News Flash

सेंट पॅट्रिक्स डे

गुलाम म्हणून विकल्या गेलेल्या पॅट्रिकची पुढची काही र्वष आर्यलडमध्ये मेंढपाळ म्हणून काम करण्यात गेली.

| September 6, 2015 12:42 am

अमेरिका
‘सेंट पॅट्रिक्स डे’ हा जरी १७ मार्चला साजरा केला जात असला, तरी त्याची धामधूम अमेरिकेतल्या बाजारांमध्ये कितीतरी दिवस आधी दिसायला लागते. त्यासाठी ‘स्पेशल सेल’च्या बातम्या टीव्ही आणि वर्तमानपत्रांतून घरोघरी पोहोचवल्या जातात. श्ॉमरॉक या त्रिदली पानाचे किंवा इंद्रधनुष्याचे प्रिंट असलेले मुले व मोठय़ांचे कपडे, कानांत, गळ्यात घालायची खास या दिवसाला शोभणारी ज्वेलरी, हिरव्या रिबिनी, हिरवे नेक- टाइज, स्पेशल बॅगा, चपला, बूट, ग्रोसरीच्या दुकानांमध्ये पानकोबी, मुरवलेल्या बीफचे कॅन्स, खायचा हिरवा रंग वापरून केलेल्या कुकीज, फुलांच्या दुकानात पोपटी रंगांची ख्रिसँतममची कुंडीमध्ये वाढवलेली रोपं, ग्रीटिंग कार्ड्सच्या दुकानांत बुटका, खटय़ाळ लेप्रकॉन, कमानीच्या एका टोकाला सोन्याच्या नाण्यांनी भरलेलं भांडं असलेलं इंद्रधनुष्य, श्ॉमरॉक, सेट पॅट्रिकचं एका हातात श्ॉमरॉक आणि दुसऱ्या हातात क्रॉस घेतलेलं चित्र अशी या सणाला अनुरूप अशी कार्ड्स शेल्फांमध्ये हारीने लावलेली दिसू लागतात. या कार्डाचा खप दरवर्षी १५ दशलक्ष डॉलर्सच्या घरात असतो.आर्यलडच्या सेंट पॅट्रिक या लाडक्या संताची १७ मार्चला पुण्यतिथी असते. ३८५ साली जन्मलेल्या पॅट्रिकचं निधन १७ मार्च ४६१ रोजी झालं. पॅट्रिकला त्याच्या कुमारवयात इंग्लंडमधून अपहृत केलं गेलं होतं. गुलाम म्हणून विकल्या गेलेल्या पॅट्रिकची पुढची काही र्वष आर्यलडमध्ये मेंढपाळ म्हणून काम करण्यात गेली. मोठय़ा हिकमतीने तिथून त्याने आपली सुटका करून घेतली. मग फ्रान्समध्ये मोनॅस्ट्रीत राहून त्याने ख्रिश्चन धर्माचं शिक्षण घेतलं. तो बिशप झाला. त्याच्या मनाने त्याला आर्यलडला परत जाऊन ख्रिश्चन धर्माचा प्रचार करायचा कौल दिला. पॅट्रिक आर्यलडला आला तेव्हा तिथे जंगली टोळ्यांचं राज्य होतं. सामान्य लोक अशिक्षित होते. पेगन धर्मीय होते. नरबळीसारख्या प्रथा या धर्मात होत्या. त्यामुळे ख्रिश्चन धर्म या धर्माचा धिक्कार करी. पॅट्रिकने ख्रिश्चन धर्माचा प्रचार केला. तिथल्या लोकांना लॅटिन भाषा लिहायला आणि वाचायला शिकवली. असं म्हणतात की, पॅट्रिक जग सोडून गेला तेव्हा आर्यलडमध्ये १०० टक्के लोक ख्रिश्चन झाले होते. पिढान्पिढय़ा आयरिश लोक पॅट्रिकला आपला राष्ट्रीय संत मानत आले आहेत. त्याची पुण्यतिथी साजरी करत आले आहेत.अमेरिकेत आलेल्या आयरिश लोकांनी आपल्याबरोबर या सणाची परंपरा आणली, परंतु त्याला खास अमेरिकन टच् दिला. आर्यलडमध्ये डब्लिन सोडलं तर अजूनही या दिवसाचं धार्मिक व पवित्र रूपच सर्वमान्य आहे असं म्हणतात. अमेरिकेत अगदी सुरुवातीलाहिरव्या कुरणांच्या शोधात युरोपमधून बरेच लोक आले. आयरिशही आले. पण खरे आयरिश  लोकांचे लोंढे अमेरिकेत १८४५ ते १८५१ या काळात आणि १९३० मध्ये आले. पहिल्या वेळी त्यांच्याकडचा दुष्काळ आणि दुसऱ्यांदा युरोपमधली आर्थिक मंदी अशी सबळ कारणं त्याला होती. बघता बघता आयरिश लोकांची अमेरिकेतली संख्या ४० दशलक्षच्या घरात गेली. आर्यलडमधील लोकसंख्येपेक्षाही ती मोठी आहे. अमेरिकेत जास्तकरून आयरिश अमेरिकन लोक वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, बॉस्टन, फिलाडेल्फिया, शिकागोमध्ये आढळतात. त्यामुळे दरवर्षी सेंट पॅट्रिक्स डेची परेड या शहरांमध्ये मोठय़ा धूमधडाक्यात निघत असली तर त्यात नवल काय? वाढत्या संख्येने आयरिश लोक आता अमेरिकेच्या कानाकोपऱ्यातही पोहोचू लागले आहेत. अलीकडे पोटरेरिको, मायामी, न्यू अर्लीन्स, सवाना (जॉर्जिया), डब्लिन (ओहायो), सॅनफ्रॅन्सिस्को, कॅन्सस सिटी या शहरांमध्येही सेंट पॅट्रिक्स डे परेडचा हिरवा रंग पसरू लागलेला दिसतो. परेडमध्ये भाग घेणारे, साइड-वॉकवर वा टीव्हीवर परेड बघणारे आयरिश  आणि इतर अमेरिकन लोक आता अमेरिकेच्या जवळजवळ प्रत्येक भागात दिसू लागले आहेत. मागच्या वर्षीच्या सेंट पॅट्रिक्स डेच्या परेड्सची संख्या होती- शंभर!कुठलाही मोठा सण किंवा खास दिवस अमेरिकेत परेडशिवाय साजरा होत नाही. १५ ऑगस्टला न्यूयॉर्कला इंडिया डे परेडही असते. न्यूयॉर्कची सेंट पॅट्रिक्स डेची परेड सगळ्यात मोठी. ही परेड इथल्या पाचव्या अव्हेन्यूवर ४४ व्या रस्त्यापासून ८६ व्या रस्त्यापर्यंत असते. हजारो लोक या परेडमध्ये भाग घेतात. वेगवेगळे फ्लोट्स, डेकोरेशन्स, खास कपडे घालून बॅगपाईप हे वाद्य वाजवणारे कलावंत अशी सगळी गर्दी परेडमध्ये असते. फ्लोट्समध्ये मुद्दाम आमंत्रित केलेले कलाकार, आर्यलडहून आलेले प्रसिद्ध पाहुणे, ब्यूटी- क्वीन्स, सुप्रसिद्ध आयरिश अमेरिकन नेते, ग्रँड मार्शल असे सगळे त्यात सामील होतात. या परेड्सचा खर्चही भरपूर असतो. या खर्चाकरिता परेडच्या काही दिवस अगोदर ‘फंड-रेझिंग डिनर्स’ आयोजित करतात. उत्तम फ्लोट्सना बक्षिसं असतात (बऱ्याचदा विमानाच्या प्रवासाची मोफत तिकिटे). परेडमध्ये हिरवा रंग प्रामुख्याने दिसतो. अमेरिकेत ईशान्य भागांत काही ठिकाणी यावेळी हिरव्या वाटाण्यांची पेरणीही करतात. परेडमध्ये भाग घ्यायला प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या ग्रुपचा सभासद असावा लागतो. न्यूयॉर्कच्या परेडमध्ये रॉबर्ट केनेडी आणि जिमी कार्टर यांच्यासारख्या अमेरिकन नेत्यांनी भाग घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना आदराने परेडमधून हाताला धरून बाहेर काढल्याची आठवण पुष्कळजण सांगतात. सवाना जॉर्जियामध्ये १८७५ साली या परेडमध्ये दोन फ्लोट्स होते. एका फ्लोटवर एक अमेरिकन (नॉन-आयरिश) आणि एक आयरिश अशा दोन स्त्रिया उभ्या केल्या होत्या आणि दुसऱ्या फ्लोटवर ३२ बायका आर्यलडच्या ३२ राज्यांचं प्रतिनिधित्व करीत होत्या.या परेडकरिता सिएटल शहरात रस्ते हिरव्या रंगाने रंगवले जातात. व्हाइट हाऊसमधलं फाऊंटन हिरवं करतात. आणि ४० टन खाण्याचा हिरवा रंग टाकून शिकागो नदीही हिरवीगार करतात. हिरव्या रंगाचा आणि सेंट पॅट्रिकचा तसा काहीही संबंध नाही; पण हिरवा रंग म्हणजे आर्यलड असं समीकरण आहे. सर्वत्र पसरलेल्या हिरव्या रंगामुळे आर्यलड ‘पाचूचं बेट’ या नावानेही प्रसिद्ध आहे. अमेरिकेत सगळ्या सणांना आपला असा रंग असतो. नाताळचे रंग म्हणजे लाल, हिरवा, पांढरा आणि निळा, व्हॅलेंटाइन डेचा रंग लाल, हालोविनचे रंग भगवा आणि काळा, थँक्स गिव्हिंगचे ऑरेंज, ब्राऊन आणि ‘सेंट पॅडीज’ (‘सेंट पॅट्रिक्स डे’चं संक्षिप्त नाव)चा हिरवा!हिरव्या रंगाच्या बरोबरीने श्ॉमरॉकच्या पानांनाही आयरिश लोक खूप महत्त्व देतात. एका देठावर तीन नाजूक पानं असलेलं श्ॉमरॉक गरीब आयरिश लोक खाण्यातही वापरत असत. सेंट पॅट्रिकनी ख्रिश्चन धर्माचा प्रचार एका हातात क्रॉस आणि दुसऱ्या हातात श्ॉमरॉक घेऊन केला असं म्हणतात. श्ॉमरॉकच्या पानांचा उपयोग तो आयरिश लोकांना ख्रिश्चन धर्मातली ‘होली ट्रिनिटी’ समजावून सांगायला करीत असे. ‘फादर’, ‘सन’ आणि ‘होली स्पिरिट’ ही ट्रिनिटी या श्ॉमरॉकच्या रूपात तुम्हाला दिसते असं तो सांगत असे. सेंट पॅट्रिकच्या आयुष्यातल्या कुठल्या गोष्टी खऱ्या आणि कुठल्या कपोलकल्पित- या वादात लोक पडत नाहीत. ख्रिश्चॅनिटीच्या प्रसारापूर्वी आयरिश लोक पेगनधर्मीय होते. या धर्मात तीन या आकडय़ाला अनन्यसाधारण महत्त्व होतं. बाकी ठिकाणी दुर्मीळ असणारी श्ॉमरॉकची तीन पानं त्यांना भूत, वर्तमान आणि भविष्यकाळ, किंवा स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ,  काल, आज आणि उद्या दर्शविणारी वाटत असतील अशीही शक्यता आहे. आयरिश लोकांना ही पानं आपल्या राष्ट्राचं प्रतिनिधित्व करतात असं वाटतं.या दिवशी आयरिश लोकांचं जेवण म्हणजे कॉन्र्ड (मुरवलेलं) बीफ, कोबी, सोडा ब्रेड (हा ब्रेड बेक करताना यीस्टऐवजी सोडा वापरतात), उकडलेले बटाटे, शेपर्डस पाय (मांसाहारी) आणि कॉफी. ब्रेकफास्टला तळलेली अंडी, तळलेले टोमॅटो, सॉसेजेस आणि ब्लॅक आणि व्हाइट पुडिंग. अमेरिकेत मॅक्डोनल्ड, बर्गर किंग अशी फास्टफूडची दुकानं हिरव्या रंगाचा पुदिन्याचा शेक किंवा हिरव्या कव्हरची केच-अपची पाकिटं खास या दिवशी विकतात. बारही हिरव्या रंगाची बीअर विकतात. आयरिश लोक अपेयपानासाठी प्रसिद्ध आहेत. खरं तर हा सण लेंटच्या काळात येतो. लेंट म्हणजे ईस्टरच्या आधीचा ४० दिवसांचा अवधी. या काळात ख्रिश्चन भाविक व कॅथलिक्स मांसाहार, धूम्रपान, अपेयपान या सर्वापासून दूर राहतात. आर्यलडमध्ये ८५ टक्के लोक कॅथलिक्स आहेत. चर्चने त्यांना लेंटमधल्या या एक दिवसासाठी सगळी सूट दिली आहे. चर्चमध्ये सकाळी जाऊन उरलेला दिवस सेंट पॅडीज डे साजरा करणारे आयरिश खूप आहेत.अमेरिकेत लहान मुलांकरिता सेंट पॅट्रिक्स डेची मजा काही वेगळीच असते. अमेरिकेच्या कुठल्याही राज्यात गेलात तरी आयरिश अमेरिकन लोक असतातच. प्राथमिक शाळांमध्ये सकाळी मुलं वर्गात येण्याअगोदर शिक्षक वर्गात थोडा पसारा करून ठेवतात.. मुलांच्या डेस्कमधलं सामान जमिनीवर टाकणं, आपलं टेबल अस्ताव्यस्त करणं अशा तऱ्हेचा. मुलं आली की आधी शिक्षकांसकट प्रत्येकाने आपल्या अंगावरचं काहीतरी हिरवं दाखवायचं. (पायमोजे, टॉप, हेअर बँड, ब्रेसलेट, नेकलेस, इअर-रिंग्स, सँडल्स- काहीही.) तसं ते नसलं तर हलकासा चिमटा काढून घ्यायची तयारी ठेवायची. मग लेप्रकॉन आला आणि त्याने हा पसारा केला म्हणून पसारा आवरायचा. लेप्रकॉन म्हणजे आयरिश ‘फेरी’.. पण परीराणी नाही. हा बुटका, कुरूप पुरुष असतो. त्याच्याकडे सोन्याच्या मोहोरांनी भरलेला हंडा असतो आणि तो हंडा लेप्रकॉन इंद्रधनुष्याच्या टोकाला ठेवतो. जर तुम्ही इंद्रधनुष्यावरून चालत त्याच्या टोकापर्यंत पोहोचू शकलात तर तुम्हाला तो हंडा मिळेल असा लेप्रकॉनचा वायदा असतो. (मुळात आपल्याला जरी कमानीसारखं दिसत असलं तरी इंद्रधनुष्य गोल असतं. तेव्हा त्याच्या टोकापर्यंत जाणं आणि तो हंडा मिळवणं, या दोन्ही परीकथेत शोभणाऱ्याच गोष्टी!) लहान मुलांना कल्पनेच्या विश्वात रमवण्यासाठी ही थोडीशी गंमत असते. या दिवशी हमखास काही पालक हिरव्या आयसिंगने डेकोरेट केलेल्या कुकीज् घेऊन येतात. मुलं इंद्रधनुष्य व त्याच्या टोकाला असलेला सोन्याच्या मोहोरांचा हंडा असं चित्र काढतात. ‘तो सोन्याच्या मोहोरांचा हंडा मिळाला तर मी काय करीन?’ याबद्दलचे आपले विचार लिहितात. कुकीज्चा समाचार घेतात आणि एकमेकांना ‘हॅपी सेंट पॅट्रिक्स डे’ विश करतात.अमेरिकेत सेंट पॅट्रिक्स डे हा बराचसा सेक्युलर आयरिश सण झाला आहे. नावावरून या सणाची कल्पना करायला गेलं तर ती हमखास चुकते. अमेरिकेसारख्या व्यापारी राष्ट्रात सगळ्या उद्योगांना समृद्धी मिळवून देणारा हा एक मौजमजा आणि मस्तीचा सण आहे. काही धार्मिक आयरिश लोकांचं मात्र म्हणणं आहे की, हा सण चर्चमध्ये जाऊन, ‘सोबर’ राहून साजरा करावा. आणि सध्या जो साजरा केला जातो त्याला ‘आर्यलड डे’ म्हणावं. ‘नावात काय आहे?’ असं म्हणणाऱ्या सर्वसामान्य आयरिश अमेरिकन नागरिकांना मात्र हा सण म्हणजे त्यांची जुनी ‘अशिक्षित, गरीब अमेरिकन आयरिश मायनॉरिटी’ ही प्रतिमा पुसून टाकून अमेरिकेतला एक ‘महत्त्वपूर्ण बहुसंख्याकांचा गट’ ही नवी प्रतिमा जगापुढे आणणारा वाटतो. अमेरिकेतल्या नॉन-आयरिश लोकांना आर्यलडची झलक त्यात पाहायला मिळते. आणि व्हॅलेंटाइन डे ते ईस्टर या सणविरहित काळात सेलिब्रेशनचं एक छानसं निमित्त मिळतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2015 12:42 am

Web Title: feast of saint patrick patricks day
Next Stories
1 ‘कुमारसंभव’ अध्यात्माचं आरोग्यशास्त्र
2 ‘सहर होने तक ‘ गजल अन् नज्मचे शायर
3 ‘सुपाचं’सूप वाजायला लागलंय..
Just Now!
X