कौस्तुभ केळकर- नगरवाला

जिगरी मतर सदाभौ यांस,

दादासाहेब गांवकरचा दंडवत.

 

कळविन्यास लई आनंद होवून ऱ्हायलाय की तुम्चं टपाल शुपरफाश्ट भ्येटलं. मजकूर बी ध्यानामंदी आला. वैनीसायेबास्नी आम्च्या कारभारनीनं क्येलेला चिवडा, चकल्या आन् शंकरपाळी पसंद पडली न्हाईत वाचून लई आनंद जाला. चालतंय की!

शेम टू शेम. आमास्नी आम्ची बायकू पसंद हाई, पर तिचा फराळ न्हाई. तिची काय बी मिश्टेक न्हाई बगा. दिवाळीपत्तुर पाऊस मुक्कामी व्हता गावाकडं. शंकरपाळी सांदळनार की! येरवी हिनं क्येलेल्या चकल्या तिच्या सोभावावानी येकदम कड्डक. त्या बी नरम गरम ह्य टायमाला. चिवडय़ामंदी शेंगदाणे घातलेच न्हाईत तर तुमास्नी कसं गावनार? परवडत न्हाई सदाभौ. काजूचा भाव हाई शेंगदाण्याला. आवं तुम्च्या दोगांच्या दातान्ला लंबी जिंदगी भ्येटंल तेच्यापाई. आखिर तक तुमाला सेल्फीमंदी सोताचं दात काडून कडकडून हसायला भेटंल.

म्हनून न्हाई घातलं शेंगदाणे चिवडय़ामंदी. खरं सांगू का सदाभौ, तुमी जैसे थे वैसा फराळ, गोड मानून घेत्ला यातच आमास्नी आनंद हाई. आवं उद्या आमी फराळाच्या ताटात पॅकबंद खुशखुशीत कुरकुरे पाटीवलं तरी बी कुरकुरीत न्हाई म्हून कुरकुर करत्याल वैनीसायेब. कसं? राग मानू नका सदाभौ. आमी आप्ला कंट्री इनोद क्येला. तुमी गालो गालों में, गोलगप्प्यांवानी हसून ऱ्हायलंय. आमाला पुन्यांदा आनंद जाला.

बाकी या टायमाची टपालकी तुमी आनंद पें कुरबान क्येली. लई झ्याक वाटलं. तुम्चं म्हननं रास्त हाई. आनंदाचा आन् झोपेचा लई नजदीकचा रिश्ता हाई सदाभौ. रात के हमसफर, निशाचर, वटवाघूळ, देर रात तक जागनेवाले आन् सकाळच्याला उन्हं डोक्यावर येईपत्तुर हातरुनात लोळनारे नेहमी आनंदी असत्यात. त्यांची जिंदगी नळश्टापवानी येकदम हसीन आसती. सकाळच्याला नळाला पानी न्हाई आलं तरीबी त्यांना दुखदर्द होत न्हाई. ‘जगी सर्वसुखी, सदानंदी कौन हाई?’ जो इन्सान दुनियेला इसरून, समदी गनगन फाटय़ावर मारून दुपारच्या टायमाला दोन घंटे आडवा होवून डाराडूर घोरतो, त्यो खरा देवानंद. त्येचा सदरा सुखी मान्साचा सदरा. सुखाच्या गावाची वाट, पुन्यांदा पुणे मुक्कामी पोचून ऱ्हायली सदाभौ. पुन्याचा आनंदाचा टीआरपी जगामंदी टापला. काहून? दुपारची झोप. मानूस जितका आडवा, तितका चांगला. त्यो आडवा जाला की दु:ख, आसूया, भांडण, टंटा, समदं इसरून जातो. सपान बगतू. डोळं मिटून सपनों की दुनियेमंदी हरवून जातू. बल ग्येला आन् झोपा क्येला. चालतंय की! चारा पानी, म्येनटनन्स वाचला. झोपला म्हून खुश हाई गडी. सदाभौ, गावाकडं चावडीम्होरं वडाचा पार हाई. दुपारच्या टायमाला पाराखाली मिले सूर म्येरा तुम्हारा चालतंया. समदी जनता सूरामंदी घोरत पडल्येली. सरपंच लई खूश. उद्या पब्लिक जागी जाली तर? नुस्ता सवाल जवाब. नुस्त्या कम्प्लेन्टा. ढीगभर डिमांडा. यापरीस पब्लिक झोपलंय त्येच बेश. मेरे अंदर के शैतान को मत जगावो. आरं न्हाई जागं करनार कुनी.

सदाभौ, आवं आप्लं पब्लिक झोपल्येलं हाई तरीबी देश आनंदी न्हाई? मेरा गाँव, म्येरा देश.  झ्येपंना गडय़ाहो!

जगन्यासाटी आनंदाची दारू लागत्ये सदाभौ. आन् काही लोकान्ला आनंदात जगायसाटी दारू लागत्ये. कभी खुशी कभी गम. जिंदगीत सुखाची चांदी आन् दु:खाची मंदी दोगी बी आल्टून पाल्टून येत्यात. आम्च्या गावचा नरसू पलवान गडी. दारूच्या नादी लागला. आयुष्याचा इस्कोट. गम और खुशी. कंच्या बी वक्ताला नरसूला दारू लागायची. पसं पुरंना. तेची बायकू मेटाकुटीला आली. आम्च्या आबासायेबांनी नरसूची दारू सोडवली. एक हफ्ता आबासायेबांनी नरसूला दारू पाजली सोताच्या पशानं. नरसूच्या मनावर बिंबवलं. कौन म्हन्तं दारू वाईट? ती ब्येशच हाई. फकस्त सोताच्या पशानं पिनं वाईट. दुसऱ्याच्या पशानं दारू ढोसली की डबल नशा चढती. आटव्या दिसाला नरसूला लाथ घालून हाकीलला. दोन चार दिस दोस्तांनी पाजली. तेच्यानंतर अशा फुकटय़ाला कुनीबी जवळ करीना. आपुआप दारू सुटली तेची. येकदम कोरडाठाक. दारूबिगर जगन्याची नशा चढली हाई नरसूला. समदं घर आनंदी. पर लाईफ म्येंबर गिऱ्हाईक तुटलं म्हून गुत्तेवाला दुक्खी हाई. या गममंदी तो सोताच प्यायला लाग्ला हाई. मारल आफ दी श्टोरी काय सदाभौ? येकाचा आनंद दुसऱ्याला दुक्खी करून सोडतो. अशानं समदा देश आनंदी कसा हुनार?

माग्च्या म्हैन्यात गावामंदी येक साधु आल्ते. स्वामी शेल्फीनंद. येकदम माडर्न साधु. श्मार्ट फूनवाले. जगन्याची टेक्नालाजी बदलून ऱ्हायलीय साधुम्हाराज. आनंदात जगायचंय? सेल्फीश व्हा. श्मार्ट व्हा.

सोतासाटी जगा. दुनियेची फिकीर करू नगा. मी माझा. जिथं जाताल तिथं शेल्फी काडा. थोबाडपुश्तक, कायआप्पा, शोशल मिडीयावरनं ते शेल्फी जगाला पाटवा. तुमी भारी हाटलामंदी जाऊन नाश्ता करून ऱ्हायलाय याच्यामंदी कसला आनंद?

घास खान्याअगुदर शेल्फी काडा. आजकाल कुनी बी बेनं भारी हाटलात जातंया.. ह्य़े शेल्फी बगून जवा पब्लिकच्या प्वाटात दुक्खल तवा शेल्फी पाटीवनारा आनंदी हुईल. त्यो खरा जगन्यातला आनंद. शेल्फीबाबा की जै! दोन चार लोग मारामारी करून ऱ्हायलंय, कुनी पान्यामंदी बुडून ऱ्हायलंय, आक्शीडंट झालंया. नवराबायकूचा भांडनटंटा चालू हाई? तुमी मदी नका पडू. तुमी फकस्त शेल्फी घ्या. पटाटा फोटू काडा आन् होवू दे व्हायरल.  खरा आनंद. तुमी ट्रीपला ग्येलं, धबधब्याखाली भिजून ऱ्हायलंय.. काडा शेल्फी. तेच्यापाई येखादा खपला तरीबी गम न्हाई. तुमी शेल्फी काडनं सोडू नगा. बी शेल्फीश, बी आनंदी. गावामंदी लई फालोअर्स हाईत शेल्फी बाबांचं. कालच्याला गणूचं धाकटं पोरगं टमरेल आन् श्मार्टफून घेवून वावरात गेल्तं. समद्या गावाला टशन. तेच्या फूनची ब्याटरी शंपली आन् गावाचा जीव भांडय़ात पडला. कुनी तरी आवरा ते शेल्फीबाबान्ला.

आनंदी रहायचं आसंल तर शापिंग आन् शिपिंग मश्ट हाई सदाभौ. आवं गावाकडनं गाडी भरून जवान लोग शापिंगला जातात पुन्याला. लक्ष्मीरोडला न्हाई, क्याम्पात न्हाई. तेन्ला मालमंदीच जावं लागतंया. मालमंदी शापिंग न्हाई क्येलं तर तेला फाऊल म्हन्त्यात सदाभौ. तिथल्ला चकचकाट बगून गावाकडची पोरं गडबडून जात न्हाईत. कंच्या ब्रान्डला कंची आफर हाई तेन्ला बराब्बर ठाव हाई. गावाकडं बी आनलाईन शापिंग चालतंया. कापडं, फून, चप्पल, बूटं समदं आनलाईन मागवत्यात. बिलाचं आकडं बापाचा जगन्याचा ब्यालन्श बिगडवून ऱ्हायलाय सदाभौ. बाप ब्येचारा अनवानी रानात राबतुया आन् पोरगं ब्रान्डेड शूज घालून फटफटीवरनं गाव उंडारतंय. पोरगं खूश म्हून आईबाप आनंदी. लायकीपेक्शा जास्त लाड पुरवत्यात. सौता मन मारून जगत्यात, ते आईबाप आनंदी कसं सदाभौ? शापिंगचा आनंद लई वंगाळ. भस्म्या रोगावानी. शापिंगची लत लागती. किती बी घ्येतलं तरी मन भरत न्हाई.

बाजूवालीकडची साडी बगीतली की बायकूला शेम टू शेम साडी पायजेल. कपाटामदला ढीग तिला याद न्हाई. डिट्टो तशी साडी भेटल्याबिगर तिला चन न्हाई. सदाभौ, दोन चार घंटे बायकूबरूबर जो दादला साडीच्या शापिंगला जाईल, जो गडी बायकू म्हनंल त्या साडीचं त्वांड भरून कवतिक करंल त्यो खरा शापिंगानंद. त्यो खरा लक्ष्मीनारायनाचा जोडा. तेचा संसार सुखाचा हुईल.

बाकी शिरीयलमदलं, जाहीरातीतलं न्हाईतर आन्ना मुव्हीमदलं जग येगळंच आसतंया सदाभौ. रिअलमंदी आसं काय बी न्हाई. तिथल्ली भारी भारी कापडं, नयानवेल्या लाम्बडय़ा गाडय़ा, राजमहालावानी घर, हॅन्डशम नवरा-बायकू, हसमुख गुबगुबीत प्वारं.

समदं झूठ. आपल्या फूनमंदी भारी डाटा प्लान मारायचा. कानामंदी हेडफूनाचं कानातलं खुपसायचं. फूनच्या इवलाशा श्क्रीनवर त्यो चकचकाट, येश्टीच्या बाकावर धक्कं खात डोळं भरून बगायचा. ती दुनिया आपली न्हाई. त्ये सुख आपल्या नशिबी न्हाई म्हून आपला श्टापवर गुमान उतरून जायाचं, हीच खरी शिरीयल हाई. येकदम रियल. तेच्यामंदीच आनंद शोधायचा.

पीकपानी, जमीनजुमला, शिक्शन, नौकरी समदीकडं नुस्ती घालमेल.

कशात आनंद मानायचा? आशानं देश कसा आनंदी हुनार?

सांगतू सदाभौ. आम्च्या गावाकडं इठोबाचं मंदिर हाई. तिथल्ले पुजारीबोवा. देवमानूस. सदा आनंदात ऱ्हानार. हसमुख च्येहरा. द्य्ोव आन् मानव यांच्यामदलं कनेक्शन जनू. येकटा जीव सदाशिव. येक दिस तेन्चा अध्याय संपला. गावाला लई दुक्ख जालं. जो त्यो शोक करू लागला. पुजारीबोवांचा येक शिष्य हाई.

तो म्हन्ला, रडता कशापाई?

आनंदी ऱ्हावा. सुखाचं मरन आलंया आम्च्या म्हाराजान्ला. काहून? ते शेवटपत्तुर आनंदात जगलं. दुसऱ्याच्या आनंदात तेन्नी सौताचा आनंद शोधला. आहे त्यात समादान हाईच. पर सौताच्या आध्यात्मिक परगतीसाटी ते नेहमी पुडं पुडं जात ऱ्हायले. शिकत ऱ्हायले. तेच्या आनंदात जगन्याचा बी सोहळा जाला आन् मरनाचा बी. आनंद कभी मरते नही!

सदाभौ, ह्योच खरा फारम्युला हाई. आनंदी राहन्याचा ह्योच खरा मंत्रा हाई. दुसऱ्याच्या आनंदामंदी जवा आपल्याला सौताचा आनंद गावंल तवाच समदा देश सुखी हुईल. आहे तेच्यामंदी आनंद न मानता, देसाच्या परगतीसाटी जवा परत्येक जन घाम गाळील, पुडं पुडं शिकत जाईल, सौताला सिद्ध करील तवाच देश परगती करील. आनंदी हुईल.

सदाभौ, आमाला पूरा यकीन हाई. आम्चं ठरलंया. मी, तुमी,आमी समदा देश ह्योच फार्म्युला फालो करनार. आप्ला देश सुखी हुनार. आनंदी देशांच्या लिष्टमंदी टापला जानार.

तवा फिकीर नाट सदाभौ. खुशियाँ मनाव, सदानंदी रहो!

आनंद देवो भव!

 

तुम्चा जीवाभावाचा दोस्त,

दादासाहेब गांवकर.

kaukenagarwala@gmail.com