दोन आठवडय़ांच्या अथक धडपडीनंतर अखेरीस सदाशिव गेला. जेव्हा त्याला ‘आयसीयू’त अ‍ॅडमिट केले, तेव्हाची भेट आठवली. नाकात ऑक्सिजनच्या नळय़ा असूनही बोलला, ‘मला तुझी अलीकडची दोन पुस्तके पाठव. मी इथं कुणाकडून वाचून घेईन.’ मी म्हटलं, ‘पुण्याला गेल्या गेल्या पाठवून देतो.’ त्याला खूप हसवले. तो हसलाही. त्याच्या काळय़ा त्वचेवर वाढलेले दाढीचे पांढरे खुंट उठून दिसत होते. नाकपुडय़ांचा गोलाईचा आकार जाऊन त्याचे वृद्ध माणसाचे होते तसे सरळ रेषांनी सीमित केलेले रुंद नाक झाले होते. केसांचा काळा रंग उडून त्याचे पांढऱ्या- काळय़ा मिश्र रंगात रूपांतर झाले होते. हा सदाशिव वेगळाच होता. आजारी पडल्यानंतर पहिल्यांदाच पाहत होतो. त्या आजारपणाने त्याला कुठल्या कुठे नेऊन टाकले होते. जशी त्याच्या जाण्याची सुरुवात तेव्हापासूनच झाली होती.
पण असे मी आत्ता म्हणतोय. तेव्हा वाटले होते, तो बरा झाला की हे सगळे बदलेल. परत टवटवी येईल. दाढी करता येईल, केस रंगवता येतील, वगैरे. खोल गेलेला आवाज जरा खणखणीत होईल. होणारच ना! हे काय त्याचे जायचे वय आहे का? माझ्यापेक्षा पाच-सात वर्षांनी तो लहान आहे ना. माझ्या आधी कसा जाईल तो? किंवा दुसऱ्या शब्दांत- माझ्या आधी त्याने जाऊन कसे चालेल?
माझा तो मित्र होता, पण मैत्रीला आणखी एक झाक होती. शिष्यत्वाची. माझे एरवीचे मत आहे, मी कुणाचा गुरू नाही. पण एखादा मित्र आपल्याकडून शिकत असेल त्याला काय म्हणायचे? मागे एकदा आमचे फोनवर बोलणे झाले होते. तो सारखा धाप लागल्यासारखे बोलत होता. सगळे बोलणे निराशेचे. मी त्याला म्हटले, ‘मित्रा, जरा खणखणीत बोल की रे! असा विचार काय करतोस? सगळे असून? आता ऊठ, बेसिनवर जा. मस्तपैकी तोंड धू. मस्तपैकी गरम गरम चहा पी. मस्तपैकी ड्रेस चढव, छानपैकी फिरून ये. आल्यावर मस्तपैकी आडवा हो. एक आवडते पुस्तक काढ आणि मस्तपैकी वाचत पड.’
तो हसत म्हणाला,  ‘हा तुझा ‘मस्तपैकी’ शब्द आहे ना, तो मला मस्तपैकी आवडलाय. आता उठतोच.’ मी म्हणालो, ‘कसा उठणार? साधाच उठणार?’ तो हसला. म्हणाला, ‘नाही नाही, मस्तपैकी उठणार.’ पुढे कधी फोन केला, विचारलं, ‘कसा आहेस?’, तो म्हणाला, ‘अर्थात मस्त.’
हा त्याचा मूड काही दिवस टिकायचा. परत नंदाचा (त्याच्या बायकोचा) फोन यायचा, ‘जरा त्यांना पुण्याला बोलावून घे रे. तुझ्याकडून आले की काही दिवस बरे असतात.’ मी नकळत त्याचा कौन्सिलर झालो होतो की काय? आमच्या मित्रपरिवारातला आनंद (नाडकर्णी) हा खरा कौन्सिलर. मी कुठला? सदाशिव आनंदकडे अधूनमधून जायचोही. आनंदगोळय़ाही त्याला सुरू होत्याच.
पण सावरण्यासाठी मित्रांची मदत त्याला का घ्यावी लागावी? त्याचे हिंदी सिनेमातले करिअर संपल्यात जमा होते. अधूनमधून सदाशिव मराठी सिनेमात,  मालिकांमध्ये, क्वचित सुमित्रा-सुनीलच्या फिल्ममध्ये कामे करीत होताच. पण ते करिअर संपल्याचे त्याला फ्रस्ट्रेशन आले होते काय?
त्याचा नट म्हणून जो वकूब होता, त्याचे चीज हिंदी सिनेमात झालेच नाही. त्याची ‘कन्यादान’, ‘छिन्न’ नाटकांतली कामे आठवा की! ‘अर्धसत्य’मध्ये जो खलनायकी शिक्का बसला तो कायमचा. मधल्या काळात त्याने मुंबईला घर केले. तीन मुली झाल्या. संसार चालवण्यासाठी मिळतील ती कामे त्याला करावीच लागली. याचा त्याला सल असेल का? सडाफटिंग असता तर योग्य भूमिका नसेल तर ती नाकारण्याचे धैर्य तो दाखवू शकला असता. का कोण जाणे, मला त्याचे त्या काळाबद्दल गूढ वाटते. मी त्याला त्या काळापासून ओळखत असलो तरी मैत्री तो खलनायक झाल्यानंतरची. त्यावेळी ती असती तर मी त्याला सांगू शकलो असतो. मित्राचे हे कर्तव्यच नाही का, सत्य परखडपणे सांगायचे! ते धाडस झेपले असते की प्रापंचिक जबाबदाऱ्या हा मुद्दा जास्त प्रभावी ठरला असता? कोण जाणे!
त्याच्या ‘इश्क’ सिनेमात त्याला विनोदी भूमिका करायला मिळाली. ती किती छान केलीय त्याने. म्हणजे त्याच्यात अनेक क्षमता होत्या. पण हे फूल पुरते उमलू शकले नाही, याची खंत वाटते.
मला फिल्म लाइनमधलं ओ की ठो कळत नाही. त्याचा विचार कशाला करा? माझ्यासमोर सदाशिव हा माणूस होता आणि तो माझा आवडता होता. कारण मनाने अतिशय हळवा होता. कुठे त्याची सिनेमातली खलनायकी आणि कुठे त्याचे हळवेपण! मेधा पाटकरांबरोबर तो नर्मदा खोऱ्यात जाऊन आला, विस्थापित गावे पाहून आला. काय गलबलून गेला होता तो! म्हणाला, ‘अरे मित्रा, काहीच सोयी नाहीत रे तिथं. लोकांनी जगायचं कसं?’ दुसरा विषय निघाला. त्यावर गप्पा सुरू झाल्या की मधूनच म्हणायचा, ‘का रे त्यांच्यावर अशी वेळ आली? किती हाल! काय ती पोरं! बघवत नव्हती रे.’ असं बऱ्याचदा.
सुनंदाला कॅन्सर झाल्यावर गळपटून गेला होता तो. नुसता येऊन मान खाली घालून बसायचा. आम्ही रेडिएशन घ्यायला मुंबईला यायचो. तिच्या भावाकडे उतरायचो. तिथेही तो असाच येऊन बसायचा. केमोथेरपीच्या महागडय़ा औषधांचे  बिल त्याने परस्पर भरून टाकले होते. तसेच माझ्या ऑपरेशनच्या वेळीही पुण्याला येऊन राहिला. सकाळ ते संध्याकाळ थांबायचा. नाकाच्या बँडेजमधून लाल पाणी झिरपून बाहेर यायचे. सदाशिव ते कापसाने टिपत बसायचा. कधी पाण्यात रुमाल भिजवून चेहरा पुसून काढायचा. अगदी आईच्या मायेने.
आजचा थकलेला सदाशिव पाहिला की एकेकाळचा उत्साही सदाशिव आठवतो. किती निर्भीडपणे मते व्यक्त करायचा तो. मग बाळासाहेब ठाकरे असोत की शरद पवार. मला हा उत्साह नव्हता. मी त्याला म्हणायचो, ‘तू नगर जिल्हय़ातला राजकारणी आहेस.’ मी त्याला ‘नगऱ्या’ म्हणायचो आणि तो मला ‘ओतुऱ्या’ म्हणायचा. एकेकाळी मीही निर्भीड लिखाण केलेले; पण पुढे माझे विषय बदलले. पण सदाशिवचा स्पष्टवक्तेपणा अखेपर्यंत राहिला. नर्मदेला जाऊन आल्यावर मला घेऊन गृहमंत्र्यांकडे गेला. त्यावेळी त्याने मंत्र्यांची, अधिकाऱ्यांची अशी तासली की बस्स! गृहमंत्र्यांनी तिथल्या तिथे काही अधिकाऱ्यांना सस्पेंड केले, रजेवर पाठवले. मी त्याचा आवेश पाहून थक्क झालो होतो. तो राजकारणात गेला असता तर चांगला राजकारणी झाला असता. सत्ताकांक्षी नव्हे, तर सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणारा.
आज तो असा नळय़ांच्या भेंडोळय़ात पडलेला पाहत होतो. माणूस असतो काय अन् होतो काय? त्याचे खरे जगणे कोणते आणि भोवतालच्या परिस्थितीची अपरिहार्यता किती? माणसाला ही परिस्थिती नैसर्गिक रीतीने उमलू देत नाही. का त्याला हतबल करते? का त्याला आधीच खणून ठेवलेल्या चाकोरीतून वाहायला भाग पाडते?
आता सदाशिव गेलाय. माझ्या शरीराचा एक भाग जसा गळून पडलाय. माझ्या मनातला मुंबईतला एक उबदार कोपरा आता गारठून, गळून गेलाय. माझीही- तशी प्रत्येकाचीच जायची वेळ येणार, हे माहीत आहे. पण ते जाणे किती आधीच सुरू होते. कणाकणाने आपण जातच असतो. शेवटी फक्त उरते- डॉक्टरांनी कुटुंबीयांकडे पाहून नकारार्थी मान हलवणे. जसे शोकसागरात बुडणे, जसे त्या माणसाच्या आठवणींचे कढ वर येणे.. जसे आता माझे झाले आहे.