गेले काही अच्छे दिवस आम्ही पाहतोय, जिकडे तिकडे नुसते ओले ओले सुरू आहे.
घरात ओले, दारात ओले, मैदानात ओले. फार कशाला, व्हॉट्सॅपवरही ओलेच ओले..
आता तुम्ही म्हणाल, की बुवा बिनपावसात हे ओले कुठून बरे आले?
तर याचा अर्थ असा की, तुम्ही तो अनुपमेय, नयनरम्य, महाभव्य महासोहळा याचि देही याचि डोळा पाहिलेलाच नाही!
अहाहा! काय सोहळा होता तो! महिना होत आला, पण अजूनही तो आमुच्या दृष्टीसमोरून हलण्यास तयार नाही. त्यातील बाकीची ती झाडे, पाने, फुले, ती आदिम नृत्ये वगैरे सोडा. त्यात धरण्यासारखे तसेही काही नव्हते! शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनातील नृत्यगाणी का ध्यानी ठेवायची असतात? पण जेलो! (आपली लोपेझांची जेनिफर हो!) तिची ती हिरवीकंच गुलनार मूर्त.. तिचे ते नाचणे, ते जागच्या जागी उडय़ा मारणे, त्या अदा, ते विभ्रम, ते ‘ओले ओले’ सुरीले गाणे, ते.. असो! (आपुल्या डोळ्यांत मोतिबिंदू नाहीत याचे केवढे समाधान वाटते नाही अशा वेळी? पुन्हा असो!)
तर वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्यहो, तुमच्या ध्यानी आता हे आलेच असेल की, या ओल्याचा त्या ओल्याशी संबंध नसून, हे फिफा विश्वचषक पदकंदुक सोहळ्यातील गाणे आहे. आमुचा गेला महिना याच ओल्या ओल्या पदकंदुकाने व्यापून टाकला आहे. तुम्हांस सांगतो, या काळात माणसे माणसे राहिली नाहीत. निशाचर झाली आहेत. पदकंदुकाच्या म्याची पाहात रात्र रात्र जागवू लागली आहेत. जाग्रणाला आमची ना नाही. कोणी कशासाठी जागावे याबद्दलही आमचे काही म्हणणे नाही. तसे आम्हीही रोज रात्री डासांबरोबर बॅडमिंटन खेळत जागत असतो. पण सज्जनहो, म्हणून आम्ही त्याचे धावते समालोचन करीत नाही!
या पदकंदुकाच्या प्रेक्षकांचे तसे नसते. दूरचित्रवाणीवर म्याच पाहण्यास बसताना एरवी सामान्य माणसे काय करतात? तर कोणी मक्याच्या लाह्या भाजून ठेवते, कोणी फर्मास चहा-कॉफीचे थर्मास घेऊन बसते. पण आमुचे परमशेजारी रा. रा. लेले जवळ मोबाइल घेऊन बसतात व तिकडे गोल झाला की व्हॉट्सॅपच्या गटागटांवर आरडाओरडा करतात. रात्रभर आपले ते व्हॉट्सॅपचे टुण्टुण सुरू! जरा कुठे आपण बॅडमिंटनचा एखादा सेट जिंकून पाठ टेकावी, तो वाजलेच यांचे एक्स्पर्ट कमेन्टांचे टुण्टुण!
‘अरे या ब्राझीलपेक्षा आमच्या कोल्हापुरातली दिलबहार, नाय तर फुलेवाडी टीम चांगली खेळते!’ किंवा –
‘कुणीतरी त्या मेस्सीला अक्कल शिकवा रे. कसा बॉल ड्रिबल करतोय?’
अशा वेळी ते विसरूनच जातात, की आपण रा. रा. लेले आहोत, रा. रा. पेले नव्हे!
मध्यंतरी त्यांच्या या टुण्टुणीस कंटाळून आम्ही स्वत:च म्याची पाहणे सुरू केले. पहिल्यांदा आम्हांस समजेनाच, की मैदानात नेमके काय घडते आहे? एकतर ते खेळाडू आपल्या ओळखीचे ना पाळखीचे. तशात त्यांची नावे अशी, की भल्या भल्या खेळपत्रकारूंचीसुद्धा फेफे उडते ती उच्चारताना. बरे आमचा क्रीडाक्षेत्राचा अभ्यासही इतुका दांडगा, की क्रिकेटची म्याचही आम्हांस उलगडते ती दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रातील धावते समालोचन वाचून. तेव्हा अखेर आम्ही लेलेंकडून नियमांचे पुस्तकच आणले. पण त्यानेही काही जमले नाही. परवा पेनल्टी शूटाऊट म्हणजे काय ते पाहू गेलो, तर तिकडे गोलही होऊन गेला. बरे, पायाने चेंडू लाथाडण्याच्या या खेळात डोक्याने केलेला गोलही ग्राह्य असतो, हे समजल्यानंतर तर आमचे डोकेच कामातून गेले. ते बाजूस ठेवून खेळ पाहावा म्हटले तर सगळाच रांगडा आणि धसमुसळा प्रकार. अधूनमधून क्यामेरा प्रेक्षकांत जाई, तेवढाच काय तो नेत्रश्रमपरिहार!
वाटले, यापेक्षा गडय़ा आपुले टेनिस बरे! या पदकंदुकातील गदारोळापेक्षा टेनिसमधील मोनिकाचा भुभूत्कार परवडला! टेनिस कळो- न कळो, पाहताना मोद दाटला चोहीकडे असे काहीसे छानसे फील गुड होते! उगाच का कोटय़वधी भारतीय फ्याशन टीव्ही पाहावा तैसे विम्बल्डन पाहतात?
पण तरीही आम्ही आजचा अंतिम पदकंदुक सामना पाहणार आहोत. त्यामागे हेतू दोन. एक म्हणजे नंतर दोन दिवस त्यावर चर्चा करता येईल. (पुरुषांना टीव्ही मालिकांवर चर्चा करणे नच्छ असते ना!) आणि दोन- अंतिम सामन्यानंतर समारोपाचा महासोहळा आहे. तो पाहून धन्य धन्य होता येईल.
दुष्काळ, अर्थसंकल्प अशा संकटांनी कोरडय़ा कोरडय़ा झालेल्या मनासाठी तेवढेच ते ओले ओले!!