07 December 2019

News Flash

‘लतिका’

गीता साने या आज ज्यांना माहीत आहेत त्यांना बहुधा ‘चंबळची दस्युभूमी’ (१९६५) आणि ‘भारतीय स्त्री-जीवन’ (१९८५) या पुस्तकांच्या लेखिका म्हणून परिचित असाव्यात.

| April 12, 2015 12:10 pm

गीता साने या आज ज्यांना माहीत आहेत त्यांना बहुधा ‘चंबळची दस्युभूमी’ (१९६५) आणि ‘भारतीय स्त्री-जीवन’ (१९८५) या पुस्तकांच्या लेखिका म्हणून परिचित असाव्यात. परंतु त्यांच्या नावावर दहा lok06कादंबऱ्या आहेत. (वरील दोन पुस्तकांशिवाय) त्या बुक गंगा डॉट कॉमवर उपलब्ध आहेत. गीता साने या स्त्रीवादी लेखिका म्हणून ख्यातकीर्त आहेत. मातृसत्ताक पद्धतीचा त्यांनी पुरस्कार केला होता. नेटवरील उपलब्ध माहितीनुसार, नागपूर विद्यापीठातून विज्ञान शाखेत पदवी घेणाऱ्या त्यांच्या काळातल्या त्या पहिल्या महिल्या होत्या. (त्यामुळेच प्रस्तुतच्या कादंबरीत लेखिकेच्या नावापुढे एम.एससी. ही पदवी लिहिली असावी.)
प्रस्तुत कादंबरीचे कथानक त्या वेळी (१९३५/४० या काळात) नक्कीच फार धाडसी वाटले असेल. एका मुलाची आई असलेल्या राधा या नायिकेला लग्नापूर्वीचा प्रियकर- कुमार हा वेड लागलेल्या अवस्थेत दृष्टीस पडतो. तो तोच आहे याची खातरजमा झाल्यावर तिचे प्रेम उफाळून वर येते. मागचा- पुढचा विचार न करता ती जेथे पाहुणी आलेली असते ते घर सोडून निघते आणि त्या वेडय़ाला घेऊन एका गाडीत बसते. कुठे जाणारी ती गाडी होती आणि कुठे जाऊन ती काय करणार होती, हे काहीच सुचत नसताना भरला संसार सोडून आणि पूर्वीचा प्रियकर, नव्हे ठरलेला वर वेडा झालेला असताना एका स्त्रीने हे पाऊल उचलावे हे फार आताही विलक्षण वाटते. गाडीत त्यांना एक वृद्ध आर्यसमाजी भेटतात. ते तिला व तिच्या पूर्वाश्रमीच्या वाग्दत्त वराला आसरा देतात. इयरसी-झाँसी यांच्या मधल्या एका शहरात ते राहू लागतात. ती शाळेत शिकवू लागते. कुमार बरा होतो. पण राधेच्या मनात विलक्षण संभ्रम होतो. आपण काय करायला हवे आणि काय केले? ते बरोबर की चूक? या संभ्रमात ती पडते. मुलाची आठवण येऊन ती अस्वस्थ होते. मात्र ती अतिशय दुबळी आहे. त्यामुळे ती परमेश्वरावर श्रद्धा ठेवते. दुबळी माणसे आपल्या डोक्यावर कोणताही दोष सहसा घेत नाहीत. कारण आपण अपराधी आहोत हे समजल्यावर परिणामाचे उत्तरदायित्व घेण्याचे धैर्य त्यांना नसते. परमेश्वराची काठी अशा वेळी त्यांना फार उपयोगी पडते- इति लेखिका.
पूर्वीचा प्रियकर हा आताही आपल्याला मनापासून पती म्हणून हवा आहे. ही मानसिक अवस्था/संस्कारांमुळे नाकारू बघते.
‘कुमारांना वेड माझ्यामुळे लागले. त्यांची शुश्रूषा करणे हे माझे कर्तव्य आहे. ते शुद्धीवर आले म्हणजे मी त्यांचा संसार थाटून देईन. व मग बाळाकडे जाईन. बाळा, कुमारांना माझी गरज जास्त आहे. कुमारच्या प्रेमाचे ऋणसुद्धा मला फेडले पाहिजे.’ ही एकीकडे भावना व दुसरीकडे संस्कार आणि मुलाची ओढ. अखेर संस्कारांचा विजय होतो. आणि कुमारला सोडून ती आपल्या मुलाकडे (म्हणजेच नवऱ्याकडे व सासरच्या घरी) जाते. तो निर्णय घेतल्यावर कुमार तिचे नेमके विश्लेषण करतो आणि नवऱ्याकडे परत जाण्यातले धोके समजावून सांगतो. ‘माझ्याशी राहणे जगाच्या दृष्टीने पाप आहे आणि जगाची तुला भीती वाटते म्हणून तुला परत जायची घाई झाली आहे.. पण नीट विचार कर.. जगाने वापरलेली मापे नेहमीच सचोटीची नसतात. स्वत:ची कसोटी त्यांना लाव आणि मग माझा स्पर्श तुला पाप वाटत असेल तर तू येथून अवश्य जा.. प्रथम तू आपली कक्षा का सोडलीस? बाळाचा त्याग करताना तू माता नव्हतीस?’
इतके सारे झाल्यावरही ती सासरी जाते. सासरची मंडळी तिला अस्पृश्याप्रमाणे वागवितात. मुलगा ओळखत नाही. नवरा कुमारकडून खरी हकीगत जाणून घेतो आणि राधा मनाने आपली नाही हे स्वीकारतो. ‘कुमार तुला परके नाहीत, परका मी आहे. तुला ते आज परके वाटतात, कारण विवाह ग्रंथीने तुला माझ्याशी बांधले आहे. माझा भविष्यकाळ तुझ्याशी संलग्न झाला होता. पण परस्त्रीवर आसक्ती ठेवण्याइतका मी नीच नाही.’ (नवरा)
अखेर ती कुमारकडे परतते. कुमारला संताप येतो. राधा सर्वाना खेळणी म्हणून वागवते आहे, असा त्याचा निष्कर्ष फार काळ टिकत नाही. तिच्यावरच्या स्वत:च्या प्रेमाची जाणीव पुन्हा होऊन तो तिला स्वीकारतो. ज्या स्त्रीवादी भूमिकेसाठी गीता साने प्रसिद्ध होत्या/आहेत त्याची स्पष्ट झलक येथे दिसते. मात्र, त्याचबरोबर ‘पुरुषी’ समाजातील पुरुषाची बाजूही लेखिका कटाक्षाने मांडते. सामान्य वाचकाची-परंपरागत मूल्ये घेऊन जगणाऱ्याची प्रतिक्रिया काय होईल हे इथे अनेक ठिकाणी दिसते. मात्र, त्याचा निषेध फार तीव्रपणे येत नाही. राधेची गोंधळलेली अवस्था आणि कुमारचा संयम, त्याचे शहाणपण यातला विरोधाभास चांगलाच खुलतो. त्यामुळे स्त्रीवादी भूमिकेला काहीसा दट्टय़ाच बसतो. मात्र कुमारच्या शहाणपणाच्या बोलात राधेच्या संभ्रमाचा तुच्छतादर्शक उल्लेख नाही. तो बराचसा तटस्थपणाचा आहे.
‘स्त्री मुक्तीवाल्या बायका’ अशी टिंगल करणाऱ्यांनी ही कादंबरी एकदा जरूर वाचावी.
‘लतिका’ (कादंबरी).
लेखिका- गीता जनार्दन साने,
प्रकाशक- गोपाळ गोविंद अधिकारी.
महाराष्ट्र प्रकाशन संस्था
प्रकाशन – १५-१-३७
पृष्ठे- १००, मूल्य- १ रु.

First Published on April 12, 2015 12:10 pm

Web Title: forgoten books latika
टॅग Loksatta Lokrang
Just Now!
X