12 December 2019

News Flash

‘पेशवाईच्या सावलीत’

जमाखर्च हा एखाद्या पुस्तकाचा विषय होऊ शकतो का? तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य माणसाची जमाखर्चाची उबळ फार दिवस टिकत नाही.

| March 15, 2015 03:20 am

जमाखर्च हा एखाद्या पुस्तकाचा विषय होऊ शकतो का? तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य माणसाची जमाखर्चाची उबळ फार दिवस टिकत नाही. पण उद्योग, व्यापार, संस्था आणि राज्यकर्ते यांच्या जमाखर्चाच्या वह्यांना बरेच काळ टिकणारे महत्त्व असते. परंतु त्याचे पुस्तक निघणे सामान्य माणसाला lok06असंभाव्य वाटेल.
‘पेशवाईच्या सावलीत’ हे पुस्तक अशा प्रकारच्या जमाखर्चाच्या वह्यांचे आहे. ‘बदलापूर’कर्ते चापेकर यांची विविध विषयांवरची पुस्तके प्रसिद्ध झाली होती. (एडमंड बर्कचे चरित्र, गच्चीवरील गप्पा, वैदिक निबंध, पैसा, समाज नियंत्रण, साहित्य समीक्षण, निवडक लेख) शीर्षकात नमूद केलेले पुस्तक आहे ते पेशवाईसंबंधी. मात्र, ते सावलीत असलेला माणूस गुणगान करतो तसे नाही. प्रत्यक्ष जमाखर्चाच्या वह्या संपादन करून त्यावरून त्यावेळच्या सामाजिक जीवनावर कसा प्रकाश पडतो, हे लेखकाने दाखविले आहे.
म. म. द. वा. पोतदार यांनी या पुस्तकाला पुरस्कार लिहिला आहे. त्यात त्यांनी चापेकरांपूर्वी हे काम (हिशेबाच्या वहय़ा व अस्सल स्वरूपात त्या जमा करून अभ्यासण्याचे काम) न्या. रानडे यांनी सुरू केले होते, पण फारसे अभ्यासक त्याकामी पुढे आले नाहीत, असे नमूद केले आहे.lr18पुस्तकातला मजकूर अस्सल असला- म्हणजे जमाखर्चाच्या नोंदी अधिकृत असल्या तरच त्यावरून सामाजिक परिस्थितीसंबंधी निष्कर्ष काढणे शक्य होते. त्यासंबंधी लेखकाने स्वत: खात्री दिली आहे.. ‘शिल्लक बंद जमाखर्ची लिखाणातून या पुस्तकातली माहिती घेतली असल्याने तिची सत्यता शंभर नंबरी कसाची भरेल यात मात्र शंका नाही.’ ज्या प्रस्तावनेत ही खात्री दिली आहे ती जवळजवळ ८० पृष्ठांची आहे आणि त्यात बहुतांशी जमाखर्चाच्या नोंदीवरून काढू शकले जातील/ काढता येतील, असे निष्कर्ष दिले आहेत. प्रस्तावनेत चापेकरांनी पुस्तकाची मर्यादाही मोकळेपणाने सांगितली आहे. या पुस्तकाला ऐतिहासिक महत्त्व नसले तरी सामाजिक, व्यापारी, धार्मिक व भाषिक इतिहास लिहिणाऱ्याला ‘पेशवाईच्या सावलीत’मध्ये विपुल सामग्री मिळण्यासारखी आहे.
११ प्रकरणांच्या या पुस्तकात पेशव्यांची माहिती, महसूल, राज्यव्यवस्था, न्यायव्यवस्था, सावकारी व्यवहार, सामाजिक, धार्मिक, औषधे, भाषिक अशा विविध अंगाने नोंदी व त्यावरील काही निष्कर्ष आहेत. ते वाचले की पेशवाईसंबंधी आपली मते बरीचशी ढवळून निघतील. नमुन्यादाखल येथे काही नोंदी व निष्कर्ष उद्धृत केले आहेत..
* बारा महिने काम करूनही अकरा महिन्यांचा पगार द्यावयाचा अशी वहिवाट होती.
* कारकुनाने जे सरकारी काम करायचे ते करण्याकरिता त्याला ज्याचे काम असे तो पैसा देत असे. त्यास ‘कारकुनी’ म्हटले जात असे.
* कल्याणच्या सुभेदारालासुद्धा (रामराव अनंत) सुभेदारीचे पत्र आणण्यासाठी रु. २०,०००/- पेशवे सरकारास द्यावे लागले. त्यास ‘नजर’ असे म्हटले आहे. रु. ४०००/- नाना फडणीस, रु. २०००/- नारोपंत परचुरे, रु. ५०/- लक्ष्मणपंत देशमुख. (या रकमा २०० वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यावरून याची भयानकता ध्यानात यावी.)
* जकात ही उत्पन्नाची बाब समजत. सडका केल्या, वाटेत बंदोबस्त केला म्हणून जकात वसूल केली पाहिजे, ही भावना नव्हती. घाटांची दुरुस्ती करत, पण अगदी जुजबी. (म्हणजेच सध्या महाराष्ट्र शासनात पेशवाई चालते.) मुंबईहून वाईस सुरण नेताना अर्धा आणा जकात द्यावी लागे.
* मनुष्यांची खरेदी-विक्री पेशवाईअखेपर्यंत चालू होती. पुरुष खरेदी केले जात असत. ते बहुधा मुसलमान असत. कोणत्याही वयाच्या पोरीसोरी विकत घेता येत असत. त्यात शूद्र स्त्रियांचा भरणा असे. विकत घेतलेल्या वस्तूंप्रमाणेच ‘विकत घेतलेली माणसे’ गहाण ठेवता येत असत/ ठेवली जात असत.
(आज हे वाचताना अंगावर काटा येतो. निग्रोंच्या गुलामगिरीबद्दल तत्कालीन अमेरिकन लोकांना दूषणे देणारी आपली मान यामुळे खाली जाते. ‘पुराणकाळी आमच्याकडेही विमाने होती..’ असल्या विधानांच्या जातीचे हे विधान नाही, हे लक्षात घ्यायला हवे.)
* इंग्रजांकडे चाकरी करणे हा दंडपात्र गुन्हा होता.
* प्रदक्षिणा घालण्याने पुण्य मिळते, हा समज दृढ होता. लक्ष प्रदक्षिणा घालणे जिकिरीचे काम. ते इतरांकडून करून घेतले जात असे. पिंपळाला एक लाख प्रदक्षिणा घातल्या तर हजारी चार आणे; पण मारुतीला अकरा हजार प्रदक्षिणा घातल्यास हजारी एक रु. दर होता.
..अशा अनेक उद्बोधक, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी या पुस्तकात सांगितल्या आहेत. मात्र, ते वाचताना आपला भ्रमनिरास होऊ शकतो. याची मानसिक तयारी ठेवूनच त्या वाचाव्यात.
काय सांगावं, आपण आपल्या जमाखर्चाच्या वह्या पाच-दहा वर्षे प्रामाणिकपणे लिहिल्या, तर आपल्या वैयक्तिक आयुष्याचे प्रतिबिंब त्यात सामाजिक चालीरीतींबरोबर पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

‘पेशवाईच्या सावलीत’ :
लेखक- ना. गो. चापेकर,
प्रकाशक- ल. ना. चापेकर.
प्रकाशन- शके १८५९ (सन १९३७) मूल्य- ४ रु.
भारत इतिहास संशोधन मंडळ पुरस्कृत गं्रथमाला
पुष्प ३४.  

First Published on March 15, 2015 3:20 am

Web Title: forgotten marathi book peshwai chya savli
Just Now!
X