21 February 2020

News Flash

प्रत्येकाला आपला शब्द सापडो…

शब्दांच्या रानात हरवलेल्या प्रवाशाच्या हाती लागलेला पांढराशुभ्र प्रकाशाचा गोळा आपल्या आतल्या अंधाऱ्या कोपऱ्यात डोकावलं तर आपल्यालाही दिसतो. पण काव्यनिर्मितीचा हा क्षण शब्दारण्यात फेरफटका मारणाऱ्या प्रत्येकाच्या

| December 30, 2012 03:40 am

शब्दांच्या रानात हरवलेल्या प्रवाशाच्या हाती लागलेला पांढराशुभ्र प्रकाशाचा गोळा आपल्या आतल्या अंधाऱ्या कोपऱ्यात डोकावलं तर आपल्यालाही दिसतो. पण काव्यनिर्मितीचा हा क्षण शब्दारण्यात फेरफटका मारणाऱ्या प्रत्येकाच्या वाटय़ाला येतोच असं नाही. अगदी चांगलं लेखन करणाऱ्याच्या हातीही तो वारंवार लागतोच असंही नाही. भाकडकाळ येतोच प्रत्येकाच्या वाटय़ाला. पण निर्मितीविना जाणारे दिवसही महत्त्वाचे असतात त्याच्यासाठी. खूप काही पाहत, अनुभवत असतो लेखक. ते अनुभव नेणिवेत साठवण्याचे आणि पुढच्या लेखनासाठी बेगमी करण्याचे हे दिवस असतात. यातला एखादा अनुभव मनाच्या दारावर धडका मारत राहतो आणि लेखकाला त्याचा शब्द सापडतो.
प्र त्येक सुरुवातीनंतर शेवट हा असतोच. तो चुकवता येत नाही माणसाला. मीही ‘शब्दारण्या’च्या शेवटाकडे आले आहे. अर्थात, माझ्या या शेवटानंतर कोणीतरी नवी सुरुवात करणार आहेच. पण गेले काही दिवस या ‘शब्दारण्या’त फिरताना छान वाटत होतं. आपल्याला हव्या त्या शब्दांशी खेळत वर्ष कसं गेलं कळलं नाही. ‘शब्दारण्य’ हे सदर संपलं असलं तरी हे अरण्य आपल्या सर्वाच्या आजूबाजूला असणारच आहे. त्यातल्या विशाल, विचारी झाडांची सावली पसरून राहणार आहे आपल्या जगण्यावर. अनेक प्रश्नांचे भुंगे फिरताना दिसणार आहेत उत्तराच्या शोधात. सूर्याची चटका देणारी किरणं थेट पोचतील कधी पानांआडून. पण पानापानावर पडलेला, सुखद गारवा आणणारा एखादा दंवाचा थेंब आपल्याही वाटय़ाला येईलच. त्या थेंबाच्या आशेवरच जगत असतात माणसं. तो इथंच मिळण्याची शक्यता जास्त. मानवी भावभावनांच्या गुंत्याच्या मुळ्या तर खोल रुतलेल्या असतात इथल्या मातीत. त्यात अडकून पडलेल्या लेखकाची आणि चांगल्या वाचकाची तर सुटका नसतेच या अरण्यातून..
गेलं वर्षभर बरंच काही घडलं. देशाचं सांस्कृतिक, सामाजिक, आíथक आणि राजकीय जीवन ढवळून टाकणाऱ्या घटनांनी हे वर्ष गाजलं. आणि आता २०१२ चा शेवट गाजतो आहे तो दिल्लीतल्या सामूहिक बलात्कार प्रकरणानं. स्त्रीचं दमन करण्याचे विविध प्रकार शोधणाऱ्या पुरुषाला न जुमानता बाया घराबाहेर पडल्या, स्वत:च्या अस्तित्वाचा विचार करू लागल्या, स्वत्त्व शोधू लागल्या; हे या पुरुषी मानसिकता असलेल्या व्यवस्थेला सहन होत नाही. म्हणून शेवटचा घाव मर्मावरच घातला जातो आहे का? अब्रू, पावित्र्य वगरे शब्द शरीराशी जोडलेल्या समाजात बायांना नामोहरम याच पद्धतीनं करता येतं असं तर वाटत नाही ना, या अशा मानसिकतेच्या पुरुषांना? की ती वस्तू आहेच; मग तिच्या प्रियकरानं वापरली काय किंवा मी वापरली काय, असा काय फरक पडणार आहे तिच्या जीवनात, अशी भूमिका असते या विकृत मनोवृत्ती असणाऱ्या लोकांची? रोज येणाऱ्या बलात्काराच्या बातम्यांनी मन सुन्न होत असतानाच कोणीतरी संसदेत म्हणतंय- ‘बायकांना आरक्षण नको, तर संरक्षण हवं आहे.’ म्हणजे पुन्हा पिता, पती, मुलानं स्त्रीचं रक्षण करावं, या विचाराकडे हे पुरुष बायकांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करताहेत. बलात्कार वडीलही करताहेत, नवरे तर हक्कानं करताहेत; आणि त्यांच्या समोरही होताहेत, हे लक्षात घेतलं जात नाही. त्यामुळेच आता स्त्रिया स्वत: कोणत्याही राजकीय पक्षाचा पािठबा नसताना या अन्यायाविरोधात आंदोलनं करण्यासाठी रस्त्यावर उतरताहेत. आणि मुख्य म्हणजे त्यांच्या जोडीला विचार करणारे पुरुषही येताहेत, हे महत्त्वाचं वाटतं. असो.
याच सदरात या विकृतीविषयी लिहिलं आहे मी. त्यामुळे आज जास्त बोलणार नाही. पण शब्दांनीही मूक होऊन जावं अशा घटना घडत असताना मनातली अस्वस्थता वाढत जाते. केवळ स्त्रीच्या बाबतीतच हे होतं आहे असं नाही. एकूणच माणसाच्या मनातलं क्रौर्य वाढत चाललं आहे. त्यात अलीकडे क्वचित एखाद्या प्रकरणात स्त्रीही क्रौर्याची परिसीमा गाठताना दिसते आहे. िहसा ही माणसाच्या जगण्याची अपरिहार्यता झाली आहे असं वाटावं अशी परिस्थिती आहे. आपल्या मनात वाढत चाललेलं भय, असुरक्षिततेची भावना आणि त्यासोबत जगण्यासाठी कराव्या लागलेल्या संघर्षांतून मनावर आलेलं दडपण हलकं करण्यासाठी हा िहसक मार्ग आपलासा करतो आहोत का आपण? बायका-मुलांवर तर सहज हात टाकला जातोय. आणि त्यापुढे जाऊन वाटेत येणाऱ्या कोणालाही आपण वेठीस धरू लागलो आहोत. आणि त्यात लहान-थोर सारेच आहेत. हे कशाचं द्योतक आहे? उलटा प्रवास सुरू झाला आहे का आपला? आणखी किती शतकं मागे जाणार आहोत आपण? असा प्रश्न मनात उभा राहतो. संस्कृतीच्या कितीही गप्पा केल्या तरी माणसात लपलेलं हे जनावर अधूनमधून डोकं बाहेर काढत असतंच. ते जनावर मग कसलाही विचार न करता हल्ला करत राहतं स्वत:वरच, स्वत:मध्ये लपलेल्या माणूसपणावर.
रोज घडत असतं असं काहीतरी विपरीत कुठं कुठं. आपण ऐकतो, वाचतो त्याबद्दल. सुन्न होऊन जातो काही क्षण. आणि पुन्हा शिरतो आपल्याच कोशात. आपलं सुख, आपलं दुख, आपली वेदना, आपल्या भूमिका यांना गोंजारत राहतो. क्वचित कधीतरी माध्यमांनी दोन घटकांपुरती केलेली चर्चा ऐकतो आणि विसरूनही जातो. काहीजण मात्र बाहेर पडतात आपल्या कोशातून आणि पाहतात आजूबाजूला. कृतक आíथक संपन्नतेनं तरारून आलेल्या हिरव्यागार झाडाच्या बुंध्याला लागलेल्या या वाळवीचं कारण ते शोधू पाहतात. माणसात लपलेलं जनावर मारण्याचे उपाय शोधतात. आजच्या जगण्याच्या मुळाशी वाळवीसारखी लागलेली ही िहसा, हे क्रौर्य आजच्या लेखकांनाही अस्वस्थ करीत आहे. त्यांच्या लेखनातून त्याच्याबद्दल ते बोलू पाहताहेत. माणसाच्या मनात वसलेल्या, अनंत भुका असलेल्या या जनावराविषयी ते लिहिताहेत. माणसाच्या या आदिम प्रवृत्तीबरोबरच त्याच्यात असलेल्या करुणेचाही ते फार उत्तमरीत्या शोध घेताहेत.
आजचं हे वास्तव अत्यंत टोकदारपणे आपल्या कवितेतून, कथा-कादंबऱ्यांतून मांडण्याचा प्रयत्न लेखक करत आहेतच. आजचे प्रश्न आणि त्यांची तीव्रता अत्यंत संवेदनशीलपणे ते हाताळत आहेत. पण ते हाताळताना जी भाषा वापरावी लागते, ती भाषा ते प्रभावीपणे वापरताहेत की नाही, हे प्रश्न ज्या लोकांपर्यंत पोचवायचे असतात त्या लोकांपर्यंत पोचवण्यात ते यशस्वी होताहेत की नाही? हाही प्रश्न आहे. सामान्य माणूस पुस्तकांपासून दूर जात असल्याची तक्रार सतत होत असते. पण तो का दूर जातो आहे, याचा विचार लेखकांनीही करायला हवा. आजचं हे वास्तव मांडताना किंवा आजच्या जगण्यात आलेलं कोरडेपण दाखवताना काही लेखकांची तसेच कवींची भाषाही अलीकडे कोरडी होत चालली आहे का? नव्वोदत्तरी कवींनी किंवा अलीकडच्या काही कथाकारांनी कवितेत आणि कथेत जो शुष्कपणा आणला आहे, त्यामुळे माणसाचं भावनिक कुपोषण होतं आहे, हे आजच्या प्रयोग करणाऱ्या लेखकांनी समजून घ्यायला हवं. हे असंच लिहिलं गेलं तर शब्दारण्यात एकही कोवळं रसरशीत पान सापडणार नाही. सारा कोरडा पाचोळा उरेल आणि तो वाऱ्यावर उडून जाईल.. कोणाच्याही मनाला स्पर्श न करता. असं झालं तर येणाऱ्या काळातील वाचक साहित्याकडं पाठ फिरवतील. तसं काहीसं चित्र आज दिसू लागलं आहे हे नाकारता येणार नाही.
जागतिक वाङ्मय वाचणारे, समीक्षेचा अभ्यास करणारे, त्यानं प्रभावित होणारे अनेक लेखक-कवी आज आशय आणि फॉर्मबरोबरच भाषिक प्रयोग करू पाहताहेत. ते करायला हवेतच. पण ते करताना त्यांनी हे लक्षात घ्यायला हवं, की तुमची भाषा वाचकाच्या मनाचा ठाव घेत असते. त्याच्या काळजाला भिडणारं लेखन आज होतं आहे का, याचाही विचार करायला हवा. जागतिक कीर्तीच्या अनेक लेखकांनी त्यांच्या काळाबद्दल, त्या काळातील माणसांबद्दल, त्यांच्यात लपलेल्या िहसेविषयी तसेच त्यांच्या मूल्याविषयी किंवा मूल्यांच्या ऱ्हासाविषयी आणि जगण्यातल्या निर्थकतेविषयी लिहिताना भावभावनांचाही उत्कट आविष्कार केलेला असतो. त्यांच्या लेखनात थेट काळजालाच हात घालणारी एखादी प्रतिमा अत्यंत बोलकी होऊन साऱ्या परिस्थितीवर भाष्य करत असते. ‘The snow here was tiring, irritating, terrorizing…’ असं जेव्हा ओऱ्हान पामुकच्या ‘स्नो’ या कादंबरीतला निवेदक म्हणतो; तेव्हा माणसाच्या जगण्यालाच वेढून राहिलेला हा थकवा, वैताग आणि ही दहशत अगदी नेमकेपणानं वाचकांपर्यंत पोचते. गॅब्रिएल माक्र्वेझ ‘नो वन राइटस् टू कर्नल’ या कादंबरीत सरकारची अनास्था आणि आपला मुलगा गमावून बसलेल्या कर्नलची व्यथा किती नेमक्या शब्दांत मांडतो- ‘ ‘Twenty  years of waiting for the little coloured birds which they promised you after every election, and all we’ve got out of it is a dead son. Nothing but a dead son.’ .’ या ओळींतून व्यक्त होणारी खंत आणि असहायतेची जाणीव अंगावर येणारी असते.
मानवी भावभावना इतक्या तीव्रतेनं आणि तरलपणे व्यक्त करण्याचं सामथ्र्य केवळ सर्जनशील लेखकांमध्येच असतं. प्रतिभाबितिभा काही नसते, लेखक हा केवळ कुशल कारागीर असतो, असं आज काही समीक्षक जरी म्हणत असले तरी ती असतेच कुठंतरी दडलेली. ‘स्नो’ या कादंबरीमधील नायकाला कविता सुचते तो क्षण अतिशय सुंदर रीतीनं पामुकनं रंगवला आहे. तो म्हणतो- ‘He heard the call from deep inside him, the call he heard at moments of inspiration, the only sound that could ever make him happy: the sound of his muse. For the first time in four years, a poem was coming to him. Although he had yet to hear the words, he knew that it was already written.’
शब्दांच्या रानात हरवलेल्या प्रवाशाच्या हाती लागलेला हा पांढराशुभ्र प्रकाशाचा गोळा आपल्या आतल्या अंधाऱ्या कोपऱ्यात डोकावलं तर आपल्यालाही दिसतो. पण काव्यनिर्मितीचा हा क्षण शब्दारण्यात फेरफटका मारणाऱ्या प्रत्येकाच्या वाटय़ाला येतोच असं नाही. अगदी चांगलं लेखन करणाऱ्याच्या हातीही तो वारंवार लागतोच असंही नाही. काहीतरी हाती लागण्याचा तो क्षण प्रत्येक सर्जनशील लेखकाला हवासा वाटत असला तरी चार- चार र्वष तो आपल्याजवळ फिरकतही नाही; तेव्हा कोणत्या अस्वस्थतेतून लेखक वा कवी जात असेल, हे त्याच्याशिवाय कोणाला कळणार?
भाकडकाळ येतोच प्रत्येकाच्या वाटय़ाला. पण निर्मितीविना जाणारे दिवसही महत्त्वाचे असतात त्याच्यासाठी. खूप काही पाहत, अनुभवत असतो लेखक. ते अनुभव नेणिवेत साठवण्याचे आणि पुढच्या लेखनासाठी बेगमी करण्याचे हे दिवस असतात. यातला एखादा अनुभव मनाच्या दारावर धडका मारत राहतो आणि लेखकाला त्याचा शब्द सापडतो. असा शब्द सापडण्याचे क्षण पुढील वर्षांतच नाही तर कायमच प्रत्येक सर्जनशील लेखकाच्या आयुष्यात येत राहोत. प्रत्येकाला आपला आवाज लोकांपर्यंत पोचवता येवो आणि हा आवाज पोचवण्यासाठी त्याला त्याचा शब्द सापडो. नव्या वर्षांच्या शुभेच्छा आणि माझ्या लेखनावर भरभरून प्रेम केल्याबद्दल सर्व वाचकांचे आभार! (समाप्त)

First Published on December 30, 2012 3:40 am

Web Title: everyone find out his own word
Next Stories
1 उपभोगशून्य स्वामी!
2 जागतिकीकरणाचा मानवी चेहरा
3 शिवाजीराजांचे पहिले सामाजिक पत्र
X