‘मारवा’ ही माझी कथा मी ‘सत्यकथा’कडे पाठवली. ती ‘सत्यकथा’च्या दिवाळी अंकात आली. १९७८ वगैरे साल असावं. ‘मारवा’ हा सायंकालीन राग आहे. संधिप्रकाशाचा. तो मी दोन पिढय़ांतल्या बदलासाठी वापरला होता. या कथेला मी ‘मारवा’ हे नाव दिलं नव्हतं. दुसरंच दिलं होतं. कथा वाचल्यावर राम पटवर्धन मला म्हणाले की, ‘या कथेला इतर कुठलंही नाव देण्यापेक्षा ‘मारवा’ हे नाव देऊ या का? कारण त्यातून दोन पिढय़ांतल्या बदलाची सांधेजोड योग्य तऱ्हेने व्यक्त होते.’ पटवर्धन कथेकडे अशा सूक्ष्म पद्धतीने पाहत असत. त्यांचं संपादन असं बारकाव्याचं होतं. ‘मारवा’ या माझ्या कथासंग्रहातील लघुकथांवर राम पटवर्धन यांच्या संपादनाचा हात फिरलेला आहे.
तसंच ‘अत्तर’ या माझ्या दुसऱ्या कथेचं. ही दोन मित्रांच्या मैत्रीची कथा आहे. पुढे या मित्रांच्या मैत्रीचा ऱ्हास होत जातो, त्याचबरोबर त्यांच्या सांपत्तिक स्थितीचाही. त्यावेळी त्यांची मैत्री कसाला लागते. मैत्रीचा उत्कर्ष आणि श्रीमंतीचा उत्कर्ष, मैत्रीचा ऱ्हास आणि श्रीमंतीचा ऱ्हास असा हा प्रवास आहे. पुढे त्यांचा अहंकार जाऊन ते दोघे एकत्र येतात. मी या कथेत श्रीमंत मित्राचा शेवटी मृत्यू दाखवला होता. त्यावर पटवर्धन म्हणाले, ‘मित्राचा अहंकार जातो तिथंच कथेचा शेवट करायला हवा. मित्राच्या अहंकाराचा मृत्यू झाला आहे तिथं पुन्हा शारीरिक मृत्यूची गरज का वाटते?’ त्यांचं म्हणणं अगदी बरोबर होतं. मला ते पटलं. त्यानुसार मी या कथेचा शेवट केला. आणि ती कथा वेधक झाली.
असंच तिसरं उदाहरण सांगता येईल- ‘रुक्मिणी’ या कथेचं. ही कथा मी फ्लॅशबॅक पद्धतीने लिहिली होती. तिच्याविषयी पटवर्धन मला म्हणाले की, ‘लग्नाला उभ्या राहिलेल्या रेणुकाचा प्रवास नीट उभा राहत नाही. तो कालानुक्रमे सांगितला तर ते परिणामकारक होईल.’ आणि तसंच झालं. ही कथा कालानुक्रमे लिहिल्यावर तिला अनुभवांचे अनंत धुमारे फुटले.
माझी ‘निवडुंग’ ही कथा पटवर्धन यांना अजिबात आवडली नाही. त्यांनी ती प्रसिद्धही केली नाही. मग मी ती ‘अक्षर’ या दिवाळी अंकाकडे पाठवली. तिथं ती छापून आली. ती चांगली कथा आहे असं मला वाटतं. पण पटवर्धन यांचं मत मात्र तेच होतं.
राम पटवर्धन हे अतिशय नेमके प्रश्न विचारून कथेत काय करायला पाहिजे, याचं भान देत. त्यांच्याबाबत असं म्हटलं जातं की, ते जास्त आग्रही असत. पण तसं नव्हतं. आम्हा लेखकाचाच अनुभव जोरकसपणे कसा पुढे येईल, एवढंच ते पाहत. लेखकाच्या लेखनाचा त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास पटवर्धन करायचे. त्यातील लहानसहान खाणाखुणा, खाचखळगे ते शोधून काढत असत. थोडक्यात, पूर्ण अभ्यास केल्याशिवाय ते बोलत नसत. त्यांनी वाचलेल्या एखाद्या कथेबद्दल त्यांना खूप वर्षांनी विचारलं तरी ते त्याविषयी तपशीलवार सांगत. लेखकाची कथा ते पूर्ण साक्षेपाने, चारी बाजूंनी पाहत. याचबरोबर ते लेखकाच्या लेखकपणाचा सन्मानही करत. त्यांच्याबरोबरची चर्चा हा समपातळीवरचा हृद्य संवाद असे.
असाच आणखी एक किस्सा. ग्रेस यांची एक कविता पटवर्धन यांना आवडली नाही. त्यांनी ती स्वीकारली नाही. त्यामुळे ग्रेस दुखावले गेले. ती पुढे अंतरकरांच्या ‘हंस’मध्ये छापून आली. त्यावर पटवर्धन यांनी खुलासा केला की, ‘मला ती समजली नाही. लोकांनी मला काही विचारलं असतं तर मला काही सांगता आलं नसतं. ती माझी वैयक्तिक असमर्थता आहे.’
संपादक म्हणून ते अतिशय प्रामाणिक होते. स्वत:वर प्रेम न करता लेखकाच्या लिखाणावर प्रेम करणं, त्याविषयी साक्षेपाने बोलणं ही मोठी गोष्ट आहे.