12 August 2020

News Flash

प्रयोगशील रंगकर्मी

‘थिएटर युनिट’ आणि ‘अनिकेत’ या दोन संस्थांमध्ये  मिळून अमोलने रंगभूमीवर केलेले कार्य स्तिमित करणारे आहे.

(संग्रहित छायाचित्र)

माधव वझे

मराठी प्रायोगिक रंगभूमीच्या इतिहासामध्ये १९६० चे दशक रंगायन आणि विजया मेहता यांचे असल्याचे जसे नोंदविले जाईल, त्याचबरोबर १९७० चे दशक सत्यदेव दुबे आणि अमोल पालेकर यांचे एकत्रितपणे आणि स्वतंत्रपणेही असल्याचा निखालस निर्वाळा इतिहास देईल. ‘‘तुझ्यामध्ये फार  मोठे गुण असल्यामुळे माझ्या नाटकात काम करण्याबद्दल मी तुला विचारतो आहे, अशा भ्रमात राहू नकोस; तर तुला खूपच मोकळा वेळ असल्याचे मी पाहतो आहे, तर नाटकात काम करून तुझा वेळ सत्कारणी का लावत नाहीस?’’ असा खास त्याच्या शैलीमध्ये अमोलचा पाणउतारा करणाऱ्या सत्यदेव दुबेनेच अमोलला बंगाली भाषा उत्तम अवगत आहे हे जाणून त्याच्या हाती बादल सरकार यांचे एक नाटक दिले आणि त्याचा मराठी अनुवाद करायला सांगितले. त्याच्या ‘थिएटर युनिट’ या नाटय़संस्थेच्या त्या पहिल्याच मराठी नाटकाचे दिग्दर्शनही अमोल नको नको म्हणत असताना त्याच्यावर सोपविले. ‘वल्लभपूरची दंतकथा’ या अमोल पालेकर अनुवादित- दिग्दर्शित नाटकाने राज्यनाटय़ स्पर्धेमध्ये ‘थिएटर युनिट’ला एकूण एक पारितोषिके मिळवून दिली. १९६९ मधली ही घटना. आणि त्यानंतर अमोल पालेकर दुबेचा आवडता शिष्य आणि नंतर सहकारी झाला. ‘माझ्या सावलीत तुझी आता वाढ होणार नाही, म्हणून तू तुझी नाटय़संस्था आता सुरू कर,’ असे स्वत: दुबेनेच एकदा सुचविल्यानंतर अमोलने त्याची ‘अनिकेत’ संस्था स्थापन केली.

‘थिएटर युनिट’ आणि ‘अनिकेत’ या दोन संस्थांमध्ये  मिळून अमोलने रंगभूमीवर केलेले कार्य स्तिमित करणारे आहे. दुबे त्याच्या पाठीशी होता हे खरे, पण एकामागून एक सकस नाटके मिळवून त्यांचे प्रयोग करण्याची उभारी आणि धडाडी केवळ अमोलचीच होती. ‘पगला घोडा’, ‘द्रौपदी’, ‘सूर्यास्ताच्या अंतिम किरणापासून सूर्योदयाच्या प्रथम किरणापर्यंत’, ‘अवध्य’, ‘गोची’, ‘चल रे भोपळ्या टुणुक टुणुक’, ‘वासनाकांड’, ‘दिवाकरांना श्रद्धांजली’, ‘आंधळे’, ‘पार्टी’, ‘जुलूस’, ‘राशोमान’ आणि मुखवटे’ ही त्याने दिग्दर्शन केलेल्या नाटकांची नावेच त्याच्या जीवन आणि  रंगभूमीविषयीच्या धारणेची सुस्पष्ट कल्पना देतात.

साठ आणि सत्तरच्या दशकातील आपल्या प्रायोगिक रंगभूमीला विशिष्ट राजकीय वा सामाजिक दृष्टिकोनाची सद्धांतिक बैठक नव्हती, पण एक मूल्यभाव अवश्य होता. अमोलच्या रंगभूमीवर तो मूल्यभाव विविध संदर्भात प्रक्षेपित झालेला आपल्याला दिसतो. बादल सरकार यांचे ‘पगला घोडा’, सुरेंद्र वर्मा यांची ‘द्रौपदी’ आणि ‘सूर्यास्ताच्या अंतिम किरणापासून ते सूर्योदयाच्या प्रथम किरणापर्यंत’ ही दोन आणि ‘मुखवटे’ (आधे अधुरे) हे मोहन राकेश यांचे.. ही त्याने केलेली चारही नाटके स्त्री-जाणिवा व्यक्त करतात. सदानंद रेगे यांचे ‘गोची’ आणि अच्युत वझे याचे ‘चल रे भोपळ्या टुणुक टुणुक’ ही नाटके संप्रेषणाचा अभाव आणि परात्मभाव व्यक्त करणारी! माणसाच्या सत्-असत्मधला सनातन संघर्ष हा खानोलकरांच्या ‘अवध्य’चा आशय. महेश एलकुंचवारचे ‘वासनाकांड’ कलानिर्मितीच्या प्रक्रियेचा शोध घेते, तर त्याचेच ‘पार्टी’ हे नाटक कलाक्षेत्रातील प्रतिष्ठित व उच्चभ्रू लोकांच्या दांभिकपणाचे दर्शन घडविते. आणि कोणत्याही व्यवस्थेमध्ये भरडल्या जाणाऱ्या सामान्य माणसाचे भागधेय हा बादल सरकार यांच्या ‘जुलूस’चा आशय.  नाटय़छटाकार दिवाकर यांच्या ‘आंधळे’ या अनुवादित नाटकामध्ये काहीही घडत नाही. जीवनातली विपरीतता काही आंधळ्या व्यक्तींच्या संदर्भात असा त्या नाटकाचा आशय म्हणता येईल.

अमोल खरे तर आधी चित्रकार आणि मग अभिनेता- दिग्दर्शक आहे. त्याची एकल चित्रप्रदर्शने मुंबईतल्या प्रसिद्ध चित्रदालनांमध्ये अनेकदा आयोजित झाली आहेत. साहजिकच, अवकाश- तो कॅनव्हासवरचा असो किंवा रंगमंचावरचा किंवा एखाद्या वास्तूतला- हा त्याचा आस्थेचा आणि अभ्यासाचा विषय आहे. त्यामुळेच त्याने केलेल्या नाटकांची नेपथ्यरचना त्याने स्वत:च केलेली होती आणि ती एकाच वेळी समर्पक आणि सुंदरही होती. पुरेसे पैसे नसल्याने आणि त्याहीपेक्षा सौंदर्यदृष्टी आणि कल्पकता नसल्याने प्रायोगिक रंगभूमीच्या नाटय़प्रयोगांमध्ये जो एक बेंगरूळपणा येत असे, तो अमोलच्या नाटय़प्रयोगांमध्ये अजिबात नसे. त्याच्या एका नाटय़प्रयोगामध्ये- बहुधा ‘पगला घोडा’- रंगमंचावर फ्लॅटचे तुकडे उभे केले होते. ते नेव्ही ब्लू रंगाचे होते आणि फक्त एक तुकडा करडय़ा रंगाचा होता. आम्हा प्रायोगिकांना सवय होती, सगळे तुकडे नेव्ही ब्लू रंगातले उभे करण्याची. प्रयोगानंतर त्याच्याशी बोलताना अमोलने सहजपणे सांगितले होते की, काही नाही, एकाच रंगामुळे  येणारा तोचतोचपणा टाळण्यासाठी दुसरा रंग. पण एकूण परिणामाला बाधा तरी आणणार नाही असा रंग मी वापरला. कमानी रंगमंचावर त्याने नाटय़प्रयोग केले, त्यापेक्षाही कदाचित मोठय़ा संख्येने त्याने ते बाहेर, म्हणजे मदानात, गच्चीवर, उपाहारगृहात, इमारतीतल्या वाहनतळावरही केले.  विविध आकाराच्या आणि आकारमानाच्या अवकाशामध्ये नाटय़प्रयोग करून प्रयोगक आणि प्रेक्षक यांच्यामधील नात्याच्या शक्यता चाचपण्याचा, शोधण्याचा त्याने अविरत प्रयत्न केला. ‘पार्टी’ आणि ‘जुलूस’ या दोन्ही नाटकांमध्ये खूप पात्रे होती. त्या सगळ्यांना सहजपणे आणि कलात्म रीतीने सामावून घेण्यासाठी अमोलने उपलब्ध अवकाशामध्ये जे वेगवेगळे अवकाश निर्माण केले ते स्वतंत्रपणे दखल घेण्याजोगे होते. पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनामध्ये त्याने दोन दीर्घाक सादर केले, तेव्हाची घटना. प्रेक्षक भारतीय बठकीवर बसलेले.. ‘गोची’चा प्रयोग संपल्यावर अमोलने जाहीर केले की, दुसरा दीर्घाक आता विरुद्ध दिशेला सादर होणार असल्यामुळे प्रेक्षकांनी बसण्याचा मोहरा बदलावा. आणि प्रचंड गदारोळ झाला. प्रयोगाला सर्जनशील समीक्षक प्रभाकर पाध्ये आले होते. त्यांनी तर अमोलशी वादच सुरू केला. पण अमोलने त्याच्या स्वभावाप्रमाणे शांतपणे पाध्यांची समजूत घातली आणि प्रयोगानंतर अवश्य चर्चा करू असे सांगितले. पाध्यांनीही इतर प्रेक्षकांप्रमाणे बसल्याजागी चक्क यूटर्न करून दुसरा दीर्घाक पाहिला आणि प्रयोग संपल्यावर मात्र त्यांनी आपण उगीचच रागावल्याचे अमोलकडे कबूल केले.

प्रायोगिकतेचा कोणताही दावा अमोलने कधी केला नाही. त्याची प्रायोगिकता स्वत:सिद्ध होती. त्याचा तो प्रवास निर्वेध होता असे नाही. ‘पार्टी’चा प्रयोग चुकीच्या अंगाने जात असल्याची तक्रार प्रत्यक्ष महेश एलकुंचवारने केल्यानंतर आपले मतभेद आहेत, हे जाणून अमोलने त्या नाटकाचे प्रयोग बंद केले. खानोलकरांच्या ‘अवध्य’ नाटकाच्या प्रयोगामध्ये पुढे पुढे बेडरूम सीन्सना महत्त्व येत गेले आणि प्रेक्षकही त्यासाठीच येऊ लागले तेव्हा त्याने ते नाटक करायचे थांबवले. ‘अवध्य’ नाटकाचे दिग्दर्शन एका व्यावसायिक नाटय़ संस्थेसाठीही त्याने केले. पण कलाकारांना त्यांच्या भूमिकाही पाठ नाहीत आणि ते पदरचे बोलताहेत हे प्रत्यक्ष पाहिल्यावर, ते कलाकार नावाजलेले आणि मित्र असूनही आपले नाव दिग्दर्शक म्हणून जाहीर करायला अमोलने नकार दिला. सिरॅनो द बर्जरेक या जगप्रसिद्ध नाटकाचा मराठी अनुवाद- ‘मी राव जगदेव मरतड’ – मंगेश पदकी यांनी केला आणि त्या प्रयोगामध्ये अमोल आणि डॉ. लागू यांनी प्रमुख भूमिका केल्या. प्रयोगाविषयी लिहिताना अमोलने म्हटले आहे की, प्रयोग साफ पडला. आपल्याला खूप काही कळते असे आम्ही समजत होतो, त्याचा भ्रमनिरास झाला.

जीवनधारणा आणि कलाविषयक धारणा यांचा असा सुंदर समन्वय साधलेल्या अमोल पालेकर या मित्राचे या वळणावर मनापासून अभिनंदन करू या आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ या!

vazemadhav@hotmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2019 4:11 am

Web Title: experimental artist amol palekar abn 97
Next Stories
1 टपालकी : बालपण नको रे बाप्पा!
2 विशी..तिशी..चाळिशी.. : इन्शाल्ला..
3 गांधीजींचा विविधांगी मागोवा
Just Now!
X