12 July 2020

News Flash

नाटकवाला : ‘एपिक गडबड’

बाब्या या ऑल इन वन घरकाम करणाऱ्या हुशार (स्ट्रीट स्मार्ट) गडय़ानं हा वर शोधलेला आहे. किंबहुना तो कोणत्याही क्षणी पोहचणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मकरंद देशपांडे

विल्यम शेक्सपिअर आपल्या थडग्यातनं २०१८ साली उठला आणि थडकला मुंबईच्या पृथ्वी थिएटरमध्ये. आत गेला थेट. होता फक्त अंधार आणि ऐकू आलं संभाषण अपिरिचित माणसांचं. पण त्याच्या नाटकांची भाषांतरं हिंदीतही झाल्याने ते काय बोलत होते ते त्याला कळत होतं. एक तरुण मुलगी तिच्या होणाऱ्या वराची वाट पाहत होती. तिची आई आणि मामासुद्धा त्याच उत्साहाने तिला पाठिंबा देत होते. तरुणीचं नाव आरती. तिला तिचं लग्न एका ऐतिहासिक कुटुंबात करायचं होतं. म्हणजे महाराष्ट्राच्याच नाही, तर हिंदुस्थानच्या इतिहासातील महत्त्वाचं असं पेशवे घराणं, त्यातील अगदी लांबचं नातं असलेला, अगदी कितव्याही पिढीतला असला तरी चालेल अशा वराशी (कुमाराशी) करायचं होतं.

बाब्या या ऑल इन वन घरकाम करणाऱ्या हुशार (स्ट्रीट स्मार्ट) गडय़ानं हा वर शोधलेला आहे. किंबहुना तो कोणत्याही क्षणी पोहचणार आहे. आता सगळे अंधार दूर व्हायची वाट पाहत आहेत आणि शेक्सपिअरच्या पावलांनी त्यांची उत्कंठा वाढते. वाटतं की, पेशव्यांच्या कुटुंबातील कोणी विवाहोत्सुक कुमार घरापर्यंत पोहचला आहे. त्यांची उत्सुकता शिगेला पोहचते. वीज परत येते. अंधार दूर होतो आणि समोर पेशव्यांचा कुमार नाही, तर साक्षात एक रोमन पोशाखातील व्यक्ती पाहून क्षणभर सगळ्यांच्याच डोळ्यांसमोर अंधारी येते, तेव्हा ‘मला वर ऐतिहासिक पाहिजे,’ असाच तिचा अट्टहास असल्यानं वर पेशवा नसून रोमन असण्याला हरकत नाही. मग जेव्हा रोमन व्यक्तीबद्दल त्यांना माहिती मिळते की, ती व्यक्ती स्वत: विल्यम शेक्सपिअर आहे, तेव्हा आरतीच्या आनंदाला सीमा उरत नाही. ती तात्काळ बेशुद्ध होते. आई तिला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करते, पण फक्त विल्यमच तिला शुद्धीत आणू शकतो. म्हणजे आरतीला अगदी विल्यमने लिहिलेल्या रोमिओ-ज्युलिएटसारखं एका नजरेत प्रेम होतं. पण तिच्या मामाचं म्हणणं असतं की विल्यमच्या नाटकाची शक्यतो शोकांतिकाच प्रसिद्ध आहे. आरती जर त्याच्यापासून दूर राहिली नाही तर तिचीही शोकांतिकाच होईल, पण आता उशीर झालाय. कारण विल्यमच्या वाणीतून निघालेला प्रत्येक शब्द म्हणजे रत्न आणि वाक्य म्हणजे दिव्य हार.

आरतीला कसं थांबवावं हेच मुळी मामाला कळत नाही. कारण आरतीबरोबर आईलासुद्धा शेक्सपिअरच्या वाणीची भुरळ पडलेली असते. शेक्सपिअर आपल्या घरात का आला आहे याची मामा अगदी आदरपूर्वक चौकशी करतो. तेव्हा त्याला एका मोठय़ा नाटय़मय मेलोड्रामाचा उलगडा होतो.

शेक्सपिअर खरं तर थडग्यात असताना त्याच्या नाटकांच्या होणाऱ्या असंख्य प्रयोगांना गेली ४०० वर्षे दाद देत आहे. कधी डोकं धरून, कधी कूस बदलून, कधी थडग्यावर थाप मारून, तर कधी एखाद्या डोळा उघडून, तर कधी आपल्या प्रसिद्धीला दूषणं देऊन हिंदुस्थानातल्या महाराष्ट्र राज्यात, मुंबई शहरात त्याच्या लाडक्या ‘किंग लिअर’ शोकांतिकेचा फार्स करण्याचा प्रयत्न केला गेला, त्यामुळे तो थडग्यातून उठून पहिल्यांदा बाहेर आला आहे आणि त्याला त्या नाटककाराला भेटून जाब विचारायचा आहे.

ज्यांना तो आत्ता भेटला आहे, ते त्या नाटककाराला ओळखतात, पण त्याची भेट घडवून आणायला असमर्थ आहेत. पण बाब्या ही जबाबदारी स्वत:वर घेतो आणि त्याला घेऊन पृथ्वी कॅफेमध्ये जातो. आपल्या नेहमीच्या जागी तो नाटककार बसलेला असतो. आता बाब्यामुळे विल्यम नाटककाराशी संवाद साधायला तोंड उघडतो, पण त्याच्या तोंडून शब्दच बाहेर पडत नाहीत. तेव्हा त्याला एका भयानक वास्तवतेची जाणीव होते. ती अशी की, तो नाटककार आत्ता जे नाटक लिहीत आहे तेच आतमध्ये प्रयोगासारखं साकार होत आहे आणि मामा, आरती, आरतीची आई, बाब्या, पेशव्यांचा कुमार ही सगळी पात्रे आहेत एका फार्समधली, ज्याचं नाव आहे ‘एपिक गडबड.’ आपल्या थडग्यातून उठून इथपर्यंत पोहचलेला विल्यम शेक्सपिअर त्याच नाटकाचा भाग आहे; किंबहुना तोसुद्धा एक पात्र आहे ‘एपिक गडबड’ नाटकाचा. तो तेव्हाच बोलू शकतो, जेव्हा नाटककार त्याला बोलू देईल.

पुण्याहून घोडय़ावर स्वार होऊन आलेला पेशव्यांचा दूरचा किंवा शनिवारवाडय़ाच्या आजूबाजूला राहणाऱ्या कुटुंबीयांच्या पंधराव्या पिढीतील कुमार पोहचतो.. आरतीचा हात मागण्यासाठी, पण आरती तर आता विल्यमच्या प्रेमात आहे. कुमारला आरतीशी लग्न करायचं आहे आणि विल्यमला नाटककाराला धडा शिकवायचा आहे. आता तो आपल्या डोक्याने नाटकाच्या आतली सूत्रं हलवायला लागतो.

तो पहिल्यांदा बाब्याला नोकरवर्गाच्या गुलामीतून बाहेर पडून नाटकाचं प्रमुख पात्र होण्याची महत्त्वाकांक्षा देतो. मामाजी हे स्वत:ला प्रमुख पात्र समजत असतात आणि त्यांची बहीण कॉमेडियन, मुलगी आणि कुमार हिरो-हिरोईन आणि बाब्या एक साईड रोल करणारा. बाब्यावर विल्यम एक सॉनेट (चौदा ओळींची कविता) लिहितो. आता बाब्या धिंगाणा घालायला सुरुवात करतो. तो बळजबरीनं नाटकाची सूत्रं हातात घेतो.

आरतीच्या विवाहासाठी कुमार आणि विल्यममध्ये शब्दांचं युद्ध सुरू होतं. कुमार हा योद्धा असल्यानं त्याच्याकडे शब्द नाहीत आणि आता विल्यम जिंकणार, पण तेव्हा विल्यम स्वत:ला या युद्धातून बाहेर ठेवतो. आरती विरुद्ध कुमार असं एक अतिशय फार्सकिल युद्ध होतं आणि कुमार हरतो. आरती विल्यमशी लग्न करणार असं ठरतं, पण त्यावेळी मामाजींच्या रिटायरमेंटची घोषणा होते. मामाजी कायमचे रंगभूमी सोडून जाणार असतात. कारण आता बाब्या प्रमुख पात्र झालेला आहे. त्यांच्या बहिणीला बाब्यानं नुसतं कॉमेडियन नाही, तर सेकंड लीड रोलचं प्रमोशन दिलंय. त्यामुळे ती त्याच्या बाजूने आहे.

मामाजींच्या निवृत्ती समारंभात शेक्सपिअर इंग्रजी भाषेत स्वत:ची अशी वाक्ये म्हणतो, जी अख्ख्या विश्वात सुवर्णवाक्ये ठरली आहेत. आरती त्याचं मराठीत रूपांतरण करते आणि आपल्या लक्षात येतं की विल्यमने नाटककाराच्या फार्सला शोकांतिका बनवलं आहे आणि त्याच वेळी त्याचा आवाज बंद केला जातो. घोषणा होते की विल्यमचा आवाज नाटककाराने बळजबरीने बंद केला आहे. अंधार होतो.

पुन्हा प्रकाश आल्यावर आरती एकटी रडत असते. विल्यम निघून गेलेला आहे. आता बाब्या नाटककाराने ताजा लिहून दिलेला शेवटचा प्रवेश वाचतो. त्यानुसार आरतीचं लग्न हे कुमारशी होणार आहे, जो खराखुरा वारस नसून एक डमी अ‍ॅक्टर आहे. बाब्यानेच त्याला आणलेलं असतं.

शेक्सपिअर यायचं कारण असं की, ‘शेक्सपिअरचा म्हातारा’ लिहून झाल्यावरसुद्धा नाटककाराच्या मनातून शेक्सपिअर जात नसतो, म्हणून त्याला नाटकात आणून त्याला नाटकातूनच एक्झिट देणं हा मार्ग नाटककाराला सापडतो. आता त्यामुळे आरतीचा प्रेमभंग झाला असला तरीही प्रेमभंग कोणाशी झाला, हा इतिहास कधीही न विसरता येण्याजोगा असल्यानं आरती खूश आणि तिची आईही खूश. कुमार आणि आरती घोडय़ावर बसून पुण्याकडे निघतात. विल्यम अचानक दिसतो. तो त्या दोघांना हात वर करून आशीर्वाद देतो.

या फार्सचं पहिलं वाचन मी घरी केलं, ते एका विलक्षण वेगाने- म्हणजे साधारण हॉकीची मॅच रेडिओवर ऐकावी त्या वेगाने. दीप्ती नवल ही माझी खूप जुनी मैत्रीण, त्या वाचनाला उपस्थित होती. तिला या वेगाची आणि वेडाची धाप लागली ऐकून.

मी मंचन करण्यासाठी जेव्हा अभिनेते निवडले, तेव्हा त्यांना फक्त एवढंच सांगितलं की तुमच्याकडे जर सकाळी उठून थेट रिहर्सल आणि रात्री घरी एवढा वेळ द्यायला असेल तरच तालमीला या. सहा रांगडे, तगडे, शिस्तप्रिय, विश्वसनीय कलाकार मला मिळाले आणि एक जुना मित्रसुद्धा- जो स्वत: आता एक नामवंत दिग्दर्शक आहे- निशिकांत कामत. तो तालमीला आला, हसला आणि मध्येच मला म्हणाला की, ‘‘जरा माझ्या ऑफिसला येतोस का?’’

मी चहा प्यायला म्हणून त्याच्या ऑफिसला गेलो. पण तो होता एक छान, छोटा बंगला- त्याच्या मेहनतीनं त्यानं विकत घेतलेला. तो मला म्हणाला, ‘‘ही बाहेरची ओपन स्पेस.’’ खरं तर तिथं त्याचं मोठ्ठ टेबल होतं. छान कलात्मक बाकडंही होती, खुर्च्या होत्या. तो म्हणाला, ‘‘तू इथे का नाही तालीम करत?’’ निशिकांतनं माझ्या एका एकांकिकेत अभिनय केला होता, पण त्याहीपेक्षा तो नेहमीच माझ्या नाटकांचा प्रेमळ समीक्षक आणि प्रेक्षक होताच. तो पुढे म्हणाला, ‘‘हे बघ किचन, हेही तुझंच. तुला, तुझ्या टीमला चहा, जेवण करून द्यायला दोघंजण असतील. मला आवडेल, जर या वास्तूत तुझ्या नाटकाची तालीम झाली तर.’’ त्या दिवशी मला असं वाटलं की, देव आहेच. कारण मला अशी जागा हवी होती जिथे मी रोज १२ तास तालीम करू शकेन आणि रंगमंचाच्या वेडसर भक्तीमुळे तो देव निशिकांतच्या रूपाने प्रकटला. दोन ते तीन महिने आम्ही तिथे खूप खूप तालमी केल्या आणि निशिकांतने आमचे खूप खूप लाड केले. अगदी पंचतारांकित हॉटेलमधून केकसुद्धा मागवला! देव त्याला खूप देवो !

‘एपिक गडबड’चं नाव आधी ‘गडबड’ होतं. आशुतोष गोवारीकर या माझ्या मित्राने तालीम पाहिली आणि म्हणाला, ‘‘ही गडबड एपिक आहे. याचं नाव नुसतं गडबड नको.’’ मी लगेच म्हणालो- ‘‘एपिक गडबड!’’

अभिजीत साटमने हिंदीतला प्रयोग पाहून ठरवलं की, या नाटकाचे मराठीत व्यावसायिक प्रयोग करायचे आणि त्याने ते पूर्ण विश्वासाने केले. आकांक्षा गाडे, भरत मोरे, संजय दधिच, माधुरी गवळी, अजय कांबळे, निनाद लिमये या अख्ख्या टीमने अफलातून प्रयोग केले. मुळात या नाटकातला वेडेपणा हा कुठल्याही प्रवेशात एका-दोघांमुळे नव्हता. तो सतत सहा घोडे-घोडी  भरधाव धावत असल्याने होता. जरी वैयक्तिक बक्षिसं माधुरी गवळी आणि निनाद लिमयेला मिळाली असली तरी या नाटकाचे सहा खंदे फलंदाज म्हणून मी लेखक-दिग्दर्शक या नात्याने अख्ख्या टीमला सांघिक विजेतेपद देईन.

माधुरी गवळीने माझ्या एका बालनाटय़ात पुतनाची रिप्लेसमेंट केली होती. मग तिला ‘शेक्सपिअरचा म्हातारा’मध्ये एक छोटी, आंधळ्या दवंडीकाराची भूमिका दिली, जी तिने अप्रतिम वठवली. तिचे विनोदी अंग लक्षात घेऊन तिला ‘एपिक गडबड’मध्ये मध्यवर्ती भूमिका दिली. ती तिने सहज पार पाडली. या नाटकामुळे तिचा फॅन क्लब तयार झाला आहे. निनाद लिमयेने साकारलेला शेक्सपिअर मला विलक्षण वाटला. कारण त्यात मराठी भाषेतलं फार्समधलं काव्य, इंग्रजी भाषेतलं शेक्सपिरिअन सत्य प्रेक्षकांसमोर मांडणं फारच अवघड आहे- जे त्यानं उत्कृष्टपणे आणि अस्खलित उच्चारांनी केलं. भरत मोरेने कुमार इतका बेमालूमपणे केला की, तो माझा हमखास टोलेबाजी करणारा हार्दकि पंडय़ा ठरला. अजय कांबळेने बाब्या करताना मला त्याच्यात एक लांब पल्ल्याचा नट दिसला. तो सर्वागीण नट आहे. संजय दधिचनं माझ्याबरोबर खूप वर्षे काम केलं, पण फार्स कधीच केला नव्हता. त्याच्यासाठी या नाटकाच्या तालमी एखाद्या नवकलाकारासारख्या होत्या, पण त्याने फार लवकर ते टायिमग पकडलं. मराठीत प्रयोग करताना अंकित म्हात्रे मामाजी करायचा, ज्याला जात्याच विनोदी अंग आहे आणि खूप छान सूर-ताल आहे. अशा नटांना मी श्रीमंत नट म्हणेन. आकांक्षा गाडेने आरती करताना फार्सकिल प्रेम, फार्सकिल प्रेमभंग, कुमारबरोबरचं फार्सकिल शब्दयुद्ध करताना धम्माल उडवून दिली. तिच्या कुमारबरोबरच्या युद्धात प्रेक्षक हसून थकतात.

जय नाटक! जय प्रयोग!

जय कामत! जय मत्री!

mvd248@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2019 4:06 am

Web Title: epic gadbad marathi comedy play makrand deshpande drama abn 97
Next Stories
1 संज्ञा आणि संकल्पना : ..जिथून पडल्या गाठी
2 गवाक्ष : खपली
3 द्वैभाषिक लिखाणाचा दुस्तर घाट..
Just Now!
X