News Flash

सरमिसळ

बाबूजींचे गाणे मला नेहमी हेलावून टाकते. मुलीचा बाप होण्याचे सद्भाग्य या जन्मी न लाभल्यामुळे ती अनुभूती या आयुष्यात तरी नाही.

| September 28, 2014 01:03 am

हे‘‘सासुऱ्यास चालली लाडकी शकुंतला,
चालतो तिच्यासवे तिच्यात जीव गुंतला’’
बाबूजींचे गाणे मला नेहमी हेलावून टाकते. मुलीचा बाप होण्याचे सद्भाग्य या जन्मी न लाभल्यामुळे ती अनुभूती या आयुष्यात तरी नाही. पण पुतणी, भाची या भारदस्त नात्याने हक्काने डोक्यावर बसलेल्या अनेक कुलोत्पन्ना सुकन्यांची पाठवणी करताना आत काहीतरी हललेले आहे हेच खरे. ‘एका डोळ्यात हसू आणि एकात आसू’ हा वाक् प्रयोग आपण अनेकदा करतो आणि त्याचा प्रत्यक्ष प्रत्ययही जवळजवळ सर्वानाच कधी ना कधी आलेला असतो. का होते ही भावनांची सरमिसळ, याचा विचार मला आज करावयाचा आहे.
आनंद, हास्य, वेदना, दु:ख, समाधान, संताप, तृप्ती-अतृप्ती, क्रोध-कौतुक, मन:शांती-मत्सर अशा परस्परविरोधी धाग्यांनी वस्त्र विणले जाते आयुष्याचे. स्वेटर विणताना एक उलटा, एक सुलटा घालावा तसे. मानवी मनाचा थांग लागत नाही आणि एकाच वेळेला एकापेक्षा अधिक भावनांना ते सामोरे जाते हेही खरेच. वैद्यकीय परिभाषेत त्याला Ambivalence असे भारदस्त नावही लाभलेले आहे. भावना ज्या संप्रेरकांनी आणि मेंदूतील केंद्रिबदूंनी नियंत्रित होतात, त्यांना एकाच वेळी सूचना मिळाल्याचा परिणाम असो वा प्रतििबब रूपाने एकापासून दुसऱ्याचे उद्दीपन होणे असो.. माणसं हसता हसता रडतात आणि दु:खाचे कढ येत असतानाही चेहऱ्यावर स्मितरेषा फुलतात, हे सत्यच आहे.
कोणत्याही भावनेच्या प्रकटीकरणाला एक पूर्वनियोजित मर्यादा असते. ती ओलांडली गेली की भावनेचा अतिरेक होतो आणि मग नेमकी तिच्याविरुद्ध भावना प्रकट होऊ लागते. मनोवैज्ञानिक जगतामध्ये हे अस्थिरतेचे लक्षण मानले जाऊन काळजीची गोष्ट बनते. कारण अशा वेळेस भान सुटून हातून अपकृत्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लहान मुलाचा जन्म झाला, की कळत-नकळत आई-वडिलांच्या छत्राखाली वाढताना बाळावर विविध भावनांचे संस्कार होऊ लागतात. लाडात वाढणाऱ्या चांदोब्यावर जेव्हा शिस्तीचे संस्कार होऊ लागतात, तेव्हा त्याला आईबद्दल प्रेम आणि राग या दोन्ही भावनांचा अनुभव येऊ लागतो. एकाच वेळेला या परस्परविरोधी भावनांची सरमिसळ झाली की, त्याला प्रत्युत्तर देताना त्या वाढत्या मुलाच्या हातून चुका घडू लागतात. अनेकदा या भावनांच्या आंदोलनांचे प्रतििबब शालेय जीवनात आणि नंतर कामाच्या ठिकाणीही पडलेले दिसून येते. मग जीवघेणी स्पर्धा, लालसा आणि मत्सर या भावनांना एकाच वेळी खतपाणी घालते. आपल्या कामात मदत करणाऱ्या आपल्या ज्युनिअरचे कौतुक असते, पण एकदा का तो त्याच्या कामात आपल्यापेक्षा वाक्बगार ठरू लागला की, कौतुकाची जागा स्पर्धात्मक मत्सर घेऊ लागतो आणि त्याचेच पर्यवसान क्रोधात होते. ‘शिष्यात् ईच्छेत् पराजयम्’ म्हणणे सोपे आहे, सहन करणे कठीण, हे मी वैद्यकीय विश्वात अनेकदा अनुभवले आहे.
या भावनांच्या भेळीचे मिश्रण नीट जमले नाही की, आंबट-तिखटपणा वाढलाच म्हणून समजा. मग पेप्टीक अल्सर, मायग्रेन, टेन्शन, हेडएक, इरिटेबल बॉवेल सिन्ड्रोम अशा शारीरिक व्याधीही मागे लागतात आणि Ambivalent behaviour चा शिक्का माथी बसतो.
या सर्वावर नियंत्रण ठेवायचे तर एकंदरीत भावनांच्या प्रकटीकरणावर काबू ठेवणे गरजेचे आहे. माझ्या अगदी सुरुवातीच्या काळात, ‘Sanjay, Never wear your heart on your shoulders’ हा माझ्या एका अधिष्ठात्यांनी दिलेल्या सल्ल्याचा अर्थ मला उर्वरित काळात चांगलाच समजला आणि तरीही कधी कधी तोल जातो हे खरे आहे. पाच मिनिटांपूर्वी हसत-खेळत बोलणारे कुलगुरू अचानक जमदग्नी का झाले, याचा संभ्रम सहकाऱ्यांना पडणेही स्वाभाविक आहे. बरं, ‘आता माझी सटकली’ असे म्हणणे कुलगुरूला शोभत नाही. चूक माझीच असते. भेळेची भट्टी अजून नीट जमली नाही, हेच खरे.
भावनांची गल्लत ही अशी होते.. मुळात कोणतीच भावना इतरांपासून फारशी फारकत घेतलेली नसते. लहानपणी भूमितीत आपण एकावर एक अशी अनेक समकेंद्रित वर्तुळे काढायचो.. तशा या भावना असतात. आवडीतून प्रीती, प्रीतीतून मोह, मोहातून मद, मदातून मत्सर, मत्सरातून असूया आणि असूयेतून अघोरी अपराध. लाजरेपणातून संकोच, संकोचातून अंग चोरणे, अंग चोरण्यातून अलिप्तता, अलिप्ततेतून तटस्थता.. तटस्थतेतून वैराग्य. शाळेच्या आठवीच्या इयत्तेत आमच्या वेळी मॉडर्न मॅथेमॅटिक्सचे खूळ आले. व्हेन डायग्रॅम काढताना एकमेकांना कुठेतरी स्पर्श करणारी, छेद देणारी काही भाग सामायिक ठेवणारी वर्तुळे दिसू लागली. दोन-तीन वर्तुळांच्या एकत्रित सादरीकरणातून आम्हाला छळणारी गणिते निर्माण झाली. भावनांची सरमिसळ ही अशीच अनपेक्षित.. अकल्पित. म्हणून तर अनेकदा स्वजनाच्या विरहाच्या शोकाकुल प्रसंगातही माणसे विसंगत चर्चा करताना दिसतात. अप्रस्तुत प्रश्न विचारतात. अतिदु:खाची परिस्थिती कधी आत्मक्लेशात होते. या साऱ्याच्या मुळाशी भावनांची गल्लत असते. मनातले विचार प्रकट करायचे तर ते भरकटतात आणि वेगळ्याच कृतीला जन्म देतात.
.. पण म्हणून भावना बंदिस्त कोंबडय़ासारख्या खुराडय़ात नाही ठेवता येत. इकडून तिकडे दाणे टिपत गुर्टुगु करणाऱ्या पारव्यासारख्या त्या मोकळ्याच असायला हव्यात.
.. भावनांची वर्तुळे गल्लत झाल्यासारखी एकमेकांमध्ये गुंतायलाच हवीत. जिम्नॅस्टिक्स करणाऱ्या खेळाडूकडे पाहा.. अडकलेल्या कडय़ांमधून कमनीय शरीर वाकवून काढतानाच तर खरे कौशल्य दिसते. उगाच नाही, ऑलिम्पिकची कडी एकमेकांत गुंफलेली राहतात!
.. घरी आलो. टीव्हीवर कोणता तरी सिनेमा चालू होता. हिरोईन हिरोच्या उघडय़ा शर्टाच्या बाजूंना धरून हिरोच्या अस्वली छातीवर डोके घुसळून, पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणत होती, ‘I hate you, I hate you.’ मला काही कळले नाही. चिरंजीव म्हणाले, ‘सोड रे, हा फंडा तुझ्या समजण्यापलीकडचा आहे.’ मी पडत्या फळाची आज्ञा शिरसावंद्य मानली.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2014 1:03 am

Web Title: emotions regulation from brain
टॅग : Brain,Emotions
Next Stories
1 पराभव की प्रगल्भता ?
2 वन-लाइनर्स
3 समझोते आणि सर्वोत्तमता
Just Now!
X