म. ‘मी युरोपात काय पाहिले?’, लेखक- दत्तो वामन पोतदार, पहिली आवृत्ती- व्हीनस प्रकाशन, पुणे . पृष्ठे ११६. प्रसिद्धी : १९६०.
म. द. वा. पोतदार यांचे नाव घेतले की त्यांचे पूर्ण न झालेले शिवचरित्र नजरेसमोर येते. मो. ग. रांगणेकर यांच्या ‘भटाला दिली ओसरी’ नाटकात त्यांचे विडंबनही केले गेले होते. त्यामुळेत पोतदारांनी प्रवासवर्णन लिहिले याचा एक सुखद धक्का बसतो.
lr15महाराष्ट्र राज्य निर्मितीपूर्वीच्या मुंबई सरकारने १९५६ साली पोतदारांना एका अधिवेशनासाठी इटलीत पाठवले होते. ग्रंथसंग्रह कसा लावावा व ग्रंथांचे रक्षण कसे करावे, जुने लेख कसे राखावेत याबद्दल स्वतंत्र शास्त्र अस्तित्वात आले होते. दप्तरव्यवहार व दप्तरशास्त्रासंबंधात एक जागतिक संस्थाही स्थापन झाली होती. तिच्या इटलीतील अधिवेशनाला मुंबई सरकारचे प्रतिनिधी म्हणून पोतदार गेले होते. त्या प्रवासात त्यांनी जे बघितले, अनुभवले त्याचे वर्तमानपत्रे व मासिकांमधील लेख, मुलाखती, इतर टिपणे, कात्रणे यांचे संकलन म्हणजे हे पुस्तक. पोतदारांची भूमिका स्वच्छ आहे- ‘गेलो डोळे उघडे ठेवून. पाहिलेही डोळे उघडून. lr14त्यामुळे थक्क झालो तरी झपाटलो नाही. पुष्कळ पाहण्याची आणि शिकण्याची उमेद आहे. सांगतेवेळी सुचले, आठवले आणि योग्य वाटले तेवढे लिहिले.’
पोतदारांचे वय प्रवासाच्या वेळी ६६ व पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा ७० होते. हे   लक्षात घेतले की त्यांच्या भूमिकेतील वास्तवता लक्षात येते. पोतदारांचा हा विमानाचा पहिला प्रवास होता. पण त्याचे फार वर्णन ते करीत नाहीत. वमानांच्या पंख्यामुळे बाहेरचे काही दिसत नव्हते. त्यांच्या मनात विविध तरंग उठले. पण कसले, ते मात्र ते सांगत नाहीत. नोत्रदामचे देऊळ, आर्क दी त्रिऑम्फ, एफेल टॉवर या स्थळांसंबंधी पोतदार ऐतिहासिक माहिती सांगतात, पण प्रतिक्रिया फारशा देत नाहीत. पोतदारांचा हा अभ्यास दौरा होता. त्यामुळे परिषदेसंबंधी ते मनापासून लिहितात. तसेच कोल्हापूरच्या छत्रपतींच्या समाधीसंबंधी, व्हॅटिकनमधील मराठी साहित्यासंबंधी, फ्रेंच दफ्तरखान्यातील भारताच्या इतिहासासंबंधी किंवा मराठय़ांच्या इतिहासासंबंधी असलेली साधने, राष्ट्रीय ग्रंथालय (पॅरिस) अशा आपल्या अभ्यासाच्या व जिव्हाळ्याच्या विषयांसंबंधी पोतदारांनी सविस्तर लिहिले आहे. त्याचबरोबर पोतदारांचे वेगळे दर्शनही यात घडते.
‘‘इटलीच्या सांप्रतच्या जीवनात फळबागांचे उत्पन्न हे महत्त्वाचे कलम आहे. त्याला धक्का लागेल अशी भीती असो वा दुसरे काही कारण असो, भारतीय आंब्यांना सक्त मनाई आहे.’’ (पृ. ३६) ‘‘व्हांव येथे पाद्री मंडळी एक सामाजिक संस्था चालवीत होती. तिची रचना व कार्य पाहून मी विस्मितच झालो. कम्युनिझमसंबंधी अभ्यास कसून करायचे काम या संस्थेत चालते. या संस्थेतर्फे मासिके, पत्रके, ग्रंथ वगैरे पुष्कळ प्रकारचे प्रकाशनही चालू असते. एकटय़ा इंग्रजीच्या खिडकीतूनच प्रकाश घेत राहिल्याने प्रकाशाच्या दुसऱ्या lr07कोणत्याही खिडक्या आपणास दिसत नाहीशा होतात आणि आपल्या दृष्टीला व ज्ञानाला एकांगीपणा येतो आणि आपल्या विचारांना इंग्रजी रंग चढतो. त्यामुळे एक प्रकारचा पंगुपणा किंवा अधूपणा विचारात येत असला पाहिजे. इंग्रजीपेक्षाही कितीतरी पटीने मासिके, पत्रके व ग्रंथ फ्रेंच, जर्मन वगैरे भाषांतून मिळून प्रसिद्ध होत आहेत आणि त्यातील विचारांचा हिंदुस्थानमध्ये काहीच स्पर्श होत असल्याचा अनुभव येत नाही, ही गोष्ट मला जराशी भयावहच वाटते.’’ (पृ. ४८-४९)
पोतदारांनी हाऊस ऑफ कॉमन्सच्या भेटीची हकिकत सांगितली आहे. त्यातील भोजनगृहाच्या मेनूकार्डाचा फोटोही छापला आहे. त्यावर ‘टीप देण्यास मनाई आहे’ असे आश्चर्यकारक विधान आहे.
जिनिव्हा येथे गेल्यावर पोतदारांच्या मनात आले- ‘‘या लहानशा राष्ट्रात जी २२ ग्रामकुटे आहेत त्यांच्या स्वतंत्र निशाणांचे दर्शन घडवणारी चित्रे घेतली. २२ प्रकारच्या नागरिकांच्या पोशाखाचीही चित्रे घेतली. पण या अभिमानामुळे स्विस देशाच्या ऐक्याला बावीस तडे गेल्याचे कुठे ऐकिवात नाही. तेव्हा संयुक्त महाराष्ट्रावरील माझी श्रद्धा अधिक दृढ झाली (७८).’’ संपूर्ण पुस्तकात राजकीय म्हणता येईल असं हे एकच विधान.
ऐतिहासिक स्थळांबरोबरच पोतदारांनी शब्दकोशकार जॉन्सन याचे घर, कीटस् व शेली यांची दफनभूमी यांनाही भेटी दिल्या. कीटस् व शेलीवरचा मजकूर त्यांनी पुस्तक प्रसिद्ध करायचे ठरविल्यावर लिहिला. कीटस्च्या मृत्यूची व शेलीच्या शेवटाची हृदयस्पर्शी हकिकत ते सांगतात. सर्व स्मारके बघितल्यावर त्यांच्या मनात सहजच भारतातील किंवा खरे म्हणजे महाराष्ट्रातील परिस्थितीसंबंधी विषाद वाटणे स्वाभाविक होते.
‘‘पुण्यातच बघितले तर बोल बोल म्हणता राष्ट्रपुरुष विष्णुशास्त्री नारायण चिपळूणकर यांचे नारायण पेठेतले घर विकले गेले. त्रिखंडकीर्ती भांडारकरांच्या संगमाश्रमाचीही तीच गत झाली. निदान अशा निवडक स्थळी लेखशिला तरी लावून ठेवाव्या! ही कामे महापालिकेने करण्यासारखी नाहीत काय? वंशजांनीही आस्था दाखवू नये काय? संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर तरी ही जागृती दिसून येईल काय?’’ ६० वर्षांपूर्वीची पिढी कशी समाधानी होती याचे दर्शन पोतदार सुरुवातीसच घडवतात.
सरकारतर्फे परिषदेस जाण्यापलीकडे कसलीही पूर्वसूचना दिली नव्हती अगर कसलेही बंधन नव्हते. या कामासाठी सरकारने मला ४००० रुपयांची मंजुरी दिली होती व रु. ३६७२ एवढे मुंबई ते रोम पहिल्या वर्गाचे भाडे मला द्यावे लागले. शिवाय पुणे-मुंबई, रोम-फ्लॉरेन्स हा परतीचा हिशेब निराळा. जेवणखाण वाहनखर्च वगैरे निराळा.’’ (पृ. २) मात्र याबद्दल त्यांची नाराजी ते मांडत नाहीत.
पुस्तकात पोतदार मराठी शब्दांचा कटाक्षाने वापर करतात. वर कोट (over coat) अग्रमान (Priority) हस्तपाद प्रक्षालन, काककूप (Cockpit) पाळणाचालक (Liftman) पदार्थसूची (Menu card) रस प्राश (fruit juice) टाकणी (Dustbin) असे अनेक प्रयोग दिसतात.
साठ वर्षांपूर्वीचे हे पुस्तक पोतदारांचे व्यक्तिमत्त्व तर आपल्याला दाखवितेच, पण त्यावेळच्या महाराष्ट्राच्या बौद्धिक परंपरेच्या, सामाजिक विचारसरणीचाही परिचय घडविते. प्रवासवर्णनाची बरीचशी सूत्रे नकळत या लेखनात येतात. पण त्याहीपेक्षा लेखकाचे अनुभव यादृष्टीने त्याचे महत्त्व अधिक. आपल्या विषयासंबंधी कळकळ, उत्तरदायित्वाची भावना आणि संयमित शैली यामुळे पुस्तक खूपच प्रभावित करते.    

jalgaon, raver lok sabha seat, rohini khadse, eknath khadse, facebook page, remove father s image, ncp sharad pawar, bjp, maharashtra politics, lok sabha 2024, election 2024, marathi news,
रोहिणी खडसे यांच्या फेसबुक पानावर एकनाथ खडसे यांच्या छायाचित्रास फाटा
caribbean writer maryse conde profile author maryse conde information zws
व्यक्तिवेध : मारिस कॉण्डे
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
What Devendra Fadnavis Said?
“आमचं स्वप्न शरद पवारांनी पूर्ण केलं, मी त्यांचे आभार मानतो”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत