तुमच्या हे लक्षात आले आहे काय? सध्या महाराष्ट्रदेशी अचानकच व्यायामाचे वेड वाढले आहे. जिकडे पाहावे तिकडे माणसे ‘हाशहुश्श’ करीत आहेत. कोणी धावते आहे, कोणी पळते आहे. व्यायामशाळांमध्ये हाऊसफुल्लचे बोर्ड लागले आहेत. तालमींमध्ये जागा उरलेली नाही. सगळ्या मैदानांत सक्काळच्या पारी जणू मुंबई महापौर म्याराथॉन भरतेय..
आता पावसाळा हा काय व्यायामाचा मोसम आहे? या कालखंडात माणसाची पचनसंस्था मंदावलेली असते. त्यामुळे व्यायामानंतर दूध, बदाम, खारका अशा खुराकाचे सेवन करता येत नाही. तसे केल्यास वेगळाच व्यायाम घडण्याची दाट शक्यता असते. तेव्हा व्यायाम करायचा असतो तो गोड गोड हिवाळ्यात. (आम्हांस विचाराल तर मुळी व्यायाम हा करायचाच नसतो. का, की ती गोष्टच मुळी अनैसर्गिक आहे. वाघ, सिंह.. झालेच तर गाढव, पाणघोडा हे कधी व्यायाम करतात का? तेव्हा आम्ही कधीच व्यायामात शक्ती वाया घालवत नाही. त्याऐवजी घरी ‘लाइफबॉय’ आणून ठेवतो! त्याने आपोआपच आरोग्याचे रक्षण होते. हल्ली वेगवेगळे फॅन्सी साबण वापरण्याची फॅशन आली आहे. त्यामुळे घरात आरोग्य वास करीत नाही आणि मग लोकांना असे सक्काळी सक्काळी बंबात गोवऱ्या जाळाव्यात तशा व्यायामात क्यालऱ्या जाळत बसावे लागते. आता आमचे हे मत गोव्याच्या मंत्र्यांच्या वळणावर जात आहे याची आम्हांस नम्र जाणीव आहे. पण आहे ती वस्तुस्थिती आहे. मांसाहारामुळे बलात्कार वाढतात, त्याचप्रमाणे साबणामुळे अनारोग्य वाढते! (सिम्पल!!)
तर सांगत काय होतो, की संपूर्ण महाराष्ट्राची महाजिम झाली आहे. परवा राष्ट्रवादीच्या कार्यालयी गेलो, तर मा. पक्षाध्यक्षांच्या दालनात सुनीलभाऊ  तटकरे चक्क दोरीवरच्या उडय़ा मारत होते, म्हणजे बघा! त्यांचा श्वास फुलला होता. अंगावर घामाचे सिंचन झाले होते. आम्हांस पाहताच त्यांनी मानेनेच ‘बसा’ म्हणून खूण केली आणि पुन्हा आकडे मोजू लागले.. ‘पन्..धरा, सो..ओळा, स..त्तरा..’
मनीं म्हटले, हे आता २८८ शिवाय थांबणार नाहीत. तेव्हा हातानेच ‘तुमचं चालू द्या, नंतर येतो-’ अशी खूण करून बाहेर पडलो.
तशातही जाता जाता आम्ही खात्री करून घेतलीच. दोरी सुनीलभाऊंच्याच हातात होती! अजितदादा दालनात नव्हते! नंतर चौकशी केली तेव्हा समजले, की पलीकडच्या बैठकीच्या खोलीत ते लंगोट कसून सर्वागास राईचे तेल लावून बसले आहेत.
लाजून पळालोच आम्ही तेथून!   
जाता जाता काँग्रेसच्या मुख्यालयाची खबरबात घ्यावी म्हणून डोकावलो तर तेथे वेगळेच चित्र! मा. माणिकराव ठाकरे (अजून तरी!), अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश- येईल त्याच्या हातात चिमटी चिमटी शिलाजित टिकवत होते. मागे कोणीतरी टेपरेकॉर्डर लावलेला होता. ‘चला, चला. जल्दी करा. दिल्ली के गांधी आयुर्वेदिक फार्मसी का बलपुष्टिकारक, ओजवर्धक, दौर्बल्यनाशक एवं धातुपौष्टिक शिलाजित. खास हिमालय से लाई हुई रामबान दवा. मोफत मोफत मोफत..’

फुकट मिळत असूनही कोणी पुढे येत नव्हते, हे नवलच होते. बहुतेक पुढे येऊन उभे राहण्याइतकीही ताकद कुणाच्या अंगात राहिलेली नसावी. माणिकरावांबद्दल मनीं अचाट सहानुभूती ठेवूनच आम्ही तेथून बाहेर पडलो.    
भाजपच्या मुख्यालयी पोचलो, तो तेथे रा. रा. विनोदजी तावडेजी उभ्या उभ्या संतापलेले.
‘श्शा! एवढी मेहनत केली त्याचा काय उपयोग झाला?’
हातातला डंबेल त्यांनी दाणकन् खाली आपटला. ‘दोन महिने इथं घाम गाळतोय. ही बेटकुळी बघा बेटकुळी..’
‘महाराष्ट्र श्री’सारखी पोज घेत त्यांनी दंडावरची इडलीएवढी बेटकुळी दाखविली.  
‘अशी ताकद येण्यासाठी मेहनत करावी लागते. अजून पंधरा दिवस थांबले असते तर सिक्स पॅक काढून दाखवले असते. हे हे पाहिलंत?’
एका फरशीकडे त्यांनी बोट दाखवलं. तिचा छोटासा कपचा उडाला होता.
‘समर्थ जोरबैठका काढत तेथे खड्डा पडला होता. आम्ही जोर काढून काढून ही लादी फोडली. एकटय़ाच्या स्वबळाने..’
‘मग?’
‘मग आता स्वबळावर लढायला नको?,’ त्यांनी सात्विक संतापाने विचारले. भाजपमध्ये संताप सात्विकच असतो! आणि वाद ‘मतभेद’!
‘व्वा व्वा, असे कसे? लढायलाच पाहिजे.’ आम्हांस असे सल्ले द्यावयास काय जाते? तुम लढो, हम हमारा कपडा सम्भालेंगे!
‘पण ते म्हणतात- तूर्तास स्वबळाचा विचार सोडा.. कसा सोडायचा? मग आजवर केला तो व्यायाम फुकटच गेला?’
संतापाने त्यांचा चेहरा कसनुसा झाला होता.
‘असा कसा फुकट जाईल व्यायाम? त्याने काहीही पचवायची ताकद वाढते ना! आता उद्धवजींचेच पाहा..’
‘काय?’
‘तेसुद्धा तिकडे सकाळ-संध्याकाळ व्यायाम करून बेटकुळ्या काढताहेत.’
‘काय सांगता? तेही व्यायाम करताहेत?’
‘तर! पचनसंस्था बळकट करायलाच हवी ना त्यांना. अपमान पचवायची वेळ काय सांगून येते काय? अखेर राजकारणात चार दिवस सुनेचेही असतात!’
हे ऐकले मात्र अन् विनोदजींचा चेहराच फुलला.
दोन्ही हाती डंबेल्स घेऊन ते व्यायामास लागले.
महाराष्ट्रात कोण, कधी आणि कशासाठी व्यायाम करील ते सांगता येत नाही, हेच खरे!