सतीश आळेकर यांचा ‘फग्र्युसनचे दिवस’ हा लेख वाचला. त्यातील महर्षी कर्वेच्या १०० व्या वाढदिवसाचा उल्लेख वाचून माझ्या सुखद आठवणींना उजाळा मिळाला. मलासुद्धा महर्षीचा १०० वा वाढदिवस पाहण्याचे lok03भाग्य लाभले. त्यावेळी मी ना. दा. ठाकरसी कन्याशाळा, शनिवार पेठ, पुणे येथे इयत्ता दुसरीमध्ये शिकत होते. आमच्या शाळेतही महर्षीचा वाढदिवस साजरा झाला. इतक्या वर्षांनंतरही तो सोहळा डोळ्यांसमोर लख्ख आहे. महर्षीना पाहण्याचे कुतूहल होतेच. शाळेतल्या वरच्या वर्गातील १०० मुलींनी नऊवारी साडी परिधान करून महर्षीना ओवाळले होते. नुकताच पुण्याला जाण्याचा योग आला तेव्हा मी मुद्दाम माझ्या यजमानांना शाळा दाखवायला घेऊन गेले होते. तिथे मला ओळखणारे आता कोणी नाही. पण मी शाळेला ओळखते ना! मधल्या पटांगणात ५५ वर्षांपूर्वीचा तो सोहळा जणू आत्ताच घडल्यासारखा मी त्यांना कथन करीत होते. काही आठवणी मनात कायम राहतात. महर्षी कर्वेमुळे आम्ही मुली शिकून स्वावलंबी झालो. या थोर व्यक्तिमत्त्वाला मी जवळून पाहिले आहे. त्यांच्या शंभराव्या वाढदिवसाच्या कौतुकाची साक्षीदार असल्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजते. सतीश आळेकरांच्या लेखाने त्या सुखद आठवणी जाग्या झाल्या.
– डॉ. कृष्णा दाते-अलगोतर

मरणगंध..
‘लोकरंग’मधील ‘मरणगंध’ (२४ मे) हा दासू वैद्य यांचा लेख वाचला. त्यातून काही विचार मनात आले आणि ते सांगावेसे वाटले. आज माझे वय ७४ वर्षे आहे. थोडक्यात- मी उताराच्या वळणावर आहे. १९५२ पासून- म्हणजे वयाच्या नवव्या वर्षांपासून जवळच्या नातेवाईकांचे मृत्यू मी अगदी जवळून पाहिले आहेत. लेखकाने लिहिल्याप्रमाणे एक मरणगंध अनेक क्षण जागे करतो. या क्षणांमध्ये कित्येकांना मी (अहंकार, आत्मगंध नाही!) वेदनारहित मरण देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे मनाला खूप शांती मिळाली. पती, कर्तृत्ववान मुलगा यांचे मृत्यूही खूप शांतपणे सहन केले. लेखकाने सांगितल्याप्रमाणेच विहिरीतील पोहणे, सूर मारणे, पोस्टातून तार येणे या सर्व गोष्टीही मी अनुभवल्या आहेत. दासूंसारखे लिखाण मला येत नाही, पण माझ्या मनातील भावना मी पत्ररूपाने येथे मांडल्या आहेत.
– डॉ. भाग्यश्री नातू