दिल्लीत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉ. शिरीन वळवडे यांच्या ‘जिचे हाती कढई’ या पुस्तकात आरोग्यासाठी सुयोग्य आहार किती महत्त्वाचा आहे, तो कोणता असावा, किती असावा हे अगदी सोप्या पद्धतीनं सांगितलं आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार अशासारखा एखादा विकार असणाऱ्यांसाठीच नव्हे तर वजन कमी किंवा जास्त करू इच्छिणाऱ्या आणि आपलं आरोग्य टिकवून ठेवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठीही हे पुस्तक उपयुक्त आहे.
कोलेस्टोरॉल, लिपिड्स, खाद्यपदार्थामधली पोषणमूल्ये, कॅलरीज, मायक्रोवेव्ह ओव्हन, नॉन स्टिक व धातूंची आणि इतर भांडी, वेगवेगळ्या तेलांमधले फरक, भाज्या, फळे, तेलबिया अशा अनेक विषयांची त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. शिवाय ठिकठिकाणी पदार्थाच्या पाककृतीही दिल्या आहेत. पोषक आणि कमी कॅलरीज असलेले पदार्थ कसे बनवावेत ते उदाहरणे देऊन दाखवले आहे.
पाककृती चांगल्याच आहेत. मात्र काही कृतींमध्ये कॅलरीजचा हिशोब चुकला आहे. आणि मायक्रोवेव्हमध्ये पदार्थ करताना-‘मायक्रोवेव्ह हायपर (३२० अंश सें.)’ असे म्हटले आहे. तेही बरोबर नाही. मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये पदार्थ विद्युत चुंबकीय लहरींमुळे शिजतो, उष्णतेमुळे नाही.
अशा काही त्रुटी असल्या तरी पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. अवघड वाटणारे विषय सोपे करून सांगितले आहेत. आहाराशी संबंधित खूप गोष्टींचा खुलासा केलेला आहे. पुस्तकाच्या शेवटी तेल, तेलबिया, सुकामेवा आणि फळे यांच्यातल्या पोषण घटकांचे तक्तेही दिले आहेत. त्यांच्या जोडीला आपल्या रोजच्या आहारातील गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, डाळी, कडधान्ये, भाज्या व फळे यांच्यातल्या घटकांचेही तक्ते दिले असते तर बरं झालं असतं. म्हणजे वेगळ्या पदार्थाची पोषणमूल्यं काढता आली असती.
पुस्तकाची भाषा सरळ, सोपी आहे. अनेक ठिकाणी संवादांच्या रूपात आहे. त्यामुळे अधिक वाचनीय झाली आहे. शिवाय महत्त्वाची बाब म्हणजे ते अतिशय उपयुक्त आहे.
‘जिचे हाती कढई’ हे शीर्षक वाचल्यावर पटकन डोळ्यासमोर भजी, वडे, समोसे असे तळलेले चमचमीत पदार्थ येतात. पुस्तक वापरायला लागल्यावर (नुसतं वाचायला नव्हे) लक्षात येतं की न तळताही पदार्थ चविष्ट होतात. गृहिणींनी हाताशी ठेवावं असं हे पुस्तक आहे.
‘जिचे हाती कढई’ – डॉ. शिरीन वळवडे, श्रीवत्स प्रकाशन, पुणे, पृष्ठे – २१२, मूल्य – २०० रुपये.