फेब्रुवारीचा मध्य ते मार्चचा पूर्वार्ध यादरम्यान महाराष्ट्राने प्रचंड गारपिटीच्या स्वरूपात निसर्गाचे रौद्ररूप अनुभवले. वारा, वादळ, पाऊस आणि गारपिटीच्या या अनपेक्षित अस्मानी सुलतानीच्या बसलेल्या भीषण तडाख्यातून लगेच सावरणे कठीण आहे. हवामानबदलाचा हा भीषण परिणाम या संकटाद्वारे अचानक सामोरा आला असला तरीही हवामानातील या बदलांची सुरुवात फार पूर्वीच झालेली आहे. तापमानवाढ हा त्यातला प्रमुख घटक आहे. जागतिक तापमानवाढीला वेळीच आवर घातला नाही तर हवामानबदलाचे याहीपेक्षा भयंकर परिणाम भविष्यात मानवजातीला भोगावे लागतील.
आज, २३ मार्च.. जागतिक हवामान दिन. त्यानिमित्ताने जागतिक हवामानात होत असलेल्या बदलांचा घेतलेला विशेष वेध..
२३ फेब्रुवारी ते १६ मार्च असे तब्बल २२ दिवस महाराष्ट्राने हवामानबदलाची दुर्मीळ स्थिती अनुभवली. महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील काही भागाला वादळी गारपिटीचा भीषण अनुभव घ्यावा लागला. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे हवामानबदलाचे एक वेगळेच रूप अनुभवायला मिळाले. कोटय़वधी रुपयांच्या शेतीच्या तसेच जीवित व मालमत्तेचे नुकसान करून हवामानबदलाने आपले रौद्र रूप दाखवून दिले.
वातावरणात पुरेसे बाष्प आणि तापमानात वाढ झाल्यामुळे कमी दाबाचा पट्टा तयार झाला की पाऊस पडतो. अशी स्थिती वर्षभरात कधीही उद्भवू शकते. मात्र, महाराष्ट्राने गेले २२ दिवस अनुभवलेली ही घटना जागतिक पातळीवर यापूर्वी कधी घडल्याचे ऐकिवात नाही. उत्तर ध्रुवीय प्रदेश ते उष्णकटिबंधीय प्रदेशापर्यंत त्याची व्याप्ती होती. ध्रुवीय प्रदेशाकडून येणारे थंड वारे, समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि प्रशांत महासागरात निर्माण होणारी ‘एल् नीनो’ स्थिती त्यासाठी कारणीभूत ठरली. गेल्या ५०-१०० वर्षांत प्रथमच वादळी गारपिटीचे इतके भीषण तांडव बघायला मिळाले. हवामानात अचानक झालेला बदल त्यासाठी कारणीभूत ठरला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. २०१० पासूनच हवामानात अत्याधिक बदलांना (तज्ज्ञांच्या भाषेत ‘एक्स्ट्रीम क्लायमेट चेंज’) सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी उन्हाळा जेवढा लांबला, तेवढाच पावसाळा आणि थंडीसुद्धा. याचदरम्यान चीन, अमेरिका, जपान, रशिया यांसारख्या देशांमध्ये हिमवादळांचे तांडव प्रदीर्घ काळ सुरू राहिले. थंड वारे, बाष्पयुक्त वारे आणि एल् नीनो यांचा संगम झाल्यामुळे तापमानात अचानक घट झाली. खाली गरम हवा आणि वर थंड हवेमुळे अतिशय कमी उंचीवर गारा तयार झाल्या. त्यामुळे जमिनीवर पोहचेपर्यंत या गारांना विरघळायला वेळच मिळाला नाही आणि गारांचा पाऊस पडला. गारा एरवीही तयार होतात, पण त्या वर तयार होत असल्यामुळे खाली येईस्तोवर त्या बऱ्याच विरघळून जातात. यावेळी मात्र परिस्थिती उलट होती.
पृथ्वीवरील हवामान हे अनेक घटकांवर अवलंबून असते. समुद्राच्या पाण्याचे तापमान हा त्यातील एक महत्त्वाचा घटक होय. या घटकामुळेच पृथ्वीवरील विविध खंडांच्या विशिष्ट भागांत किती पाऊस पडणार, कधी पडणार, हे निश्चित होते. एवढेच नव्हे तर त्या त्या खंडाचे तापमान किती राहणार, हेदेखील त्यावर ठरते. जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राच्या पाण्याचे सरासरी तापमान वाढले आणि ते वाढल्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढले. याचा परिणाम म्हणजे अलीकडच्या काळात पावसाचे प्रमाण, चक्रीवादळांची संख्या आणि त्यांची तीव्रता वाढली आहे. ही सरासरी तापमानवाढ केवळ दोन ते तीन अंशाची दिसत असली तरीही पृथ्वीवर महाकाय बदल घडवून आणण्यास ती कारणीभूत ठरते. पृथ्वीवर यापूर्वीही तापमानवाढ झाली होती आणि अशाच प्रकारचे महाकाय बदल त्यावेळीही घडून आले होते. त्यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे हवामानबदल हा आहे. आणि सध्या हे बदल सुरू झाले आहेत. औद्योगिकीकरणाच्या कालखंडात कोळशाचा प्रचंड वापर सुरू झाल्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड आणि मिथेनसारख्या घातक व विषारी हरितगृह वायूंचे प्रमाण वाढले. परिणामी तापमान, पर्जन्यमान आणि वारे वाहण्याची पद्धत यांमध्ये लक्षणीय आणि दीर्घकालीन बदल घडून आले आहेत.
जगभरातील शासनकर्त्यांनी एकविसाव्या शतकाच्या अखेपर्यंत ही जागतिक तापमानवाढ दोन अंश सेल्सिअसच्या खाली ठेवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करून त्यासंबंधात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा निर्धार केला. मात्र, आजपर्यंत तरी त्यादृष्टीने परिणामकारक धोरणात्मक पावले उचलली गेलेली नाहीत. त्यामुळे तापमानवाढीचा आलेख खाली उतरण्याऐवजी चढताच राहिला आहे. कार्बन डायऑक्साइडच्या वरील सुरक्षामर्यादा ३५० पीपीएम (पार्ट्स पर मिलियन) इतकी असते. तथापि कित्येक शतकांनंतर मे २०१३ मध्ये हवेतील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण ४०० पीपीएमवर जाऊन पोहोचले आहे. वाढती लोकसंख्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.
आजचे तापमान हे औद्योगिकीकरणाच्या पूर्वीच्या काळाआधीच्या तापमानापेक्षा ०.८ डिग्री सेल्सिअसने अधिक आहे. त्यामुळे तापमानवाढ रोखण्यासाठी चाललेले प्रयत्न कमी पडत आहेत हेच सिद्ध होते. जागतिक तापमानवाढीचा सर्वात मोठा परिणाम आणि धोका म्हणजे सध्या ध्रुवीय हिमखंड वितळण्याचे प्रमाण वाढते आहे. हिमखंडाच्या वितळण्यामुळे महासागरांतील पाण्याची पातळी वाढत आहे. ही परिस्थिती आटोक्यात न आल्यास जगातील कित्येक देश पाण्याखाली जाण्याचा धोका हवामान क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवला आहे. हवामानात होणाऱ्या बदलांमध्ये समावेश होणारा आणि प्रामुख्याने भारतासारख्या दक्षिण आशियाई देशावर होणारा परिणाम म्हणजे पर्जन्यमानातील बदल होय. हवामानात होत असलेल्या बदलांमुळे हा पर्जन्यकाळ १० ते १५ दिवसांनी पुढे जात आहे. गेल्या वर्षी  हा बदल आपण अनुभवला. पर्जन्यकाळ पुढे वाढल्यामुळे जानेवारीत संपणारी थंडी फेब्रुवारीपर्यंत कायम राहिली. मात्र, हीच परिस्थिती पुढेही कायम राहील असे नाही. महाराष्ट्रातील ही घटना सर्वानाच धडा घेण्यासारखी आहे. निसर्गाला एका नियमित रूपात गृहीत धरता येणार नाही, तर हवामानबदलातील उतार-चढाव बघून नियोजन करण्याचा धडा आखायला हवा.  
हवामानात होणाऱ्या बदलांवर आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने २०१३ साली ‘जागतिक ऊर्जा दृष्टिकोन’ (वर्ल्ड एनर्जी आऊटलुक) हा वार्षिक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालात २१ व्या शतकाअखेर जागतिक तापमानवाढ दोन अंश सेल्सिअसच्या खाली रोखण्यासाठी एक चतु:सूत्री कार्यक्रम नमूद केला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने विशिष्ट ऊर्जा-सक्षम पद्धतीचा अवलंब, कमी सक्षम असणाऱ्या कोळशाच्या बॉयलरचा कमीत कमी वापर व बांधणी, पेट्रोलियम इंधन आणि वायू उत्पादनातील मिथेनचे उत्सर्जन कमी करणे, खनिज इंधनाच्या वापरावरील सूट पूर्णत: कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्नांना वेग देणे या बाबींचा समावेश आहे. हवामानातील बदलांवर ‘आंतर-शासकीय आयपीसीसी पॅनल’ (इंटर-गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज) आणि ‘कायटो प्रोटोकॉल’ या गोष्टींची सुरुवात म्हणजे हवामानातील बदलांवर उपाय शोधण्यासाठी आणि त्यासंबंधीची जागरुकता आणण्यासाठी उचललेली खूप महत्त्वाची पावले होत.
जागतिक हवामान विभाग आणि भारतीय हवामान खाते यांनी नोंद केलेला भारतीय हवामानाचा गेल्या १०० वर्षांचा इतिहास पाहता (१८८६ ते १९८६ ते २०१३) भारतीय हवामान हे काही अपवाद वगळता स्थिर राहिले होते. हवामान खात्याने ३० वर्षांचा हवामानबदलाचा काळ ठरवला आहे. त्यानुसार १९०१ ते १९९० हा कोरडा काळ आणि १९९१ ते २०२० हा ओला काळ ठरविला आहे. यादरम्यान, भारताने १९ कोरडे दुष्काळ, तर १३ ओले दुष्काळ पाहिले. मात्र, त्यामागील काळात क्वचितच अत्याधिक हवामानबदल पाहायला मिळाला होता. प्रचंड औद्योगिक वाढ, बेसुमार जंगलतोड आणि ग्रीन हाऊस वायूंच्या उत्सर्जनामुळे १९८६ नंतर हळूहळू तापमानवाढ आणि हवामानबदलाला सुरुवात झाली. खऱ्या अर्थाने अत्याधिक हवामानबदल २००१ पासून सुरू झाला. आणि २०१० ते २०१३ या वर्षांत शतकातील सर्वाधिक तापमान पाहायला मिळाले. त्याचबरोबर सर्वाधिक थंडीही याच काळात पडली आणि हिमवादळे व इतरही वादळे मोठय़ा प्रमाणात आली. सर्वाधिक पाऊससुद्धा याच काळात पडला.
आयपीसीसी (इंटर-गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज) व युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्रामच्या आकडेवारीनुसार, १९५० पासून पृथ्वीच्या सरासरी तापमानात वाढ व्हायला सुरुवात झाली. आज एकूण सरासरी तापमान १.० डिग्रीने वाढले आहे. मागील १०० वर्षांत प्रथमच २०००, २००५, २०१०, २०१३ ही वर्षें सर्वाधिक उष्ण वर्षे ठरली. तसेच २०१० व २०१३ हे सर्वाधिक थंड वर्षसुद्धा ठरले. हा अभ्यास नासाच्या गोडार्ड इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस स्टडीज् या संस्थेने केला आहे. त्यांच्या मते, १९५० ते ६० च्या दशकात जागतिक सरासरी तापमान ५७ डिग्री फॅरनहीट होते. ते दर दशकात वाढत जाऊन २०१३ पर्यंत ५८.३ फॅरनहीट इतके झाले.
इंडियन कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रीकल्चर रीसर्च या संस्थेने आयएमपीची १०० वर्षांची आकडेवारी अभ्यासून अलीकडे तापमान वाढल्यामुळे थंडी, उष्णता व कमी-अधिक पावसाचे प्रमाण वाढल्याचे तसेच १५ टक्के ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्शन घटल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता हवामानबदलानुसार नव्याने बियाणे तयार करण्याची शिफारस सरकारला त्यांनी केली आहे. त्यांच्या मते, विदर्भात पूर्वी सरासरी १४०० मि. मी. पाऊस पडायचा, तो आता जिल्हानिहाय बदलला आहे. यामागील कारणांचा शोध घेतला असता औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण, जंगलतोड, कार्बन डायऑक्साइडचे वाढलेले प्रमाण आणि शहरीकरण अशी कारणे समोर येतात. परिणामी वातावरणातील ओझोन वायूचा संरक्षक थर वितळला. तापमानात वाढ झाली. ध्रुवावरील बर्फ वितळले. समुद्राच्या पाण्याची उंची वाढली. सागराची आम्लता व तापमान वाढले. कृषी व औद्योगिक क्षेत्रात उत्पादन कमी झाले आणि आरोग्यावरही त्याचे परिणाम झाले.
विसाव्या शतकात मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. पण या प्रगतीसोबतच हवामानातील बदल आणि वातावरणातील कमी होणारा संरक्षक ओझोन थर यांचे भीषण संकटही त्यातूनच उभे राहिले. जीवसृष्टीवरील दुष्परिणामाच्या रूपाने आपण ते अनुभवतो आहोत. हवामानातील बदल हा जागतिक तापमानवाढीमुळे होणारा सर्वाधिक चिंताजनक परिणाम आहे. अनेक देशांमध्ये, विशेषत: युरोप आणि अमेरिकेसारख्या देशात हवामानातील बदल स्पष्टपणे जाणवत आहेत.
२०१० ते २०१३ या काळात अत्याधिक हवामानबदलाच्या अनेक घडामोडी घडून आल्या. या घडामोडींनुसार, २०१० ते २०११ हे वर्ष गेल्या १०० वर्षांतील सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले. २०१० ते २०१३ ही अत्याधिक हिमवादळे आणि थंडीची वर्षे ेठरली. २०१० ते २०१३ हा अत्याधिक पावसाचे व वादळांचा कालखंड ठरला. त्याचबरोबर भारतात दिवस आणि रात्रीच्या तापमानातही वाढ झाली. मान्सून लहरी बनला.
जागतिक हवामानातील या बदलांची आपण वेळीच दखल घेतली नाही आणि त्यासंबंधात योग्य ते खबरदारीचे उपाय योजले नाहीत तर आगामी काळात पृथ्वीवरील जीवसृष्टीसमोर कोणते भयावह संकट ओढवेल, याची कल्पनाच केलेली बरी.     

‘‘अलीकडेच झालेला महाराष्ट्रातील गारांचा पाऊस व वादळे हासुद्धा हवामानबदलाचाच भाग होता. यावर्षी प्रथमच फेब्रुवारीच्या शेवटी थंड वारे महाराष्ट्राकडे आले व तापमान घटले. त्याचदरम्यान अचानक उष्णतामान वाढले आणि पाश्चात्त्य विक्षेपामुळे (‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’) समुद्राकडील बाष्प घेऊन येणारे वारे आले. त्यामुळे शून्य डिग्री तापमानाची वातावरणातील पातळी खूप खाली आली आणि गारांची वादळे झाली.’’
– प्रा. सुरेश चोपणे, खगोल व हवामान अभ्यासक

‘‘महाराष्ट्राने २३ फेब्रुवारी ते १६ मार्चदरम्यान अनुभवलेला हवामानबदलाचा तडाखा हा वादळी वाऱ्यांसह गडगडाटी पाऊस आणि गारपिटीचा (थंडरस्टॉर्म) परिणाम आहे. साधारणपणे मार्चमध्ये अशी वादळे येतातच. मात्र, यावेळी त्यांचा वेग अधिक असल्यामुळे त्याचे परिणाम अधिक जाणवले. खाली गरम हवा आणि वर थंड हवा असेल तर अशी वादळे होतात.’’
– अक्षय देवरस, हवामान अभ्यासक