21 November 2019

News Flash

विस्मृतीत गेलेली पुस्तके

य गो. जोशी हे प्रामुख्याने कथालेखक म्हणून आपल्याला परिचित आहेत; आणि काही अंशी चित्रपटकथा लेखक म्हणूनही.

| March 29, 2015 01:29 am

य गो. जोशी हे प्रामुख्याने कथालेखक म्हणून आपल्याला परिचित आहेत; आणि काही अंशी चित्रपटकथा लेखक म्हणूनही. प्रस्तुत पुस्तक प्रथमत: लेखमाला रूपाने ‘सह्याद्री’त प्रसिद्ध झाले व नंतर पुस्तक रूपाने. त्यापूर्वी य. गो. जोशींचे ‘पुनर्भेट’ (७ भाग- १९३२)- कथासंग्रह, ३ कादंबऱ्या, ३ नाटके इतके साहित्य प्रकाशित lok06झाले होते. त्यातून य. गो. म्हणजे गंभीर प्रकृतीचे लेखन असे समीकरण रूढ झाले असावे. त्याला बराचसा छेद देणारे हे पुस्तक आहे.
नावाप्रमाणे या पुस्तकात अनौपचारिक अशा आठ मुलाखती आहेत, पण अनौपचारिक याचा खरा अर्थ काल्पनिक असा आहे. पुस्तकाची कल्पना काहीशी प्रस्तावनेतून येते. ही प्रस्तावना य. गों.चे चिरंजीव मनोहर यांनी लिहिली आहे, अशी कल्पना केली आहे. त्या वेळी त्यांच्या मुलाचे वय फक्त दीड वर्षे एवढे होते. प्रस्तावनेत ‘प्रस्तावनाकार’ म्हणतो, ‘ज्या पुस्तकात आम्ही प्रस्तावना लिहिणार आहोत ते आम्ही अजून वाचलेच नाही. कारण आम्हाला वाचताच येत नाही. (बहुधा घाऊक प्रमाणावर प्रस्तावना लिहिणाऱ्यांना हा टोला आहे) प्रस्तावना लेखनाचे जे एकमेव कार्य की कोणत्याही पुस्तकाची बेहद स्तुती करणे. त्यातील नसत्या गुणांबद्दल जिभल्या चाटणे; तेवढय़ा एका पुस्तकाने महाराष्ट्र आणि महाराष्ट्र वाङ्मयाचे काही भले बुरे केले आहे, असे प्रदीर्घ स्वरात किंचाळून सांगणे. त्या पुस्तकाने ‘पूर्वीच्या कित्येक पुस्तकांना मागे ढकलले असून कित्येकास पुढे ढकलले आहे,’ असे जागतिक विधान करणे.’ प्रस्तावनेच्या या मजकुरातून व शैलीतून पुस्तकाचे रूप दिसू लागते. त्यावेळच्या प्रसिद्ध व्यक्तींबद्दलची य. गों.ची मते त्यांनी मुलाच्या तोंडून वदविली आहेत. समाजसत्तावाद, विश्वकुटुंबवाद, व्यक्तिस्वातंत्र्य इत्यादी विचार वर उल्लेखिलेले श्री. गोरे (ना. ग.), श्री. खाडिलकर (र. कृ.), एस. एम. जोशी यांच्या कृतीत केव्हा उतरणार ते परमेश्वरच जाणे.’’
या काल्पनिक मुलाखती रावसाहेब गोपाळ लक्ष्मण आपटे (पोलीस प्रॉसिक्युटर), शांताराम आठवले, ना. ग. गोरे, रंगा सोहनी, सदू गोडबोले, गं. भा. निरंतर, के. नारायण काळे, गोडबोले आणि गोंधळेकर (जोड मुलाखत) या व्यक्तींच्या आहेत. काही ठिकाणी हे लेखन व्यक्तिचित्रण करते, काही ठिकाणी लेखकाची मते मुलाखत विषयाच्या तोंडी घालते. बरेचदा भाषा अतिशय खुसखुशीत आहे.
शांताराम आठवले यांना प्रश्न- ‘‘समजा आपण एखादी नवीन कविता केलीत आणि ती आपल्याला आवडली, तर लहान मुलांना आकडी किंवा फिट येऊन ती जशी किंचाळतात, तितक्याच तन्मयतेने आणि जिव्हाळय़ाने आपली कविता कधी गाता काय? किंवा कुणाला गाऊन दाखविता काय?’’
उत्तर : नाही. इतका फिट असल्यासारखा जिव्हाळा अजून माझ्या कोणत्याच कवितेत उतरला नाही.
रंगा सोहनींना प्रश्न- (त्यांच्या २१८ नाबाद धावांच्या इनिंगच्या संदर्भात) आपल्या यशाचं रहस्य?
उत्तर : ज्या वेळेला अशा धावा काढायच्या असतील त्यावेळेला फक्त एक सावधगिरी बाळगायची. आउट व्हायचं नाही. म्हणजे आपोआप धावा निघतात.
प्रश्न- क्रिकेट खेळताना तुम्हाला काव्यमय कल्पना सुचतात काही?
उत्तर- एकदा मला वाटले, क्रिकेटचा खेळ किती तात्त्विक आहे पाहा. दिवस-रात्रीच्या स्टंप्स् दोन्ही बाजूला ठोकलेल्या आहेत. काळ बोलिंग टाकतो आहे; आणि प्राणिमात्र जितक्या दिवसांच्या धावा काढता येतील तेवढय़ा काढून नंतर स्वर्गरूपी पॅव्हिलियनमध्ये फक्त खेळ चालू असताना आता तो तल्यारखान हकीगत सांगत असतो, त्यालाच फक्त उपमा सापडली नाही मला.
य. गो. जोशी जुन्या वळणाचे कथाकार समजले जातात. त्याला थोडीशी उपरोधिक शैलीत पुष्टी ते ना. ग. गोरे यांच्या संदर्भात देतात. ‘‘मी त्यांच्याकडे नेहमी जातो. पण त्यांनी आपल्या पत्नींना नाव घेत हाक मारलेली मी ऐकली नाही. त्यारून ते माझ्यासारखेच प्रतिगामी असावेत, असा मला संशय आहे.’’
‘अनौपचारिक मुलाखती’-  लेखक :  यशवंत गोपाळ जोशी, प्रकाशक विद्याधर हरि दाते- पुणे २,  प्रकाशन ६/७/१९४२

First Published on March 29, 2015 1:29 am

Web Title: forgoten books
Just Now!
X