News Flash

‘आर्यलिपी’चे उत्खनन

‘आर्यलिपी’ या पुस्तकात लेखक गो. का. चांदोरकर यांनी देवनागरी लिपी, मोडी लिपी, अशोका लिपी, पाली व संस्कृत भाषा यांची विस्तृत चर्चा केली आहे.

| February 15, 2015 01:07 am

‘आर्यलिपी’चे उत्खनन

‘आर्यलिपी’ या पुस्तकात लेखक गो. का. चांदोरकर यांनी देवनागरी लिपी, मोडी लिपी, अशोका लिपी, पाली व संस्कृत भाषा यांची विस्तृत चर्चा केली आहे. आपल्या लेखनामागची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणतात, ‘लो. टिळकांनी असे प्रतिपादन केले आहे की, कोणत्याही राष्ट्रात केवळ सजीवता असून उपयोगी नाही, ते lok06राष्ट्र मनुष्याचे होण्यास त्या सजीवतेबरोबरच महत्त्वाकांक्षा असली पाहिजे. महत्त्वाकांक्षा ही स्वाभिमानावाचून उत्पन्न होणे शक्य नाही. स्वत:चे गतकालीन दृष्कृतीने व दुर्दैवविलासाने आमचा ज्या परकीयांशी सहवास घडला आहे ते अत्यंत धूर्त असल्याने आम्हातील ही आत्ममीती घालविण्याचा त्यांचा सततोद्योग सुरू आहे. याहून अधिक वाईट गोष्ट म्हणजे आमच्यापैकीच काही लोक परकीयांना याबाबतीत ज्ञानाच्या अभावामुळे किंवा स्वार्थीपणामुळे मदत करीत आहेत. आमचा क्षणोक्षणी होत असलेला तेजोभंग व आमच्यात उत्पन्न झालेला किंवा केलेला अविश्वास या दोन घोर संकटांचे निवारण करणे हेच या काली श्रेष्ठ कर्तव्य आहे.’
या विचारांनी प्रेरित होऊन लेखकाने भारतीय वर्णमालेला इ. स. पूर्वी चारशे वर्षांहून अधिक जुन्या काळी अस्तित्व नव्हते, भारतीय वर्णमाला इतर वर्णमालांचे अनुकरण करून वा त्यावरून बेतलेली आहे असा विविध पाश्चिमात्य विद्वानांचा जो आरोप होता/ जे प्रतिपादन होते, तो खोडून काढण्यासाठी हे पुस्तक लिहिले.
पुस्तकातील निवेदनांची रूपरेखा प्रकरणे, उपप्रकरणांच्या शीर्षकावरून स्पष्ट होते.. लिपीची आवश्यकता, लिपीचे स्वरूप, लिपीचे पुराणत्व व कर्तृत्व, प्राकृताचा उद्गम, पाली- सामान्य विचार, मोडी व बालबोध अशोक लिपी व मोडी- प्राकृताचे साम्य, आमच्यातील एक वृद्ध प्रवाह, मोडीच्या व्युत्पत्ती, उपसंहार.
पुस्तकाच्या पहिल्या भागात परकीय विद्वानांचे प्रतिपादन अत्यंत पद्धतशीरपणे लेखकाने खोडून काढले आहे आणि भारतात लिपी सात हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात होती हे सिद्ध केले आहे.
दुसऱ्या भागात प्राकृत भाषा संस्कृत बोलणाऱ्यांची संख्या वाढीस लागल्यावर कशा तऱ्हेने उगम पावली असावी ते सांगून पाली भाषेसंबंधी लेखक म्हणतात, ‘पाली ही प्राकृताप्रमाणेच संस्कृतापासून निघालेली आहे. म्हणजे तीही प्राकृतच आहे. आणि तिच्यातील अशुद्धाचा भरणा पाहून ती कनिष्ठ वर्गात प्रचलित असलेली प्राकृत असावी व मागधी आणि संस्कृत यांच्या दरम्यान ती आहे; म्हणजे मागधीहून ती अर्वाचीन आहे असे तिच्यासंबंधी अनुमान काढतात.’
जशी मूळ संस्कृत भाषा अपभ्रष्ट होऊन तिची पाली तशीच मूळ देवनागरी जी असेल तीही अपभ्रष्ट होऊन तिची अशोककालीन पाली- जिला औपचारिक ब्राह्मी हे नाव देतात- ती बनली असावी. प्राकृतास जशी ती संस्कृतजन्य म्हणतात, तद्वतच अशोकाच्याही पूर्वी म्हणजे फार प्राचीन काळी मोडी ही बालबोध अथवा जिला देवनागरी म्हणतात, तिच्यापासून निघाली असे म्हणण्यास हरकत नाही.’
त्यानंतर लेखकाने बालबोध व मोडी यांतील साम्य-भेदांची चर्चा केली आहे आणि पुढे मोडी व अशोक लिपी एकच आहे हे सिद्ध करायचा प्रयत्न केला आहे.
एकविसाव्या शतकात अशा विविध लिपी व त्यांचा अभ्यास यांचे महत्त्व ते काय, असा प्रश्न पडणे अगदी शक्य आहे. मोडी, पाली यांचा प्रसार पुन्हा होणे अशक्य वाटते. तरीही या पुस्तकाचे महत्त्व हे, की शंभरहून अधिक वर्षांपूर्वी राष्ट्रीय अस्मिता जागी करण्याचा प्रयत्न जसा वृत्तपत्रे, ग्रंथ, नाटके यांतून झाला, तसाच काहीसा प्रयत्न या छोटय़ा पुस्तकाने केला. मात्र, केवळ तेवढेच उद्दिष्ट न ठेवता अधिक व्यापक चर्चा करण्याचाही प्रयत्न केला. त्या काळात पाली, मागधी या भाषा मृत झाल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांची सैद्धान्तिक चर्चा कालबाह्य नव्हती. मनोरंजन व राष्ट्रीय जागृती अशा दोन समकालीन प्रवाहांतला हा एक उपप्रवाह म्हणायला हरकत नाही.
‘आर्य लिपी’- गो. का. चांदोरकर, प्रकाशन वर्ष- १९०७. पृष्ठे- ९८.   

मुकुंद वझे   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2015 1:07 am

Web Title: forgotten books arya lipi che utkhanan
Next Stories
1 आजच्या गावाचा ‘सातबारा’
2 गेले ते दिवस..
3 चैतन्याचा झरा
Just Now!
X