News Flash

जर्मनीतले सणवार

सणवारांचे स्वरूप काळानुरूप बदलणे ही मानवसमूहाच्या सांस्कृतिक इतिहासाची गोष्ट आहे.

| September 6, 2015 12:57 am

सणवारांचे स्वरूप काळानुरूप बदलणे ही मानवसमूहाच्या सांस्कृतिक इतिहासाची गोष्ट आहे. ज्या- ज्या वेळी मानवसमूहांचा इतिहास बदलतो, भूगोल बदलतो, समाजव्यवस्था बदलते, त्या- त्या वेळी या समूहांची एकत्र येण्याची निमित्ते बदलतात. सणवार म्हणजे शेवटी काय, तर समूहांची एकजूट राहावी म्हणून तयार केली गेलेली निमित्ते. काळाच्या ओघात सणावारांचे बदललेले स्वरूप हा एकापरीने सांस्कृतिक बदलांचा आरसा ठरला आहे.जर्मन संस्कृतीतील सणवारांचे बदलत गेलेले स्वरूप ही एक सुरम्य कहाणी आहे. कागदोपत्री या संस्कृतीचे आयुर्मान उणीपुरी बाराशे वर्षे. या बाराशे वर्षांच्या अल्याड-पल्याड जर्मन समूहावर इतिहासाच्या वाऱ्यांचे असंख्य झंझावात आले. त्यामुळे समाजमनाच्या कातळाला खोलवर भेगा पडत राहिल्या. या सर्व फरफटीत जर्मन समूहाची एकत्र येण्याची ऊर्मी आणि निमित्ते यांत वादळी बदल झाले. आजमितीला जर्मनीतले सणवार म्हणजे ख्रिस्तपूर्व प्राचीन गेर्मान टोळ्यांच्या परंपरांचे आणि मध्ययुगीन कडव्या ख्रिश्चन परंपरांचे एक अद्भुत रसायन आहे.गेर्मानची कहाणी सुरू होते ती तब्बल तीन-चार हजार वर्षांपूर्वी. त्यावेळी युरेशियाच्या विस्तीर्ण भूभागावर विविध वंशांच्या अनेक टोळ्या वावरत होत्या. वंश अनेक; पण गंमत म्हणजे भाषा सर्वसाधारण एकसारखीच होती. या टोळ्या अत्यंत रासवट आणि क्रूर म्हणून कुख्यात होत्या. याउलट, ख्रिस्तपूर्व काळातल्या रोमन लोकांची संस्कृती अत्यंत पुढारलेली होती. आहार, निद्रा, भय, मैथुन यापलीकडे जाऊन मानवी अस्तित्वाविषयीचे विचार रोमन संस्कृतीत सुरू झाले होते. त्यांनी आपल्या सामर्थ्यांने युरोप पादाक्रांत केलेला होता. जंगलात राहणाऱ्या या रानटी ‘गेर्मान’ टोळ्यांचा त्यांना भारी उपद्रव होई. ख्रिस्तोत्तर ९८ साली टॅसिटस (ळूं्र३४२) नावाच्या रोमन इतिहासकाराने या टोळ्यांबद्दल ४६ प्रकरणांमध्ये ‘गेर्मानिया’ या नावाच्या ग्रंथात या प्राचीन गेर्मानांचे- म्हणजे आजच्या जर्मनीच्या पूर्वजांचे साद्यंत वर्णन करून ठेवले आहे. आजमितीला त्यांच्या सणवारांचे वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे श्रेय या रोम इतिहासकाराकडे जाते.तर या गेर्मानांचे अनेक देव होते. मध्य युरोपातील भूभाग नापीक. जंगले भाकड. निसर्ग रौद्र. त्यामुळे सर्व सणवारांची गुंफण वंशसातत्य आणि ऋतुमान या दोन संकल्पनांभोवतीच झालेली. त्यांच्या सणांचे कॅलेंडर पाहिले तर ही गोष्ट स्पष्ट होते. जानेवारी महिन्यातल्या पौर्णिमेस वाळलेल्या गवताच्या भल्यामोठय़ा बाहुल्या टेकडीवर नेऊन त्यांचे दहन केले जाई. फ्रेया या देवीचे पूजन होई. फ्रेया ही वंशसातत्याची देवता. हॅजलनट्सच्या झाडांच्या डहाळीचा स्पर्श गाईंच्या आचळांना केला जाई. दूधदुभते भरपूर हवे ना! फेब्रुवारी महिन्यात सगळ्या पूर्वजांची पूजा केली जाई. पंचमहाभूतांची आळवणी होई. मार्चमध्ये लागते वसंताची चाहूल. त्याची देवी ओस्तारा. तिची मूर्ती रथासारख्या शृंगारलेल्या गाडीत ठेवून मिरवणूक काढली जाई. अंडी आणि ससे यांना सृजनाचे प्रतीक म्हणून फार महत्त्व असे. आपल्याकडे नाही का- केळी बहुप्रसवा म्हणून पूजेत केळीचा फणा हवाच. तसेच काहीसे. एप्रिल महिना म्हणजे या गेर्मानच्या मते चेटकिणींच्या विवाहाचा महिना. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ‘वालपुर्गा’ या महादेवाची उपासना केली जाई. मे महिन्यात आजूबाजूचा निसर्ग सृजनाचा कळस गाठे. हे सृजन मानवी शरीरातही प्रवेशावे, या ऊर्मीने सखल, गवताळ जमिनीच्या तुकडय़ावर निर्वस्त्र अवस्थेत तरुण-तरुणी नृत्यासाठी जमत. गेर्मान पुरुष आपल्या सहचरीची निवड करी. नंतरचा जून महिना हा सूर्यपूजनाचा महिना. जलाशये, विहिरी, सरोवरे फुलांच्या माळांनी सजवली जात. जुलै महिन्यातली पौर्णिमा ही सुगीच्या सणासाठी राखून ठेवलेली असे. ऑगस्टमध्ये ‘थोर’ नावाच्या देवाची आळवणी होई : ‘बाबा रे! आता पाऊस पाडू नकोस, नाहीतर हातचे पीक जाईल.’ सप्टेंबर महिना शिकारीच्या सणाचा. पोटभरीसाठी शिकारीवर भिस्त. सुगी घरी आली म्हणून कृतज्ञतेसाठी पुन्हा फ्रेया आणि ‘थोर’ या देवतांचे पूजन. होप् आणि बार्ली या धान्यांची पहिली बीयर गाळायची. सफरचंद तोडणी करायची. सर्वात उंच डहाळीवरचे एक सफरचंद मात्र फ्रेयाचा नैवेद्य म्हणून सोडायचे बरे का! ऑक्टोबर हा प्राचीन गेर्मानांचा श्राद्धाचा महिना. रानडुकराचा बळी द्यायचा आणि वंशसातत्याची प्रार्थना करायची. नोव्हेंबरमधले हिवाळ्याचे बोचरे वारे म्हणजे देव-दानवांच्या युद्धाची तयारी असे या गेर्मानांना वाटे. त्यात देवांचा विजय व्हावा आणि सूर्यदेव पुन्हा शक्तिमान व्हावा म्हणून सुकी फळे व धान्याच्या ओंजळी निसर्गाला अर्पण केल्या जात. डिसेंबर महिना म्हणजे अंधाराचे साम्राज्य. त्याच्या शेवटाला सतत १२ दिवस (बारा महिन्यांची आठवण म्हणून) सूर्यदेवाची उपासना आणि बळी देण्याचा प्रघात होता. घोडय़ाचा बळी दिला जाई आणि चेरी वृक्षाच्या डहाळीने ताज्या रक्ताचे प्रोक्षण सुन्ना/ सोल(सूर्य)च्या मूर्तीवर आणि मंदिराच्या पायऱ्यांवर होई. अंधाराचा पराजय आणि प्रकाशाचा विजय याचा प्राचीन गेर्मानांना तीव्र ध्यास होता.ख्रिस्तोत्तर सहावे शतक ते पंधरावे शतक हा मध्ययुगाचा कालखंड. यातील जर्मन भूभागासाठी महत्त्वाच्या घटना म्हणजे रोमन धर्माचा आणि साम्राज्याचा अस्त! ख्रिश्चन धर्माने घेतलेला युरोप खंडाचा ताबा. लॅटिन भाषेच्या संकरामुळे ‘गेर्मानिक’ भाषेचे विघटन आणि त्यातून इंग्रजी, फ्रेंच, नॉर्डिक या उपभाषांच्या निर्मितीप्रक्रियेचा कळस, पाठोपाठ त्यातूनच भौगोलिक विघटन आणि आकुंचित झालेल्या जर्मन भूभागावर उभी राहिलेली घट्ट वर्ण आणि जातीव्यवस्था आणि त्यावर राज्य करणारी एकाधिकारशाही. ही एकाधिकारशाहीची हौस पार हिटलरच्या मृत्यूपर्यंत कायम राहिली ती कधी चर्चच्या रूपात, कधी राजाच्या रूपात, तर कधी लष्करशाहीच्या रूपात! ख्रिश्चन धर्माने तिसऱ्या- चौथ्या शतकापासून आजच्या भाषेत ‘लोकलायझेशन’चे यशस्वी सूत्र वापरले आणि गेर्मानांच्या बहुईश्वरवादाला चुचकारत एकेश्वरवाद जर्मन भूभागावर रुजविला. गेर्मान परंपरांना ख्रिश्चन महिरपीत सजवले. मग ‘ओस्तारा’ देवीतून ‘ईस्टर’चा सण निर्माण झाला. त्यातली अंडी आणि ससे ही प्रतीके कायम ठेवली गेली. मिरवणुकी आता चर्चच्या प्रांगणातून निघू लागल्या. ख्रिस्तजन्म म्हणजे प्रकाश (देव) आणि अंधार (दानव) यांच्या युद्धातील प्रकाशाचा विजय या स्वरूपात त्यांच्या गळी उतरवला गेला. एप्रिलमधील चेटकिणींची लग्ने आता रोगराई, निसर्गाची अवकृपा अशा भीतीच्या अवगुंठनातून स्त्रीवर्गाला बळीचा बकरा करण्यासाठी वापरली गेली. स्वतंत्रपणे विचार करू पाहणाऱ्या स्त्रियांना चेटकीण ठरवून चर्चच्या प्रांगणात समारंभपूर्वक त्यांचे दहन केल्याचे जर्मन भूभागावरील कागदोपत्री पुरावे चक्क १७९३ सालापर्यंत मिळतात. चर्चच्या एकाधिकाराला कंटाळून भूमिहीन शेतकऱ्यांना मार्टिन ल्यूथरने एकत्र केले. लॅटिनमधून जर्मन भाषेत बायबल आणले. प्रॉटेस्टंट आणि कॅथलिक पंथातील युद्धाने जर्मन भूमीवर तब्बल ३० वर्षे रक्ताचे पाट वाहिले. टोळीयुद्धांची संस्कृती या ना त्या रूपात तशीच कायम राहिलेली दिसते. याच काळात जर्मन समाजमनाचे दुभंगलेपण सुरू झाले, असे सांस्कृतिक वंशशास्त्र सांगते. जर्मन मनाने दोन वर्तुळे आखली. त्याचे खाली मुंडी घालून काम करण्याचे बाहेरचे जग आणि त्याचे स्वत:चे असे आतले जग. त्याच्या प्रियजनांचे, त्याच्या विचारांचे. तिथे बाहेरच्या जगाला मज्जाव राहिला. हा मज्जाव अगदी आजपर्यंत तसाच आहे.या सगळ्याचा परिणाम जर्मनीतील सणवारांवर होणे अपरिहार्य होते. त्यातून चर्चच्या दबावाखालील सामूहिक धार्मिक सण आणि स्वत:च्या उमलण्याच्या वर्तुळातले खासगी सण अशी वर्गवारी झाली. ईस्टर, ख्रिसमस व फाशिंग हे प्रमुख सामूहिक सण. त्यातही कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट विभागातल्या वेगवेगळ्या तारखा, परंपरा, रीतीभाती आजच्या जर्मनीतही कायम आहेत. खासगी सणांमध्ये प्रामुख्याने स्वत:चे, सख्ख्या प्रियजनांचे (मावस, चुलत हा प्रकार जर्मनीत नाही.) वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, मुलाच्या शाळेतला पहिला दिवस असे सोहळ्याचे प्रकार सुरू झाले.औद्योगिक क्रांतीने जर्मनीतले मध्ययुग संपवले. लोकशाही आली. खासगी वर्तुळ जास्त महत्त्वाचे झाले. त्याचा परीघ स्वत:पुरता आणि स्वत:भोवती ठळकपणे वाढविण्यात आला. धर्म, चर्च, सत्ताकेंद्रे यांना अस्पृश्यासारखे बाहेर ठेवले गेले. सण आणि सोहळे ही मानवी प्रवृत्ती आधुनिक जर्मनीत आज अशा वेगळ्या परिवेशात दिसून येते.जर्मनीतील दक्षिणेकडील कर्मठ ग्रामीण भागात ख्रिसमस, ईस्टर, फाशिंग या सणांचे पालन बरेचसे अजूनही चर्चच्या निगराणीत होते. शहरांत मात्र हे धार्मिक सण मुख्यत: कौटुंबिक सण म्हणूनच साजरे होतात. जर्मनीत सँटाक्लॉज नाही. तो आहे प्राचीन गेर्मान परंपरेतला निकोलाऊस. डिसेंबरातले गेर्मानांचे ते बारा दिवसांचे सोहळे २५ डिसेंबर ते ६ जानेवारी या बारा दिवसांत अजूनही घट्ट बांधले गेले आहेत. चर्च वा समूहाऐवजी ते आज फक्त कुटुंबीयांसाठी ठेवले जातात. प्राचीन गेर्मानांची वसंतपूजेची मिरवणूक फाशिंग किंवा कार्नेव्हाल या रूपात आज जर्मनीत पाहायला मिळते. वेगवेगळी दृश्ये साकार केलेल्या रथांची मिरवणूक निघते. या सणात बीयर व वाइनची चंगळ असते. ईस्टरचे उपास कोणी करीत नाहीत. पण त्या नावाखाली खाद्यपेयांची गटारी अमावास्या साजरी होते. आधुनिक जर्मन आई-बाबा ईस्टरची अंडी बागेत लपवतात. मुलांनी ती शोधायची. असे आई-बाबा-मुले इतकेच घट्ट वर्तुळ कटाक्षाने जपले जाते. आता समूहाची गरज संपलीय. स्वभावाची गरज मोठी होत चाललीय. फाशिंगच्या मिरवणुकींच्या चित्ररथांतून सरकारी धोरणांवर टीकेचा आसूड कडाडतो. जर्मन समाजाला उत्तमोत्तम विडंबनकार या कार्निवालच्या रूपातून मिळतात. जर्मनीत गाणेबजावणे, खाद्यपेये यांत नजाकत व हळुवारपणा कमी; रांगडेपणाच जास्त. समूहसंपर्काची गरज भागविण्यासाठी जर्मनीतला सुप्रसिद्ध ऑक्टोबर फेस्टिव्हल सुरूझाला. द्राक्षे तयार झाली की शेतकऱ्यांच्या खळ्यावर वाईन फेस्टिव्हल झडू लागतात. एप्रिल ते सप्टेंबर अ‍ॅस्फॅरेगसचा (शतावरीची एक जात) मोसम. म्हणून मग त्याचा फेस्टिव्हल!खरे तर स्वत:चा वाढदिवस हाच जर्मनांचा आजमितीचा सर्वात मोठा सण. त्याचे आयोजनही आटोपशीर असते. मोजके कुटुंबीय व स्नेह्य़ांसोबतचे कॉपीपान, त्यासाठी स्वत: बनवलेले फळांचे केक, गप्पांनी रंगलेली संध्याकाळ अशा तऱ्हेनं तो साजरा केला जातो. पन्नाशी- पंच्याहत्तरी हे टप्पे म्हणजे खासगी वर्तुळातला सर्वात मोठा सोहळा. खासगी आनंद व्यक्त करण्याची ऊर्मी हे आज जर्मनीत सणाचे नवे निमित्त झाले आहे. धार्मिक- सामाजिक दडपण संपले. त्याचबरोबर मध्ययुगातील ‘सणासुदीचा काळ म्हणजे गरीबांचा घातवार’ या अर्थाच्या जर्मन म्हणीही वाहून गेल्या. उंच कडय़ावर बसलेला इतिहासपुरुष जर्मन सणवारांची ही साठा उत्तराची कहाणी त्यातली वळणे निरखताना कुठल्या पाचा उत्तरांनी संपन्न होईल बरे, या कुतूहलात नक्कीच रमला असेल.

vaishalikar@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2015 12:57 am

Web Title: festivals of germany
Next Stories
1 यदाकदाचित
2 सेंट पॅट्रिक्स डे
3 ‘खूप लोक आहेत’, पण श्याम मनोहर एकमेव अपवाद!
Just Now!
X