प्रशांत कुलकर्णी – prashantcartoonist@gmail.com

खरं तर चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी ‘पर्यावरण’ हा शब्दच फारसा चलनात नव्हता. साहजिकच नद्या, जंगलं, हिमालय, समुद्र वगैरे फारसे प्रदूषित नव्हते. पण जसजसा ‘पर्यावरण’ या शब्दाचा वापर वाढला, अभ्यास सुरू झाला, लोकजागृती झाली आणि त्याचदरम्यान बेसुमार जंगलतोड सुरू झाली, नद्यांचं प्रदूषण वाढलं, हिमालय वितळू लागला आणि समुद्राच्या पाण्याची पातळीही वाढू लागली.

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण

त्यानंतर एकीकडे पर्यावरणविषयक आंतरराष्ट्रीय परिषदा सुरू झाल्या, लाखो लेख लिहिले जाऊ लागले आणि दुसरीकडे प्रदूषणही वाढतेच राहिले. शेवटी या कल्पनेबाहेर वाढत चाललेल्या प्रदूषणाचे भयावह चित्र जनतेला कळावे म्हणून जगभरातले अनेक व्यंगचित्रकार पुढे सरसावले. त्यांच्या तिरकस दृष्टिकोनामुळे पृथ्वीवरच्या मानवाच्या चिंताग्रस्त चेहऱ्यावर किंचित हास्य पसरलं, त्याला या संकटाची जाणीव झाली आणि पर्यावरणवाद्यांनाही हायसं वाटलं. धोक्याची जाणीव करून देणारी हीच ती व्यंगचित्रकारांची अद्भुत ज्ञानरेषा असं म्हटलं तरी चालेल. रोजच्या रोज लाखो टन कोळसा, तेल, पाणी आणि हवा यांचा राक्षसी वापर करणारे औद्योगिक क्षेत्र असंच वाढत राहिलं तर या पृथ्वीचं काय होईल हे प्रभावीपणे रेखाटलं आहे रुमानियाचे व्यंगचित्रकार यूजिन तारू यांनी.

मुंबईतल्या बोरीवली नॅशनल पार्कमध्ये असंख्य बिबटे आहेत. हळूहळू सर्व बाजूंनी आक्रमण होत गेल्याने नॅशनल पार्कचं क्षेत्र कमी झालं. नाइलाजाने हे बिबटे बाहेर पडले आणि कधी गोरेगावात, तर कधी आयआयटी- पवईत, तर कधी ठाणे इथल्या गृहसंकुलांतून ते दिसू लागले. त्यामुळे साहजिकच घबराट उडाली. नॅशनल पार्कला कुंपण घालण्याची मागणी होऊ लागली आणि यथावकाश ते काम पूर्णही झालं. सोबतच्या व्यंगचित्रात दुसऱ्या भागात ते जंगल आणि त्याच्या भोवतीचं कुंपण दिसतंय. पंचवीस वर्षांत ‘जंगल’ नक्कीच वाढलं; फक्त त्याचा प्रकार बदलला, इतकंच. अर्थात मानवाने स्वत:च्या बेबंद वर्तणुकीला वेळीच कुंपण घातलं असतं तर ही वेळ आलीच नसती, हेही खरं आहे.

पर्यावरणाची हानी टाळायची असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याची माहिती, कारणे, उपाय इत्यादी लवकरात लवकर पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे; भले मग त्यासाठी पर्यावरणाची हानी झाली तरी बेहत्तर!!! (म्हणून तर पर्यावरणाच्या आंतरराष्ट्रीय परिषदांना जगभरातून हजारो लोक महागडे इंधन खर्च करून जातात ते पर्यावरण वाचवण्याच्या हेतूनेच!) हीच भावना पीटर ब्रुक्स यांनी वीस वर्षांपूर्वी रेखाटली.. ती आजही लागू पडते.

पूर आणि दुष्काळ यांनी पर्यावरणाचा समतोल बिघडेल आणि एकीकडे प्रचंड पाऊस पडेल, तर दुसरीकडे महादुष्काळ असं भाकित शास्त्रज्ञ करत आहेत. हा दुष्काळ इतका प्रचंड असेल की ध्रुवावरचं बर्फही वितळेल अशी भयानक भविष्यवाणी ते करत असतात. युक्रेनच्या जुरीझ कोसोबुकीन या व्यंगचित्रकाराने काही निवडक रेषांमधून उत्तर ध्रुवावरच्या अतिबर्फाळ प्रदेशातही दुष्काळामुळे जमीन भेगाळेल असं भीषण दु:स्वप्न चितारलं आहे.

जोएल रॉथमन हे अमेरिकी विद्वान गृहस्थ. छोटय़ांसाठी आणि मोठय़ांसाठी अनेक विनोदप्रचुर पुस्तकं त्यांनी लिहिली. त्याशिवाय ते उत्कृष्ट ड्रम वाजवतात. पण अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ते व्यंगचित्रकार आहेत आणि त्यांचा विनोद हा उत्तम दर्जाचा उपहासात्मक विनोद आहे. ‘इवन द बर्ड्स आर कफिंग!’ (रेवियट लिमिटेड प्रकाशन) हा त्यांचा पर्यावरणविषयक व्यंगचित्रांचा संग्रह. पुस्तकात डाव्या बाजूला पर्यावरणावर आधारित एखादा झकास विनोद आणि उजव्या पानावर त्यांचं असंच टप्पल मारणारं व्यंगचित्र असं या पुस्तकाचं स्वरूप आहे. पुस्तक उघडल्यावर पहिल्याच व्यंगचित्रात त्यांनी त्यांच्या विनोदाची जातकुळी दाखवून दिली आहे. हॉटेलवरच्या रूममध्ये सकाळी अंथरुणातच आळस देत नवरा बायकोला म्हणतोय, ‘‘वा मार्था! किती छान शहर आहे हे. सकाळी उठल्या उठल्या इथे पक्ष्यांचं मधुर आवाजातलं खोकणं ऐकू येतं!’’ प्रदूषणामुळे मानवाबरोबर इतर प्राणिमात्रांचाही जीव गुदमरतोय.. त्यामुळे पक्षीसुद्धा खोकताहेत- ही कल्पनाच अंगावर काटा आणते.

त्यांची चित्रकला साधीच आहे. जेमतेम दोन पात्रं. फारशी पाठीमागची दृश्यं वगैरे नाहीत. चेहऱ्यावरचे हावभाव विषयानुरूप; पण त्यात फारसे डिटेलिंग नाही. क्वचित काळ्या शाईचा कोट वगैरे रंगवण्यासाठी वापर आणि साध्या पेनानं केलेलं रेखाटन.. पण त्यातला विनोद आपल्याला बोचणारा आहे, हे नक्की!

एका व्यंगचित्रात सकाळी फिरायला जाताना वडील आपल्या लहान मुलाला सहज विचारतात, ‘‘तुला मोठेपणी काय व्हायचंय?’’ मुलगा निर्विकारपणे म्हणतो, ‘‘मला जिवंत राहायचं आहे!’’

एका व्यंगचित्रात प्रयोगशाळेत शास्त्रज्ञांना एवढा आनंद झालाय, की हातातल्या मायक्रोस्कोपकडे बघत ते म्हणतात, ‘‘यापूर्वी मी कधीच हे पाहिलेलं नाही! कदाचित शुद्ध हवेचा एखादा सूक्ष्म कण असावा!’’

‘‘बाहेर जाऊन प्रदूषित हवेत श्वास घेण्यापेक्षा घरात बसून सिगारेट ओढणं कमी धोकादायक आहे..’’ असं समर्थन त्यांच्या एका व्यंगचित्रातली व्यक्ती करते. ‘‘बाहेर जाऊन खेळू नकोस! उगाच फुप्फुसं खराब होतील!’’ असं आपल्या मुलाला दटावणारी आई इथे आहे. ‘‘पाण्याचा फॉम्र्युला आता बदलावा लागेल..’’ असे इथले शास्त्रज्ञ म्हणतात!!

हल्ली प्रत्येकजण ‘रिसायकल केलेली गोष्ट वापरा, म्हणजे पर्यावरणाचं रक्षण होईल’ असा उपदेश करत असतो. एका ग्रीटिंग कार्डच्या दुकानात ‘आमची सर्व कार्ड्स ही रिसायकल पेपरने केलेली आहेत’ असा फलक वाचल्यावर एक महिला उद्विग्नपणे म्हणते, ‘‘जेव्हा ते पेपरपासून पुन्हा झाड बनवतील तेव्हाच ते खरं रिसायकलिंग असेल!’’

क्षणात एखादा दृष्टान्त देण्याची ताकद व्यंगचित्रकलेमध्ये असते, ती ही अशी!