15 January 2021

News Flash

मधुमेहींचा आहार

सर्व वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्ही विचार करत असाल की सणाच्या दिवसात मी दुखणी व त्याच्या आहाराबद्दल का लिहिते आहे. पण त्याचे कारण या वर्षी

| November 11, 2012 11:35 am

सर्व वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्ही विचार करत असाल की सणाच्या दिवसात मी दुखणी व त्याच्या आहाराबद्दल का लिहिते आहे. पण त्याचे कारण या वर्षी दिवाळीच्या दिवशी (१४ नोव्हेंबर) ‘World Diabetes Day’ येत आहे.
मधुमेह आपल्या देशाची वाढती समस्या आहे. या जगात मधुमेहींच्या गणनेमध्ये आपला दुसरा नंबर येतो. प्रत्येक पाचव्या भारतीय नागरिकाला मधुमेह असून ही फार काळजीची बाब आहे. मधुमेहाची सर्वात मोठी समस्या म्हणजे त्याची काही लक्षणे नसतात. उदा. जेव्हा आपल्याला संसर्ग झाला की ताप येतो, पोट बिघडले की मग पोट दुखते- पण मधुमेहात मात्र असे काहीही होत नाही. मधुमेहाची जी लक्षणे आहेत- खूप भूक लागणे, खूप तहान लागणे, खूप लघवी होणे, ही रक्तातील साखर फार जास्त प्रमाणात वाढल्यावरची लक्षणे आहेत. पण रक्तातील साखर हळूहळू जास्त होते. सर्वसाधारण प्रमाणापेक्षा थोडी जास्त साखर रक्तात असताना जर कळली तर त्यावर त्वरित इलाज-पथ्य करून ती आटोक्यात आणता येते. परिणामी मधुमेहामुळे शरीरात होणारी गुंतागुंत  टाळता येते. पण ही थोडी वाढलेली साखर रक्ताचा तपास केल्यावरच कळते. त्यामुळे रक्ताचा तपास करणे आवश्यक आहे. जर आपल्या आई-वडील किंवा बहीण-भावाला मधुमेह असेल तर मधुमेहाची चाचणी नियमित रूपाने करणे आवश्यक आहे. मधुमेह  झाल्यावर त्याचे पथ्यपाणी व इलाज करण्यापेक्षा तो टाळता यावा यावर भर दिला पाहिजे. ‘Prevention is better than cure’ अशी म्हणच आहे.
मधुमेह टाळण्याकरता वजन आटोक्यात ठेवणे आवश्यक आहे. खूप गोड खाल्ले की मधुमेह होतो हा चुकीचा समज आहे. गोड खाऊन मधुमेह होत नाही- पण खूप गोड पदार्थ खाल्ले की वजन वाढते, पोटावरची चरबी (abdominal fat) वाढते व त्यामुळे मधुमेह होण्याची शक्यता वाढते. मधुमेह टाळण्याचा सोपा उपाय आहे की ‘पोटभर खाऊ नका व पोट रिकामे ठेवू नका’!  पोट रिकामे ठेवले- खूप भूक लागली की मग आपण विचार न करता खातो, गरजेपेक्षा जास्त खातो व वजन वाढते व अती खाण्यामुळे रक्तातील साखर वर-खाली होऊ शकते.
आपण खाताना, आपल्याला किती अन्नाची गरज आहे हे जाणून व समजून घेणे आवश्यक आहे. जर आपल्या रोजच्या जेवणानेही आपले वजन सतत वाढत आहे, असे कळले की हे अन्न आपल्या गरजेपेक्षा जास्त आहे हे आपणास समजले पाहिजे. कोणी आपल्याहून जास्त खाते यावर लक्ष न देता- आपल्याला अन्नाची किती गरज आहे, हे समजले पाहिजे. जर वजन वाढत असेल तर अन्नाचे प्रमाण कमी केले पाहिजे. त्याचबरोबर अन्नाची निवडही बरोबर केली पाहिजे. उदा. भात खाऊन वजन वाढते, मधुमेह असेल तर रक्तातील साखर वाढते, म्हणून बरेच लोक साखरेचे प्रमाण वाढले किंवा वजन कमी करायचे असेल तर भात सोडतात. पण मग कमी खाऊन पोट भरत नाही म्हणून पोळीचे प्रमाण वाढवतात. पण असे करताना पोळी व भात खाऊन साखर वाढते, वजन वाढते. त्यामुळे पोळी जास्त घेण्यापेक्षा सॅलड,  भाजी, आमटी यांचे प्रमाण वाढवावे. किंवा दही, उसळ यांचे प्रमाण वाढवायला पाहिजे. त्याचबरोबर आहाराबद्दलचे गैरसमजही समजून घेतले पाहिजेत. उदा. मधुमेहींना साखर चालत नाही, पण गूळ नैसर्गिक  असल्यामुळे चालतो किंवा मधसुद्धा चालतो. हा फार मोठा गैरसमज आहे. असे केल्यामुळे मधुमेह आटोक्यात ठेवणे कठीण होते. शरीरात साखर, गूळ व मध हे सर्व एकाच प्रकारे काम करतात व समप्रमाणात साखर वाढवतात. त्यामुळे हे तीनही पदार्थ टाळावेत.
साखर मधुमेहींना वज्र्य आहे हे ज्ञान सर्वाना असते, पण स्निग्ध पदार्थही मधुमेहींना तेवढेच हानीकारक आहेत. हे फार कमी लोकांना कळते. एक विशिष्ट प्रकारचा स्निग्ध पदार्थ – ‘Trans fats’ हा सर्वात हानीकारकआहे.  ट्रान्सफॅट हा डालडा, मार्गरीन इत्यादी पदाथार्ंत आढळतो. या प्रकारचे स्निग्ध पदार्थ वापरूनच फराळाचे पदार्थ, मिठाया इत्यादी तयार होतात. त्यामुळे असे पदार्थ टाळावेत. त्याचप्रमाणे इतर स्निग्ध पदार्थसुद्धा कमीतकमी प्रमाणात वापरावेत. तेल अती उकळले / तापविले की त्यात ‘Trans fats’ तयार होतात. हे तेल परत वापरले तर हे ‘Trans fats’ तयार केलेल्या पदार्थात येतात व त्यामुळे मधुमेहीला त्रास होऊ शकतो. स्निग्ध पदार्थात ऊर्जा इतर अन्नपदार्थापेक्षा जास्त असते व त्यामुळे त्याच्या सेवनाने वजन लगेचच वाढते. त्यामुळे स्वयंपाक करताना कमीतकमी प्रमाणात तेल, तूप, लोणी, ओले-सुके खोबरे, दाण्याचे कूट वापरावे.
आता दिवाळीचे दिवस आहेत. या दिवसात फराळाचे पदार्थ, मिठाई इत्यादी वस्तू खूप प्रमाणात केल्या जातात. विकत आणल्या जातात. मग मधुमेह असणाऱ्यांनी किंवा मधुमेह टाळावा अशी इच्छा असलेल्यांनी काय करावे? कुठलाच गोड पदार्थ खाऊ नये. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी गोड पदार्थ टाळावेत. त्याचे कारण त्याच्यात साखर-गूळ असतो व त्यात स्निग्ध पदार्थही खूप असतात. त्यांनी ताजे पदार्थ जसे फ्रूटसॅलड, खीर इत्यादी घ्यावे. ज्यात कमी प्रमाणात साखर घालता येते व गायीचे दूध घेतले की त्यात स्निग्ध पदार्थाचे प्रमाणही कमी असते. ज्यांना मधुमेह टाळायचा असेल त्यांनी फराळाच्या वस्तू कमी प्रमाणात खाव्यात. पदार्थाची निवड करणे हे फार गरजेचे आहे. सर्व पदार्थ न खाता, फक्त आवडीचे एक-दोन पदार्थ खावेत.
आपल्या संस्कृतीत प्रेमाचा वर्षांव फक्त अन्नामार्फत दाखवला जातो. ‘आग्रह करणे’ हा चांगल्या पाहुणचाराचा अनिवार्य भाग आहे असे समजले जाते. मधुमेहींना अन्नाचा आग्रह करणे टाळावे. त्याच्यावर प्रेमाचा वर्षांव करायचे इतर मार्ग शोधणे या दिवाळीत गरजेचे आहे.
आपल्या शरीराला अन्नासारखी व्यायामाची गरज असते. पूर्वीच्या काळी सर्व फराळाचे पदार्थ घरी करायचे, त्याचबरोबर दिवाळीची साफसफाई इत्यादी सर्व लोक स्वत: करायचे. त्यामुळे त्यांना खूप व्यायाम मिळायचा. आजकालच्या काळात आपण फराळ आयता आणतो व साफसफाई इतरांकडून करवून घेतो. त्यामुळे आपल्याला शारीरिक कष्ट होत नाहीत. मग अशा कारणांमुळे दिवाळीनंतर वजन वाढते. हे टाळण्याकरता दिवाळीतही व्यायाम करणे- कामे करणे सोडू नका!
ही दिवाळी आपणा सर्वाना सुख-समृद्धीची जावो ही इच्छा आहे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 11, 2012 11:35 am

Web Title: food for diabetes world diabetes day
Next Stories
1 शाळकरी मुलांचा आहार
2 आहारचर्या : राष्ट्रीय आहार सप्ताह
Just Now!
X