ‘गरुडांची हवीत गिधाडांची नकोत’ हे त्यांचेच विधान होते. कानेटकर आणि तेंडुलकर या दोघांच्या नाटकांचा त्या वेळचा प्रकाशक प्रकाश रानडे हाच होता. या अस्वस्थतेच्या, तणावाच्या काळात हे दोन्ही नाटककार जर एकाच वेळी टिळक रोडवरच्या नीलकंठ प्रकाशनात आले की प्रकाश टेन्स होऊन त्याची तारांबळ उडत असे. तो एकदम निघूनच जायचा आणि एकटा जाऊन हसत बसायचा. दुकानात हे दोघे सिद्धहस्त नाटककार आणि जोडीला दोन नाटककारांमधला दीर्घ ‘पॉज’. दोघांपैकी कोणीच काही बोलायचे नाहीत. संवाद झालाच तर म्हणजे पुढील प्रमाणे :
कानेटकर : मुंबईला पाऊस कसा काय यंदा?
(स्तब्धता)
तेंडुलकर : ठीक! (प्रदीर्घ स्तब्धता) नाशिकला यंदा द्राक्षांचा सीझन कसा आहे?
कानेटकर : या एकदा नाशिकला बंगल्यावर!
तेंडुलकर : (स्तब्धतेनंतर) हं!
बस्स! प्रत्येकी चाळीस-चाळीस नाटकांचे संवाद लिहिलेल्या या दोन ज्येष्ठ नाटककारांचा संवाद संपला. मी दुकानाचे मालक रानडे कधी येतील याची वाट बघत उभा. उभा म्हणजे अक्षरश: उभा! कारण दुकान लहान. त्यामुळे खुच्र्याही दोनच होत्या किंवा उगीच जास्त माणसं दुकानात नकोत, म्हणून मालकांनी केलेली पुणेरी योजना असावी. वरील संवादानंतर कानेटकरांना कुठेतरी जायचे होते, म्हणून त्यांची एक्झिट झाली. मी तेंडुलकरांना गमतीत विचारलं की, मग कधी निघणार नाशिकला. त्यावर तेंडुलकर पुन्हा एक पॉज घेऊन म्हणाले, ‘मी सहसा बंगल्यावर नाही जात. घरी जातो.’ अशा या दोघांच्या गमती बघायचा योग मला दोन-तीन वेळा आला.
कानेटकरांच्या नाटय़वाचनाला भरपूर गर्दी. वाचन उत्तम आणि प्रभावी झाले. वाचन संपल्यावर पुन्हा सगळे रेंगाळले. सगळ्यांच्याच लक्षात आलेले होतेच की घाशीरामचे प्रयोग बंद झाल्याने आलेली विमनस्कता काही गेलेली नाहीये. मग असं ठरलं की अनिल जोगळेकरनी दिलेले नवीन संस्था काढण्याबद्दलचे पत्र घेऊन दौंडला जायचं. त्याप्रमाणे दुसऱ्याच दिवशी दोन स्कूटर्स घेऊन मी, दीपक ओक, मोहन गोखले आणि सतीश घाटपांडे अशा आम्ही चौघांनी दौंडला जाऊन जब्बारला पत्र दिले आणि उलटा निरोप आणला की, २७ मार्चला आळेकर वाडय़ाच्या गच्चीवर जमायचे. त्या दिवशी नव्या संस्थेची ‘थिएटर अ‍ॅकॅडेमी’, पुणेची स्थापना झाली आणि ७३ अखेर ‘घाशीराम’चे प्रयोग परत सुरू झाले. २७ मार्च हा दिवस दर वर्षी ‘जागतिक रंगभूमी दिन’ म्हणून ‘युनेस्को’तर्फे पाळला जातो हे आम्हाला खूप नंतर कळले.
याही वेळेस आणीबाणी नव्हती. मग शासनाने अधिकृत पुकारेपर्यंत ही आणीबाणी असते तरी कुठे? कुठे दडलेली असते सैतानासारखी? का बसलेली असते लपून आपल्या प्रत्येकात, आपल्यातल्या असहिष्णुतेच्या स्फोटाची वाट बघत? नक्की कशानं घडतो हा स्फोट? कोण घडवतं हा स्फोट? कोणता विचार? एक साधं नाटक करायचं तर केव्हढं हे रामायण! सत्ता कोणाचीही असो, आणीबाणी घटनेनुसार अधिकृत असो वा नसो, कलेलाच काय रोजच्या जगण्यालाही असहिष्णुतेचा सामना सतत करावाच लागतो. आपल्यामधली असहिष्णुता म्हणजे हिमनगच. फक्त टोकच बाहेर, बाकीचा भाग आत खोलवर. या आपल्या आतल्या असहिष्णुतेचे संतुलन रोजच्या जगण्यात प्रत्येकाने २४x७ राखणे हा सध्या सगळ्यांचाच एक मोठा जिकिरीचा जागतिक उद्योग होऊन बसलेला आहे. तेव्हा म्हणा, ‘सखाराम, घाशीराम, नथुराम, गीता, बायबल आणि कुराण.. परत म्हणा.. सखाराम, घाशीराम, नथुराम..’
 
तळटीप : ‘शार्ली हेब्डो’नंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलच्या झालेल्या वैचारिक गुंतागुंतीवर आमचे लेखक मित्र, विचारवंत डॉ. राजीव नाईक यांचा सखोल चर्चा करणारा उत्तम लेख ‘साधना साप्ताहिका’च्या एप्रिल ११, २०१५ च्या अंकात आला आहे.(उत्तरार्ध)                                           

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2015 12:20 pm

Web Title: emergency and marathi play sakharam binder
Next Stories
1 आणीबाणी
2 ‘ओ.. बाबाजान’
3 ‘ओऽऽऽ बाबाजान..’
Just Now!
X